डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ ।। तनामनाची व्यथा ।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(ते ऐकून तनुजाला खूप वाईट वाटलं होतं. ती तडक घरी परत आली होती. इथून पुढे …

येणारे जाणारे तनुजाचं घर बघून आश्चर्यचकित होत. “ किती ग सुंदर घर ठेवलं आहेस तनुजा ! आम्हाला नाही ग बाई असं चैत्रगौरीच्या आराशीसारखं चकचकीत घर ठेवायला जमणार.”

तनुजाची मुलगीही आपली रूम नीट ठेवायला शिकली. पसारा करणारा दादा गेला अमेरिकेला.

त्या दिवशी राजीव घरी आला तर त्याला सोफ्यावर मासिके, सेंटर टेबलवर खायच्या डिशेस दिसल्या.  पाण्याचे ग्लास तसेच पडलेले. झालं ! त्याने रियाला आणि तनुजाला धारेवर धरले आणि खूप बोलला दोघीना. अगदी इथपर्यंत,की “ हे माझं घर  आहे,नीट ठेवणार नसाल तर  इथे  राहू नका. तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे.” 

रिया तिच्या खोलीत  निघून गेली आणि तनुजा काहीही बोलली नाही. रात्री बेडरूम मध्ये आल्यावर ती म्हणाली, ” हे अती होतंय तुझं राजीव ! घर माणसांसाठी असतं,, का माणसं घरासाठी गुलाम म्हणून असतात? सारखी त्याची चाकरी करायला? तुझ्या वागण्याला  obsessive compulsive disorder असे नाव आहे  बरं का – अती करू नकोस. वेळीच जागा हो. हवी तर डॉक्टरची मदत घे, मी येते तुझ्या बरोबर. पण आता हे वेड टोकाला गेलंय तुझं. नीट विचार कर. अरे किती सहन करायचं आम्ही? सततच आम्ही घाबरून असतो, कारण कधी तुझा स्फोट होईल ते सांगता येत नाही. मी खूप वाचलंय याबद्दल. काही लोक दिवसातून चाळीस चाळीस वेळा हात धुतात, तर काही  वीस वेळा अंघोळच करतात.  तूही याकडेच झुकायला लागला आहेस  राजीव. आम्हाला घराबाहेर जा म्हणण्याइतकं का आम्ही वाईट वागतो, का घर वाईट ठेवतो? नीट विचार कर. आता तुझ्या या स्वभावाची मला भीती वाटायला लागलीय. पहिल्यांदा कौतुक केले सगळ्यांनी, की राजीवला नीटनेटकेपणा, टापटीप आवडते. अडगळ अजिबात चालत नाही. पण आता आम्हाला याचा त्रास होतोय. नीट विचार कर, नाहीतर आपलं घर उध्वस्त होईल तुझ्या या अतिरेकापायी.”

राजीव विचारात पडला. ‘ खरंच आपण असे वागतोय का? आणि ती टोकाची स्वच्छता आणि न सहन होणारी अडगळ कधीपासून आपला ताबा घेऊन बसलीय? ‘ 

राजीव म्हणाला, “ तनुजा, तुम्ही बरोबर आहात. मी  आपल्या डॉक्टर मित्राची अपॉइंटमेंट घेतो पुढच्या आठवड्यात. ऑफिसमध्येही मला आता हे जाणवू लागलंय. मी खूप चिडचिड करतो,लोकांना वाट्टेल ते बोलतो. टेबलवर जरा जरी अडगळ दिसली, तरी मला ते सहन होत नाही. नक्की माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम असावा “.

तनुजाला गहिवरून आले. तिने राजीवला जवळ घेतले. “ होईल सगळे ठीक राजीव. आपण जाऊया तुझ्या   सायकॉलॉजिस्ट मित्राकडे. मीही खूप बदलले तुझ्यामुळे. खूप छान स्वच्छतेच्या सवयी लागल्या मलाही. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला, की तो गुणही दोषच होतो ना. आपल्या मुलांनाही जाच व्हायचा याचा.

त्यांचे मित्र त्यांनी कधी घरी आणले नाहीत, हे लक्षात आलंय का तुझ्या ? अरे, आईवडिलांनी केलेली माया, धडपड नाही दिसत मुलांना. पण लावलेली शिस्त, दिलेला मार मात्र बरोबर लक्षात ठेवतात  रे ते. आमचेही  अतिशय प्रेम आहे तुझ्यावर, आणि हवाच आहेस तू सगळ्यांना.  पण  नॉर्मल बाबा आणि  नॉर्मल नवरा हवास तू राजीव.”

पुढच्या आठवड्यात राजीव आणि तनुजा , डॉ. निर्मल उपाध्याय यांच्याकडे गेले. निर्मल राजीवचा  शाळेपासूनचा मित्र. त्याने नीट सगळे ऐकून घेतले आणि तनुजाला म्हणाला, ” तू ही थांब आत. मी  

राजीवला  संमोहनाखाली नेणार आहे, आणि अर्थात इन्ट्राव्हेनस इंजेक्शन्स ही देणारच आहे.”

डॉ. निर्मलने राजीवला  संमोहनात नेले…. 

” राजीव, तू आता पंधरा वर्षे मागे जा. काय आठवतंय तुला?”

“ मी इंजिनिअर झालोय. माझं लग्न ठरलंय तनुजाशी. छान आहे ती.” 

 “ राजू, तू आता शाळेत आहेस. काय आठवतंय तुला?”

राजीवची अस्वस्थ हालचाल झाली. तो म्हणाला, ” मी दुसरीत आहे ना? नको नको. मला असं करू नका ना काका. इथे अडगळ आहे. कुबट वास येतोय.धूळ आहे. मला सोडा. “

राजीव किंचाळू लागला. डॉ. निर्मलने राजीवला इंजेक्शन दिले आणि तो गाढ झोपला..

तनुजाला डॉ. निर्मल म्हणाले, “ तनुजा, राजीवच्या लहानपणाच्या वाईट आठवणींशी याचा संबंध आहे बघ. पुढच्या आठवड्यात पुन्हा आपण हे सेशन करू. मला खात्री आहे, राजीव यातून बाहेर येईल.” 

राजीव घरी आला, आणि त्याला हे काहीही आठवले नाही. डॉ. निर्मलने त्याला काही गोळ्याही सुरू केल्या होत्या.

पुढच्या आठवड्यात डॉ. निर्मलने पुन्हा राजीवला संमोहनात घातले. पुन्हा तसेच झाले…. 

डॉ. निर्मलने विचारले, ” राजीव, कोण आहेत रे हे काका? काय करतात तुला ते? “

राजू अस्वस्थ झाला…  ” आमचे लांबचे काका आहेत ते. गावाकडेअसतात. नेहमी नाही येत आमच्याकडे, पण मला नाही आवडत ते. मला खाऊ देतात आणि वर अडगळीच्या खोलीत नेतात आणि घाणेरडे चाळे करतात. मला किती दुखतं मग. काका,सोडा मला .. सोडा ना .”

राजीव हातपाय झाडू लागला. “ राजीव, तू हे आईबाबाना नाही का सांगितलंस?”

“ कित्ती वेळा सांगितलं मी, पण त्यांनी मलाच मार दिला. आई म्हणाली,’ मोठ्या माणसाबद्दल असं बोलतात का?” आणि मलाच अडगळीच्या खोलीत कोंडून ठेवलं तिनं. काका,तुम्ही घाणेरडे आहात, वाईट आहात.” राजीव रडायला लागला. .. जणू आठ वर्षाचा लहानगा राजीवच तिथे  हुंदके देऊन रडत होता.

 तनुजाच्या  डोळ्यातून पाणी येऊ लागले. तिने राजीवला जवळ घेतले. “.राजू,आता नाही हं असे कोणी तुला करणार. मी आहे ना तुझ्याजवळ ?” 

“आई ग, तुला खरं वाटतंय ना गं  मी सांगतोय ते? “

“ हो रे राजू. मी शिक्षा करीन त्या काकांना. कधीही घरी येऊ देणार नाही. मग तर झालं ना?”

डॉ. निर्मल चकित होऊन हे बघत राहिले. कोणीही न सांगता, तनुजाने उत्स्फूर्तपणे  राजूच्या खोल लपलेल्या जखमेवर फुंकर घातली. ती त्याची आईच झाली त्या क्षणी. जे काम त्यावेळी राजीवच्या आईने करायला हवे होते, ते तनुजाने केले. अगदी आंतरिक उमाळ्याने !

राजीवच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. “ आई ग,” म्हणून त्याने तनुजाला मिठी मारली.

डॉ. निर्मल म्हणाले, “ बघ.तनुजा, हे कारण होते राजीवच्या अतिरिक्त स्वच्छतेच्या वेडामागचे. ती अडगळीची खोली, ते घाणेरडे काका, ते कुबट वास आणि मनावरचं तीव्र दडपण. सहासात वर्षाच्या मुलावर केलेले अनैसर्गिक अत्याचार, याचा उद्रेक होता तो. आत्ताच्या भाषेत आम्ही याला ‘ चाईल्ड अब्यूज ‘ म्हणतो. कुठे तरी अंतर्मनात त्याचा संबंध होता, आणि म्हणूनच राजीवचं मन ते झटकून टाकायला , बाह्य गोष्टींची पराकोटीची स्वच्छता करू बघत असे. आता लक्षात आलं का, तो हे मुद्दाम नव्हता करत.”

तनुजाला अत्यंत दुःख झाले. आपल्या अत्यंत सज्जन नवऱ्याबद्दल तिची माया उफाळून आली.

डॉ. निर्मल म्हणाले, “ तो यातून हळूहळू बाहेर येईल. तू गप्पा मारताना हा विषय काढ. त्याला ते आठवू दे. त्याने ते खोल मनात दडपून ठेवलेले बाहेर येऊ दे.”

तनुजाने हळूहळू राजीवला मोकळे केले. त्याला ते सगळे आठवले. आपल्या अतिरेकी स्वच्छतेच्या मागचे कारण त्याला उमगले. जी गोष्ट त्याने इतके वर्ष मनाच्या कोपऱ्यात गाडून टाकली होती, ती तनुजा आणि 

डॉ. निर्मल समोर व्यक्त करताना, राजीव मोकळा होत गेला. 

राजीव यातून बाहेर आला. दोन वर्षांनी तनुजा आणि तो लेकाकडे अमेरिकेला गेले. 

निनाद एअरपोर्टवर त्यांना न्यायला आला होता. घरी जाताना गाडीत म्हणाला, ” बाबा,रागावणार नाही ना? माझा फ्लॅट एकदम अस्ताव्यस्त आहे हं. मी त्यातल्या त्यात आवरलाय पण तुमचा तो  शंभर टक्के निकष  नका लावू हं प्लीज. मला वेळच होत नाही हो आवरायला.” 

बाबा, तनुजा त्याच्या घरी पोचले. त्या फ्लॅटला बघून पूर्वीच्या राजीवने आकाश पाताळ एक केले असते. पण राजीव म्हणाला, “ ठीक ठेवलाय की फ्लॅट. इतका काही वाईट नाही रे. मस्त आहे,आवडला मला.अरे,तुम्ही मुलं महत्वाची मला. “ 

मुलगा आश्चर्यचकीतच झाला आणि म्हणाला, “ आई, हे काय बघतोय मी? आपले बाबाच बोलताहेत ना 

हे ? मी तर तुम्ही रागवाल म्हणून हॉटेलमध्ये रूम पण बुक करणार होतो.”

“नाही रे वेड्या. सुंदर आहे हाच फ्लॅट. तुझे बाबा बदललेत आता. ही तुझ्या आईची आणि निर्मलकाकांची कृपा. ते विसर आता. सांगेन कधीतरी. ” राजीव निनादला जवळ घेऊन म्हणाला.

निनादच्या डोळ्यात पाणीच आले. “ हे पहिल्यांदा  घडतंय बाबा, तुम्ही मला जवळ घेताय.”

“हो रे निनाद… बाळा नकळत अन्यायही झाला माझ्या हातून तुम्हा मुलांना वाढवताना. पण आता क्षमा कराल अशी आशा आहे. “ 

“काय हे बाबा ! “ असं म्हणत आईबाबांना मिठीच मारली निनादने, आणि हास्यविनोदात 

खायच्या डिशेस, कपबश्या, सगळे टेबलावर तसेच पडलेले टाकून तिघेही गप्पांमध्ये रंगून गेले.

— समाप्त — 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments