डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

।। गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

लग्नानंतर अगदी दोनच महिन्यात दिवस गेले म्हणून सगुणाबाई अगदी नाराज झाली. तिला फार हौस, नटण्या मुरडण्याची, नवऱ्याबरोबर सिनेमाला जायची, जत्रेला जाऊन पाळण्यात  बसायची ! हे सगळं आता दिवस गेल्यावर  बंद पडणार, म्हणून तिला वाईटच वाटलं. सासू म्हणाली, ‘ का ग उगीच तोंड पाडून बसलीस? होतंय तर होऊ दे की  लगेचच. शेजारची रखमी मूल मूल करतीय आणि तुला नको म्हणायचा माज आलाय व्हय.’ 

सगुणी काहीच बोलली नाही. मुकाट्यानं  गेली परसात, कच्ची पपई खाल्ली, म्हणाली, ‘ जाईल पडून गर्भ. अजून तर दोन महिने पण नाही झाले.’ मग दुसऱ्या दिवशी चार अंडी खाल्ली. कोण जे सांगत होतं ते करत होती सगुणा. पण तो चिवट गर्भ काही पडेना. दिसामाशी तो वाढू लागलाच. नवराही शेवटी तिला रागावला, म्हणाला, ” काय ग चाललंय तुझं? दिलंय देवानं तर घे की मुकाट ! होतंय लवकर मान्य आहे पण तुला कुठं मोठं नोकरीला जायचंय ग? ”

  सगुणा काही बोलायची नाही, पण मनोमन तिरस्कारच केला  तिनं त्या गर्भाचा ! दिवस पुढे पुढे गेले,आणि त्या पोटातल्या बाळाने तिला खरोखर काहीच त्रास नाही दिला. योग्य वेळी सगुणा प्रसूत झाली. दवाखान्यात नर्सने डॉक्टरला बोलावून आणले. ‘ सर, तुम्हीच लवकर या. मला तर काही समजत नाहीये. ” डॉक्टर हा जगावेगळा निरोप ऐकून, तसेच रात्री दवाखान्यात आले. नर्स कोपऱ्यात उभी होती. ” सर,बाळ बघा ना ! “

 डॉक्टरांनी बाळ उघडे करून बघितले. त्या दुर्दैवी बाळाची दोन्ही लिंगे अविकसित होती. मुलगा, का मुलगी, हे त्यांनाही नीट ठरवता येईना. त्यांना अतिशय वाईटच वाटले. सगुणासारखी विचारत होती, 

” डॉक्टर, काय झालं मला? मुलगी असली तरी मला चालेल. नीट आहे ना माझं बाळ? “ डॉक्टराना तिला काय सांगावे हेच समजेना. होहो, छान आहे हं बाळ तुमचं, मग तुमचं आवरलं की देतो हं जवळ. ‘

  मुलांचे डॉक्टरही आले. त्यांनीही बाळ बघितलं. त्यांनी सगुणाच्या नवऱ्याला बोलावलं, खरी परिस्थिती सांगितली आणि म्हणाले,’ तुम्ही दोघे अजून तरुण आहात, तुम्हाला आणखीही अव्यंग संतती होईल. हे मूल  तुम्ही कसं सांभाळणार? माझा सल्ला असा की, काही संस्था अशी मुले फार चांगली सांभाळतात. त्यांना शिक्षण देतात. तिथे याची व्यवस्था होईल. विचार करा. तुमचे आणि त्यातही त्याचे आयुष्य त्याला घरी ठेवून वाया नका घालवू.”

सगुणा आणि तिचा नवरा म्हणाले, “ हे मूल असं झालं यात त्याचा काय दोष ? माझ्या बायकोला नकोच होता तो ! ती विषारी औषधे खाऊन तर नाही ना झालं असं?” डॉक्टर म्हणाले “ तसं काही नसतं. तुमच्या आणि त्याच्या नशिबात हे होतं. बघा,कसं काय करणार ?अवघड आहे हे. “

सगुणा खूप खूप रडली, स्वतःला दोष दिले, तिला खूप अपराधी वाटायला लागले.  मूल आपलं दिवसामाशी मोठं होत होतं. लहानपणी काही लक्षात येत नव्हतं पण मोठा झाल्यावर काय? सगुणा आणि नवऱ्याला या प्रश्नाने रात्रंदिवस झोप यायची नाही.

नंतर सगुणाला पुन्हा दिवस गेले. यावेळी,ती  शहाणी झाली. तालुक्याला जाऊन, सगळी नीट तपासणी करून आली. मूल छान  निर्व्यंग आहे, कोणताही दोष नाही, हे डॉक्टरांनी सांगितले.सगुणाला याही वेळेस मुलगाच झाला. पण किती नॉर्मल खणखणीत मुलगा .. त्या दोघांचे डोळे आनंदाने भरून आले. नवीन बाळ बघायला,  लहानगा श्यामही दवाखान्यात आला. आपला छोटा भाऊ बघून खूप आनंद झाला त्याला. याचे मात्र छान  बारसे  करून, राम नाव ठेवले, त्यांनी।

श्यामला  शाळेत घातले.  शाळेत आवडायचे  श्यामला. मन लावून अभ्यास करायचा श्याम आणि पासही  व्हायचा. जसजसा मोठा व्हायला लागला,तसतसा थोडा बायकी दिसायला लागलाच श्याम. पण तेही खूप लक्षात येण्यासारखा नाही. त्याला बायकी कपडे आवडत नसत., पण तरीही त्याच्यातले वेगळेपण लपत नसेच. 

रामची  वाढ नैसर्गिकरीत्या अगदी उत्तम होत होती. खेळात, मैदानावर अगदी उठून दिसायचा राम. श्याम स्वभावाने इतका चांगला होता, की त्याला कधी रामचा हेवा वाटला नाही की द्वेष.

श्याम घरी आईला मदत करायचा.त्याला स्वयंपाक करायला फार आवडायचा.चवही फार छान होती त्याच्या हाताला. सगुणाला अतिशय वाईट वाटे या मुलाचे. आपल्या मुळेच हे वैगुण्य आले या मुलात, असं म्हणत बसे ती.  निदान या छोट्या खेडेगावात, श्यामची चेष्टा तरी करत नसत मुलं. त्याचा गोड स्वभाव आवडायचा मुलांना.

श्याम मनाने खंबीर होता. त्याला आपल्यातले वैगुण्य चांगलेच माहीत होते. मोठा होऊ लागला, तसतसे हे वाढत जाणार होते. हॉर्मोनल बदल तर होणार होतेच. श्याम शक्यतो आरशासमोर उभा राहून,आपण बायकी हावभाव करत नाही, तसे चालत नाही हे बघत असे. थोडेसे आपोआप तसे होत असेच. पण ते अगदी प्रकर्षाने  लक्षात येण्यासारखे नव्हते.

सगुणाने शामला स्वयंपाक शिकवला. ती स्वतः फार सुगरण होती. गावात तिला खूपदा बायका कार्य असले की मदतीला बोलवायच्या. तिला पैसेही द्यायच्या. श्याम तिच्या हाताखाली तयार होऊ लागला. Ssc झाल्यावर श्याम म्हणाला, “ आई,मी पुण्याला जातो. तिकडेच बारावी करतो आणि मी कॅटरिंगचा डिप्लोमा घेतो.” 

सगुणा ला अतिशय वाईट वाटले. पुण्यासारख्या महासागरात या आपल्या असे वैगुण्य असलेल्या मुलाचा निभाव कसा लागणार? सगुणाने मनाशी निश्चय केला,आपण त्याच्याबरोबर पुण्यात राहायचे. राम आणि त्याचे वडील राहतील इथेच .

सगुणाने  गरीब वस्तीत भाड्याने खोली घेतली. ती लगेचच धुणीभांडी करू लागली. पुण्यासारख्या ठिकाणी तिला कामांना काय तोटा. हिला स्वयपाकाचीही चार कामे मिळाली. श्यामला केटरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. श्यामने पहिल्याच दिवशी वर्गात मुलांना सांगितले, “दोस्तहो! मी खूप ग्रामीण भागातून आलेला गरीब मुलगा आहे. मी तुमच्यातला नाहीये. मला समजून घ्या. तुमच्या लक्षात आलं असेल, मी  देवाने अन्याय केलेल्या त्या एक टक्क्यांपैकी आहे. यात माझा काय दोष? मलाही तुमच्यासारखे शिकू द्या. इतर  किन्नर लोकांसारखी मला सिग्नलला भीक नाही मागायची. कोणीतरी होऊन दाखवायचंय मला. शाळेत मुलं करायची रे चेष्टा, ‘ फलक्या, गणपत पाटील,’ पण मी लक्ष नव्हतो देत. मला सहकार्य कराल ना? एखाद्याला जन्मतः डोळे नसतात, कोणी मुके असतात, तसा मीही एक दुर्दैवी आहे.” बोलतांबोलता श्यामच्या डोळ्यात पाणी आले. क्लासमधील मुलं अतिशय  गंभीर होऊन हे ऐकत होती. हा साधा,पायजमा,शर्ट घातलेला मुलगा,आपण होऊन हे न लाजता सांगतोय, याने त्यानाही गलबलून आले.

 तो खूप बायकी नव्हता. पण कुठेतरी काहीतरी कमी आहे, हे लक्षात आल्याशिवाय कसे राहील? वर्गातला भोसले उठून उभा राहिला.  मैदान गाजवलेला, खेळाडू होता भोसले. 

“ शाबास रे श्याम.  देतो आम्ही तुझ्या धीटपणाला आणि जिद्दीला. आम्ही सगळे तुझे मित्र आजपासून.काय ग पोरीनो,काय म्हणणे आहे तुमचे? ”

रेखा म्हणाली, “ भोसले, फार गोड आहे श्याम ! तुम्हीच त्याची पहिल्या दिवशी टिंगल  केलीत, पण आम्ही कधीच करणार नाही, केलीही नाही. श्याम, हे जाहीर सांगायचे धैर्य तुझ्यात आहे, हे केवढे मोठे आहे रे. खूप पुढे जाशील तू. आजपासून तू आमचा दोस्त.”

 शामला मनातून आनंद झाला. त्यांचा कोर्स सुरू झाला. पाठीमागे चर्चा होत असणार, हा मुलगा कोण, कसा..  पण श्यामने लक्ष द्यायचे नाही असंच ठरवलं होतं.

कमी त्रास नव्हता होत त्याला. वस्तीतही असा मुलगा आलाय,अशी बातमी पसरलीच. किन्नरांची टोळी टाळ्या वाजवत त्याला भेटायला आली. “ ए पोरा,कसलं करतो रे कालेज. ही दुनिया लै बेकार.. तुला काय जगू देणार व्हय. तू आमच्यातलाआहेस,आमच्यातच ये .बघ. ही रानी महिन्याला धा हजार कमावती. ही शबनम पन्द्रा. तू काय करतोस इथं? “

 श्यामने त्यांच्या पुढारी बाई लक्ष्मीला नमस्कार केला.

“ मावशी, तुमचं खरं आहे. पण मला साडी नाही नेसावीशी वाटत. मला कोणत्याही अनैसर्गिक भावना नाहीत. मला समजून घ्या मावशी ! काही गरज लागली, तर मी तुमच्याशिवाय कुठं जाणार? मी  तुमच्यातलाच एक आहे, पण बाई म्हणून नाही जगणार! “

— क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments