श्री सचिन वसंत पाटील
जीवनरंग
☆ कोयता… भाग – 3 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆
(कुठं रात्रीच पाणटूळ भाईर आलं तर? आणि समजा व्याली यवस्थित आणि वार पडंना झाली तर? वार कुत्र्यानं वडून न्हेली तर? तिला नुसता विचार सुद्धा सहन होईना.) – इथून पुढे —
सुलीला गेल्यावर्षी सुक्यानानाची, कुत्र्यांनी फाडून खाल्लेली शेरडी आठवली. आणि तिला ऊभं वारं सुटलं.
जेवा-खायाचं सोडून सुली शेजारच्या रघूआप्पाच्या खोपीत घुसली. सुनंदा वैनीला तिनं विचारलं,
“जेवलासा का?”
“हे न्हवं आत्ताच जेवले बग!”
“आणि तू गंऽ सुले. तू जेवलीस का?”
“जेवले मी बी!” सुलीनं दाबून खोटंच सांगितलं. उगी लांबड लागाय नगो म्हणून.
“गाड्या काय आज लवकर येणार न्हाईत म्हणं!”
“व्हय गं, म्याबी ऐकलं मघा. अण्णाच्या गाडीची टायर फुटलीया जणू! बाकी येतील की सगळी.”
“व्हयवं, आता कवा दुरूस्ती हुतिया कुणास ठावं? कारखान्याची गाडी येणार, मग जॅक लावून दुसरा टायर घालणार. मग गाडी कारखान्यावर यिऊन खाली हुणार!”
“व्हय, रात उजडंल त्येला! झोप तू आपली बिनघोरी, का आमच्यात येतीस आजच्या रोज झोपायला?”
“आली आसती खरं, ती शेरडी एक व्याला झालीया. बाळाला आणि घेतलं पायजे. जागा पुरायची न्हाय तुमच्या खोपीतबी. झोपते आपली माजी मी!”
“झोप झोप, त्येला काय हुतंय? आणि आमी हायच की हितं. काय लागलं केलं तर कवाबी हाक मार. लगी येतो!”
“तुझ्या आईचा काय फोनबीन आल्ता काय? म्हातारीच्या तब्येतीचं कसं काय कळलं का?”
“परवादिशी आल्ता. मुकादमाच्या मोबाईलवर. हाय बरं म्हणत्या. कवा बिगाडतंय, कवा सवंनी आसतीया. हाय तसंच म्हणायचं!”
आसंच काहीबाही दोघी बोलत बसल्या. तोवर बैलगाड्या आल्याचा आवाज आला. बैलांच्या गळ्यातील चाळ, साठ्यातला पत्रा वाजताना ऐकू येऊ लागला. “आरं शिरप्या हैऽ.. चलरंऽ..!” गाडीवानाचा आवाज लांबून येत होता.
सुली आपल्या खोपीबाहेर आली. आपला अण्णा आज येणार नाही, हे माहीत असूनही तिनं सगळ्या गाड्या नजरेनं धुंडाळल्या. त्यात तिचा अण्णा तिला कुठंच दिसत नव्हता. तिची घोर निराशा झाली.
हळूहळू सगळ्या गाड्या आपापल्या जाग्यावर गेल्या. उदास मनानं पाय ओढत ती आपल्या खोपीत आली. गाड्या आल्यामुळे तळ काही काळ जिवंत झाला. काही वेळ जनावरांना वैरणपाणी देतानाचे आवाज. पुरूष माणसं जेवताना बोलत असलेली. टोळीत काही दारूडेही होते. येताना टाकुनच आलेले. विनाकारण आपल्या बायकापोरांना शिव्या हासडीत होते.
काही वेळातच सारे चिडीचूप झाले. दमूनभागून आलेली अंगे विसावली. मेल्यागत मुरगाळून पडली. सुलीनंही पातेल्यातल्या भाताचे चार घास खावून घेतले. घास जात नव्हतं. भूकच मेली होती. भाताचं घास तसंच पाण्याच्या घोटाबरोबर गिळलं.
तळावर अंधार दाटला होता. रात्रीचे नऊ-साडेनऊ झाले असावेत. पाण्यात पडल्यागत तळ शांत झालेला. सगळं वातावरण थंडगार झालेलं. मधेच एखाद्या बैलाच्या गळ्यातील घुंगरांची किनकिन नि रातकिड्यांची किरकिर तेवढी ऐकू येत होती. बाळाच्या शेजारी पटकूर हातरून तिने पाठ टेकली. तोवर शेरडीची धडपड ऐकू आली. ‘अगं बाईऽ..! वैरण टाकायची राह्यलीच की!’ असं स्वतःशीच पुटपुटत ती पुन्हा उठली. शेरडीला बारीक-बारीक कोंबऱ्या आणि शेवरीची मूठ टाकली. शेरडी कुरूकुरू शेंडे कुरतडू लागली.
बराच वेळ ती शेळीकडे एकटक बघत अंगणात उभी राहिली. वातावरण चिडीचूप झालेलं. तिनं आभाळाकडं बघितलं. नुकतीच पौर्णिमा होऊन गेल्यामुळं टिपूर चांदणं पडलेलं. ढगाआडून चंद्राची कोर बाहेर आली. तिचा झिरपलेला पांढराशुभ्र प्रकाश खोपीवर पडला. चांदण्याच्या त्या मंद प्रकाशानं सारा तळच न्हाऊन निघालेला. खोपीवरला वाळला पाला चंद्राच्या लख्ख प्रकाशानं उजळून निघाला होता. हळूहळू खोपीच्या निर्जिव सावल्या आपले पाय पसरत चालल्या होत्या.
सुली आत आली. चुलीवरची चिमणी विझवली. अंथरुणावरती अंग टाकलं. तिला आपल्या आईची आठवण झाली. आईनं जाताना दिलेल्या सूचना तिला आठवल्या. झोपताना चिमणी बंद करायची. बाहेर कुणी बोलवलं तर जायचं नाही. ओळख असल्याशिवाय बोलायचं नाही. असं बरंच काहीबाही ती अंथरुणावर पडल्या पडल्या आठवत होती.
हळूहळू झोप येऊ लागली. डोळे पेंगुळले. तिला झापड पडली. पहाटेच्या निबिड अंधारातली अस्वलं तिला आठवू लागली. त्यांचे नख्या असणारे पंजे. तोंडावरचे काळेभोर केस. माणसांसारखी दोन पायांवर उभी राहून ती पुढे पुढे चालत येतायत…
ती दचकून उठली. घामानं डबडबलेली. तोंड पुसलं. थोडं पाणी पिऊन घेतलं. पुन्हा अंथरुणावर पडली. तिने मन घट्ट केलं. कशाला घाबरायचं नाही, असं ठरवलं. ती पुन्हा झोपी गेली.
मध्यान रातचंच कसल्यातरी आवाजानं ती दचकली. काळजात चमक उठली. दाराबाहेर कुणीतरी खोकल्यासारखं झालं. तिने डोळे उघडले. अंधाराचा ती अंदाज घेऊ लागली. कोण असावं इतक्या रात्री? का आलं असावं? बुलटवाला मुकादम तर नसेल? असेल, तर तो का आला असेल? एवढ्या रात्री? त्याला माहीत आहे, आज अण्णा-आई घरात नाहीत. त्या संधीचा फायदा उठवायचा आहे का त्याला?
मनात प्रश्नांचं काहूर माजलं. ते झटकून ती अंथरुणावरून उठली. खिडकीपाशी गेली. तिने एक डोळा बाहेर लावला. कोणच कसं दिसेना? ती तशीच थोडावेळ थांबली… कारखान्यावरची कुणी उडाणटप्पू पोरं आली असावीत का? काय नेम सांगावा तेंचा? ती तशीच थोडावेळ कोणोसा घेत थांबली. पण, परत काहीच हालचाल नाही. तिचे डोळे मिटू लागले.
तिथनंच गुडघ्यानं रांगत-रांगत ती अंथरुणावर आली. कलंडली. तिची झोप लागली. पुन्हा थोडा वेळ गेला. दार ढकलल्यासारखा आवाज आला. पाल चमकावी तशी ती चमकली. खडबडून उठली. खच्चून जोरात ओरडली, “कोणाय तेऽ..!”
बाहेर कुणी पळून गेलेल्या पावलांचा आवाज. लांब लांब जाणारा. तिने खिडकीतनं बघितलं तर बाहेर कुणीच नव्हतं. टिपूर चांदणं तळावर पसरलेलं.
ती अंथरुणावर येऊन बसली. कोण असावं ते? मुकादम? कारखान्यावरची पोरं? की आणखी कोण? आज्जीनं काढलेला नवरा नंदू तर नसेल? काळाकुट्ट. बसलेल्या नाकाचा. अंगावर केस असणारा. अस्वलासारखा दिसणारा! तिची मती गुंग झाली. कोण असावं? एवढ्या रात्री येण्याचा त्याचा काय उद्देश असावा? पेपरला आलेल्या, टिव्हीवर सांगितलेल्या बलात्काराच्या घटना ती ऐकून होती.
ती विचार करू लागली. असं घाबरून राहिलो तर आपणही उद्या पेपरची बातमी होऊन जाऊ? आई-अण्णानं येवडी आपल्यावर जबाबदारी टाकलीया ती पार पाडली पायजे. आता इथनं पळ काडायचा न्हायी. काय हुईल त्येला सामोरं जायाचं. आल्या संकटाला धिरानं तोंड द्यायला पायजे… खरंतर तिचं पोरपण आता सरलं होतं. विचाराला बळकटी आली होती. असे अनेक प्रसंग बाईच्या जातीला निभावून न्यावे लागतात, याची बारीकशी चुणूक आज यौवनाच्या उंबरठ्यावर असताना तिच्या वाट्याला आली होती.
विचार करता-करता तिचं लक्ष कुडाला अडकवलेल्या कोयत्याकडं गेलं. आणि लख्खकन तिच्या मनात विचार आला. त्या विचारासरशी तिने कोयता उपसला. हातात घेतला. त्याची धार तपासली. अगदी पुढं येणाऱ्या हाताचं मनगट एका घावात तुटण्यासारखी कारी धार होती त्याला. आणि कोयता चालवून ऊसाचे कंडके पाडायचा अनुभवही तिच्या गाठीशी होता.
ती पुन्हा झोपली. एक हात तिने बाळाच्या अंगावर टाकला होता तर दुसर्या हातात तिने कोयत्याची मूठ गच्च धरली होती. आता तिला कुणाची भिती वाटत नव्हती. मुकादमाची, कारखान्यावरच्या पोरांची, नंदूची आणि त्या अंधारातल्या अस्वलांची सुद्धा!
— समाप्त —
© श्री सचिन वसंत पाटील
विजय भारत चौक, मु. पो. कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली.
मोबा. ८२७५३७७०४९.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈