सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ अम्मी आणि मम्मी – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

त्या दोघी सातवीच्या वर्गात असताना प्रथम भेटल्या एकमेकींना. दोघी आपापल्या देशातून न्यूयॉर्कच्या या फ्लशिंग हायस्कूलमधे आल्या होत्या. इथे आल्यानंतर दोघी इंग्लिश भाषेशीच नव्हे, तर बऱ्याच नव्या बदलांशी  झुंजत होत्या. नवीन देश, नवीन वातावरण आणि अनोळखी लोकांमधे सापडलेल्या दोन अजाण मुली! एक पाकिस्तानच्या लाहोर सारख्या मोठ्या शहरातून आलेली आणि एक भारताच्या झाबुआ सारख्या मागास आदिवासी प्रदेशातून. एकजण वर्गाच्या या कोपऱ्यात गुपचूप बसलेली असायची, तर दुसरी दुसऱ्या कोपऱ्यात.

एकदा जेवणाच्या सुट्टीत दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. दोघींना एकमेकींचा एकटेपणा जाणवला. दोघी एकमेकींशी बोलण्यासाठी उत्सुक झाल्या. एकमेकींशी मैत्री करण्यासाठी आतुर झाल्या. हळुहळू, इतके दिवस नाईलाजानं गप्प रहाणाऱ्या तृपितचं बोलणं सुरु झालं. तहरीम तशी अबोलच होती. लाहोरसारख्या मोठ्या  शहरातून आलेली होती, पण शहरी गोंगाटापासून दूर रहाण्याचीच सवय होती तिला. आपल्या अंतरंगातच  रमणारी होती ती. त्याविरुद्ध तृपित, झाबुआच्या केसाळ, चपळ मांजरीसारखी जहाल! एक शांत, तर एक बडबडी. दोघींची अशी काही गट्टी होत गेली, की दोघी एकमेकींना पूरक होत गेल्या.  

तहरीम आणि तृपित, त अक्षराचं फक्त यमक तेवढं जुळत होतं, बाकी दोघींच्या व्यक्तिमत्वात जमीन आसमानाचा फरक होता. तहरीमच्या ओठांवरच्या स्तब्धतेतल्या सगळ्या गोष्टी तृपितच्या ओठांवर यायच्या. एक जण गुपचूप आपलं काम करणारी होती, तर दुसरी, काम करणाऱ्यांना हसवून हसवून बेजार करणारी! तहरीमकडून तृपित तिचा गंभीरपणा घ्यायची, आणि तिच्या ओठांवरच्या हसण्यातही झळकणारा तिचा उफाळता उत्साह तिला द्यायची.

एक शांत रहाणारी तर दुसरी बडबडी अशा या दोन मुलींचं मूळ बघायला गेलं तर आणखीनच आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट होती. भारत-पाकिस्तान या देशांशी झाबुआ आणि लाहोर जोडलेलं होतं. एक भिल्लांच्या प्रदेशातून आलेली, तर दुसरी पठाणांच्या वंशातली होती. हे दोन्ही वंश म्हणजे, अव्वल दर्जाच्या लोखंडासारखे मजबूत, पण या दोघी मुलींना या शब्दांच्या अर्थाच्या गहनतेशी काय देणं-घेणं होतं? तुझं तुला लखलाभ असो! लाहोरचं लाहोरला आणि झाबुआचं झाबुआला! कारण आता त्या लाहोरमध्ये नव्हत्या, की झाबुआमधे पण नव्हत्या! “आता तर आपण न्यूयॉर्क मधे आहोत!” त्या गल्ल्या-आळ्या मागे टाकून नव्या गल्ल्यांमधे, नव्या वळणांवरुन, नव्या वाटा, नवी ध्येयं शोधत आता त्या मैत्रिणी झाल्या होत्या- एवढं त्यांना पुरेसं होतं.

हळुहळू बरोबर रहाणं, बोलणं वाढत गेलं. एकजण हिंदी बोलायची, तर दुसरी उर्दू. पण दोघींना त्यात काही फरक जाणवला नाही. दोघींना असं वाटायचं, की या दोन्ही भाषांची फक्त नावं वेगवेगळी आहेत. अगदी एकसारख्याच तर आहेत दोन्ही भाषा. ना हिला उर्दू लिहायला आवडत, ना तिला हिंदी लिहायला!  हिंदी, उर्दू लिहिणं सुटलं म्हणून दोघी खूश होत्या. पण आता इथे इंग्रजीशी झगडावं लागत होतं, रोजची डोकेफोड चाललेली होती. ESL म्हणजेच, इंग्लिश अॅज ए सेकंड लँग्वेज च्या वर्गात जाणं इथल्या हुशार मुलांच्या नजरेत भलतंच अपमानजनक मानलं जायचं, पण करणार काय? दुसरा काही इलाज नव्हता. पहिल्याच दिवशी वर्गात शिक्षिकेनं जी काय बडबड केली, ती या दोघींच्या सपशेल डोक्यावरून गेली. त्यांचे कोरे चेहरे बघून लगेचच त्यांना ESL च्या वर्गात पाठवण्यात आलं. दोन अपमानित मुली एकमेकींचा सन्मान बनल्या. कोणाला सांगाय-सवरायला वेळच मिळाला नाही, या दोघींना  A B C D माहित आहे, इंग्रजी लिहिता पण येतं, पण वर्गात ही जी बडबड चालते, ती त्यांच्या आकलनापलीकडची आहे! इतक्या वेगात कसं कोणी इंग्रजी बोलू शकतं? त्या दोघी तर आधी हिंदी-उर्दू तून विचार करणार, ते बरोबर आहे की नाही, हे तोलून बघणार मग बोलणार, तोपर्यंत तर ते बोलणं म्हणजे, मंद गतीने दिल्या जाणाऱ्या बातम्यांचा कार्यक्रम होऊन जायचा! एकमेकींशी बोलताना विचार करकरून इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करता करता मधेच केंव्हा हिंदी-उर्दू मधून बोलायला लागायच्या, ते त्यांचं त्यांनाही कळत नसे.

जेवणाच्या सुट्टीत दोघीजणी बरोबर खाण्यासाठी अशा जागी जाऊन बसायच्या, की जिथे आपापले पराठे लपवून खाण्याची गरज पडत नसे. ESL वरून तर कटकट झालीच होती, वर आणखी यांचं जेवण बघून ही कटकट अजूनच वाढली असती. तहरीमच्या आईला हिंदी सिनेमांचं फारच वेड होतं. तिने तहरीमला लाहोरला असताना कित्येक हिंदी सिनेमांच्या गाण्यांवर नाच करायला शिकवलं होतं. ती गाणी जेंव्हा केंव्हा तिच्या तोंडून यायची, तेंव्हा तृपितही तिच्या सुरात सूर मिळवत असे. दोघी मिळून ही गाणी गाताना त्यातून एक तिसरीच  भाषा जन्म घेत असे, त्यांच्या मैत्रीची भाषा, जी अनिवार्यपणे त्यांच्या जवळिकीचं कारण बनत असे. सगळं काही जणू मोजून मापून घडवलं जात होतं. नात्यांच्या मजबुतीसाठी हे मोजमाप आवश्यकच असतं. मग कोणी ते तराजू घेऊन तोलो न तोलो, मोजो व न मोजो पण सतत तराजूची एखादी तागडी वर खाली होतच असते. त्या दोघींच्या तागड्या समान तर होत नसत, पण थोड्या वर खाली होऊन, थोड्या डगमगून मग बरोबर होऊन जायच्या.

ही म्हणायची, “ठीक आहे, काही होत नाही”

ती म्हणायची, “काही प्रॉब्लेम नाही!”

तृपितला तिचे शिक्षक टपित म्हणायचे, तर तहरीमने त्याचं टप्पू करून टाकलं!

“अगं टप्पू, प्रॉब्लेमचा अर्थ एखादी बाब किंवा गोष्ट असा होतो.”

“अर्थ काहीही असू दे, काही बिघडत नाही.”

आणि मग निष्पाप अशा हसण्यात दोघी बुडून जायच्या! अभ्यासाशी या दोन्ही मुलींचा संबंध तसा कमीच होता. जास्तीत जास्त वेळ दंगामस्तीतच जायचा. वर्ग चालू असताना कसाबसा वेळ काढत असत दोघी. वर्गांची गरज तर फक्त तास चालू असताना बसण्यापुरतीच होती, त्यानंतर तर नवनवीन खोड्या काढणं, हूडपणा करणं चालू असायचं. कधी हिच्या घरी, कधी तिच्या घरी येणं जाणं तर चालूच असायचं.

एकीची अम्मी होती, तर एकीची मम्मी होती. दोघीही पास्त्याला शुद्ध तुपातली जिऱ्याची फोडणी द्यायच्या. पिझ्झा हिरव्या चटणीबरोबर खायच्या, एवढंच नाही, तर सुपाच्या वाडग्यात बुडवून बुडवून चपाती, रोटी खायच्या! दोघीही नमाज आणि पूजा करायच्या वेळी जीन्स आणि शर्ट वर ओढणी घ्यायच्या. एक चिकन, बिर्याणी सारख्या डीश बनवायची, तर दुसरी शिरा, पुरी, छोले हे बनवण्यात रमून जायची.

या दोघींच्या बिल्डींग पण जवळपासच होत्या. कोणीही तृपित कुठली आहे, किंवा तहरीम कुठली याची काही चौकशी केली नाही. तहरीमच्या घरच्यांनी विचार केला असावा, की पाकिस्तानातच कुठेतरी रहाणारी असावी, आणि तृपितच्या घरच्यांनी विचार केला असेल, की भारतातलीच असेल. असंही असू शकेल, की असा काही विचारच त्यांच्या मनात आला नसेल. या सगळ्या चौकशा करायला वेळ तरी कोणाजवळ होता? घरातला प्रत्येक जण या नव्या देशात आपली मुळं रुजवायच्या मागे लागलेला होता. आधी उदरनिर्वाह आणि मग इतर काही! घरातली मुलंही नव्या वातावरणात इंग्लिश बरोबर झगडतानाच वेगवेगळ्या प्रकारचे नवे चेहरेही आपल्या आसपास बघण्याची सवय लाऊन घेत होती.

थोड्याच दिवसात त्या दोघी अगदी घट्ट मैत्रिणी झाल्या. घरी येणं-जाणं, खाणं-पिणं सगळं काही कधी या घरी, तर कधी त्या घरी व्हायला लागलं. तृपितच्या घरी तिची आजी पण होती. आजोबा जाऊन तर खूपच वर्षं होऊन गेली होती. दोघी शाळेतून घरी यायच्या, तेंव्हा त्यांना आजीच जेवण वाढत असे. एक दिवस बोलण्या बोलण्यातून आजीला कळलं की तहरीम मुसलमान आहे. तिला धक्काच बसला. या शब्दाबद्दल विलक्षण तिटकारा होता तिला. हा शब्द बोलणं, ऐकणं हा सुद्धा जणू अपराध होता! पण या मुलीचा हळुवारपणा, नाजुकपणा खूप आवडायचा आजीला. तिनं विचार केला, जाऊ दे, ठीक आहे, मुसलमान असली तरी उत्तर प्रदेशातल्या लखनौच्या आसपासचीच असेल. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश एकमेकांचे शेजारीच आहेत. इतकी अदबीनं बोलते, की लखनवी शैलीची झाक दिसून येते!

“तहरीम, पोरी, कुठली आहेस तू? लखनौ, की त्याच्या आसपासची?”

तिचं उत्तर ऐकून आजीच्या तोंडाचा आ वासलेलाच राहिला. हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. खाली विखरून पडलेल्या काचेच्या तुकड्यांमधे तिच्या धाकट्या मुलाचा चेहरा तिला दिसू लागला. प्रत्येक टोकदार तुकडा सरळ तिच्या मनावरच हल्ला करू लागला. आजीच्या या प्रतिक्रियेकडे दोन्ही मुलींचं लक्षच नव्हतं, त्या आपापसात बोलत कशावर तरी जोरात हसत होत्या. इकडे आजी स्वतःशीच बडबडत होती, “कार्लं तर आहेच, शिवाय, वरून लिंबू पण चोळलेलं आहे. म्हणजे, आपल्या भारतातले मुसलमान नाही, तर पाकिस्तानातले मुसलमान आहेत.”

त्या दिवशी घरात वादळ तर उठणारच होतं, नशीब, आजी तहरीम तिच्या घरी जाईपर्यंत काही बोलली नाही. नाहीतर त्या बिचाऱ्या छोट्या मुलीच्या मनाला किती त्रास झाला असता! तहरीम परत गेल्याक्षणीच आजीने घरात थयथयाट सुरु केला. तृपितची मम्मी पण कामावरून तेंव्हाच घरी आलेली होती. मग काय विचारता?

“देवा, देवा, हिनं तर आपल्या वैऱ्याशी मैत्री केली आहे! सांभाळ हिला! आपला धर्म भ्रष्ट करून घेईल ही! ती कार्टी पाकिस्तानी आहे!”

“खुन्यांशी कोणी मैत्री करतं का?”

“या लोकांनी माझ्या मुलाचा जीव घेतलाय, खुनी आहेत ते!”

“मांस-मटण तर खातच असणार हे लोक, अशा घरात येणं जाणं आहे या पोरीचं!”

“तुला माहीत नाही का, हे खुनी आपलं आणि पाकिस्तानचं नातं कधी धड होऊ देत नाहीत ते!”

क्रमश: भाग १

मूळ हिंदी कथा – अम्मी और मम्मी – मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments