जीवनरंग
☆ आता ती बघू शकेल. – भाग १… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆
(मागील भागात आपण पाहिले – प्रसादची आई म्हणाली ताई मला माहित्येय तुम्हाला काय विचारायचे आहे. मीच सांगते. तुम्हाला असं वाटतं ना प्रसाद आरती सारख्या आंधळ्या पोरीशी का लग्न केले आणि ती फोटो कसे बघू शकेल? आर्यनच्या आईनं होकारार्थी मान डोलावली. – आता इथून पुढे )
ताई, मी एका गरीब शेतमजुराची मुलगी आहे, माझ्या आई बापाने घरची थोडीफार शेती असलेल्या घरात माझे लग्न लावून दिले होते. घरची शेती काही फार जास्त नव्हती , पण खाऊन पिऊन सुखी होतो एवढंच. लग्नानंतर चार महिन्यांनी शेजारच्या शेतकऱ्याने शेताच्या बांधावरून भांडण उकरून काढले. भांडण एव्हढे विकोपाला गेले की शेजाऱ्यांनी रागात प्रसादच्या बाबांच्या डोळ्यात विषारी कीटक नाशक ओतले. खूप दवाखाने केले. डॉक्टर केले. पण त्यांचे डोळे गेले ते कायमचेच.’ आर्यनच्या आईच्या तोंडातून ‘आई ग , कीती निर्दयी आणि अमानुष’ असे उद्गार निघाले.
‘आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते, प्रसादच्या बाबांचे डोळे जाऊन आणि त्यांचा इलाज करण्यात दोन महिने गेले होते. लग्नानंतर सहाव्या महिन्यात मला पाळी आली तेव्हा, प्रसादचे बाबा बोलले, माझं आयुष्य तर आता अंधारात जाईल, आपल्याला मूलबाळ झालं नाही. तुला मी काडीमोड देतो, तुझे दुसरे लग्न झाले तर तू तरी सुखी राहशील. कशाला माझ्या आंधळ्या सोबत आयुष्याची नासाडी करतेस मला सांभाळत राहून?’ त्यावेळी मी ठाम राहिले त्यांनी माझ्या सुखासाठी मनापासून घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान वाटला आणि मी त्यांचा निर्णय नाकारला. घरातल्या शेतीची सगळी सूत्र मी हाती घेऊन संसार करू लागले. एक वर्षाने आम्हाला प्रसाद झाला पण वयाच्या नवव्या वर्षी त्याचा एक डोळा गेला. त्यावेळी खूप खचायला झाले पण प्रसादच्या आंधळ्या बाबांनी धीर दिला. माझे दोन डोळे गेलेत त्याचा एक तरी आहे ना, माझ्यावेळी हार नाहीं मानलीस मग आता का खचून जातेस?’
प्रसाद अभ्यासात हुशार होता, अभ्यास आणि शेती करता करता तो बँकांच्या आणि सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा देत होता. दीव्यांग कोट्यातून त्याला बँकेत चांगली नोकरी लागली. आता वर्षभरापूर्वी प्रसादचे बाबा वारले. वर्षभरात त्याचे लग्न करायचे म्हणून त्याच्यासाठी मुली बघायला लागलो. प्रसादला एक डोळा नाही म्हणून कधी मुलगी तर कधी मुलीचा बाप नकार देऊ लागला. कोणी कोणी तर मुलीच दाखवत नव्हते. जवळपास वीस एक ठिकाणी नकार आला होता.
आर्यनच्या आईने विचारले, मग आरती सोबत कसं काय लग्न जुळलं?
ही माझी सून आहे ना आरती ती आमच्याच गावातली. प्रसादच्या बाबांच्या डोळयात विषारी औषध ज्या माणसाने टाकले होते, त्याच माणसाची पोरगी आहे ही आरती. आरतीचा बाप जेल मधुन सुटून आल्यावर प्रसादच्या मागे चार वर्षांनी झाली होती त्यांना. जेव्हा त्याला कळले की त्यांची पोरगी जन्मजात आंधळी आहे, तेव्हा तो रडत रडत प्रसादच्या बाबांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायला आला. ‘दादा मी चुकलो देवाच्या काठीला आवाज नसतो मला माफ करा, देवानेच मला शिक्षा केली.’
गेल्या महिन्यात प्रसादला मुलगी बघायला आम्ही ज्या बसने तालुक्याच्या गावात चाललो होतो, त्या बस मध्ये आरती पण होती. आरतीचे देखणे आणि सुंदर रूप बघून बसमधील बाया, बाई ग, एव्हढी देखणी पोरं पण दिसत नाही तिला, कसं हीचं लग्न व्हायचं? हिला पण कोणीतरी आंधळाच मिळणार अस एकमेकींशी पुटपुटत होत्या.
तालुक्याच्या गावी ज्या मुलीला बघितलं तिने तिथेच नकार दिला, मी बिन लग्नाची राहीन पण या एक डोळ्याशी लग्न नाही करणार.’ ती म्हणाली होती. तेव्हापासून प्रसाद ने डोळ्यावर चष्मा लावायचे सोडून दिले. बस मधील बायकांची कुजबुज त्याने पण ऐकली होती.
घरी आल्यावर त्याने मला विचारले, आई आरतीला तुझी सून केली तर चालेल का? मी त्याला म्हणाले, माझा संसार झाला करून. तुझे तू ठरव. मी तुझ्यासोबत आहे.’
आरतीच्या बापाला निरोप पाठवल्यावर तो पुन्हा घरी आला आणि आधीच मेलेल्याला अजून मारू नका म्हणू लागला. पण त्याला प्रसादने समजावले.
तुमची परिस्थिती नव्हती तशी आमचीसुद्धा परिस्थीती नव्हती म्हणून माझ्या बाबांना आणि तुमच्या आरतीला बघता आले नाही. पण आता मला चांगली नोकरी आहे, आज ना उद्या परिस्थीती सुधारेल. खुप लोकं नेत्रदान करतात, आपण आरतीसाठी बघू या कोणा दुसऱ्याचे डोळे मिळतात का? मला दोन डोळे असते तर माझाच एक तिला दिला असता. मीच कशाला माझ्या आईनेदेखील बाबांना दिला असता पण जग एवढं पुढे गेले हे माहितीही नव्हतं आणि माहिती असून ऐपत सुद्धा नव्हती. आता दोन महिन्यांपूर्वीच आमचे दोघांचे लग्न झाले. आम्ही गावाकडून मुंबईतल्या मोठ्या डोळ्यांच्या दवाखान्यात आलो होतो. आनंदाची गोष्ट अशी आहे की आरतीला बघता येणार आहे. दुपारपर्यंत दवाखान्यातले सगळं आटोपले म्हणून या लहानशा बोटीतून मांडवा की काय तिथं जाऊन पुन्हा याच बोटीने परत मुंबईला फिरणार. पुन्हा कधी समुद्र बघायला मिळेल की नाही म्हणून आजच साधली संधी.
हे सर्व ऐकताना आर्यनची आई अवाक झाली होती. न राहवून तिने प्रसादच्या आईला विचारले, ‘पण काकी आरतीसाठी नेत्रदान कोण करणार आहे? तिला कोणाचे डोळे लावणार आहेत? अवयव दान ही खुप खुप गुंतागुंतीची, खर्चिक आणि कायदेशीर पद्धतीने करायची प्रक्रिया आहे ना?’
प्रसादची आई म्हणाली, लग्न ठरल्या ठरल्या प्रसादने सगळी माहिती काढली होती, कोणी मृत्यूपूर्वी नेत्रदान केले असेल तर मिळतील असं काहीबाही तो सांगायचा. मी म्हटलं जिवंत असताना कोणी नाही का नेत्रदान करू शकत. मी माझा एक डोळा दिला तर नाही का चालणार? सुरवातीला तो नाही म्हणाला होता पण नंतर त्याला आणि मला डॉक्टरांनी तुम्ही म्हणताय तसे समजावले, कोणाचाही अवयव कोणालाही सहजपणे नाही देता येत , रक्तगट , तो अवयव ज्याला द्यायचा आहे त्याचे शरीर ते स्वीकारू शकते का. अवयव दान करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य आणि वय हे अवयव दान करण्यासाठी योग्य आहे का, हे सगळे बघावे लागते.
आरतीचे बाबा पण डॉक्टर सांगत होते ते सगळं ऐकत होते. त्यांनी स्वतःहून पुढे होऊन सांगितले माझा आणि आरतीचा रक्तगट एकच आहे, तुम्हाला लागतील त्या सगळ्या चाचण्या करा पण माझाच डोळा माझ्या लेकीला द्या. माझ्या कर्माचे प्रायश्चित्त भोगल्याचे समाधान तरी मला लाभेल. डॉक्टरांनी आरतीच्या बाबांचे म्हणणे ऐकले आणि तशा चाचण्या करायला सांगितले. ते म्हणाले मी हॉस्पिटलमध्ये थांबतो तुम्ही आलाच आहात तर फिरून या कुठेतरी. या बोटीत बसण्यापूर्वी त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की चाचण्या पाहिजे तशा आलेल्या आहेत. डॉक्टरांनी कायदेशीर प्रक्रियांची तयारी करायला सांगितले आहे.
आर्यनची आई हे सर्व ऐकून निःशब्द झाली. तिला काय बोलावे हेच बराच वेळ सुचत नव्हते.
क्षुल्लक कारणावरून अमानुषपणे वागणारी आरतीच्या बापासारखी माणसं ज्यांना नंतर पश्र्चाताप सुद्धा होतो, अशा माणसांना मोठ्या मनाने माफ करणारे प्रसादचे आई बाबा , प्रसाद सारखा उच्च विचारसरणी असलेला तरुण. राहणीमानाने साधारण आणि भोळे असलेले पण मनाने सधन असणारे शेतकरी जमिनीत बियाणे रुजवून नुसते अन्नधान्यच पिकवत नाहीत तर लाखमोलाचे विचार सुद्धा समाजात रुजवतात.
– समाप्त –
लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर, कोन, भिवंडी ठाणे
संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈