☆ जीवनरंग ☆ भाऊबीज ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆ 

भगवान आणि भाग्यलक्ष्मी यांच्या  लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी घरी पाळणा हलला. सासर-माहेरच्या नातेवाईकांनी बाळ -बाळंतीणीचं कौतुक  भरभरून केले.दिसामासांनी बाळाची प्रगती अगदी नजरेत भरू लागली.केजीतच या बाळाला दुसऱ्या ईयत्तेचा अभ्यास  पण अगदी सहज अवगत झाला होता.त्याचे पाठांतर पाहून शेजारचे लोक अचंबित होत असत.त्याच्या प्रखर बुद्धिमत्तेची चुणूक स्काॅलरशिपच्या परीक्षेतील सुयशाने त्याच्या शिक्षकांना जाणवली. “त्याला शहरात पाठवा ,आणखी चांगली प्रगती होईल” असा सल्लाही भगवानला शिक्षकांनी दिला.पण खर्चाचे गणित जमणारे  नव्हते.

भाग्यलक्ष्मीच्या  संसार वेलीवर बाळच्या पाठोपाठ आणखी एक सुंदर कळी उमलली. जणूकाही  नक्षत्रांची तेजस्वी  जोडीच भास्कर आणि भावना यांच्या रूपाने अंगणात बागडत असे. भगवान एका खासगी काॅलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.पगार अगदी कमी आणि तोही बऱ्याच वेळा वेळेवर होत नसे. भाग्यलक्ष्मी काटकसरीने संसाराचा गाडा हाकण्यासाठी जमेल तसा आपल्या पतीस हातभार लावत असे. आईबाबांच्या आचरणातून सुसंस्कार घेतं मुलं मोठी होत होती.भास्करला एका चांगल्या कंपनीचा नोकरी साठी काॅल आला.सर्वांचा निरोप घेऊन भास्कर परगावी गेला. त्याची व भावनांची भेट मोठ्या सणांच्या निमित्ताने होई.

एकदा  दिवाळीच्या  सुट्टीत घरी आल्यावर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या भावनाताईच्या मनात आलं, “एवढा पगारदार दादा आहे पण दरवर्षी शंभर रुपयेच ‘भाऊबीज’ म्हणून ओवाळणी देतो.आईबाबांसाठी तर एकदाच नवीन कपडे त्यानं आणलेत.” तिनं हा विषय सहज आईजवळ काढला .बोलताना भाग्यलक्ष्मीचा गळा  अगदी दाटून आला.

“जादा तयारीसाठी भास्करला शिकवणी लावणं आवश्यक होती. पण तेव्हा घरच्या बेताच्याच परिस्थितीचे भान ठेवून त्याने मोठ्या स्वकष्टाने दहावीत गावात पहिल्या क्रमांकावर आपली मोहोर उमटवली.आता शहरात जाऊन मोठा इंजिनिअर होऊन गावाकडे परत यायचं असं स्वप्न उराशी बाळगून होता.”

“जमीन -जुमला, शिल्लक काही नाही. अशी निर्धन अवस्था पाहून बाबांची मोठी घालमेल सुरू झाली होती. सुजाण भास्करने त्याच क्षणी  ‘डिप्लोमा कोर्स पूर्ण करावा’  असाच निर्णय घेतला.  पण धाकट्या बहिणीने सतत चांगल्या पद्धतीने मेरीट मिळवावे. तिने इंजिनिअर होऊन आपले अधुरं स्वप्न पूर्ण करावं. अशी इच्छा आमच्या जवळ त्याने व्यक्त केली.”

“पार्टटाईम नोकरी करत अभ्यास करून तो डिप्लोमा कोर्सला प्रथम आला. पण पुन्हा डिग्रीचे शिक्षण परवडणारे नव्हते. त्याला नोकरी करणेच भाग पडले. भास्करदादानं  इंजिनिअर होणाऱ्या  धाकट्या बहिणीच्या डोळ्यांमध्येच त्याची करिअरची स्वप्ने साकार होताना पाहिली होती.”

भास्करच्या  या असीम त्यागाची जाणीव प्रथमच भावनेला झाली. तिच्या चांगल्या भवितव्यासाठी भास्कर ने अगदी जीवाचे रान केले होते.

तिच्यासाठी वेळ काढून त्याने  सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले होते. वेळच्यावेळी काॅलेजची फी, हाॅस्टेलच्या सर्व खर्चाला तोच बाबांकडून पैसे पाठवत होता. सहा वर्षे त्याने आपल्याला काही कमी पडू दिले नाही हे तिला आता उमगले.

मायलेकींचा अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता. “आपला दादा किती ग्रेट आहे” असं म्हणत त्या नोटेकडे  आणि नोकरी साठी परगावी चाललेल्या लाडक्या भास्करदादाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पुन्हा पुन्हा पहात राहिली.

 

© सौ. मुग्धा कानिटकर

सांगली

फोन 9403726078

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments