श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘भय…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी ☆
“ ऐक ना .. मी काय म्हणते.. आपण असला डायमंड नेकलेस घेऊया मला ? ओरिजनल डायमंड आहेत हे..”
एका मासिकात आलेली डायमंड ज्वेलरीची जाहिरात दाखवत तिने विचारले.
“ अगं पण खूपच किंमत असेल त्याची.. आपल्याकडे तेवढा बॅलन्स नाहीय.. प्लिज.. दुसरे काहीतरी घेऊया.. एक लाखापर्यंत .. माझ्याकडे तेवढेच आहेत.. “
“ माझ्या वाढदिवसासाठी पण नाहीत ? बाबांकडून घे ना तुझ्याकडे नसतील तर..”
“ बाबांकडून कसे घेणार ? आपण या वाढदिवसाला आपल्या बजेटमध्ये बसेल असे दुसरे काहीतरी घेऊया ना..”
“ नाही मला तेच डायमंड नेकलेस हवंय..”
“ अगं पण पैसे नाहीत तेवढे.. आणि बाबांकडून पैसे घेणं बरं नाही दिसणार..”
तो तिला अजिजीने म्हणाला. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली,
“अगदी बरोबर आहे तुझे.. बाबांकडून पैसे घेणं बरं नाही दिसणार ते.. आई, बाबा, तू .. तुम्ही तिघेही तुरुंगात खडी फोडायला गेलात तर ते मात्र बरे दिसेल .. पेपरात मोठ्या टाईपमध्ये तुमची तशी बातमी आली तर ते बरे दिसेल.. हो ना ?”
“ अगं, काय बोलतेस तू हे ? त्यांचा काय संबंध इथे.. अगं, ते तुझ्याशी किती मायेनं वागतात अन् तू त्यांच्याबद्दल असा विचार करतेस ? “
तिच्या त्या वाक्याने तो क्षणभर दचकला होता. एका क्षणात तिच्या ते वाक्य चलचित्र होऊन त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेले होते. मनात भयाची लाट पसरली पण दुसऱ्याच क्षणी त्याला स्वतःच्या हताशपणाचा राग आला होता. आईबाबांचे नाव तिच्या तोंडी अशा पद्धतींने आल्यानं न राहवून रागातच तो म्हणाला. बोलताना त्याच्याही नकळत त्याचा आवाज चढला होता.
“ चुकलंच माझे.. त्यांच्याबाबतीत मी काहीच कृती न करता नुसताच असा विचार करतेय हे खरंच चुकलं माझे…आणि एक तुला सांगायचे राहिलेच बघ. तुझे प्रत्येक वाक्य पुरावा म्हणून माझ्याजवळ असते.. अगदी जपून ठेवलेले असते, तू आवाज चढवून बोललास माझ्याशी तर तो तुझ्याविरुद्धचा कौटुंबीक छळाचा पुरावाच ठरेल हे मात्र तू विसरू नकोस हं ! “
ती खूप शांतपणे बोलत होती.. तो मनातून खूप चिडला होता पण काहीच बोलला नाही.. तिच्या वागण्या- बोलण्यानं मनावर भयाने सावली धरली होती. तिच्या तोंडून ‘कौटुंबिक छळ ‘ शब्द ऐकताच तो गलितगात्र झाला होता. ती म्हणेल तसे वागण्यावाचून आपल्याला दुसरा काही पर्यायच नाही असे त्याला वाटू लागलं होतं.
आपली स्थिती दगडाखाली हात सापडलेल्या माणसासारखी झालीय असे त्याला वाटू लागले होते. त्याला स्वतःपेक्षा जास्त आई- बाबांची काळजी वाटत होती. आयुष्यभर कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय न देणारी सरळ स्वभावाची पापभिरू माणसे ती… त्यांना हे सारे समजले तर त्यांना कसे सहन होईल ? ती दोघेही उन्मळून पडतील, कोसळून पडतील ही भीती वाटत होती आणि म्हणूनच तो त्यांना काहीही न सांगता एकटाच सारं सोसत होता.
कधीतरी तिला आपल्या चुकीची जाणीव होईल, तिच्यात बदल होईल आणि सारे सुरळीत होईल हा वेडा आशावादही कधीकधी त्याच्या मनात निर्माण होत होता.. हे ही दिवस जातील असे त्याचे वाटणे त्याला सोसण्याचं बळ देत होतं .
“ बाबा, मला थोडे पैसे हवे होते..”
त्याच्या मनात नसतानाही पहाटे हॉलमध्ये बसून चहा घेताना, काहीसा चाचरतच तो बाबांना म्हणाला. खरेतर बाबांजवळ पैसे मागायला त्याचं मन धजावत नव्हते. त्याची त्याला शरम वाटत होती पण कसंबसं खाली मान घालून जमिनीकडे पहात तो बाबांना म्हणाला होता. बाबांनी क्षणभर त्याच्याकडे पाहिले. त्याची मनस्थिती त्यांच्या ध्यानात आली. त्यांनी त्याच्या खांद्यावर मायेनं हात ठेवला.
“ किती पाहिजेत ? अरे ,बाबा आहे मी तुझा.. काही बोलताना, सांगताना, मागताना असे अवघडून कशाला जायचं बाळा..? सांग ,किती पाहिजेत?”
त्याचे डोळे पाणावले होते.
“ बाबा, वाढदिवस आहे ना तिचा… आपल्या घरातला पहिला वाढदिवस.. ,तिला काहीतरी चांगलं गिफ्ट द्यावं म्हणत होतो. डायमंडचा नेकलेस घ्यावा म्हणत होतो.. माझ्याकडे एक लाख आहेत..”
बाबांनी त्याच्याकडे पाहिले. आपल्याकडे पैसे मागताना त्याला अवघडल्यासारखे झालंय.. तो त्याच्या मनात नसताना नाईलाज म्हणून पैसे मागतोय हे त्यांच्या ध्यानांत आलं होतं. त्याचे अवघडलेपण कमी व्हावं म्हणून बाबा त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले,
“ अरे व्वा ss! खूप चांगलं ठरवलंस . सुनबाईच्या पसंतीने हवे ते घे. पैसे किती लागतील ते तेवढं सांग. “
“ बाबा, सांगा ना यांना काहीतरी, अहो, वाढदिवसाला डायमंड नेकलेस आणायचा असं हे म्हणतायत.. उगाच कशाला इतका खर्च.. आपण वाढदिवस साधेपणाने, नुसता केक आणून घरच्याघरी करूया.. हवंतर आपण चौघे बाहेर कुठंतरी जेवायला जाऊया.. असे म्हणत होते मी .. पण हे ऐकायलाच तयार नाहीत. तुम्हींतरी समजावा यांना..”
ती बाबांचं आणि त्याचं बोलणे ऐकत किचनमध्ये उभी होती . तिथून हॉल मध्ये येत तक्रारीच्या सुरांत बाबांना म्हणाली. तिचे बोलणे ऐकून त्याने दचकून तिच्याकडे पाहिले.
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈