श्री मेघःशाम सोनवणे
जीवनरंग
☆ ‘एक नंबर शिवणार’… भाग १ – लेखक – श्री राजेंद्र परांजपे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
रविवारची सकाळ. आम्ही सगळे झोपेत होतो. इतक्यात दारावरची बेल वाजली. आधी मी दुर्लक्ष केलं. वाटलं भास असेल. पण दोन मिनिटांनी पुन्हा वाजली. तिसऱ्या वेळेस जेव्हा वाजली तेव्हा नाईलाजाने उठावं लागलं. उठून घड्याळात बघितलं तर जेमतेम साडेसात वाजत होते. म्हणजे रविवारच्या मानाने पहाटच म्हणायची.
मी आळस देतदेतच दार उघडलं. दारात साधारण चाळीस एक वर्षांचा एक काळासावळा माणूस उभा होता. अंगात पांढरा लेंगा झब्बा, आणि डोक्यावर मळकी गांधीटोपी. दाढीचे खुंट वाढलेले. त्याच्या हातात एक कापडी पिशवीपण होती. मी त्याला ओळखलं नाही.
माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तोच म्हणाला, “साहेब, नमस्कार. मी राजाराम.”
“सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही.” मी म्हणालो.
“अहो कसं ओळखणार? आपण पहिल्यांदाच भेटतो आहोत. मला बाबासाहेब देशमुखांनी तुमचा पत्ता दिला आणि भेटायला सांगितलं.” त्याने स्पष्टीकरण दिलं.
बाबासाहेब देशमुख म्हणजे प्रसिद्ध इतिहास संशोधक. माझे चांगले आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचे मित्र. त्यांनी पाठवलंय म्हणजे हा माणूस नक्कीच कामाचा असणार. हे लक्षात आल्यावर, मी राजारामला म्हणालो,
“या ना, आत या. बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो.”
“साहेब, तुम्ही मला अहो जाहो नका करु. नुसतं राजाराम म्हणा. मी लहान माणूस आहे.” राजाराम म्हणाला.
“बरं, बस राजाराम. मी आलोच” असं म्हणून मी आत जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आलो, आणि काय काम आहे ते विचारलं.
“साहेब, मी जुनी फाटकी पुस्तकं शिवतो. देशमुखसाहेब म्हणाले की तुम्हीपण त्यांच्यासारखेच इतिहास संशोधक आहात. त्यामुळे तुमच्याकडेपण शिवण्यासारखी अशी दुर्मिळ आणि फाटकी पुस्तकं असतील तर ती द्या. एक नंबर शिवतो बघा मी ती. अगदी नव्यासारखी करुन देतो.” राजारामने त्याच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं.
त्याचं म्हणणं खरं होतं, मीदेखील गेली तीसेक वर्ष इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळे, कुठून कुठून जुनी आणि दुर्मिळ पुस्तकं, ग्रंथ, बखरी आणि इतर बरेच ऐतिहासिक दस्तावेज जमा केले होते. त्यातल्या काहींची अवस्था खूप नाजूक होती. ती व्यवस्थित शिवणं गरजेचं होतं. नाहीतर त्यातली पानं सुटून गहाळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे मी अशाच एखाद्या माणसाच्या शोधत होतो. बरं झालं बाबासाहेबांनी त्याला धाडला ते.
“आहेत अशी पुस्तकं वगैरे. अरे पण ती बेडरुममधे कपाटात आहेत. बेडरूम मध्ये माझी बायको आणि मुलगा झोपले आहेत. कपाटातून पुस्तकं बाहेर काढताना कदाचित त्यांची झोपमोड होईल. तू असं कर, तू दुपारनंतर ये. तोपर्यंत मी ती काढून ठेवतो.” मी म्हणालो.
“दुपारनंतर?” तो चाचरत पुढे म्हणाला, “साहेब, मी अंबरनाथला राहतो. आता घरी जाऊन परत यायचं म्हणजे खूप उशीर होईल. त्यापेक्षा मी तुमच्या बिल्डिंगच्या खालीच थांबतो, आणि तासाभराने वर येतो. चालेल?
अंबरनाथला राहतो? अरे बापरे ! तिथून निघून हा माणूस रविवारी इतक्या लवकर अंधेरीला माझ्या घरी पोहोचला? पहिल्यांदाच आल्यामुळे माझं घर शोधण्यातदेखील त्याचा थोडा वेळ गेला असेलच. कमाल आहे या माणसाची. म्हणजे घरुन निघाला तरी किती वाजता असेल हा? मनातल्या मनात विचार करुन मी त्याला म्हणालो, “बरं, चालेल. मी लवकरात लवकर पुस्तकं बाहेर आणतो. पण तू घरुन काही खाऊन निघालास का?”
“हो साहेब” तो म्हणाला खरा, पण त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की तो खोटं बोलतोय. घरुन निघताना किंवा वाटेत त्याने काहीच खाल्लेलं नसावं. मी खणातून माझं पाकीट काढलं, आणि त्यातली शंभरची नोट काढून त्याच्या पुढ्यात धरुन म्हटलं “हे घे आणि कोपऱ्यावर जाऊन आधी चहा, नाश्ता करुन ये.”
राजारामने थोडे आढेवेढे घेतले, पण मी ती नोट त्याच्या खिशातच कोंबल्यावर त्याचा नाईलाज झाला. तो नाश्ता करायला गेला.
तो चहा, नाश्ता करुन येईपर्यंत, मी पुस्तकं काढून ठेवली होती. ही पुस्तकं शिवायचं काम तो कुठे बसून करणार, असा माझ्या मनात प्रश्न आला. पण जणू काही तो वाचून, राजारामच म्हणाला, “साहेब, तुम्ही तुमची गॅरेजमधली गाडी थोडावेळ बाहेर लावलीत तर मी तिथे बसून काम करतो. चालेल का?”
राजाराम हुशारीने आधीच सगळा विचार करुन आला होता तर. मला त्याचं कौतुक वाटलं. आणि त्याचा प्रस्तावही चांगला होता. मग आम्ही दोघांनी मिळून पुस्तकं आणि एक मोठी चटई खाली नेली. मी माझी गाडी बाहेर लावली, आणि गॅरेजची जागा त्याला मोकळी करुन दिली. त्याने ताबडतोब चटई अंथरुन त्याच्या जवळच्या पिशवीतून दाभण, दोरा, गोंद, चिकटपट्टी वगैरे सामान काढलं आणि तो कामाला लागला.
“एक नंबर शिवणार बघा साहेब. काही काळजीच नको तुम्हाला आता या पुस्तकांची. या तुम्ही तुमचं आवरुन.” तो म्हणाला.
वॉचमनला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून मी घरी गेलो आणि आंघोळ, चहा नाश्ता करुन पुन्हा तासा दीड तासाने खाली गेलो. तोपर्यंत त्याने अर्धअधिक काम संपवलं होतं. कामातली त्याची सफाई बघून मी खुश झालो. त्याच्याशी गप्पा मारता मारता मला समजलं की त्याच्या घरी त्याची बायको आणि आई आहे. त्या दोघी लोकांकडे धुणी, भांडी करतात आणि फावल्या वेळेत गोधड्या, पिशव्या वगैरे शिवण्याचंही काम करतात. आणि हा चपलांपासून पुस्तकांपर्यंत सगळं शिवतो. तसे खाऊन पिऊन सुखी होते तिघे, पण त्याच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली तरी अजून पाळणा हलला नव्हता. हा सल त्याच्या मनात होता, तो त्याने दोन तीन वेळा बोलूनही दाखवला. असतं एकेकाचं नशीब.
आणखी तासाभरात त्याचं काम संपलं. आम्ही पुस्तकं घेऊन वर घरी आलो. अगदी मला हवं होतं तसं काम केलं होतं त्याने. त्याला काही खायला देऊन, मी पैसे विचारले. माझ्या अंदाजापेक्षा त्याने कमीच सांगितले. मी ते दिले. त्याबरोबर त्याने त्यातले शंभर रुपये मला परत दिले. “साहेब, हे सकाळी तुम्ही मला नाश्त्यासाठी दिले होते.” तो म्हणाला.
मी अवाक् झालो. आजच्या लबाडीच्या जगात इतका प्रामाणिकपणा? नाहीतर लोक ठरलेले पैसे दिल्यावरसुद्धा वर लोचटपणे आणखी बक्षिसी मागतात. मी राहू दे म्हंटलं. पण त्याने ऐकलं नाही. ती नोट त्याने टेबलावर ठेवली आणि नमस्कार करुन तो निघून गेला. जाण्याआधी, ‘परत काही काम असेल तर सांगा साहेब, एक नंबर शिवणार’ हे सांगायला, आणि आपला फोन नंबर एका कागदावर लिहून द्यायला तो विसरला नाही. पण दुर्दैवाने राजारामने लिहून दिलेला त्याचा नंबर माझ्याकडून हरवला. त्यामुळे नंतर त्याच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही. बाबासाहेबांकडून त्याचा नंबर घेईन म्हंटलं, पण तेही राहूनच गेलं.
क्रमश: भाग 1
मूळ लेखक – राजेंद्र परांजपे
संग्राहक – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈