सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन  अनुवादीत कथा – सुश्री अनघा जोगळेकर ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

१. आदलाबदली  २.  हॅँग टिल डेथ  ३. वखवखलेले डोळे

१. आदलाबदली

आभाळातून मोत्यांची झडी लागली होती. मोठे मोठे शुभ्र मोती जमिनीवर विखरून पडत होते. आकाश निरखणारं तिचं अबोध मन खिडकीपाशीच रेंगाळलं होतं. ओलसर, थंड, तरीही उमललेले मोती. तिचे हरणासारखे डोळे एकटक त्या मोत्यांकडे एकटक बघत होते.

तिचे उत्सुक डोळे जसे काही बोलत होते, जसा काही आकाशात खजिना आहे. त्याचा दरवाजा चुकून उघडा राहिला आहे आणि त्यातले सगळे मोती खाली पडताहेत. ती किलबिलल्यासारखी म्हणाली, ‘ हे देवा! अशा तर्‍हेने तर तुझा सारा खजिनाच संपून जाईल! ‘

तिचं बोलणं ऐकून मी हसलो आणि तिच्या निरागसतेकडे पाहू लागलो.

ती दिवसभर घरात एकटीच असायची. त्या खिडकीपाशी बसायची. संध्याकाळ होताच घरात हालचाल, गडबड सुरू व्हायची. येणार्‍यांपैकी कुणी तिला पाणी मागायचं, कुणी जेवण. कुणी काही, तर कुणी काही. ती धावत-पळत सगळ्यांची कामे करायची. 

रात्री उशिरा सगळे आपापल्या खोल्यातून जात, तेव्हा ती आपली सारी कामे संपवून खिडकीपाशी येऊन बसायची आणि तारे मोजायची. अनेकदा तारे मोजता मोजता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायचे, जशी काही ती त्या तार्‍यांमधे कुणाला तरी शोधते आहे. कधी खळखळून हसायची, जसं काही जे शोधत होती, ते तिला सापडले आहे. कधी कधी गुणगुणायची, ‘ये चाँद खिला, ये तारे हँसे…’

तिचं असं गुणगुणणं ऐकून आतमध्ये बसलेली माणसे फुसफुसायची, ‘ असं वाटतय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटचं प्रोग्रॅमिंग करताना त्यात इमोशनल कोशंटचं परसेंटेज जरा जास्तच फीड झालय!’

भावशून्य मशीन बनत चाललेल्या त्या माणसांमध्ये, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोट, प्रत्येक क्षणी आपला इमोशनल कोशंट वाढवण्याचा प्रयत्न करत होता आणि मी त्या मशीन बनलेल्या माणसांमध्ये त्या रोबटचे मशीनमधून  माणसात रूपांतर होण्याची वाट बघत होतो.

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

२.  हॅँग टिल डेथ

मीनू, मी बघतले, जेव्हा जेव्हा तुला वाईताग येतो, किंवा तू काळजीत, चितेत असतेस, तेव्हा तेव्हा तू खोलीत जाऊन कपात उघडतेस. तिथेच थोडा वेळ उभी रहातेस. मग थोड्याच वेळात तुझा चेहरा हसरा हसरा होतो. अखेर ता कपाटात असं आहे तरी काय?’

पलाशचं बोलणं ऐकून मीनू हसली.

‘छे छे, केवळ हसून काम भागणार नाही. आज तुला हे रहस्य उलगडून दाखवावंच लागेल. ‘ पलाशच्या आवाजात थोडा आवेश होता. मग नजर चुकवत म्हणाला, ‘तुझ्या अपरोक्ष मी ते कपाट अनेक वेळा उघडून पाहीलं. शोधाशोध केली पण….. अखेर असं आहे तरी काय तिथे?’ तो जवळ जवळ ओरडताच म्हणाला.

मीनू थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली. मग तिने त्याचा हात धरला आणि त्याला खोलीत घेऊन आली. तिने कपाट उघडले.

‘ ते बघ माझ्या खुशीचं रहस्य!’

‘अं… तो तर एक हॅंगर आहे. ….रिकामा हॅंगर…’

‘ होय पलाश. तो हॅंगर आहे, पण रिकामा नाही. याच्यावर मी माझ्या सार्‍या चिता, काळज्या, त्रास, वैताग लटकवून ठेवते आणि कपाट बंद करण्यापूर्वी  त्यांना म्हणते,

‘मरेपर्यंत लटकत रहा!’ मी माझ्या काळज्या, त्रास, वैताग माझ्या डोक्यावर स्वार होऊ देत नाही. त्या माझ्यापासून दूर केल्यानंतरच त्या निपटून काढते. ‘

आता त्या कपाटात एकाऐवजी दोन हॅंगर लटकलेले आहेत.

  ♥ ♥ ♥ ♥ ♥ 

३. वखवखलेले डोळे

‘खरोखर काळ काही बदलला नाही. पुराणकाळात इंद्राने अहल्येवरती जोर-जबरदस्ती केली होती आणि आज-कालची ही पोरं येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक मुलीची छेडछाड काढत रहातात. ‘ टी. व्ही.वर काही तरी बघत आजी म्हणाली.

‘ही इंद्राची काय गोष्ट आहे आजी?’ मी सोफ्यावर माझी पर्स फेकत विचारलं.    ‘अग, प्रथम हात-पाय धू. चहा- पाणी होऊ दे. मग सांगते. रोज रोज बसने येऊन जाऊन करण्याने तू थकत असशील ना!’ आजीने वात्सल्याने विचारले.

‘ हुं…. आता सांग.’ मी चहा पिता पिता पुन्हा विचारलं.

‘असं घडलं की इंद्राची वाईट नजर अहल्येवर पडली, तेव्हा गौतम ऋषींच्या शापाने त्याच्या सगळ्या शरीरावर योनी उमटल्या. नंतर त्या पुढे डोळ्यात बदलल्या. ‘

‘डोळ्यात? ‘

‘हो ना! म्हणून तर इंद्राला हजार डोळे आहेत.’

इतकं ऐकताच मी उठून उभी राहिले आणि कपडे झाडू लागले.

‘आता तुला काय झालं? आणि कपडे का झाडते आहेस?’

‘इंद्राचे ते हजार वखवखलेले डोळे, आजही समाजामध्ये पसरलेले आहेत. मी ते माझ्या अंगावरून झाडून दूर करते आहे.’

केवळ झाडण्याने काम नाही भागणार पोरी. ते फोडण्याची गरज आहे.’ आजी दृढ स्वरात म्हणाली.

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

मूळ लेखिका – सुश्री अनघा जोगळेकर  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments