सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ मोहनमाळ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

भागिरथीबाई वयाच्या ८१व्या वर्षी वारल्या. काल दिवसकार्य झालं आणि आज चौदाव्याचं गोडाचं जेवण!आता जरा आराम करून मंडळी आपापल्या घराकडे निघणार होती. गजानन आणि त्याची बायको गडी माणसांकडून मागची आवरा-आवर करून घेण्यात गुंतली होती. हो, हातासरशी कामं करून घेतली नाही, तर परत कामाला माणसं कुठून मिळणार?  बाकीची तीन मुलं, त्यांच्या बायका, एक मुलगी आणि जावई माजघरात बसली होती. त्यांची हलक्या आवाजात कुजबुज चालू होती.

भागिरथीबाईंना एकूण नऊ मुलं झाली, पण आज घडीला चार मुलगे आणि एक मुलगी तेवढी जिवंत आहेत. सगळी, लग्न, पोरंबाळं होऊन रांगेला लागलेली. मोठा गजानन आणि त्याचं कुटुंब, भागिरथीबाईंसोबत रत्नागिरीजवळ चिखलीला राहात होतं. त्याच्या पाठचा सुरेश, रमेश, आणि वसंता ही मुंबईत, तर नंदा पुण्यात स्थिरावलेली.

चिखलीतलं  जुनं कौलारू घर तसं लहानच, पण दरवर्षी काही ना काही दुरूस्तीचा खर्च असायचाच. म्हणून मोठ्या मनानं सगळ्या भावंडांनी घरावरचा हक्क सोडून, ते गजाननाच्या नावावर करून दिलं होतं. थोडी नारळ-सुपारीची झाडं आणि आंब्याची कलमं होती. दरवर्षी सगळे भाऊ, एकेक जण करून आठ दिवस राहून जायचे.गाडीनी आसपासच्या कोकणात फिरायचे आणि जाताना आपल्या वाटणीचे आंबे, नारळ, कोकमं असं गाडीत भरून घेऊन जायचे. नंदा तर  बोलून चालून माहेरवाशीण, ती देखील सहकुटुंब दोन-तीन आठवडे मुक्काम ठोकून असायची. जाताना सारा वानोळा घेऊन जायचीच.

गजानन आणि माधवी, मोठेपणाचा आब राखत, सगळं हसून साजरं करायचे.तक्रार करायचा स्वभावच नव्हता दोघांचा! माधवी लग्न होऊन नेन्यांच्या घरात आली, तेव्हा धाकटी नंदा अवघी  दोन वर्षांची तर होती.आणि बाकी तिघे शाळेत जाणारे.

नंदा सहा वर्षांचीअसतानाच, माधवीचे सासरे लकवा होऊन अंथरुणाला खिळले. मग सासूबाई त्यांच्या शुश्रूषेत गुंतल्या आणि कुटुंबाचा बाकी सारा भार  गजानन आणि माधवीवर पडला.

पोटची पोरं असल्यागत सगळ्यांना सांभाळलं होतं तिनं! शिक्षण संपल्यावर दिरांना नोकऱ्या लागल्या आणि लग्न करून त्यांचे संसारही थाटून दिले होते. पंधरा वर्षे सासरे आजारी होते. त्यांचं पथ्यपाणी, आल्यागेल्याचा पाहुणचार, सासूबाई आणि स्वतःचा संसार माधवीनं छान सांभाळला होता. सासरे गेले आणि सासूबाईंनी संसारातून पूर्णच लक्ष काढून घेतलं. गेली सात-आठ वर्षे त्याही अस्थमा आणि संधिवातानं बिछान्यावरच होत्या. गजानन घरातली पिढीजात भिक्षुकी चालवत होता. थोडं नारळ-सुपारीच्या बागेचं उत्पन्न येत होतं. त्यावर त्यांचा निर्वाह ठीक चालला होता. पण वेळेला हातात नगद पैसा नसायचा.त्याला एक मुलगा, एक मुलगी. मुलगा  इंजिनिअर होऊन नुकताच नोकरीला लागला होता चिपळूणला. मुलगी बी. काॅम. झाली होती. तिच्या लग्नाचं बघायचं होतं आता.

गडी माणसांकरवी कामं मार्गी लावून, गजानन आणि माधवीदेखील माजघरात येऊन टेकले. नणंदा-भावजयांची जरा नेत्रपल्लवी झाली. नंदा थोडी माधवीजवळ सरकली.

‘वहिनी,दमलीस ना ग! आईचं तुम्ही खूप केलंत!आईचं काय आमचं सगळ्यांचंच केलंस बाई तू! आता चार दिवस सवड काढून तू आणि दादा माझ्याकडे या आराम करायला.’ माधवीच्या दिर-जावांनीही नुसत्या माना हलवल्या.

‘मी काय म्हणते,’ आईचे काही दागिने होते का ग? मला वाटतं एक मोहनमाळ होती ना पाचपदरी? नाही म्हणजे तसं काही नाही म्हणा, पण आठवण म्हणून सगळ्यांना देता येईल ना काहीतरी, ती मोडून!या सगळ्यांचंच मत आहे हं असं!

‘मोहनमाळ म्हणजे ७-८ तोळ्याची तरी असेल ना हो वन्सं! ‘ वसंताच्या बायकोनं विचारलं.

माधवीला काय बोलावं सुचेना. ती आपल्या नवऱ्याच्या तोंडाकडे बघू लागली. गजानन हाताने थांबा अशी खूण करत, माडीवरच्या त्याच्या खोलीकडे गेला. येताना त्याच्या हातात एक कागदी लखोटा होता. त्याने आतला कागद काढून नंदाच्या हातात ठेवला. ती सोनाराकडची पावती होती. माधवजी शाह.. त्यांच्या नेहमीच्या सोनाराचा सही-शिक्का होता त्यावर. पाकिटातच मोहनमाळ  होती.

‘सगळ्यांना वाचून दाखव नंदा काय लिहिलंय ते!’ गजानन म्हणाला.

‘मोहनमाळ, वजन चार तोळे, दहा मासे.. लाखीमणी.  सोन्याचा मुलामा’.

‘अरे, पण आई तर एकदा म्हणाली होती की बाबांच्या आजारपणात पैशासाठी तू दोन्ही गहाण टाकलंय.’

‘हो, बरोबर आहे. बाबांच्या औषधपाण्यासाठी पैसा पुरत नव्हता. त्यात ऐन पावसाळ्यात स्वैपाकघरातली भिंत ढासळली. पैशाची सोय करणार तरी कुठून? म्हणून एकदा फोन केले होते सगळ्यांना नाईलाजाने. पण त्यावेळी तुमचीही प्रत्येकाची काही ना काही अडचण होतीच. आईने तिची ही मोहनमाळ जीवापाड जपली होती,तिच्या माहेरची आठवण म्हणून  तिच्या लग्नात तिला घातली होती ती. एकदाच कधीतरी ती गहाण ठेवायची वेळ आली होती. पण थोड्याच दिवसांत बाबांनी ती सोडवून आणली होती.

मी माधवजींकडे ती घेऊन गेलो. त्यांनी ती माळ हातात घेऊन तीनतीनदा पाहिली आणि मला म्हणाले,’ गजा, अरे ही सोन्याची नाही. नुसता मुलामा आहे वरून सोन्याचा! असं कसं झालं? तुझ्या आईची  मोहनमाळ एकदा मी पाहिली आहे. ती पिवर सोन्याची होती. तुझे बाबा एकदा गहाण ठेवायला आले होते. मी त्यांना म्हणालो,’ अरे हे स्त्रीधन घरात राहू दे. मी देतो ना तुला पैसे. आपले मैत्रीचे संबंध किती जुने आहेत.’ पण त्यांच्या स्वाभिमानी मनाला ते पटलं नाही.

पण मला नाही कसं म्हणायचं? म्हणून म्हणाले, ‘ तुझं बरोबर आहे माधव, दुसरी काही सोय होते का बघतो.’

तेच्यानंतर माझे वडील आजारी झाले म्हणून मी गुजरातला गेलो. वडील गेले म्हणून महिनाभर तिकडेच होतो.

‘ मी आल्यावर तो भेटायला आला होता मला. मी पैशाची सोय झाली का विचारलं. तेव्हा म्हणाला मुरली मारवाड्याकडून घेतले होते. पण नंतर कोणाची थकबाकी आली आंब्याची, दोन वर्षांची आणि  सोडवली माळ. मला वाटतं तवाच कायतरी झोल केला असणार मुरलीनं! आतातर तो पण देवाघरी गेला. कोणाला धरणार? ‘

मी सटपटलो. ही तर मुरलीनं घोर फसवणूक केली होती. आणि बाबांनी विश्वासानं तो दागिना खरा समजून घेतला होता परत. आईनं घेऊन हडप्यात ठेवून दिला. आता आईला काय आणि कसं सांगायचं? एकतर तिला खूप धक्का बसणार, नाहीतर माझ्यावरचा पण विश्वास उडणार. एकूण सर्व परिस्थिती खूपच नाजूक होती.

माधवशेठ मदतीला धावला. त्याने ही पावती करून दिली,आणि मोहनमाळ मला परत केली. माझी पैशाची गरज भागवली. घराची भिंत उभी राहिली. बाबांच्या औषधपाण्याची सोय झाली. आईला मात्र मोहनमाळ गहाण ठेऊन पैसे आणल्याचं सांगितलं. पण त्याचे पैसे तर फेडायला हवेच ना! माझ्या तुटपुंज्या उत्पन्नात ते तरी कसं जमणार? मग माधवशेठनी मला त्याच्या पेढीचं हिशोबाचं काम सोपवलं. महिना ३०रू.पगार! ते पैसे मी न घेता कर्जफेड करायची. ३००० रूपयाचं मुद्दल फेडायचं तरी आठ वर्षे जाणार होती. व्याजाची गोष्ट माधवनी केलीच नाही. त्यातच बाबा गेले, पुन्हा त्यांच्या दिवसकार्याचा खर्च झाला. त्यामुळे दोन-तीन महिने ती कर्जफेड करणंही झालं नाही. घराचीही काही न काही डागडुजी करावी लागतच होती.

तशात माधवशेठनी बायको खूप आजारी पडली. टायफॉइडनी ती अंथरुणालाच खिळली.त्याचा मुलगा-सून गुजरातेत. माधवी घरचं सांभाळून रोज तिच्याकडे जायची. तिचं सर्व अंथरूणातच करावं लागत होतं. पण ते करायची. तिला पथ्याचं काही करून जबरदस्ती भरवायची. तिच्या या शुश्रुषेमुळे मायाबेन आजारातून उठली. तिनं हिचे पाय धरले, ‘ तुझ्यामुळे मी जिवंत राहिले. माझ्या कातड्याचे जोडे घातले तरी तुझे उपकार फिटणार नाही.मी तुला काय देऊ?’

‘ माझ्या धाकट्या बहिणीसारखीच ना तू! मग घरच्या माणसाची काळजी आपणच घ्यायला नको का? ‘ माधवी म्हणाली.

माधवीनं कोणत्या अपेक्षेनं थोडीच तिची सेवा केली होती. ही तर माणुसकी आहे ना! आणि आपल्या वेळेला माधवनी मदत केली, त्याला गरज आहे तेव्हा आपणही करायलाच हवी की! पण त्यानंतरच्या दसऱ्याला माधवशेठ आणि मायाबेन आईला भेटायला आले होते.

जाताना माधवशेठ मला एक लिफाफा देऊन गेला. त्यामध्ये दहा हजार रुपये होते आणि कर्जफेड पूर्ण झाल्याची पावती सही-शिक्क्यानिशी होती.

‘ तू काही बोलू नको. माझी पण आईच आहे ही!तिला तिचा जिन्नस दे,खूप आनंद होईल बघ तिला! आणि तिचं औषध-पाणी नीट होऊ दे.  काय लागलं तर बिनधास्त सांगायचं मला.’ असं म्हणून त्यानं मिठी मारली घट्ट! ‘

मग मी आईला तिची मोहनमाळ दाखवून, कर्ज फिटल्याचं सांगितलं.  तिनं खूप आनंदानं ती मोहनमाळ  स्वतःच्या गळ्यात घालायला माधवीला सांगितलं. खूप समाधान वाटलं म्हणाली आणि मग पुन्हा ती माळ काढून माधवीच्या हातात दिली.

‘ नंदा, आईची आठवण म्हणून तुम्हाला हवं तर  तुम्ही कोणीही ती घेऊन जा. आमचं दोघांचं काही म्हणणं नाही ! गजानन म्हणाला आणि माधवीनंही मानेनं होकार दिला.

नंदाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि इतरांच्या माना शरमेने खाली झुकल्या होत्या.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments