☆ जीवनरंग ☆ बोध कथा – वचनपूर्ती ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा ७. वचनपूर्ती
धारानगरीत एक ब्राह्मण रहात होता. फुले-फळे आणण्यासाठी तो वनात जात असे. हा त्याचा नित्याचाच उपक्रम होता. पण एक दिवस मात्र विपरीत घडले. त्याला वनात साक्षात व्याघ्रराजाचे दर्शन झाले! वाघाच्या रूपाने साक्षात मृत्यूच समोर उभा आहे असे ब्राह्मणाला वाटले. भयभीत होऊन तो पळायला लागला. वाघानेही पाठलाग करून त्याला शेवटी पकडलेच!
तेव्हा मनात काही विचार करून ब्राह्मणाने वाघाला विनंती केली की, “आपण माझ्यावर दया करून मला ठार न मारता तीन दिवसांसाठी सोडले, तर मी घरी जाऊन, माझी महत्त्वाची कामे आटपून, माझ्या नातलगांना भेटून परत येईन”. त्यावर वाघ म्हणाला, “जर तू परत आला नाहीस तर मी काय करावे?” “मी नक्की परत येईन” असे जेव्हा ब्राह्मणाने वचन दिले, तेव्हा वाघाने ब्राह्मणाला सांगितले की, “हे ब्राह्मणा! तू घरी जाऊन तीन दिवसांनी परत ये. मी तुझी इथेच वाट बघतो.”
शोकाकुल अवस्थेत ब्राह्मण घरी परतला. घरी जाऊन तीन दिवसांनी सगळी कामे आटपून, वाघाला वचन दिल्याप्रमाणे तो वाघाच्या समोर येऊन उभा राहिला. ब्राह्मणाला पाहताच, वाघाला त्याच्या सत्यप्रियतेचे खूप कौतुक वाटले. अहो आश्चर्यम्! वाघाने ब्राह्मणाची स्तुती करून त्याला ठार न मारता घरी जाण्यास सांगितले. ब्राह्मणाला वचनपूर्तीचे फळ मिळाले.
तात्पर्य – खरोखरच सत्यवादी जगात पूज्य ठरतात
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी