डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ परिवर्तन — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆
(अगदी साधेसुधे लोक दिसले ते. पण बोलायला चांगल्या होत्या तिच्या आई. म्हणाल्या, “ मी खरे सांगू का?”) इथून पुढे —-
“जरी आम्ही इतके वर्ष इकडे राहिलो, तरी आम्ही बेताच्या परिस्थितीतच रहातोय. यांना सतत भारतात, पैसे पाठवावे लागतात. आमच्या मुलाने लग्न झाल्याबरोबर वेगळे घर घेतले, आणि तो आमच्याशी अजिबात सम्पर्क ठेवत नाहीये. यांची एक अगदी साधी नोकरी आहे, आणि मीही बेबी-सिटिंगचे काम करते. इकडे राहणीमान खूपच महाग आहे हो. आमच्याकडून आपण खूप मानपान, आणि इतरही कसली अपेक्षा ठेवू नका प्लीज… म्हणजे आम्ही हे करूच शकणार नाही. एक दिवसाचा लग्नाचा खर्च करूआम्ही. . एक छोटे गळ्यातले तेवढे तिच्यासाठी करून ठेवले आहे मी. माझी मुलगी चांगली शिकलेली आहे, पगारही चांगला आहे तिला. आणि हे लग्न त्यांचे त्यांनीच ठरवलंय तर आपण एकमेकांच्या समजुतीने घेऊया. आम्ही तुमच्या तुलनेत खूप कमीच आहोत हे अगदीच मान्य आहे आम्हाला. “
गीता घरी आली. समीरला आईची नाराजी समजली. तो म्हणाला, “ कोणत्या काळात रहातेस आई? मोना आणि तिचे आईवडील खरोखर सज्जन आहेत. आणि आपल्याला काही कमी आहे का? मोना मिळवती मुलगी आहे. माझी आणि तिची वर्षभराची ओळख आहे. मला खात्री आहे, ती आणि मी नक्की सुखी राहू. मी सायलीशीही बोललोय परवा. तिलाही लग्नाला येता येणार नाहीये. पण तू मात्र ते करतील ते गोड मानून घे. मग भारतात गेलीस, की घे हवे ते. मी देईन की तुम्हाला भरपूर पैसे. ”. . . . समीर आपल्या आईला ओळखून होता.
ठरलेल्या दिवशी हिंदू टेम्पलमध्ये, अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले. ना कोणते दिखाऊ समारंभ, ना मानपान. . . . . दोन तासात मंडळी घरी आलीसुद्धा. मोनाच्या आईवडिलांनी छान जेवण ठेवले होते. लग्नाला मोजकीच माणसे, ऑफिसचे मित्र, असे लोक होते. गीताने सगळे दागिने, भरजरी साडी मोनाला दिली. मोनाने हौसेने नेसली, आणि सगळे दागिनेही घातले. छान दिसत होती दोघांची जोडी.
राहून राहून गीताला मात्र वाटत होते, की काय हे लग्न. . . यापेक्षा गेट टुगेदर सुद्धा जास्त भपकेदार होते आपले. . . पण बोलणार कोण? आता आपल्या मैत्रिणी असले फोटो बघून काय म्हणतील? केवढे कौतुक सांगितले होते मी. . . . परदेशातले लग्न खूप सुंदर असते. . . यव आणि त्यव. . . . . आणि इथे २ तासात घरी. . . ना काही समारंभ, ना काही. . . एक साडी ठेवली माझ्या हातात ओटी भरून. . . आणि यांना साधासा कुर्ता आणि टी शर्ट. . . जाऊ द्या झालं.
दोन्ही मुलांनी आपल्या आपल्या लग्नात, मला न विचारता सगळे करून टाकले. वर दोन्हीही असले बेताचे व्याही मिळाले. . . अतिशय नाराज होती गीता. गीताने विचारले, “ कुठे जाणार नाही का हनिमूनला? “
मोना म्हणाली, “ ममा, जाऊ ना !पण तुम्ही आहात ना, तोपर्यंत नाही. ”
मोना दुसऱ्या दिवशी पट्कन उठून कामाला लागली. गीताच्या लक्षात आले, ही मुलगी सराईतासारखी वावरतेय स्वयंपाकघरात, म्हणजे ही इथे येऊन, राहून गेली असणार.
मोना म्हणाली, “ ममा तुम्ही खरच आराम करा. मला समीरचे सगळे किचन ओळखीचे आहे. मी कितीतरी वेळा येऊन करूनही गेलेय त्याच्यासाठी स्वयंपाक. ”. . . . मोनाने खरोखरच तासाभरात उत्तम स्वयंपाक केला. म्हणाली, “ ममा, पोळ्या मात्र बाहेरून आणल्यात हं. त्या करायला येत नाहीत मला, आणि वेळही नसतो. ”
गीता, रवी, समीर, सगळे अगदी मनापासून जेवले. रवीने मोनाची मनापासून स्तुती केली.
गीता म्हणाली, “ वावा !मोना, मस्त केलंस ग सगळं. आवडलं मला सगळं हं. आता समीरची काळजीच नाही मला. ”
मोना रात्री गीता आणि रवीच्या रूम मध्ये आली. म्हणाली, “ ममा, मला माहीत आहे, तुम्ही नाराज आहात. आम्ही तुमच्या बरोबरीचे नाही, माझे मॉम डॅड गरीब आहेत. पण ते खरोखर चांगले आहेत. मला, माझ्या भावाला, किती कष्ट घेऊन शिकवलंय त्यांनी. पण भाऊ निघूनच गेला अमेरिकेला. आज मी एवढा पगार, माझ्या आईवडिलांनी दिलेल्या शिक्षणानेच तर मिळवतेय. तुम्हाला आणखी एक सांगणार आहे,. . त्या दोघांना काहीही मदत लागली तर मी करणार आहे. त्यांची सम्पूर्ण जबाबदारी मी घेईन. अर्थात ते दोघे इतके मानी आहेत, की कधीही माझ्यावर अवलंबून राहणारच नाहीत. समीरला होकार देताना, मी हे आधीच सांगितलं आहे. त्याची काहीही हरकत नाही, आणि तुमचीही नसावी. ममा, नाती पारदर्शक असावीत ना. मी त्यांच्याशी, आणि समीरचे आईवडील म्हणून तुमच्याशीही, कायमच आदरानेच वागेन. मला तुम्ही समजून घ्या. लग्नात दिलेले दागिने छान आहेत, पण असले इतके भारी दागिने मी कधी वापरू? ते लहान मंगळसूत्र मात्र ठेवून घेते. . आणि फक्त २ साड्या मला पुरे आहेत. बाकी प्लीज घेऊन जा. मला खरोखर कसलाच सोस नाही हो. फक्त तुमचे प्रेम आणि आशीर्वाद द्या. “
गीता थक्क झाली. तिला आपल्या मैत्रिणींच्या सुना मुली आठवल्या. ’ मला लग्नात हेच हवे हं आई, आणि सासूलाही एखादा भारी दागिना तुम्ही द्यायला हवात, ’ हे बजावणारी सोनलची मुलगी आठवली.
मुलीला हिऱ्याचे मंगळसूत्र घेतले नाही, म्हणून लग्नात तमाशा करणारी प्रीतीची विहीण आठवली.
कोमलने लग्नात नुसतेच गुलाबजाम काय केले, आणखी काही स्वीट नाही का, म्हणून नाके मुरडणारी लता आठवली.
या सगळ्या मैत्रिणी, त्यांच्या मुलीसुना, तिला आठवल्याच एकदम. इतके मोठे खर्च करूनसुद्धा, न टिकलेली लग्नंही गीताला आठवली. . . एकाच वर्षात पल्लवीची सूनबाई निघून गेली होती. . . वर्षाची अत्यंत लाडावलेली मुलगी, सासरी सासूसासरे आणि नवऱ्याशीही पटत नाही म्हणून परत आली होती.
— हा सगळा चित्रपट गीताच्या डोळ्यासमोरून सरकला.
परदेशी जन्मलेली, पण संस्कार भारतीय असलेल्या या मुलीबद्दल एकदम माया दाटून आली गीताच्या पोटात. किती खरी वाटते ही मुलगी !
गीता उठली, आणि तिने मोनाला पोटाशी धरले. म्हणाली, “ मोना, मला आता माझ्या समीरची मुळीच काळजी नाही ग. फार छान निवड आहे त्याची. माझाच चष्मा बदलायला झाला होता. . . काय आहे ना समीर मोना, मी सामान्य आयुष्य कधी जगलेच नाही. सतत समाजातल्या श्रीमंत आणि उथळ मैत्रिणींसाठीच जगत आले. पार्ट्या, भिशी, सतत फार्महाऊसवर जाऊन मजा करणे, हेच आमचे आयुष्य !! पण खरं सांगू, अलीकडे उबग यायला लागला होता ग या दिखाऊ जगण्याचा. आता मात्र मी त्या ग्रुपमध्ये फिरकणार सुद्धा नाही. मोना, समीर, छान आहेत तुमचे विचार. सायलीसुद्धा मला हेच सांगत होती जीव तोडून. पण तेव्हा नाही पटलं. “
गीताच्या डोळ्यात पाणी आलं. रवीने तिला जवळ घेतले, आणि म्हणाला, “ मीही हेच सांगून शेवटी नाद सोडून दिला. पण गीता, मुळात तू खूप सरळ आणि भाबडी आहेस. चल, आता कबूल कर, आपल्या घरात, बाहेरची दोन्ही मुले लाख मोलाची आली आहेत … जावई आणि सून. ”
गीताने मान हलवली, आणि म्हणाली, “ हो रवी. कधीतरी येते अशी डोळे उघडणारी वेळ. आता भारतात गेले की सगळे ग्रुप सोडून देणार. मी msw आहे, हेही मी कित्येक वर्षे विसरूनच गेलेय रे रवी ! माझी मैत्रीण माया, मला केव्हाची अंध शाळेत काम करायला बोलावतेय. सारखी म्हणत असते, ‘ गीता, तुझा टॅलेंट वाया घालवत आहेस तू या दांभिक उथळ बायकांच्यात. एकदा येऊन बघ समाजातली दुःखे. . . विसरून गेली आहेस का ग. . आपण msw आहोत ते?’. . . तिकडे नक्की जाईन म्हणते. ”
अचानक झालेले हे परिवर्तन बघून, रवि आणि समीरने एकमेकांना टाळ्या दिल्या, आणि डोळे पुसत मोनाने गीताला मिठी मारली.
अतिशय समाधानाने, भरल्या मनाने, आणि डोळ्यांनी, गीता आणि रवी भारतात परतले.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈