सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ पार्टी – भाग २ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
(मागील भागात आपण पाहिले – रस्ता संपत नव्हता आणि ती कुत्री काही केल्या पाठलाग सोडत नव्हती…गाडी थांबवून त्या कुत्र्यांना हुसकावून लावण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाच नाही…कारण थांबला की खेळच संपणार होता…अचानक मागून अनुप जोरात ओरडला, “पक्या…पक्या….ते बघ तिथं…तिथं घर दिसाय लागलं…चल लवकर तिथं!” आता इथून पुढे)
एक मिणमिणत्या लाईटीचा उजेड एका दगडी कौलारू घरावर पडला होता…..ओसाड अश्या माळरानावर ते घर एकटच उभं होतं…..प्रकाशने बाईकचा वेग वाढवला आणि बाईक त्या दगडी कौलारू घराच्या दिशेने चालली…..त्या घराच्या दगडी भिंतीवर काहीश्या विचित्र भाषेत काहीतरी लिहल होत…..घरावर एक बोर्डही लागला होता….ते घर जसजसे जवळ येऊ लागलं तसं मागे लागलेली ती भयानक कुत्री एकेक करून अंधारात गायब होऊ लागली….दोघांनी थोडा निश्वास सोडला…दोघांनाही प्रचंड तहान लागली होती….आधीच दोघेही प्रचंड थकले होते….सगळं अंग घामाने भिजले होते घसा कोरडा पडला होता…..दोघांनी मागे वळून बघितले मागे एक लांबलचक रस्ता दिसत होता….आजूबाजूची पांढरी माती अगदीच अनोळखी होती….त्या कमानीतून आपण एका दुसऱ्या दुनियेत आलोय की काय असा भास अनुपला होत होता तोच काहीसा खरा ठरत होता…..ह्या पांढऱ्या मातीवरून तर हा नक्कीच महाराष्ट्र वाटत नव्हता..आणि ते अनोळखी भाषेतले फलक??..कदाचित आपण एका दुसऱ्या राज्यात आहोत किंवा एखाद्या दुसऱ्या देशात??…..शक्यता नाकारता येत नव्हती….एकाच रात्रीत बऱ्याच अविश्वसनीय,भयंकर आणि जीवघेण्या गोष्टी घडल्या होत्या…..काहीही घडू शकत होत…..दोघांनी गाडी त्या घराबाहेर पार्क केली घरावरी एक अनोळखी “ホテルの客” अश्या अक्षरात काहीतरी लिहलं होतं…घराचे बांधकाम भारतीय वाटत नव्हते….छप्पर उताराचे आणि बांबूनी बनले होते…..बाहेरून दगडी विटांचे बांधकाम होते….एक रूमचे घर असावे असं बाहेरून वाटत होते…अनुप आणि प्रकाश त्या घराच्या पायऱ्या चढून दरवाज्याजवळ पोहोचले…..दरवाजा जवळपास मोडकळीस आला होता…..अनुपने फक्त एक बोट लावले आणि कर्रर्रर्रर्रर्रर्र असा आवाज करत तो दरवाजा पूर्णपणे उघडला गेला….अजून एक धक्का दोघांचेही डोळे विस्फारून गेला….बाहेरून लहान एक खोलीचे दिसणारे घर आतून मात्र एका प्रशस्त हॉल सारखे होते हा हॉल खूपच मोठा वाटत होता….दुरून परत तो कुत्र्यांचा आवाज आला आणि दोघांची पावले त्या घरात पडली…..एक मोठा हॉल मधेच एक मोठा डायनिंग टेबल ठेवला होता…..त्या मोठ्या हॉल मध्ये उजेड कमी जास्त होत होता कारण आजूबाजूला लावलेल्या मशालीची ज्योत ज्या बाजूला जाईल तिथे उजेड असा खेळ सुरू होता…मशालीच्या आगीच्या केसरी रंगात तो हॉल उजळून निघाला होता….सगळं वातावरण दोघानाही अनोळखी होत….ते त्या वातावरणात खेचले जात होते….पाऊले आपोआप आत पडत होती….हॉल च्या आजूबाजूला काही खोल्या होत्या त्यांची दारे जुन्या दरवाज्यानी बंद होती…..डाव्या बाजूला काही लाकडी ड्रम ठेवले होते त्यावर लाकडी झाकण होते…..दोघांच्याही नजरा त्या आश्रयात मानवी अस्तित्वाला शोधत होत्या….अनुपची नजर चारी दिशांना फिरत होती इतक्यात प्रकाशाची खुनावणारी थाप अनुपच्या खांद्यावर पडली आणि तो भानावर आला….समोरच्या एका स्टेज सारख्या कोपऱ्यात एक म्हातारा गुडघ्यात आपले डोके लपवून बसला होता…..होय म्हातारच होता तो…..त्याचा चेहरा जरी दिसत नसला तरी अर्धे टक्कल आणि मागे असलेल्या पांढऱ्या फेक केसांमुळे अंदाज बांधता येत होता सोबत त्याचे शरीर अगदीच अशक्त होतं…..हाडाला मांस चिटकलं होत अंगावर सुरकुत्या काळे तीळ त्या जीर्ण वृद्ध देहाची ओळख करवून देत होत्या…..तो म्हातारा गुडघ्यात तोंड लपवून पुढे मागे डुलत होता काहीतरी विचित्र भाषेत पुटपुटत होता….त्याच्या डोक्यात एक छोटंसं छिद्र आणि त्यातून पांढरा स्त्राव वाहत होता त्याचा उग्र वास सगळीकडे पसरला होता….खांद्याची पाठीची हाडे स्पष्ट दिसत होती…..त्याचा तो भयानक अवतार बघून अनुप आणि प्रकाशने एकमेकाकडे बघितले शेवटी धाडस करून अनुप बोलला,
“व आजोबा….थोडं पाणी मिळलं का प्यायला?”
तो आवाज ऐकून तो जीर्ण झालेला देह शांत झाला…..आणि आपले गुडघ्यात लपवलेला चेहरा वर न काढता एक हात बाहेर काढून त्या लाकडी ड्रम कडे बोट दाखवले…..त्या हाताकडे दोघे काहीवेळ बघतच राहिले…..लांब बोटे त्यावर लांब काळी नखे मानवी वाटत नव्हतीच…..दोघांनी लगेच तिथून काढता पाय घेतला……घसा कोरडा पडला होता…तहानेने पूर्ण अंग थरथरत होते त्यामुळे दोघेजण त्या लाकडी ड्रम जवळ पोहचले…..एक विचित्र असा वास त्या ड्रम मधून येत होता पण तहान तर प्रचंड लागली होती त्यामुळे प्रकाशने ड्रमचे झाकण उघडले……समोर जे काही होतं ते बघून दोघेही भीतीने जवळपास खालीच कोसळले….ड्रम रक्ताने काठोकाठ भरला होता एक दोन मानवी मुंडकी त्या लाल भडक रक्तावर तरंगत होती…..बसल्या बसल्या अनुपचे लक्ष समोरच्या खोलीवर गेले त्या खोलीचे दार उघडले गेले होती…..मानवी हाडांचा कवट्यांचा खच च्या खच त्या खोलीत तुडुंब कोंबून भरला होता …बाहेर येऊ पाहत होता…..अनुप आणि प्रकाश आता जोरजोरात किंचाळू लागले….कित्येक लोकांची हाडे होती ती.
कट कट कर्रर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्रर्र….
घामेजलेल्या त्या दोन चेहऱ्यांनी त्या आवाजाच्या दिशेने बघितले……मशालीच्या उजेडात तो अगदी अमानवी वाटत होता…..तो म्हातारा आता त्यांच्या समोर उभा होता…..आपला जबडा फूटभर ताणवून उघड्या जबड्याने आणि काळ्या उभ्या डोळ्यांनी तो त्या दोघांच्याकडे बघत होता…..त्या जबड्यात छोटे छोटे असंख्य दात होते….हातांनी आकार बदलला होता 7,8 फुटी देहाचे हात लांबून आता जमिनीला टेकत होते…..त्या हातांची बोटे लांबलचक पसरली होती…..अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून उपाशी असलेला तो अशक्त देह….मानवी मांस खाऊन जगत असावा आणि बक्षीस म्हणून हाडांचा संग्रह करून ठेवत असावा…..कित्येक दिवसापासून तो उपाशी असावा अंदाज नव्हता….लांब उघडलेला जबडा त्या दोघांचे लचके तोडायला रक्त प्यायला आसुसला होता…..समोरच दृश्य बघून अनुप आणि प्रकाश जिवाच्या आकांताने बाहेर पळत सुटले…..मागोमाग तो अमानवी म्हातारा हातांचा आणि पायाचा आधार घेत एखाद्या चारपाई प्राण्याप्रमाणे चिरररररररर चिरररररररर अस किंचाळत त्यांच्या मागे धावत येत होता…..अनुप आणि प्रकाश घराबाहेर पडले…..दोघांचाही श्वास चढला होता…..प्रकाश जोरजोरात रडत होता रडतच त्याने बाईक स्टार्ट केली….आणि रस्त्यावर आणली…..बाईक वेगाने धावत होती तितक्याच वेगाने ते अमानवी आपला जबडा फूटभर उघडा ठेवून त्यांच्या मागे येत होतं…..अनुप ओरडत होता प्रकाशला बाईक पळव पळव म्हणून जिवाच्या आकांताने सांगत होता कारण तो अमानवी म्हातारा काही अंतरावरच हातापायांनी धावत येत होता….वेगाने धावताना रस्त्यावर त्याच्या हातापायांची हाडे आपटत होती त्याचा खट खट खट असा आवाज घुमत होता….त्याचे हात लवचिक होते त्याने तो हल्ला करत होता…अचानक अनुप किंचाळला…..त्या म्हाताऱ्याने आपल्या लांबलचक नखांचा वार अनुप वर केला ….बाईक स्पीड मध्ये असल्यामुळे पाठीवर दोन तीन नखांचे ओरखडे पडून त्यातून हलके रक्त वाहू लागले…..कर्कश गर्जना करत तो म्हातारा कोणत्याही क्षणी झडप घालून त्या दोघांचा फडशा पडायला तयार होता…..दोघांनाही काहीच सुचत नव्हतं मागून काळ धावतच येत होता…….इतक्यात प्रकाशने 80 च्या स्पीड वर धावणाऱ्या गाडीला अर्जंट ब्रेक लावला…..समोर एक जण गाडी बाजूला उभी करून रस्त्याच्या मधेच दोघांना थांबण्यासाठी हात करत उभा होता……त्याच्या हातात पाण्याची बाटली होती दुसऱ्या हाताने तो थांबायचा इशारा करत होता……घाबरलेल्या प्रकाशने डिस्क ब्रेक दाबला होता त्यामुळे गाडी थोडी लडबडून दोघेही अलगद त्या समोर उभा असलेल्या तरुणापुढे कोसळले……तसा तो तरुण पुढे आला….हातातली 2 लिटर ची पाण्याची बाटली खाली ठेऊन त्यांच्याजवळ गेला आधी त्याने गाडी उचलली.
“आव….दादा….जरा हळू की राव…..एवढ्या तर्राट कुठं निघालाईसा….हात करालतो की राव.”
कपाळावर अष्टगंधाचे दोन पट्टे ओढलेल्या तरुणाकडे अनुप आणि प्रकाशचे लक्षच नव्हतं….त्यांचं लक्ष समोरच्या रस्त्यावर होतं….गाडी बरोबर मागे येणारा त्या म्हाताऱ्याला त्यांची नजर शोधत होती…दोघे प्रचंड घाबरले होते…भीती त्यांच्या चेहऱ्यावर घामाच्या रूपातून वाहत होती…दोघांची ती अवस्था बघून त्या तरुणाने रस्त्यावर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली आणि त्यांच्या दिशेने केली…..अनुप आणि प्रकाश त्या तरुणाकडे बघत होते तो सामान्य वाटत होता….बाटलीतील पाणी बघून अनुपने ती बाटली घेतली आणि थरथरत्या हातांनी टोपण उघडत घटाघटा पिऊ लागला…..आपली तहान शांत होताच त्याने ती बाटली प्रकाशकडे दिली….प्रकाशसुद्धा घटाघट ते पाणी पिऊ लागला त्याचा वेग बघून तो तरुण म्हणाला,
“ए भावा….जरा पाणी ठिव त्यात….वाईच्या गणपतीच्या मूर्तीवरच तीर्थ आहे त्ये…..घरातल्या लोकांना पण द्यायला पाहिजे की. “
प्रकाशने बाटलीला टोपण लावले…..त्या तरुणाने परत एकदा दोघांच्याकडे बघितले आणि सॅक मधून एक लाडूचे पाकीट काढले.
“बाकी काय नाही हे लाडूचे पाकीट आहे बघा….हे खावा जरा…..वाघ मागं लागल्या सारखं कुठनं आलाईसा अस??”
थरथरत्या हातांनी ते प्रसादाच्या लाडवाचे पाकीट घेऊन अनुप बोलू लागला, “ते….ते….भूत….भूत….” अनुपच्या तोंडून पुढचे शब्द फुटेनात….त्या तरुणाने समोरच्या रस्त्याकडे बघितले.
“भूत??…..कुठं हाय भूत??….कुणी न्हाई बघा इथं….बाकी ह्यो रस्ता खूपच हरामखोर आहे राव….मी पण 2,3 तास गाडी चालवायलोय….वाटच सापडना राव….वाईतन कोल्हापूरला यायला निघालो तर एक बेनं भेटलं वाटत….लिफ्ट दिली त्याला आणि जवळचा रस्ता जवळचा रस्ता करत करत त्या रांxच्यान ह्या रोडवर आणून सोडलं बघा….भलतंच विचित्र झिपरं हुत त्ये…काय बाय विचित्र बडबडत हूत…..बर जवळचा रस्ता म्हणत 3 तास ह्या असल्याच एका रोडवर फिरालोय आपला… एक गाव दिसणा की घर…..मग कंटाळून इथं थांबलो…पाणी संपलं म्हणून देवाचं तीर्थ पीत हुतो तवर तुमची गाडी भेटली बघा.”
क्रमश: भाग २
लेखक : श्री शशांक सुर्वे
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈