सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – क्रमश: भाग 4 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
अचलाने अभिजितला दाखवली ती आत्महत्येची बातमी.
क्षणभर त्याचा चेहरा गंभीर झाला. पण लगेचच दोन्ही हात वर करून तो ‘हेss’ म्हणून ओरडला. अगदी सुजयसारखंच.
“अभि?”
“अग अचला, ही बातमी खरीच दिसतेय.आता तर आपला चित्रपट….. ”
“अभि……”तिच्या आवाजातला तिरस्कार त्याला आरपार भेदून गेला.
मग दर एक-दोन दिवसांआड अशा बातम्या येऊ लागल्या.
अचलाला तर तिसऱ्या पानावरचा वरचा उजवा कोपरा बघायचा धसकाच बसला. अभिजित तिची नजर चुकवू लागला.
त्या दिवशी रात्री मात्र अचलाने ठामपणे सांगितलं, “अभिजित,मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे.”
“मी दमलोय.”
“मला एस्क्युजेस नकोयत. मी काय सांगणार आहे, ते तुला ऐकावंच लागेल.”
“ठीक आहे. लवकर आटप.”
“आतापर्यंत अकरा दुणे बावीस मुलांनी आत्महत्या केल्यायत. कसल्यातरी खुळचट कल्पनांवर विश्वास ठेवून.”
“सत्य आणि सिनेमा यातला फरक न कळण्याएवढी लहान ती नक्कीच नव्हती.”
“सत्य आणि सिनेमा यातला फरक समजण्याएवढी मोठी होती ती मुलं. पण खरी बातमी आणि खोटी बातमी यातला फरक ओळखू शकली नाहीत. निदान पहिल्या जोडीला तरी ती बातमी खरी वाटली. नंतरच्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. कॉम्पिटिशनचं युग आहे ना हे !आमचं प्रेमही त्यांच्याइतकंच उत्कट आहे, हे दाखवायचा मोह झाला असणार त्यांना.”
“असेलही.”अभिजितने खांदे उडवले.
“पण कोणत्याही परिस्थितीत तू तुझी जबाबदारी टाळू शकत नाहीस.”
“म्हणजे? “अभिजित तुच्छतेने काही बोलला, की अचला सरळ तिथून निघून जात असे. आज मात्र त्याच्या ‘म्हणजे’मधली तुच्छता लक्षातच न आल्यासारखी ती बोलत राहिली.
“तू प्रेस कॉन्फरन्स घे आणि सांगून टाक. सांगून टाक की ती पहिली बातमी खोटी होती. सांगून टाक, की चित्रपटाचा शेवट हाही एक स्टंटच आहे. चित्रपट ओरिजनल वाटावा म्हणून केलेला. वास्तवाच्या जगात त्याला काहीही अर्थ नाही, स्थान नाही. तेव्हा कोणीही तो चित्रपट गांभीर्याने घेऊ नये. पाहिजे तर तो चित्रपट ‘ऍडल्ट’ करून टाका.”
“झालं तुझं बोलून?”
“हे सगळं उद्याच्या उद्या झालं पाहिजे.”
“हे बघ, अचला. या गोष्टी माझ्या हातात नाहीत.नवीनभाईच काय ते ठरवू शकतील.”
“मग बोल त्यांच्याशी. समजाव त्यांना. म्हणावं, पैशापेक्षा माणसाचं आयुष्य कितीतरी पटीने मौल्यवान आहे. की मी बोलू त्यांच्याशी?”
“तू नको. मीच बघतो.”
पण तो नवीनभाईंशी काहीच बोलला नाही. नवीन चित्रपटांची सिटींग्ज चालू होती. अशी काहीतरी मुर्खासारखी स्टेप घेऊन तो स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार नव्हता.
ही कालची गोष्ट. आज मात्र अचलाने निश्चयच केला. आज कोणत्याही परिस्थितीत ती अभिजितला कन्फेशन द्यायला लावणार होती. प्रेम म्हणजे काय, याची जाणीवही नसणाऱ्या त्या निरागस, कोवळ्या प्रेमिकांना अपील करायला लावणार होती.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈