सुश्री शांभवी मंगेश जोशी
जीवनरंग
☆ ‘जे.बी.एल.’… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆
आला! काळा वड्डा! नाही नाही काळदेव! काळुराम! असं म्हणत, इश्मत, मुश्ताक आणि जेनीनं एकमेकांना टाळ्या दिल्या. त्यांच्या अचकट विचकट हसण्यानं जबीलच्या मस्तकात तीव्र सणक गेली. तेवढ्याच जोरात हातातला दगड जबीलने त्यांच्याकडे भिरकावला. इश्मतच्या डोळ्याला रक्ताची धार लागली.
प्रिन्सिपल मार्थासमोर जबील, भीतीनं, तेवढाच संतापानं आणि वेदनेनं, थरथर कापत उभा होता. आता जबरदस्त शिक्षा होणार हे त्याला कळून चुकलं होतं.
‘‘इसके पेरंट्सको बुलालो, इमिजिएट!’’ असं म्हणत, त्या जबीलच्या जवळ पोहोचल्या. एरवी प्रेमळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्था मॅडमचा जेवढा संताप, धाक अन् दरारा होता; तेवढाच जबीलच्या डोळ्यात त्वेष आणि संताप होता. हाताच्या मुठी घट्ट आवळून, त्या मागे बांधून जबील उभा होता.
लहानपणापासून काळा-काळा म्हणून चिडवणारी, हिणवणारी अनेक दृष्यं, त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होती.
‘‘हात आगे!’’
मोठ्ठी छडी, त्याच्या डोळ्यासमोर नाचवत मार्था मॅडम ओरडल्या.
ओठ घट्ट आवळून, जबील टपोरे डोळे ताणून, त्यांच्याकडे बघत राहिला.
‘‘हात आगे! सुनाई नही देता?’’
तरीही जबील तसाच!
संतापाने बेभान झालेल्या मार्था मॅडमने त्याच्या खांद्यावर सटकन् छडी मारली.
त्याबरोबर जबीलच्या उजव्या हाताची मूठ पुढे आली अन् त्याच्या चारही बोटांनी मार्था मॅडमच्या हातावर काळ्याकुट्ट, तेलकट, वंगणासारख्या पदार्थाचा फटकारा मारला. मार्था मॅडमच्या गोर्या धप्प हातावर जबीलचे इवल्याश्या चार बोटांचे काळे कुट्ट फटकारे उठून दिसत होते. त्या जागी मॅडमना प्रचंड झोंबू लागलं. ‘‘स्स्… हां…!’’ करून त्या चित्कारल्या. हातातली छडी गळून पडली. त्या हाताकडे बघत राहिल्या. अनपेक्षित प्रकाराने सारेच गोंधळले. मॅडमच्या भोवती जमा झाले. संधीचा फायदा घेऊन जबीलने धूम ठोकली. शाळेच्या गेटवरून उडी मारून, तो पसार झाला.
मार्था मॅडम निवृत्त होऊन बरीच वर्ष झाली, तरी त्यांच्या हातावरची खूण मिटली नव्हती. त्यासाठी त्यांनी अनेक औषधोपचारही केले. पण ती जन्माचीच खूण त्यांच्या हातावर उमटली.
मार्था मॅडमच्या हातात एक पत्र होतं.
‘‘मॅडम, मी तुमचा विद्यार्थी आहे. माझ्या संशोधनासाठी मिळालेला पुरस्कार तुम्हाला प्रदान करण्याची इच्छा आहे…’’ असं म्हणून कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची विनंती केली होती.
खाली सही – J. B. L. अशी अक्षरं होती. जस्ट बी लव्हिंग – असा त्याचा विस्तार आणि अर्थही होता. कितीही डोक्याला ताण दिला तरी मॅडमना काही आठवेना. पण विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी कार्यक्रमाला जाण्याचं त्यांनी निश्चित केलं. कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी मॅडमसाठी कार पाठवली होती. मॅडम व्यासपीठावर येताच, एका व्यक्तीनं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. मॅडमने त्याच्या खांद्याला धरून उठवलं.
‘‘मॅडम माफ केलंत का मला? मी जबील. ओळखलतं का मला?’’
मॅडमने आश्चर्यानं ‘आ’ केला. त्याचवेळेस त्यांचा उजवा हात डाव्या हातावरच्या खुणेवरून फिरत राहिला. J. B. L. अक्षराचा अर्थही उलगडला.
‘‘मॅडम, माणसांच्या कातडीचा काळा रंग बदलण्यासाठी मी औषध शोधून काढलं आहे. त्यासाठी मला हा पुरस्कार मिळत आहे. त्या दिवशी तुम्ही मारलेल्या छडीमुळेच मी हा शोध लावू शकलो. हा पुरस्कार मी तुम्हाला प्रदान करत आहे.’’ असं म्हणून जबीलनं मॅडमच्या हातात पुरस्कार ठेवला. त्यावरची जे. बी. एल. अक्षरं उठून दिसत होती.
‘‘जस्ट बी लव्हिंग’’ असं म्हणत जबीलनं डबीतलं औषध, मार्था मॅडमच्या हातावर प्रेमानं, हळुवार हातानं लावलं. म्हणाला, ‘‘मॅडम रोज हे औषध लावलं तर महिनाभरात हे व्रण नाहिसे होतील. एवढंच नाही, कोणताही काळा माणूस त्यामुळं गोरापान होईल. पण एकदा माफ केलं म्हणा.’’
मॅडमच्या पाण्यानं भरलेल्या डोळ्यापुढं, छोटा जबील दिसत होता. इतक्याश्या हातानं फटका मारणारा. समोर उभं राहून जबील विचारत होता, ‘‘माफ केलंत का मॅडम? सांगा ना.’’
© सौ. शांभवी मंगेश जोशी
संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003
फोन नं. 9673268040, [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈