? विविधा ?

☆ भाडेकरू… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) 

“बरे झाले साठे काका तुम्ही फोन करून आलात, नाहीतर नेमके तुम्ही यायचे आणि आम्ही कुठेतरी बाहेर गेलेलो असायचो.” सुहासने साठे काकांचे अगदी हसून स्वागत गेले. त्यांना त्यांची आवडती आरामखूर्ची बसायला दिली.

“अगं मंजिरी पाणी आणतेस का? आणि हो चहा टाक साठे काकांसाठी, कमी साखरेचा बरं का.” आतल्या खोलीत कार्यालयातले काम घरी करत बसलेल्या मंजिरीला त्याने आवाज दिला.

“तसे महत्वाचेच काम होते, म्हणून फोन करून आलो होतो.” जरा स्थिरावल्यावर व पेलाभर पाणी पोटात गेल्यावर साठे काकांनी विषय काढला.

“अगं मंजिरी आधी चहा टाक, काका किती दिवसांनी आपल्या घरी आले आहेत.” साठे काका का आले असतील या विचारांत तिथेच उभ्या मंजिरीला त्याने जागे केले.

“थांब मंजिरी, मी जे सांगणार आहे ते तूही ऐकणे महत्वाचे आहे. तर बरं का सुहास, तुझ्या वडिलांनी शेवटच्या काळात माझ्याकडे एक पत्र दिले होते. ते गेल्यावर मी ते पत्र तुला वाचून दाखवावे अशी त्यांची इच्छा होती.”

काकांनी कुठल्याशा पत्राचा विषय काढताच सुहास आणि मंजिरी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.

“इतका विचार करायचे कारण नाही, हे काही मृत्यूपत्र नाही. त्यांना फक्त त्यांच्या मनातला विचार तुला सांगायचा होता. आधी तुझ्या नोकरीच्या धावपळीमुळे तर शेवटी दवाखान्यातल्या धावपळीमुळे त्याला तुझ्याशी नीटसे बोलता आले नव्हते. पण बहुधा त्याला त्याची वेळ जवळ आल्याचे आधीच कळाले असावे, म्हणून त्याने हे पत्र खूप आधी लिहून ठेवले होते. फक्त माझ्या हातात शेवटच्या काळात दिले.” आता साठे काकांनी दीर्घश्वास घेतला. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्यांनी आणखी घोटभर पाणी घेतले.

“काका असे काय आहे त्या पत्रात की जे त्यांना माझ्या जवळ किंवा मंजिरीच्या जवळ बोलता नाही आले.” सुहासच्या मनात नाना शंकांचे काहूर माजले होते. मंजिरी शांत असली तरी तिचीही अवस्था फार वेगळी नव्हती. एवढ्या वेळ उभ्या मंजिरीने पटकन भिंतीला टेकत खाली बसणे पसंत केले.

काकांनी सोबतच्या पिशवीमधून पत्र बाहेर काढले. कार्यालय सुटले तरी कार्यालयातील कामकाजाची पद्धत सुटली नव्हती. आणि म्हणूनच पत्र अगदी खाकी लिफाफ्यामध्ये वरती छान अक्षरात अगदी नाव तारीख घालून ठेवले होते. काकांनी आधी पत्र सुहासला दाखवले. वडिलांचे अक्षर त्याने सहज ओळखले. ते सुबक नक्षीदार असले तरी शेवटच्या काळात थरथरत्या हातांनी नक्षी थोडी बिघडली होती.

काकांनी पत्र वाचायला सुरूवात केली. वरचा मायना वाचला तसे सर्वांचेच डोळे पाणावले. अधिक वेळ न दवडता त्यांनी पुढचे वाचायला घेतले.

“मला कल्पना आहे की, या वाड्याची वास्तू पाडून ही जागा एखाद्या व्यावसायिक इमारत विकासकाला द्यायची तुझी इच्छा अनेक वर्षांपासून आहे. तू माझ्याकडे थेट विषय काढला नसलास तरी कधी ताई तर कधी मंजिरीच्या आडून तो माझ्या पर्यंत पोहचवत राहिलास. माझ्या पाठीमागे या वाड्यावर तुझा व बहिणीचा समसमान हक्क आहे हे मी वेगळे सांगायला नको.”

“पण काका मला यातले काहीच नको आहे. माझे घर केव्हाच झाले आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने गाठीला बक्कळ पैसाही आहे. ताईने हवे तेव्हा या वाड्याचा ताबा घ्यावा, मी हसत माझ्या घराकडे निघून जाईन.”, काकांचे पत्र वाचन मधेच तोडत सुहास तावातावाने बोलला. तसा त्याचा हात दाबत मंजिरीने त्याला शांत केले.

“अरे मला पत्र तर पूर्ण वाचू देत.”, असे म्हणत काकांनी पुढे पत्र वाचायला सुरूवात केली.

“माझ्या आजोबांपासूनचा म्हणजेच तुझ्या पणजोबांपासूनचा हा वाडा. इथे काही बिऱ्हाडे पिढ्यान् पिढ्या राहात आहेत. जशी तुझी माझी नाळ जुळली आहे तशीच या बिऱ्हाडांच्या पुढच्या पिढ्यांशी माझी नाळ जुळली आहे. तू जागा विकसकाला देताना ताईचा विचार घेशीलच याची खात्री आहे पण सोबत या बिऱ्हाडांचाही एकदा विचार घ्यावा एवढीच माझी विनंती आहे, त्यांची योग्य व्यवस्था करावी एवढीच माझी शेवटची इच्छा आहे.”

पुढची पत्राच्या समारोपाची वाक्ये वाचायची गरजच नव्हती. त्यांची पत्र लिहिण्याची पद्धत, त्यातली भाषा, सुरूवात व समारोप आताशी साऱ्यांच्या परिचयाचे झाले होते. काकांनी पत्र सुहासच्या हाती सुपूर्त केले. पुढची काही मिनिटे तो नुसताच पत्रावरून हात फिरवत होता. “मी आत जाऊन चहा टाकते.”, त्यांची तंद्री तोडत मंजिरी म्हणाली आणि झपझप आत गेलीही.

बाहेर फक्त साठे काका, सुहास आणि वडिलांचे पत्र राहिले होते.

वाडा तसा खरेच जुना होता. अनेक बिऱ्हाडे आधीच सोडून गेली होती. काही खोल्या वारसा हक्क राहावा म्हणून कुलुपे आणि जळमटांसह बंद होत्या. न मागता दर महिना खात्याला भाडे म्हणून नाममात्र रक्कम जमा होत होती. पण सुहासच्या चटकन लक्षात आले की ज्यांच्यासाठी वडिलांचा जीव अडला होता किंवा त्यांनी एवढा पत्र प्रपंच केला होता, ते जोशी मास्तर वाड्याच्या मागच्या अंगणातील खोल्यांमध्ये आपल्या पत्नीसह राहात होते. पंख फुटले तशी मुले केव्हाच उडून गेली होती. पाठीमागे दोन जीर्ण देहांसह जीर्ण घरटे राहिले होते.

त्यांची जुजबी व्यवस्था करून सुहासला हात काढता आले असते, किंबहुना विकसकाने तसे सुचविले देखील होते. ना जोशी मास्तरांमध्ये लढायची ताकद होती ना त्यांच्या बाजूने कोणी लढायला उभे राहिले असते. काही शिक्षक दुर्लक्षिले जातात हेच खरे.

विकसकाला जागा ताब्यात द्यायला अद्याप पुष्कळ वेळ होता. सुहासने जोशी मास्तरांच्या मुलांशी संपर्क करून पाहिला. अपेक्षेप्रमाणे समोरून काहीच प्रतिसाद आला नाही.आता मात्र एक वेगळीच कल्पना सुहासच्या मनात आली आणि ती त्याने आधी मंजिरीला मग ताईला बोलून दाखविली. साठे काकांना यातले काहीच सांगायचे नाही असे त्याने दोघींना बजावले होते. जोशी मास्तरांशी तो व मंजिरी स्वतः जाऊन बोलले. त्याची कल्पना ऐकून तर मास्तर ढसाढसा रडले.

इकडे साठे काका लांबूनच पण वाड्यात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होते. सुहास सामानाची बांधाबांध करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण त्याने जोशी मास्तरांचे काय केले याचा काही थांग पत्ता लागत नव्हता. त्याला वडिलांच्या पत्राची आठवण करून द्यावी असे काकांना खूपदा वाटले, पण त्यांनी धीर धरला. एके दिवशी वाड्याच्या दारात ट्रक उभा असल्याचे त्यांना कोणाकडून तरी कळाले आणि हातातली सगळी कामे टाकून त्यांनी वाडा गाठला.

“अरे सुहास तू निघालास वाटतं. ते जोशी मास्तर कुठे दिसत नाहीत, त्यांचे काय ठरवले आहेस? तुझ्या वडिलांचे पत्र लक्षात आहे ना?” काहीसे रागात काहीसे नाराजीने पण एका दमात साठे काका बोलून गेले.

“ते तर पुढे गेले.”, ओठांवर हसू आलेले असतानाही कसेबसे ते दाबत सुहास थोडा कर्मठपणे बोलला.

“पुढे गेले म्हणजे? कुठे गेले?” साठे काकांचा पारा चढला.

“माझ्या घरी, माझे स्वागत करायला.” सुहासने अगदी संयमाने प्रतिउत्तर दिले.

“तुझ्या घरी म्हणजे? तू मला नीट सांगणार आहेस का? हे बघं तुझ्या वडिलांची अंतिम इच्छा होती की …” साठे काकांचे वाक्य पूर्ण होऊ न देताच सुहासने त्यांना वाड्याच्या पायऱ्यांवर बसवले.

“काका मी त्यांना दत्तक घेतले आहे. लोक मूल दत्तक घेतात तसे मी आई वडील दत्तक घेतले आहेत आणि आता अगदी शेवटपर्यंत मी त्यांचा संभाळ करणार आहे.” एखाद्या मुलाने वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवावे तसे सुहासने साठे काकांच्या खांद्यावर डोके ठेवले आणि म्हणाला, “तसेही आई बाबांच्या पाठीमागे आम्हाला तरी आधार कोण आहे.” साठे काकांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहात होत्या आणि आज त्या पुसायचे भानही त्यांना राहिले नव्हते.

लेखक : म. ना. दे.

(श्री होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments