सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ जीवनरंग ☆ मौत से ही मुहब्बत निभायेंगे हम – भाग 5 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
ऑफिसमध्ये पोहोचली, तेव्हा अचला बरीच सावरली होती.
सहकाऱ्यांना ‘गुड मॉर्निंग’, ‘हाय’ करताकरता तिने इनवर्ड मेलमधली लेटर्स चाळून घेतली. दोन लेटर्सच्या मागेच रिप्लाय लिहून तिने टायपिंगला पाठवून दिले.पाच-सहा लेटर्सवर फाईलचे रेफरन्सेस घालून ती फायलिंग ट्रेमध्ये टाकली. एकाचं सविस्तर उत्तर लिहायचं होतं. ते ऍक्शन फाईलमध्ये ठेवून त्यासाठी लागणाऱ्या रेफरन्स फाईल्सची लिस्ट तिने प्यूनकडे दिली.
कामाचा एक टप्पा संपवून, काँप्युटर ऑन करून ती ई-मेलकडे वळली.
नेट कनेक्ट होईपर्यंतच्या थोड्याशा फुरसतीत तिला आठवण झाली. सेफमधल्या पाचशेच्या दोन नोटा कमी झाल्या होत्या. सुजयने काढून तर घेतल्या नसतील ना? की आपलाच वेंधळेपणा झाला असेल? संध्याकाळी विचारलं पाहिजे त्याला. आणि त्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. त्यापेक्षा पूर्वीसारखं कॅशमध्येच पॉकेटमनी देऊ या त्याला. तरच त्याला पैशाची किंमत कळेल आणि आपलाही कंट्रोल राहील. रोजचा हिशेब लिहायची सवय लागली तर आयुष्यभर उपयोगी पडेल आणि कुठचे खर्च अनाठायी आहेत, ते त्याचं त्यालाच कळेल.
नेट कनेक्ट झालं. तिने ई-मेल ब्राउझ करायला सुरुवात केली.
पहिल्या दोन-तीन कामाच्या संदर्भात होत्या. नंतरची सुजयची होती. सुजयची ई-मेल? त्याने आपल्याला मेल कशाला केली? एकतर डायरेक्ट बोलू शकतो, नाहीतर फोनवर….
तिने वाचायला सुरुवात केली.
‘ममा, माझी मेल बघून आश्चर्य वाटलं असेल तुला. पण मी मुद्दामच फोन नाही केला.
मला माहीत आहे, उद्या सकाळी दहाच्या सुमाराला किंवा त्यानंतर तू मेल चेक करशील. तोपर्यंत मला सवड मिळेल.’
सवड? कसली सवड? कशासाठी?
‘पप्पा ग्रेट आहेत. मला पैसे देतात म्हणून नाही. पण खरंच ग्रेट आहेत. लव्ह पण तेच म्हणते. लव्ह म्हणजे…… जाऊदे ना. मी तिला लव्हच म्हणतो. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. खूप म्हणजे खूपच. पण लव्ह म्हणते, लग्न झाल्यावर सगळं बदलतं. तिच्या मम्मी-डॅडींचं लव्हमॅरेज होतं. घरचा विरोध पत्करून लग्न केलं होतं त्यांनी. पण लव्ह पाच-सहा वर्षांची असताना त्यांचा डिव्होर्स झाला. खूप सहन केलंय लव्हने. तुम्ही दोघेसुद्धा किती भांडत असता एकमेकांशी !
म्हणून तर लव्ह म्हणाली….. म्हणजे मी तर नकोच म्हणत होतो ;पण लव्हनेच समजावलं मला – एक मृत्यूच आपलं प्रेम जसंच्या तसं ठेवू शकेल. पप्पांचा ‘मौत से ही… ‘पाच वेळा बघितला आम्ही.
आम्हीसुद्धा आमचं प्रेम अमर करणार आहोत – आज रात्रीच.
ही मेल तू वाचशील, तेव्हा आम्ही हा इहलोक सोडून प्रेमलोकात पोहोचलेले असू.
–सुजय’
अचला दगडच झाली, ते वाचून.
अभिजितने निर्माण केलेल्या स्फुल्लिंगाने त्याचं स्वतःचंच जग भस्मसात केलं होतं.
समाप्त
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈