श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ रानपाखरू – भाग २ –  लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(मागील; भागात आपण पहिले –   “आता तू म्हनशील..मग या वर्सालाच का घाट घातला? तर बयो त्याचं असंय..सांजसकाळ तू लगीन करून दुसऱ्याच्या घरला जाशीन. उद्याला तुझ्या सासूनं म्हनाया नको, का ही पोर बिनआईची म्हनून हिला कुरडया येती नाईत.तिच्या आतीनं येवढंबी शिकवलं नाई..”)

बोलता बोलता आतीचं हुरदं दाटून आलं.  आता इथून पुढे)  

संगी खाली बघत गहू खालवर करीत उपसत व्हती . आतीनं नीट केलेल्या गव्हाचं पानी बदलीत व्हती .जरा ईळ गव्हाची वली रास रांजनात सांडन्याचा आवाज,पान्याचा चुबूक चुबूक आवाज येत राह्यला.समजूतीचं पानी गव्हात मुरत व्हतं,अवखळ नादीक असं काई निथळून जात व्हतं.

मध्यान्हीला गुंजाळाच्या तात्यानं फटफटीवर जाता जाता पारावर बसलेल्या मामांना हाळी दिली.मामांबरोबरची सगळी माणसं वळू वळू पाह्या लागली.

“ओ शंकरराव!! रांजनगावचे पावने येत्या ऐतवारी येनार हाईत.तयारीत ऱ्हावा ss”

मामांनी घरी आल्या आल्या ही बातमी आतीला सांगातली.आती खुश तर झाली पण ‘कसं व्हैल? काय व्हैल? समदं बैजवार झालं म्हंजे बरं..’ असा तिला काळजीकाटा लागला. कायतरी आठवल्यासारखं करीत आती म्हनली,

“तात्यानं निरोप दिला तवा कोनी ऐकलं तर नाई ना? नाई म्हंजे कोन कसं..कोन कसं..काईकाईंना बघवत नाई दुसऱ्याचं चांगलं.तुमीबी सांगू नका इतक्यातच कोन्ला.नाईतर समद्या जोडीदारांना दवंडी देताल..”

“दवंडी तर कवाच दिली तात्यानं..फटफटीवरून जाताजाताच मोठ्यांदी बोलला.समद्यांनीच ऐकलं.”   “घाऱ्या शिरप्यानंबी ऐकलं काय?” आतीनं धसकून विचारलं.

“म्हनलो ना समद्यांनीच ऐकलंय”

आती वैतागली.घाऱ्या डोळ्याच्या मानसांचा तिला कदीच भरवसा वाटला नव्हता.

आतीनं सांजच्याला तीन वाटांची माती, डोईची केसं,सात लाल मिरच्या,शिराईचे फड आन उलसिक तुरटी घेऊन संगीची नजर काडाया घेतली.नजर काढता काढता आती म्हनत व्हती,

“आल्यागेल्याची, पाप्याची, चांडाळाची समदी वाईट नजर जाऊंदे मसनात…

संगे!! सासरी एखांदातरी नासका कांदा असतो बघ..ज्याला दुसऱ्याचं उनंदुनं काढाया लय आवडतं..अशांचे हसून दात पाडता आले पायजेल.शेवटी सासर ते सासरच”

संगी मुकाट हुं हूं करत होती.बाईची नांदनूक यवढी अवघड असती? ती ईच्चारच करीत राह्यली.

बघता बघता ऐतवार आला…

ऐतवारच्या पहाटपासून आती आन् संगी उठली व्हती.घरच्या गावठी हरबऱ्याच्या डाळीचं पायलीभर पुरन तिनं शिजाया घातलं .संगीला पुरन वाटाया बसवून सोत्ता आमटीचा मसाला भाजू लागली.घरच्या काळ्या मसाल्याचा खुमास वास शिवारभर सुटला .जरावेळानं संगीची जोडीदारीनबी मदतीला आली.पटपटा हात चालवून त्या तिघींनी समदा सैपाक उरकत आनला.न्याहारीच्या वक्तापर्यंत पावनी येतीन असा आवाका व्हता पन उन्हाचा तडाखा वाढत चालला तरीबी पावन्यांचा पत्ता नवता. मामा घराभाईरच्या खाटंवर रस्त्यावर नजर ठिवूनच बसले व्हते. कुडच गाडीची धूळ उठतांना दिसत नवती. रस्त्यावर निस्तं भगभगतं ऊन बेडूकगिळल्या अजगरावानी पसारलं व्हतं. अजूनतर सूर्य माथ्यावरबी आला नवता तरी ऊन चटचटा भाजीत व्हतं.

पुरनपोळ्यांच्या चळतीवर माश्या घों घों करू लागल्या.आतीनं त्येच्यावर ठोक्याची पितळी उपडी टाकली.न्याहारीसाठीचे पोहे भिजट व्हऊन चालले.

संगीच्या केसात माळलेल्या गजऱ्याची टवटवी तिच्या चेहऱ्यावानीच कोमावली व्हती.आतीनं एकदम विचारलं,

“यंदाच्या ऐतवारीच म्हनले व्हते ना? तात्यानं नीट निरोप दिला ना?  तुमी परासलं का नाई नीट?”

” हा मंग! पाडव्यानंतरचाच ऐतवार..मी चांगलं ठाकूनठोकून इचारलं की तात्याला”

“आस्सं! पाडव्यानंतरचा ऐतवार हाच ना गं पोरीओ?”

“व्हय गं मावशे! हाच ऐतवार..येतीन वली.नको तकतक करू तू.उन्हामूळं थांबत थांबत येत असतीन.”    जोडीदारीन म्हनली.

थांबतीन कशाला? मोठे बागायतदार हाईत.चारचाकी हाये घरची…

…मरूंदे!! पावनी येतीन तवा येतीन.तवर घोट घोट च्या तरी घेऊ पोरीओ”

आतीनं आमटीचं भगूनं औलावर ठिवलं आन चुलीवर चहाचं आधन टाकलं. वट्यावरच्या तुळशीपासल्या गवत्याची दोन पानं चुरडून आधनात टाकली.च्या ला कढ आला नाई कुडं तोच मामांची हाळी आली.आतीनं पुढल्या दारातून पायलं तर मामा छातीला येक हात लावीत पळतच आतमंदी आले,

“अगं!! पावनी आलीत बर्का!!”

संगीच्या काळजातून लक्कन गोळा सरकून गेला.छाती धाडकनी धडकत व्हती. आतीनं त्याच च्या त पानी वाढीवलं.पटकनी पदर सावरीत भरला तांब्या मामांकडे दिला. मामांनी मोठ्यांदी हसत पावन्यांना  ‘रामराम,श्यामश्याम’ केलं. महिपतरावाशी वळख व्हतीच.बाकीची पावनीबी मोकळंढाकळं बोलत व्हती. जोडीदारीन खिडकीच्या फटीतून समदं लक्ष देऊन बघत व्हती.पोराचे हावभाव बारकाईने बघत ती खुसफूसली,

“संगे! पोरगा लय चिकना हाय बघ.आक्षी कपिल देव सारखा”.आती जिवाचा कान करून बैठकीच्या खोलीतली बोलनी ऐकत व्हती.तिचं लक्ष नाई आसं पाहून जोडीदारनीनं पटकनी संगीलाबी खिडकीपाशी बोलवलं.तिनं खिडकीच्या फटीतून दिसनाऱ्या चेहऱ्याकडे पाह्यलं आन तिच्या काळजात लकलक व्हायला लागलं. तरनाताठा, रूबाबदार,‌ येक बारकं लिंबू लपल येवढा भरघोस मिशीचा आकडा, घाटदार दंडावर तटतटलेला काळ्या धाग्यातला ताईत आन या समद्या पैलवानी बाजाला ठिगळावानी दिसनारं बुजरं हसू.संगीनं त्या चेहऱ्यावर तिच्याबी नकळत जीवाची कुरवंडी करून टाकली.नजर आपोआपच खाली झुकली.बोटं पदराशी चाळा करू लागली.काळजाचं रानपाखरू कवाच त्याच्या खांद्यावर जाऊन बसलं व्हतं. जोडीदारीन कायतरी आंबटचिंबट बोलली. संगीनं डोळे मोठे केले.लाजनारी संगी आक्षी जिवतीवानी दिसत व्हती.

तितक्यात ‘पोरीला बोलवा’ असा पुकारा झाला.आती पदराची सळसळ करीत आत वळली. संगीच्या हातून च्या पाठवला गेला.तिची लांबसडक बोटं लाजेनं थरथरत व्हती. कपबशीबी कापरं भरलं.  मनात गोड हुरहूर सुरू झाली व्हती. सपनांची पाखरं गिर्र गिर्र गिरक्या घेत होती.महिपतरावानं आन दुसऱ्या येका हुलबावऱ्या पावन्यानं काय काय प्रश्न इचारले ह्ये आता तिच्या ध्यानातबी नवतं.

ती आत आल्यावर लगेचच मामांनी पावन्यांना न्याहारीचं ईचारलं.हुलबावरा पावना भसकनी म्हनला,

“अवो नाई नाई.येतांना त्या शिंदेसायबांकडं बुंदीलाडूची न्याहारी करून आलो आम्ही.म्हनून तर उशीर झाला इकडं यायला. त्यांच्याबी दोन पोरी लग्नाला आल्यात ना!”

महिपतरावानी पावन्याला कोपर ढोसून इशारा केला आन तो सोत्ता मोठ्यानं म्हनला,

“अवो शिंदेसायेब सहजावारी रस्त्यावर भेटलं. म्हने चला च्या घेऊ एक कप..आता येवढ्या मोठ्या मानसाला नाई म्हंता नाई येत ना..मग गेलो जरायेळ..नाईतर इकडंच यायला निघालो व्हतो.” त्यानी इषय हुशारीनी बदलला. हुलबावरा वरमून गप्प बसला व्हता.

संगीच्या मनातली पाखरं चिडीचूप झाली.आतीबी ईचार करू लागली,

“म्हंजे हा पावना आधीच दोन पोरी पाहून आलाय व्हय?शिंदेसाह्येब पोरीच्या वजनाइतकं म्हनलं तरी सोनं देईल खुशाल.महिपत्या वंगाळच शेवटी.पैशापुडं नांगी टाकली आसंन त्यानं.मोठ्याचीच लेक करायची व्हती तर आलाच कशाला इथं? उगाच पहाटपासून आदबाया लावलंय.”

पावनी आलीच हाईत तर साजरी करायची म्हनून जेवनंखावनं चालली खरी पन त्याच्यात राम नवता. आग्रह केल्यावर पावनी नकं म्हनू लागली तवा आती बोललीच,

“शिंदेसाह्यबाकडं पोट भरलं असंन तुमचं..नै का?”

तिचं कुजक्यावानी बोलनं मामांना समजलं व्हतं.त्यांनी पावन्यांच्या नकळत आतीवर डोळे वटारले. संगी गुमान वाढत व्हती.पोरगाबी मुकाट जेवत व्हता.

पावनी गेल्यावर समदी थकून बसली.आतीच्या डोक्यात राग मावत नवता. मनात उलटेपाल्टे इचार चालले व्हते.डंख मारीत व्हते.

‘पोरगा देखना ,महिपत्या तालेवार .त्यांना उचलू उचलू धरतील अशाच ठिकानी सोयरीक करतीन.आपली गरीबाची पोर कवा आवडायची त्यानला? पन मंग आलीच कशाला इथं? उगाच पुरनावरनाचा घाट घालायला लावला.पोरीला हुरहूर लागली असंन.तिच्या जिवाला काय वाटत असंन?’

संगीचं मन मातूर कायतरी येगळंच म्हनत व्हतं,

‘पोरगा तर लय आवडला.असाच तर पायजेल व्हता..रूतून बसलाय काळजात पन् तरीबी जिथं आतीमामांना कायम खाली पाह्यची वेळ येईल आसं सासर मला नकोच. दिसत्यात फक्त मोठ्या घरची. पन त्यांचे वासे पोकळ असत्यात. उगाच आशा लावून ठिवायचं काय कारन पडलंय?कसा गचबशावानी जेवत व्हता.आवाजबी ऐकला नाई त्याचा. मरूदे..कितीबी आवडला तरी त्याचा ईचार नाई करायचा आता’

तिनं पार पक्कं ठरीवलं.संध्याकाळची हुरहूर सोडली तर संगी परत घरात हसूखेळू लागली. तिला हसतांना पाहून आतीचा बी जीव भांड्यात पडला.तवर मामाबी दुसऱ्या स्थळांच्या तपासाला लागले.

लेखिका – डॉ. क्षमा शेलार

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments