? जीवनरंग ❤️

☆ “फुलपुडी”… भाग 2 ☆ श्री क्षितिज दाते ☆

(मागील भागात आपण पाहिले – हे ऐकून तिला थोडंसं हायसं वाटलं.

“ हुश्श !!.. थांबा लगेच त्याचे ३ महिन्याचे राहिलेले पैसे ट्रान्सफर करते !”.

“ नको नको … आता मी स्वतः जाऊनच देतो .. त्याचे आभार प्रत्यक्ष मानतो. मला इतक्या दिवसांनी बघून त्यालाही जरा बरं वाटेल!” आता इथून पुढे )

एका चकार शब्दाने पैशाबद्दल न विचारता सलग इतके महीने फुलपुडी देत होता तो.

बाबांच्या लेखी त्या फुलपुडीचं महत्व बघता हे कुठल्याही उपकारापेक्षा कमी नव्हतं. आता मात्र बाबांना कधी एकदा संध्याकाळ होतेय आणि स्वतःच्या हातानी त्याला पैसे देऊन मनापासून कृतज्ञता व्यक्त करतोय असं झालं होतं. संध्याकाळी स्वयंपाकाच्या मावशी आल्या आणि तडक बाबा फुलवाल्याकडे गेले.  तिथे जाऊन बघतात तर काय ? त्या ठिकाणी कुठलीशी चहा-वडापावची टपरी होती. बाबांनी कुतुहलाने त्याला विचारलं,

“ अरे, इथे फुलांचं दुकान होतं त्यांनी काय नवीन गाळा घेतला काय ?’

“ नाय काका .. तो गेला .. माझा गाववाला होता तो !!”. 

“ कुठे गेला ? मला पत्ता दे बरं !”.

“ वारला तो काका .. २-३ महिनं झालं !”.

“ बाप रे !! काय सांगतोस काय ? मग ते दुकान दुसरं कोणी चालवतं का ?”.

“ नाय ओ काका ! फुलांचा धंदाच बंद केला. आता मी चालवतो हे दुकान “.

हे ऐकून बाबांना चांगलाच धक्का बसला पण आता त्यांच्या मनातल्या विचार डोहात एका नवीन प्रश्नानी उडी मारली.  फुलांचं दुकान जर बंद झालं तर मग दाराला रोज फुलपुडी कोण अडकवून जातंय?

त्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारलं. त्यांच्या बागेतल्या मित्रांकडे चौकशी केली. संस्थेतर्फे आलेल्या मुलाची शक्यता पडताळून पहिली. लेक विसरली म्हणून जावयानी चेन्नईहून काही व्यवस्था केली का याची सुद्धा खातरजमा केली. पण फुलपुडीबद्दल सगळेच अनभिज्ञ होते. शेवटी त्यांनी सोसायटीच्या वॉचमनला या बाबत विचारलं.

“ ओ हां शाब .. एक लोडका आता है रोज .. शायकील पे .. कोभी शाम को आता है.. कोभी रात को लेट भी आता है !!“

“ अरे … अपने जान पहचान का है क्या ?”

“ पैचान का ऐसे नही… वो रोज आता है इतने दिनसे .. तो जानता है मै. “

“ अभी आज आयेगा तो मुझे बताओ !”

आता बाबांच्या डोक्यात एकाच विचाराचा भुंगा… . तो कोण असेल?

संध्याकाळनंतर बरीच वाट बघून शेवटी बाबा झोपून गेले पण रात्री उशिरा कोणीतरी फुलपुडी अडकवलीच होती.

दुसऱ्या दिवशी मात्र बाबांनी ठरवलं. वॉचमनवर विसंबून राहायचं नाही.  कितीही उशीर झाला तरी याचा सोक्षमोक्ष लावायचाच. संध्याकाळपासूनच दार किलकिलं करून बाबा थोड्या थोड्या वेळाने अस्वस्थपणे येरझारा घालत होते. अधून मधून बाहेर बघत होते.

मध्येच दाराशी खुडबुड आवाज झाला . धावत त्यांनी दार उघडलं. एक तरुण मुलगा गडबडीने खाली उतरत त्याच्या सायकलपाशी जात होता. बाबा काहीसे मोठयाने ..

“ अरे ए , इकडे ये .. ए … !!“

तो मुलगा लगेच वर आला.

“ आजोबा कशे आहे तुम्ही आता ?”

“ मी बरा आहे. पण तू कोण रे बाळा ?? . मी ओळखलं नाही तुला . पण तुला बघितल्या सारखं वाटतंय कुठेतरी . आणि तू फुलपुडी आणतोस का रोज ?.. कोणी सांगितलं तुला ? त्या फुलवाल्यानी का ? त्याच्याकडे कामाला होतास का?”

बाबांचं कमालीचं कुतूहल त्यांच्या या प्रश्नांच्या सरबत्तीतून बाहेर पडत होतं.

“ आजोबा sss . तुम्ही डिशचार्ज घेतल्यावर अँब्युलंसनी आलते किनई घरी,   त्या अँब्युलंसचा डायवर मी !”.

“ अरे हां हां … आता तू सांगितल्यावर आठवला बघ चेहरा. ये आत ये. बस इकडे.. पण तू …. फुलपुडी ? .. त्याला खुर्चीवर बसवता बसवता एकीकडे बाबांचे प्रश्न सुरूच होते. त्याचं काय झालं .. त्यादिवशी तुमचं ते तंगडं मोडलं असून पण ssssss … सॉरी हा आजोबा .. ते रोज नुसते पेशंट, मयत, लोकांचं रडणं वगैरे बघून बघून आपलं बोलणं थोडं रफ झालंय, . पण मनात तसं काय नाय बर का !”..

“ अरे हरकत नाही …   बोल बोल !!”

“ हां ss  तर तुमचा एवढा पाय फ्रँक्चर असून पण तुम्ही ते ताईला फुलपुडीचं सांगत होते ते मनात पार घुसलं होतं बघा माझ्या .तुम्हाला आजींची किती काळजी वाटते ते ऐकून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलतं. नंतर येके दिवशी येका पेशंटला आणायला सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलतो अन् माझ्याच समोर एक बॉडी आत आली. बघतो तर तो फुलवाला sss . शॉक लागून मेला बिचारा. पण आई शप्पथ खरं सांगतो आजोबा, त्याची बॉडी बघून मला पहिलं तुम्ही आठवला. आता आजींच्या फुलपुडीचं काय होणार हा प्रश्न पडला.

तेव्हाच ठरवलं की ते बंद होऊन द्यायचं नाय.  मग येक दोन दिवस त्याची कामाला ठेवलेली पोरं दुकान बघत होती त्यांच्याकडून आणून दिली मी फुलपुडी तुम्हाला. नंतर गाशाच गुंडाळला ओ त्यानी. येकदा वाटलं त्या तुमच्या ताई पैशे भरतात त्यांना समजलं तर करतील काहीतरी पण नंतर वाटलं, त्या तरी बाहेरगावाहून काय करणार ? मलाच काही कळना झालं. म्हंटलं डबल झाली तरी चालेल पण आपण देऊ की थोडेदिवस फुलपुडी. माझ्या घराजवळ एक फुलवाला आहे पण त्याच्याकडे घरपोच द्यायला माणसं नाही. म्हंटलं आपणच देऊया. पण मी दिवसभरचा असा कुठं कुठं जाऊन येतो. देवाला घालायची फुलं म्हणल्यावर अशी नको द्यायला. म्हणून रोज घरी जाऊन आंघोळ झाली की मग सायकलवर येतो. बरं आपला घराला जायचा एक टाईम नाय. म्हणून कधी उशीर पण होतो. बरेच दिवस बघितलं तर दाराला कधीच दुसरी पुडी दिसली नाही म्हणजे म्हंटलं आजोबांनी दुसरा फुलपुडीवाला धरला नाही अजून. आता आपणच द्यायची रोज. तेवढाच आजींच्या आनंदात आपला पण वाटा.’

“ अरे मग इतक्या दिवसात एकदा तरी बेल वाजवून आत यायचंस . भेटायचंस. !”

“ अहो . आधीच तुमची तब्येत बरी नाही त्यात तुम्हाला का त्रास द्यायचा आणि भेटण्यापेक्षा फुलपुडी वेळेत मिळणं मत्त्वाचं !”.

“ अरे पण पैसे तरी घेऊन जायचेस की !! फुलवाल्याचे द्यायचेत अजून की तू दिलेस ?.

हे घे पैसे . ” .. पाकिटात हात घालत बाबा म्हणाले.

“ हाय का आता आजोबा . छे छे..  मी नाही घेणार पैसे. पण त्याची काही उधारी नाही बर का. एकदम द्यायला जमत नाही म्हणून रोजचे रोख पैशे देतो मी त्याला !”

“ अरे पण तू का उगीच भुर्दंड सहन करणार ? उलट इतके दिवस तू हे करतोयस त्याचे आभार कसे मानू हेच समजत नाहीये बघ मला. काय बोलावं हेच सुचत नाहीये.

“ अहो भुर्दंड काय ? अन् आभार कसले ? माझे पण आई वडील हैत की गावी . तिकडं असतो आणि माझ्या आईला फुलं हवी असती तर फुलपुडी आणली असतीच की मी. त्यांची इच्छा होती की मी गावात राहावं अन् मला मुंबईतच यायचं होतं. म्हणून त्यांनी बोलणं टाकलंय ओ माझ्याशी. त्याचंच वाईट वाटतं बघा. ही फुलं देऊन मला माझ्या आईला आनंद दिल्याचं समाधान मिळतंय हो!”.

बाबांचे डोळे एव्हाना आपसूक पाणावले होते. त्यांनी त्या मुलाचा हात अलगद हातात घेतला. तो मुलगा सुद्धा भावूक झाला….

“ सीरियस पेशंटला घेऊन जातो तेव्हा वेळेत पोचेपर्यंत जाम टेन्शन असतं आजोबा.

वरच्या सायरनपेक्षा जास्त जोरात माझं हार्ट बोंबलत असतंय . आणि एकदा जीव वाचला की नई  मग भरून पावतं बघा. आपली ड्यूटीच आहे ती, पण त्यादिवशी तुम्ही ते म्हणले होते ना “आईच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची कळी फुलण्यासाठी फुलपुडी॥ ”  .. मला काय असं छान छान बोलता येत नाही तुमच्यासारखं .. पण तुमचं बोलणं ऐकून एक गोष्ट डोक्यात फिट्ट  बसली की..  “ मरणाऱ्यांना जगवणं मोठं काम हायेच पण “ जगणाऱ्यांना आनंदी ठेवणं ” पण तितकंच मत्त्वाचं आहे, म्हणून आता पुढच्या महिन्यात मी गावी जातो आणि आमच्या म्हातारा-म्हातारीला पण जरा खुश करतो. चला….  निघतो आता….  उशीर झाला. जरा जास्त बोललो असलो तर माफ करा हां आजी आजोबा!’

हे सगळं ऐकून आई आत देवघरापाशी गेली. संध्याकाळी दिवा लावून झाल्यावर देवापुढे ठेवलेली साखरेची वाटी घेऊन आली आणि ती त्या मुलाच्या हातात ठेवली. आपला थरथरता हात त्याच्या डोक्यावरून, गालावरून प्रेमाने फिरवला. आणि मृदु आवाजात म्हणाली ….

“ अहो बघा sss  दगडात देव शोधतो आपण .. पण तो हा असा माणसात असतो. नाहीतर या मुलाचं नाव सुद्धा आपल्याला माहिती नाही पण माझ्या आनंदासाठी तो इतके दिवस झटतोय! .. धन्य आहे बाळा तुझी!”

आई दारापाशी गेली. या सगळ्या गप्पात दाराला तशीच अडकून राहिलेली फुलपुडी काढली.

खुर्चीत बसली आणि प्रसन्न अन् भरल्या अंतःकरणानी, पाणावलेल्या डोळ्यांनी एकटक बघत बसली ती दिवसागणिक आनंद देणारी इवलीशी “फुलपुडी”. 

– समाप्त –

© श्री क्षितिज दाते

ठाणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments