जीवनरंग
☆ पोपट – भाग – 2 – लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆
(मागील भागात आपण पहिले – एवढे बोलून झाल्यावर नितीनने सावकाश डोळे उघडले व तो आत्याची प्रतिक्रिया पाहू लागला. आपल्या पूर्वजीवना विषयीचे असे अचूक भाष्य ऐकल्यावर आत्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. तिने उठून नितीनला पोटाशी धरले. त्याला सिद्धी प्राप्त झाली आहे याची तिला खात्रीच झाली. आपण गरोदर असताना एकदा आळंदीला गेलो होतो हे तिला आठवले. तिथेच कुणातरी पुण्यात्म्याने आपली कुस धन्य केली असावी असे तिला वाटले. आता इथून पुढे)
हा हा म्हणता ही गोष्ट चाळभर पसरली. मग रोज पाच वाजता शाळेतून आल्यावर नितीन कद नेसून, पोपट आणि भविष्यपत्ते घेवून वेगवेगळ्या घरी जावू लागला. त्याला नितीनशास्त्री ह्या उपाधी पाठोपाठ एक दोन रूपये दिवसाआड मिळू लागले. त्यामुळे आमची चांगलीच चंगळ होवू लागली.
“त्यामानाने माझ्या व्यवसायात मला ना किर्ती मिळाली ना पैसा! ज्यांची पुस्तके मी आणली होती ते राजरोसपणे ती परत घेवून गेले शिवाय जाताना माझेही एखादे पुस्तक घेऊन गेले. माझ्या व्यवसायाला उतरती कळा लागली.”
शेवटी ‘हर अच्छे और बुरे वक्त का अंत निश्चित है,’ या उक्तीनुसार आमच्या सहामाही परीक्षा झाल्या. नितीन तीन विषयात नापास झाला तर मला फुलपास होऊनही ४४ टक्केच मार्क मिळाले. नितीन खूपच घाबरला होता. त्याला भावनीक आधार देण्यासाठी मी आधी त्याच्या घरी गेलो.”
“त्याचा असा दिव्य निकाल पाहिल्यावर नितीनच्या बाबांनी चढ्या आवाजात चौकशी सूरू केली. आत्या काही बोलेना. तो आरडा ओरडा ऐकून दारातून डोकावलेल्या शेजारच्या चोंबड्या काकूंनी, बाबांना नितीनच्या पोपटज्योतिषाची कल्पना दिली आणि पुढे हा मुलगा जयंतरावांसारखा नाव काढेल, त्याला पाठ्यपुस्तकाच्या बेडीत अडकवू नका असेही मानभावीपणे सांगितले.”
झाले! बाबांची नजर क्रूध्द झाली. त्यांनी पहिल्यांदा आत्याला फैलावर घेतले. मग ते, “आता त्या पोपटाची मुंडीच मुरगाळतो” असे रागाने म्हणून त्याला शोधू लागले. पण तोही असा डांबरट की कुठे गायब झाला हे कळलेच नाही. पशू-पक्षांना नैसर्गिकरीत्या संकटाची जाणीव होते म्हणतात! मग या सर्वाची शिक्षा नितीनने एकट्याने भोगली.
बाबांनी अखंड ब्रम्हांडाचे भविष्य छापलेले पत्ते फाडून खिडकीतून बाहेर फेकले. त्यावेळी जरी प्रत्यक्ष धुम्डूम महाराजही दरवाजातून आत आले असते तरी बाबांचा रुद्रावतार पाहून अंग चोरून ते खिडकीच्या गजातून मांजरासारखे पळाले असते!”
“आता यापुढे कुणाला काही समजावण्यात अर्थ नाही हे उमगुन मी आमच्या चाळीकडे निघालो. चाळीबाहेर शेकोटी पेटलेली होती. तिच्या भोवताली मुले उभी होती. मीही परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी त्यांच्यात जावून उभा राहीलो.”
” काय रे? आज एकदम शेकोटी?” मी एकाला सहज विचारले. त्याने खाली बोट दाखवले. तेव्हा मी निरखून पाहिले असता शेकोटीत माझे संपूर्ण वाचनालय, नावाच्या पाटी सकट भस्मसात होताना दिसले. याचा अर्थ मी घरी पोचायच्या आतच माझे ४४ टक्के मार्क्स कुणाच्या तरी फितुरीने तिथे पोचले होते! आणि तिथेच माझ्या व्यावसायीक स्वप्नांची होळी झाली!”
“दादा तुम्ही दोघेही किती उपद्व्यापी होता हो! पुढे त्या पोपटाचे काय झाले?” श्रेयाने खदखदा हसत विचारले.
यापुढे नितीन सांगू लागला, “पुढे वर्षभरात तो पोपट चांगला मोठा झाला. त्याच्या गळ्याभोवती काळी पट्टी उगवली आणि तो नर असल्याचे आम्हाला कळले. आम्ही त्याचे नाव ‘प्रिन्स’ ठेवले.”
“अशी बरीच वर्षे गेली. मी कॉलेजला जावू लागलो. तोपर्यंत प्रिन्स आमच्या कुटुंबाचा हिस्सा झाला होता. त्याच्या पिंजर्याचे दार आम्ही कधी बंद केले नाही. तो घरातल्या घरात उडत असे. आईला त्याचा फार लळा लागला होता. माझ्या आईचा स्वभाव बडबड्या. ती स्वयंपाक करताना किचनमधे खिडकीच्या गजावर बसून तो कर्कश्यपणे शिट्या मारत तिच्याशी गप्पा मारत असे.”
” तेव्हा रोज दुपारी पोपटांचा एक थवा आमच्या चाळी समोरच्या वडाच्या झाडावर येवून बसे.त्यातली एक पोपटीण आमच्या खिडकीच्या गजावर बसून ‘प्रिन्स’ला लाडिकपणे शिटी मारून बोलवी. मग हा पठ्ठ्याही तिच्या शेजारी बसून बरच वेळ मिठू मिठू करे.” ” ती पोपटीण आहे हे तुम्हाला कसे कळले?” श्रेयाने विचारले.
” तिच्या गळ्याला काळी पट्टी नव्हती.” नितीनने सांगितले.
” एकदा त्यांना चोचीत चोच घालून बसलेले आईने पाह्यले आणि हा लवकरच घरात सून आणणार असे तिला वाटू लागले. पण झाले भलतेच, अचानक एक दिवस तो थवा येणे बंद झाले आणि प्रिन्सही नाहीसा झाला!”
त्या गोष्टीचा आईला जबर धक्का बसला. तिची झोप उडाली. तिला जेवण जाई ना. “माझ्या पोराला फूस लावली” असे म्हणत सारखी अश्रू ढाळू लागली. मला तिने “वाट्टेल ते करून प्रिन्सला शोधून आण” अशी गळ घातली.
मग दादाच्या सल्ल्याने मी पेपरात “आमचा प्रिन्स नावाचा पोपट हरवला आहे.” अशी जाहिरात त्याच्या फोटोसकट दिली. त्यात “शोधून देणाऱ्यास योग्य इनाम मिळेल,” असेही लिहीले.
आठ दिवसांनी आम्हाला एक पत्र आले.त्यात “दिलेल्या वर्णनाचा एक पोपट सापडला आहे लवकरात लवकर घेवून जाणे” असा मजकूर होता. खाली सांताक्रूझ LIC ऑफिसचा पत्ता व व्यक्तिचे नाव होते.
आम्हा सर्वांना जणू हर्षवायू झाला. दुसर्या दिवशी सकाळी मी आणि दादा त्या LIC ऑफिसात गेलो.ऑफिस खूप मोठे होते. तळमजल्यावरच्या वीस – पंचवीस टेबलांवर बरीच माणसे काम करताना दिसत होती.
आम्ही एका प्यूनला आम्हाला ज्याना भेटायचे होते त्यांचे नाव सांगितले. त्याने, “अपॉइंटमेंट घेतली आहे का?” असे विचारले. आम्ही त्याला ते पत्र दाखवले. पत्र वाचताच त्याचा चेहेरा बदलला.
“बोंबला आता,” असे काहीसे पुटपुटत त्याने आम्हाला एका केबीनच्या दाराकडे बोट दाखवले.
केबीनच्या दारावर टक टक करताच,” येस् कम इन” असा चिडका आवाज आला.
आम्ही घाबरत आत गेलो. आत एक रागीट चेहेर्याचे आणि बाकदार नाकाचे गृहस्थ बसले होते. मी त्यांच्यासमोर ते पत्र ठेवले.
पत्र वाचताच त्यांच्या भुवया वक्र झाल्या. चेहेरा संतापाने लाल झाला. आम्हाला ते ” गेट आऊट फ्राॅम हियर,” असे जोरात ओरडले. काहीच न कळून आम्ही बाहेर पडलो. आतून त्यांचा आरडा ओरडा ऐकू येत होता. आता पुढे काय करावे ते आम्हाला समजेना. बाहेर सर्व स्टाफ खदखदा हसत होता.
त्यातल्या एकाने सांगितले, “हा त्या सर्वांनी मिळून केलेला प्लॅन होता. ते साहेब अतिशय चिडके असून त्यांच्या बाकदार नाकामुळे स्टाफ त्यांचा पोपट असा उल्लेख करतो. आता तुमच काम झालय, मार खायच्या आत इथून पळा!”
“काय काय अनुभव घेतले तुम्ही. नशिब त्यावेळी कानफटीत बसली नाही.” श्रेया हसत म्हणाली.
“अग पण विधात्याने जर तुमच्या गालावर चपराकच लिहून ठेवली असेल तर ती कशी चुकेल?” मी हळूच पिल्लू सोडून दिले.
” म्हणजे ?”
“पुढे नितीनने त्यांच्याच चपराकी सव्याज खाल्ल्या.” मी नितीनकडे बघण्याचे टाळले.
“कधी?” न उमगुन श्रेयाने विचारले.
“त्यानंतर दहा वर्षांनी जेव्हा कर्मधर्म संयोगाने तेच गृहस्थ त्याचे सासरे झाले, त्यानंतर…” मी वाक्य पूर्ण केले.
आवाक झालेल्या श्रेयाचा हात अभावितपणे तोंडावर गेला आणि तिला तिचेही नाक बाकदार असल्याची जाणीव झाली!
– समाप्त –
लेखक – श्री रविकिरण संत
संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈