श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘सोबत…’ – भाग – 6 ☆ श्री आनंदहरी ☆
“ दिगंत, खूपच थकलास ना? हॉस्पिटल म्हणले कि खूपच थकायला होतं. खूप केलंस तू माझ्यासाठी.”
“ मॅडम, आभार प्रदर्शन करून मला निरोप द्यायचा, घालवायचा विचार आहे का काय?”
दिगंत चेष्टेच्या सूरात हसत हसत म्हणाला.
“ काहीतरीच काय बोलतोयस ? पण मी काय म्हणत होते, निर्मलाताईच्या सारखीच एखादी बाई रात्रीसाठी मिळतेय का पाहूयात का? “
“ कशाला मी आहे ना..”
“ तू तर आहेसच रे.. पण तू ऑफिसला जाणार. तुझी किती दमणूक होईल. जागरण होईल. आजारी पडशील रे अशाने .. तू आजारी पडून कसं चालेल? म्हणून म्हणते. शिवाय तुझं स्वतःचं आयुष्य आहेच ना ? त्याचाही विचार नको का करायला ?”
“ म्हणजे मला घालवायचा विचार करताय . ”
काहीसं मनोमन ‘ हर्ट ‘ होऊनही तसं न दाखवता दिगंतने हसतच विचारलं.
“ नाही रे..तुला कशाला घालवीन? तुच्यावाचून दुसरं कोण आहे मला? “
“ मग ? तुम्हाला अवघडल्यासारखं वाटतंय का?”
“ मलाच काय, प्रत्येक स्त्रीला पुरुषाकडून सेवा करून घ्यायची म्हणलं कि अवघडल्यासारखं होतंच.. “
“ नवरा असला तरी?”
“ अरे, नवऱ्याच्या बाबतीत कसे वाटेल? थोडं फार त्याच्याबाबतीतही वाटणारच पण तितकंसं नाही.”
“ मॅडम, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय…”
” अरे, मघापासून तू तेच करतोयस , बोलतोयस, सांगतोयस, विचारतोयस.”
मॅडम हसत हसत म्हणाल्या.
“ मॅडम, प्लिज. मी सिरियसली बोलतोय.”
“ काय झालं दिगंत ? काही प्रॉब्लेम किंवा अडचण आहे का ? अरे, माझ्याशी बोलताना एवढी प्रस्तावना न् परवानगी कशाला? “
“ मॅडम, खूप दिवस तुम्हाला सांगायचा विचार करीत होतो. मॅडम, मला तुमच्याशी लग्न करायचंय.”
त्याच्या वाक्यानं मॅडम दचकल्या.
“ काssय ? काय बोलतोयस तू दिगंत ? तू वेडा आहेस काय?”
“ लग्न करणारे वेडे असतात काय? मॅडम, रागावू नका. गेले काही दिवस मी खूप विचार केला आणि माझा निर्णय पक्का आहे.”
“ अरे पण? माझी ही अवस्था पाहून दयेपोटी म्हणतोयस ना असं? मला दया नकोय कुणाची.. आणि आत्ता तुला वाटत असले तरी चार दिवसांनी तुला पश्चाताप वाटायला लागेल.. असा भावनेच्या भरात वेड्यासारखा विचार नको करुस.”
“ नाही मॅडम, मी भावनेच्या भरातही म्हणत नाही आणि तुमची दया वगैरे वाटूनही म्हणत नाही. मला मनापासून जे वाटतंय ते आणि खूप सारासार विचार करून म्हणतोय.”
“ नाही दिगंत. अरे, मी तुझ्यापेक्षा नाही म्हणलं तरी नऊ- दहा वर्षांनी मोठी आहे.”
“ ते ठाऊक आहे मला .”
“ तरीही? अरे कसं करता येईल लग्न ?”
“ का ? अशी लग्नं यापूर्वी कधीच केली नाहीत काय कुणी?”
“ केली असतीलही पण ती सगळी प्रेमातून.”
“ प्रेम म्हणजे काय असतं , मॅडम? एखादी व्यक्ती आवडू लागते, आपलीशी वाटू लागते .तिची ओढ वाटू लागते, तिचा सहवास हवाहवासा वाटू लागतो यालाच प्रेम म्हणतात ना ? “
“ व्वा ! प्रेमावर पीएचडी केल्यासारखा बोलतोयस .”
“ तुम्ही विषय बदलताय मॅडम. कधीतरी तुमच्याशी बोलणार, तुम्हाला सांगणार होतोच. मॅडम,मी पीएचडी केलीय का नाही ते ठाऊक नाही पण मी प्रेम केलंय, अगदी मनापासून.अजूनही करतोय. एक क्षणही विसरू शकलेलो नाही. त्यामुळेच तर सगळं सोडून इकडं आलो.”
“ अरे मग तिच्याशीच लग्न कर . सुखी होशील. काही अडचण असेल तर सांग मला, मी करीन मदत.”
“ नाही मॅडम, हवाहवासा वाटणारा मी नकोनकोसा वाटू लागलो आणि तिथंच विषय संपला. प्रेमात स्वतःला लादता येत नाही . नकोय म्हणल्यावर समोर तरी कशाला ऱ्हावा ? झालं. आलो इकडे. पण मॅडम, मला तेव्हापासून वाटायला लागलं की जगात कोणीही कोणाचं नसतं किंबहुना अजूनही तसंच वाटतं. इथं आल्यावर, काळाने म्हणा किंवा परिस्थितीनं म्हणा, मला एक गोष्ट शिकवली, सांगितली ती म्हणजे जगण्यासाठी आपल्या वाटणाऱ्या व्यक्तीची सोबत हवी असते जीवनात. तुम्ही भेटलात आणि ते पटू लागलं. माझे तुमच्यावर प्रेम आहे का नाही ते नाही सांगता येणार मला.. पण तुम्ही, मला आपल्या वाटलात, मला तुमचा सहवास आवडू लागला. हे जीवन जगताना मला तुमची सोबत हवी आहे.. वय काय ? कुठल्याच गोष्टी महत्वाच्या ठरत नाहीत त्यापुढे.. महत्वाची एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हालाही माझी सोबत हवी असणे, हवीशी वाटणे. “
दिगंत खुर्चीतून ऊठला. मॅडमांच्या बेडजवळ गेला.मॅडमांचे डोळे भरून आले होते. त्यानं त्यांचे डोळे पुसले. त्यांना बसतं केलं. त्यांच्या समोरच बेडवर बसून त्यांचे हात हातात घेत म्हणाला,
“ मॅडम, तुमचा निर्णय काहीही असला तरी हा दिगंत आत्तासारखा तुमच्या आयुष्यात असणार आहेच… पण तरीही मला जीवनात साथ- सोबत हवी आहे. मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. तुम्ही कराल माझ्याशी लग्न?”
दिगंत बोलत होता, विचारत होता .मॅडमांच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा ओघळू लागले होते.. त्याला आपण मॅडमना दुखावलं ,असं वाटून वाईट वाटू लागलं. तो उठून त्यांच्याजवळ गेला. त्यांचे अश्रू पुसता पुसता त्यांना म्हणाला,
“ तुमचं मन मी दुखावलं असलं तर माफ करा मला ,मॅडम.”
“ तसं नाही रे, तू वेडाच आहेस.. अरे अशा वेळी विचारतोयस कि होकार देताना तुझ्या कुशीत तोंड ही लपवता येत नाही मला.”
दिगंतने पुढं सरकून जवळ बसत त्यांना त्रास होणार नाही , वेदना होणार नाही अशा बेताने त्यांना कुशीत घेत विचारलं,
“ अस्सं काय?”
दिगंतला त्यांचं, ‘ होss !‘ हे उत्तर त्यांच्या स्पर्शातून जाणवत राहिलं ,कितीतरी वेळ.
– समाप्त –
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈