डॉ. ज्योती गोडबोले
☆ संध्याछाया… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(विश्वासला मात्र मंदारची अतिशय मनापासून ओढ आणि माया होतीच.त्यांना तो प्रेमाने आपल्या घरी रहायला बोलावी, बाहेरून चांगले पदार्थ मागवी, त्यांच्या लहान मुलांशी खेळण्यात रमून जाई.) इथून पुढे —–
मंदार या काकाला जास्त attached होता त्यातल्या त्यात. त्याची आई सविताही बऱ्यापैकी संबंध ठेवून होती सुधाशी. सुधाचं त्यातल्या त्यात सविताशी पटायचं. माहेरची माणसं, बहिणी, अशा सगळ्यांशी सुधाचं नाहीच पटायचं. त्यामुळे घरी सतत ‘ तू तिथे मी ! ‘ तिला नवऱ्याशिवाय दुसरं विश्वच नव्हतं. तिने कधी आपला ग्रुप, पुस्तक कट्टा असं काही कधी निर्माणच नाही केलं. विश्वासने कितीतरी प्रयत्न केले, पण ही सतत दुर्मुखलेलीच राहिली.
त्यादिवशी मंदार आणि त्याचे कुटुंब सुधाकडे राहायला आले. त्यांच्या लहान मुलाने विश्वासला खूप दमवले, आजोबा मला स्कूटरवरून राईड मारून आणा, बॉल खेळा, आपण शिवाशिवी खेळूया, म्हणत, मुलगा पळत सुटे आणि त्याच्या मागे धावून, विश्वास अगदी दमून गेला . कितीही उसने अवसान आणले तरी वय बोलतेच ना. मंदारही मुलाला रागावला नाही की “ अरे, किती त्रास देतोस आजोबांना. किती चढ उतार करायला लावतोस जिन्यावरून रे !”
शेवटी सुधाच म्हणाली, “ अहो, शांत बसा बघू. आता अजिबात धावू नका त्या पोराबरोबर. काय चाललंय तुमचं?आजारी का पडायचंय?” लाडावलेली ती मुलं बघून सुधाला अतिशय राग यायचा.पण विश्वाससमोर तिचं काही चालायचं नाही. विश्वासचं आंधळं प्रेम होतं या लोकांवर. आपल्याला काही झालं तर हे लोक नक्की धावून येतील याची खात्रीच होती त्याला. पण सुधा ओळखून होती यांना. विश्वासने मृत्युपत्र केले आणि त्यात आपली सर्व मालमत्ता मंदारच्या नावे केली. पण अजून सुधाने सही नव्हती केली म्हणून ते तसेच रखडले होते..दुसरं होतंच कोण त्याला? त्या दिवशी असंच झालं. सुधा पाय घसरून अंगणात पडली. विश्वासने मंदारला फोन केला. मंदार लगेच आला, डॉक्टरला बोलावलं. नशिबाने सुधाला कुठे फ्रॅक्चर झाले नव्हते.
मंदारने जुजबीऔषधपाण्याची सोय केली आणि तो निघून गेला. पुन्हा घरी हे दोघेच म्हातारे उरले. विश्वासला फार वाटले, मंदार आपल्याला घरी रहायला बोलावेल, चार दिवस या म्हणेल. पण तसे झाले नाही. सुधाच आडवी झाल्याने घरची उठबस करून विश्वास थकून गेला. ही तर नुसती झलक होती. पुढे काय? यांच्या घरी असं कायम रहायला येणारं कोणीही शक्यच नव्हतं आणि मंदारचीच आई त्याच्या घरी असल्याने याना तो बोलावणेही अशक्य होतं. सुधा बरी झाली आणि हळूहळू घरातल्या घरात हिंडूफिरु लागली, कामं करू लागली. विश्वासच्या मानाने सुधा प्रॅक्टिकल होती. तिला कोण कसे आहे हे बरोबर समजत होते. पण लग्न झाल्या दिवसापासून तिला समजून चुकले होते, विश्वास अतिशय हेकट आहे. तो दुसऱ्याच्या मताला अजिबात किंमत देत नाही. मी म्हणेन तेच खरे. सुधाला याचा त्रास होई पण इलाजच नव्हता. रोज उठून वाद घालण्यापेक्षा ती गप्प बसणे पसंत करी. कितीही अवसान आणले, तरी आता संध्याछाया भेडसावू लागल्या होत्याच. एकेक करत सगळी म्हातारी माणसे कालवश झाली आणि आपणसुद्धा उताराला लागलो, हे सत्य कटू तर होतेच, आणि पचवायला तर फार अवघड होतेच.
सुधाची मैत्रीण एकदा सुधाकडे आली होती तेव्हा म्हणाली, ” सुधा, कशाला वाईट वाटून घेतेस मूल नाही म्हणून. मला आहेत दोन मुलं ! उपयोग आहे का काही? दोघेही गेलेत अमेरिकेला निघून. मीही एकटीच नाही का रहात घरात? होईल ते होईल. नशिबानं भरपूर पैसा आहे, म्हणून निदान त्यांच्यावर अवलंबून तरी नाही मी ! येते जाऊन वर्षातून एकदा तिकडे, पण मला तिकडे मुळीच आवडत नाही ग कायम रहायला. आपला भारत खरंच महान ! मला तरी कोण आहे ग इथं? मी तर ‘अथश्री’मध्ये फ्लॅट घेऊन ठेवलाय. सध्या दिलाय भाड्याने. मला होईनासं झालं की मी तिकडे जाऊन रहाणार. छान आहे सगळं तिथे. कसलीही काळजी नाही. पैसे द्या, की सगळ्या सुखसोयी आहेतच. कोणाचे आभार उपकार नकोत.” सुधाच्या मनात हाही विचार घर करून राहिला. कोण कोणाचे नसते हल्ली. पुतण्यावर फार भरवसा आहे विश्वासचा, पण एवढी मी आजारी होते, तर म्हणाला का,या विश्रांतीला? आपल्यालाही ही सोय हळूहळू बघावी लागणार. अगदी घरी बायका ठेवल्या तरी आपल्याला दिवसेंदिवस घर सांभाळणे अवघडच जाणार हे कळून चुकले होते सुधाला ! आता फक्त विश्वासला हे कधी समजणार, याची वाट बघणे तिच्या हातात उरले होते.
त्या दिवशी मंदार असाच विश्वासकडे आला. इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर म्हणाला, ” काका, आपण वाडा विकून टाकूया. मला आता पैशाची गरज आहे फार. तुम्ही तरी अशा जुनाट वाड्यात का राहाताय? वाड्याचे दोन्ही भाग एकदम विकले तर किंमत चांगली येतेय ! आपल्याला फ्लॅट्स आणि वर पैसेही मिळतील. किती दिवस असे भावनिक गुंतवणूक करून, माझ्या आईवडिलांची वास्तू आहे ही, असं म्हणत रहाणार? मनावर घ्या आता. जुनी झाली ती वास्तू आणि त्या भावनाही ! मला आत्ता खरंच गरज आहे पैशाची. बाबा अकाली अचानक गेले,आणि काहीच शिल्लक नव्हती त्यांची. मला आता खूप खर्च आहेत पुढे. मुलांच्या फियाच लाखाच्या घरात असतात हल्ली. तुम्हाला काय कल्पना येणार? बघा विचार करा.” मंदार निघून गेला. विश्वासला हा पहिला झटका होता. सुधा शांतपणे हे ऐकत होती.
नंतर पुढच्या आठवड्यात सविता आली. “वहिनी, काय ठरलं भावजींचं? विकायला आहेत का तयार? बस झालं आता इमोशनली गुंतून पडणे हो ! किती दुरुस्त्या निघत आहेत वाड्याच्या. नका राहू भुतासारखे इथं दोघेच्या दोघे. मंदार म्हणतो तसं आपण वाडा विकून टाकू आणि तुम्ही आमच्याजवळच एखादा फ्लॅट घ्या. म्हणजे मंदारलाही बरे पडेल तुमची देखभाल करायला. सारखा कसा येणार तो तरी इतक्या लांबून !” सुधा म्हणाली, ‘तुमचं बरोबरच आहे, पण हे यांना नको का पटायला? मी सांगून थकून गेले. तुम्ही आणि ते बघा काय ते ! मी तुमच्या कोणत्याही भानगडीत पडणार नाही.” सविता जरा रागावलीच आणि निघून गेली..
– क्रमशः भाग दुसरा.
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈