डॉ. ज्योती गोडबोले
☆ संध्याछाया… भाग – ३ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(सुधा म्हणाली,’तुमचं बरोबरच आहे,पण हे यांना नको का पटायला? मी सांगून थकून गेले.तुम्ही आणि ते बघा काय ते ! मी तुमच्या कोणत्याही भानगडीत पडणार नाही.” सविता जरा रागावलीच आणि निघून गेली ) इथून पुढे —
पुढच्या महिन्यात पुन्हा मंदार आणि फॅमिली विश्वासकडे रहायला आले. त्याचा छोटा,सात वर्षाचा मुलगा, विश्वासशी खेळताना म्हणाला, “माझे खरे आजोबा देवाघरी गेलेत. तुम्ही नाही काही माझे खरे आजोबा ! तुम्ही तर काका आजोबा आहात. बाबा म्हणत होते, वाडा विकला की तुम्ही दोघेहीआश्रमात राहाल. आश्रम म्हणजे काय हो आजोबा? ” … त्या निरागस मुलाच्या तोंडून हे ऐकताना विश्वासच्या मनात चर्रर्र झाले. आपल्या मागे हे लोक काय बोलतात आणि काय ठरवतात हे त्याला एक क्षणात समजले. सुधा कळवळून सांगत होती, ते त्याला आठवले. ती म्हणत होती, “अहो, आपलं ताट द्यावं पण आपला बसायचा पाट देऊ नये माणसाने ! हल्ली कोणाचा भरवसा देता येतो का ? आत्ताच नका देऊन टाकू मंदारला सगळं. आपण गेल्यावर मग करतील त्यांना हवं ते. असलं कसलं मृत्युपत्र करताय? म्हणे ‘ मी गेलो तर सुधाला मंदारने सांभाळावे. किंवा ती गेली तर मला मंदारने शेवटपर्यंत संभाळावे. म्हणजे मी सर्व माझे जे आहे ते त्यालाच आत्ताच देऊन टाकतो. नशीबच, मी जॉईंट विलवर सही केली नाहीये म्हणून ते अजून तरी तसंच राहिलंय.” ….
…. विश्वासला हे सगळं आठवलं. वडील गेल्यावर या मुलावर आपण जिवापलीकडे प्रेम केलं, त्याला अडी अडचणीला पैसे दिले, आधार दिला. पण तो मात्र लांब लांबच राहिला कायम. आत्ता तो लहान मुलगा बोलला म्हणून निदान आपल्याला समजलं तरी की हे लोक आपल्याबद्दल काय विचार करत आहेत ते. कोणी कुणाचं नाही हेच खरं. विश्वासला अतिशय वाईट वाटलं. असा कसा आंधळा विश्वास टाकला
आपण ? पण देवानेच डोळे उघडले म्हणायचे, आणि नियतीच बोलली त्या लहान मुलाच्या तोंडून ! याही गोष्टीला सात आठ वर्षं होऊन गेली. विश्वास सुधा.. दोघांची सत्तरी उलटली. वाडा अजूनही विकला नव्हताच विश्वासने. मंदार येईनासाच झाला होता आताशा या वाडा प्रकरणामुळे. आता मात्र सत्याचा आरसा लखलखीत समोर आला विश्वासच्या ! सुधा सांगत होती ते बरोबर होते, हे लक्षात आले त्याच्या. दोघेही थकत चालले आता. साधं डॉक्टरकडं जायचं म्हटलं तरी त्यांना आता बळ उरलं नाही. सुधा जास्त थकत चालली. गेल्या वर्षभरात मंदार, त्याची आई कोणीच फिरकले नव्हते.
सुधाला हळूहळू पार्किन्सनने घेरले. तिचा तिच्या हालचालींवर ताबा उरला नाही.जरा जरी कसलाही ताण आला की तिचे हातपाय अनैच्छिकरीत्या हलू लागत, हातातून भांडी पडत. चालताना तिचा तोल जाई, हातपाय थरथर कापत. मान लटलटा हलू लागे. तिला रोजचे व्यवहार करणे जड जाऊ लागले… आणि तिची देखभाल करणे विश्वासला झेपेनासे झाले. आता मात्र त्याने कोणालाही न विचारता एका सज्जन बिल्डरला आपला अर्धा भाग विकून टाकला. बिल्डर म्हणाला, “ काका, तुम्ही आता त्या पुतण्याच्या अर्ध्या भागाचा विचार करू नका. तुमचे आयुष्य नीट सुखात जाईल हे बघायचं आता. तुमच्या मित्राचाच मुलगा आहे मी, कोणतीही अडचण आली तर मला हाक मारा. मी नक्की येईन. “ जगात माणुसकी आहे याचा विश्वासला पुन्हा एकदा प्रत्ययआला, आणि आपलीच माणसं आपली नसतात, याचा अनुभवही ! त्या बिल्डरनेच विश्वासला ‘अथश्री ‘ मध्ये चांगला फ्लॅट घेऊन दिला, वर भरपूर पैसे दिले.या दोघांना स्वतःच्या गाडीतून बँकेत नेले आणि ती रक्कम गुंतवून टाकली. त्याचे दरमहा व्याज यांच्या खात्यात जमा होईल, अशीही व्यवस्था केली. विश्वास आणि सुधा दोघेही अथश्रीत रहायला आले. सुधाची मैत्रीणही अथश्रीत आधीच आली होती. दोघींचा वेळ अगदी छान जायला लागला. रोज उठून नाश्ता काय करू, स्वयंपाक काय करायचा ही सगळीच कटकट संपली. विश्वासला समवयस्क नवीन मित्र मिळाले. गप्पा, टेनिस ,ब्रिज खेळणे, हे त्याला आता मनासारखे शक्य होऊ लागले. सुधाची तब्येतही जरा सुधारू लागली. दर आठ दिवसांनी डॉक्टर येत, औषधं देत.
दरम्यान एक दिवस, मंदार, त्याची आई, आणि बायको अचानक विश्वास-सुधाला भेटायला आले. सुधा विश्वासने शांतपणे त्यांचे स्वागत केले. मंदार आणि सविता तणतणत म्हणाले, “छानच केलात हो भावजी व्यवहार ! आम्हाला पत्ता सुद्धा लागू दिला नाहीत. आता त्या बिल्डरने सगळा एफ एस आय वापरल्यावर आम्हाला कमीच येणार किंमत. विचारायचं तरी मंदारला.” विश्वास काहीही बोलला नाही. सुधाही गप्पच होती. सविता म्हणाली, ” इकडे येऊन रहाण्यापेक्षा, मंदारजवळ फ्लॅट घ्या म्हणत होतो ना आम्ही? नसते का मंदारने बघितले तुम्हाला म्हातारपणी? एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विचारावेसे नाही का वाटले हो? आम्ही काय टाकून देणार होतो का तुम्हाला.. ”
आता मात्र विश्वास उसळून म्हणाला , “ हे सगळं कशाला बोलतेस सविता? सगळं समजलंय आम्हाला. सगळे पैसे स्वतः हयात असतानाच तुझ्या मुलाला देण्याचा मूर्खपणा करणार होतो मी… आंधळ्या माये पोटी .. माझा भाऊ अकाली गेला म्हणून बापाची माया देऊ केली मी तुझ्या मुलाला, पण किंमत नाही तुम्हा कोणालाच ! देवानेच शहाणपण दिलं मला. तुम्ही माझेच पैसे घेऊन आम्हालाच वृद्धाश्रमाची वाट दाखवण्याआधीच आम्ही सन्मानाने इकडे आलो ते उत्तमच.. नाही का? आपोआप गोष्टी कानावर पडल्या, म्हणून निदान हा निर्णय तरी घेता आला आम्हाला. आता मला कशाचीच खंत खेद वाटत नाही. इथले लोक चांगले आहेत. कोणाच्या दयेवर,आभार उपकारावर आम्ही जगत नाही, हे किती छान आहे. राहता राहिला वाड्याचा प्रश्न ! तुम्ही त्याचे काहीही करा. मला योग्य वाटले ते मी केले.” विश्वास पाठ फिरवून आत निघून गेला. आणखी बोलण्यासारखे काहीच राहिले नव्हते आता.
आठ दिवसांनी सुधा विश्वासने वकिलांना बोलावले. सर्व कॅश पैसे ,त्यांनी विचारपूर्वक, ब्लाइंड स्कूल, अनाथाश्रम, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, अशा ठिकाणी आपल्या मृत्यूपश्चात दान देऊन टाकावे असे लिहिले. मायेपोटी, सुधाने दागिने मात्र मंदारला द्यायचे लिहून ठेवले, तेवढेच.
वकिलांनाच त्यांनी कुलमुखत्यार नेमले आणि आपल्या पश्चात ते दिलेला शब्द पाळतील, आपल्या इच्छा पूर्ण करतील याची खात्री होती विश्वासला. आपल्या आई वडिलांच्या नावे, विश्वासने वाचनालये, गरीब विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी ठेवी, अशीही तरतूद केली.
आता मात्र, त्याला कसलीही हळहळ,अपेक्षा, आणि कसल्याच इच्छा उरल्या नव्हत्या. शांतपणे उरलेले आयुष्य आनंदात जगायचे ठरवल्यावर मागचे पाश त्यांनी सोडवून टाकले. ‘ आता हे विसाव्याचे क्षण, आपण निवांत उपभोगूया ‘ असे म्हणत विश्वास सुधा उरलेले आयुष्य शांत आणि निवांतपणे घालवू लागले.
– समाप्त –
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈