सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ जीवनरंग ☆ ? तेलवात ? ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
(साहित्य विवेक कथास्पर्धा लघुतम कथा विभाग, उत्तेजनार्थ पारितोषिक)
नवरात्राची घटस्थापना झाली.उमाने मनापासून देवीची पूजा-आरास केली. देव्हारा प्रकाशाने उजळून निघालेला होता. मन प्रसन्न होत होते. फोटोतली देवी सुद्धा समाधानाने हसतेय असे वाटत होते. उमाला खूप छान वाटत होते. आरती, प्रसाद झाला. तिने देवीला हात जोडून प्रार्थना केली,”आई,तू नेहमीच तुझ्या या लेकीची सेवा गोड मानून घेतली आहेस. सदैव माझ्या घरावर तुझ्या कृपेची पाखर घातली आहेस. माते, अशीच कृपादृष्टी असू दे . आम्हाला सगळ्यांनाच सद्बुद्धी दे, उत्तम आरोग्य दे आणि हातून चांगले काम घडू दे.”
उमा दरवर्षी देवळात नवरात्राच्या तेलवातीसाठी तेल देत असे. पण तिथे जमा होणारा तेलाचा मोठा साठा, वाया जाणार तेल पाहून तिला वाईट वाटे. ‘देवीच्या दिव्याला एवढे तेल कशाला? तिची तेलवात करणारे आपण कोण पामर ? तिच्या कृपेची दीपज्योती तर अहोरात्र तेवत असते आणि आपली आयुष्यं प्रकाशमान होत असतात.’
उमाने आता थोडा वेगळा विचार केला. तिने यंदा हे तेल एखाद्या गरजू कुटुंबाला द्यायचे ठरविले. चार दिवस तरी त्यांच्या घरच्या जेवणाला चांगली चव येईल. देवीची तेलवात नक्की उजळेल. दुसऱ्या दिवशी पूजा- प्रसाद झाल्यावर कामाला आलेल्या शांताला तिने बसविले. तिला प्रसाद दिला, ओटी भरली आणि ती तेलाची पिशवी तिच्या हातात दिली. हातात तेलाची पिशवी घेतली आणि शांताचे एकदम रूपच पालटले. अत्यानंदाने तिचा चेहरा फुलून आला. तिला काय बोलावे तेच समजेनासे झाले.
“काय झालं ग शांता ?”
“वैनी मला किती आनंद झालाय म्हणून सांगू ?”
“अग ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरून. काय झालंय?”
शांताने देवीला हात जोडले आणि म्हणाली,”वैनी, आईच्या किरपेनं माजा संसार धड चाललाय बगा. नवरा आता माज्याशी नीट वागतोय. पोरगं चांगलं शिकतंय. आणकी काय हवो वो मला? देवीची तेलवात करायची असं लई दिसापास्न माजा मनात हुतं.पन जमतच नव्हतं. घराच्या खर्चाचं तोंड सारकं वासलेलंच की.पन वैनी तुमी माझ्या मदतीला धावला बगा. माजं मोठं काम केलसा.आत्ता हितूनच देवळात जाते आणि देवीला तेल वाहूनच येते.येते वैनी.”
उमाला काय बोलावे तेच कळेना.ती एकदा शांताकडे आणि एकदा देवीकडे पहात राहिली.
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈