श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र – “सावू.. तू?.. तू इथे कशी?” कपाळावरचा घाम रुमालाने टिपत त्यांनी विचारलं. त्यांच्या थकून गेलेला निस्तेज चेहरा क्षणात उजळला.)
“मुद्दाम तुम्हाला भेटायलाच आलेय.”
” हो..पण असं अचानक?”
” तुम्हाला भेटावं असं तीव्रतेने वाटलं, आले. कसे आहात तुम्ही?”
“कसा वाटतोय?”
“खरं सांगू? तुम्ही खूप थकलायत आण्णा”. तिचा आवाज भरून आला. तेवढ्यात समोरून बस येताना दिसली न् मग सविता काही बोललीच नाही. बसमधे सगळेच गावचे. ओळखीचे. सगळ्यांसमोर मोकळेपणाने बोलणं तिला प्रशस्त वाटेना.बसमधून उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली.)
“आण्णा,आपण…आपण लगेच घरी नको जायला.”
“का गं?”
“वाटेत शाळेजवळच्या देवळात थोडावेळ बसू.मग घरी जाऊ. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय.”
“अगं बोल ना.घरी जाता जाता बोल. घरी गेल्यानंतर निवांत बोल.”
“नाही…नको”
“लांबचा प्रवास करून आलीयस.ऐक माझं.आधी घरी चल.हात पाय धू. विश्रांती घे.मग बोल.घाई काय आहे एवढी?”
सविताला पुढे कांही बोलताच येईना.
तिला असं अचानक दारात पाहून तिच्या वहिनीलाही आश्चर्य वाटलं.
“सविताताई ,हे काय? असं अचानक?” बोलता बोलता तिच्या हातातली बॅग घ्यायला वहिनी पुढे झाली आणि बॅगेऐवजी सविताच्या हातातल्या त्या दोन जड पिशव्या पाहून चपापली.तिच्या कपाळावर उमटलेली सूक्ष्मशी आठी आणि आण्णांकडे पहातानाची तिच्या नजरेतली नाराजी सविताच्या नजरेतून सुटली नाही. सविताने त्या दोन जड पिशव्या तिच्या पुढे केल्या.मग मात्र वहिनीने त्या हसतमुखाने घेतल्या.
“आधी कळवलं असतंत तर मोटारसायकल घेऊन हे आले असते ना हो मिरजस्टॅंडवर तुम्हाला घ्यायला ” तिच्या बोलण्यात सहजपणा होता पण सविताला तो सहजपणे स्वीकारता येईना.
” मुद्दामच नाही कळवलं. अचानक रजा मिळाली.आले. आण्णांना भेटावसं वाटलं म्हणून रजा घेतलीय” वहिनीकडे रोखून पहात ती म्हणाली .चहापाणी आवरलं तसं ती उठली .
“वहिनी, थोडं देवळापर्यंत जाऊन पाय मोकळे करून येते.”
” बरं या”.
“चला आण्णा..”
“आण्णा..?..ते कशाला..?” वहिनी आश्चर्याने म्हणाली.
” का बरं?त्यांना का नाही न्यायचं?” सविताने चिडून विचारलं.तिच्या आवाजातला तारस्वर वहिनीला अनोळखीच होता. ती चपापली.कानकोंडी झाल्यासारखी चुळबुळत राहिली.
“तसं नाही सविताताई..”
“मग कसं?”आता गप्प बसायचं नाही हे सविताने ठरवूनच टाकलं होतं.पण वहिनी वरमली.
” तुम्ही जा त्याना घेऊन,पण अंधार व्हायच्या आत परत या “
सविता रागाने तिच्याकडे पहात राहिली.फट् म्हणताच ब्रह्महत्या होणार पण त्याला आता तिचा नाईलाज होता.
“आण्णांना हल्ली डोळ्यांना कमी दिसतं.मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय.म्हणून म्हटलं.फार अंधार करू नका.”
“आण्णाs?”त्यांच्याकडे पहात सविताने आश्चर्याने विचारले. ते मानेनेच ‘हो’ म्हणाले. आणि खाली मान घालून त्यांनी चप्पल पायात सरकवली. ते पाहून वहिनी क्षणभर घुटमळली. मग न बोलता आत निघून गेली.
देऊळ येईपर्यंत आण्णा गप्पच होते आणि सविताही.
“मला आधी का कळवलं नाहीत?आॅपरेशनचं?”
“त्याचं काय अगं? अजून कधी करायचं तेही ठरलं नाहीय.डॉक्टर करा म्हणाले की लगेच करायचं. आणि हल्ली मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्वीसारखं अवघड नसतं अगं.तू उगाच काळजी करतेस.”
” आण्णा, तुम्ही रोज घरी काय काय कामं करता?” तिने मुद्द्यालाच हात घातला.
“मी..मी काम असं नाही गं…”
” काहीच करत नाही?”
“तसं म्हणजे… करतो आपलं मला जमेल ते..जमेल तसं..”
“कां?”तिने तीव्र शब्दात विचारलं.
“कां म्हणजे? बसून काय करायचं?” त्यांच्या घशात आवंढाच आला एकदम.ते गप्प बसले.
“तुम्हाला घरकामाची सवयही नाही न् आवडही नाही हे ठाऊक आहे मला.वहिनीला जमत नसेल तर चार बायका ठेव म्हणावं कामाला.तिने तुम्हाला कामं का लावायची?”
“तुला..सारंग बोललेत का हे सगळं?”
“त्याने कशाला सांगायला हवं?आज मीही स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंच आहे की.दहा किलोच्या साखरेच्या जड पिशव्या तुम्ही का वहायच्या?तेही या वयात?वहिनी नोकरीसाठी रोज मिरजेला जा-ये करते.गॅरेजच्या कामासाठी दादाही मिरजेला जात असतोच ना?एक दिवसाआड का होईना दादाचा मोटारसायकलवरून एखादातरी हेलपाटा असतोच की. मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची? मी आज वहिनीशी स्पष्टपणे बोलणारच आहे ह्या विषयावर..”
“ए..वेडी आहेस का तू?तू..तू तिला यातलं कांहीही बोलायचं नाहीss”
“का नाही बोलायचं ?दादाशी तरी मी बोलणारच.त्याला चांगली खडसावून विचारणार”
क्रमश:…
©️ अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈