सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग ३ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
तिकडे सुश्रिया झाडाच्या फांदीवर बसून मस्त झोके घेत होती. तिथून तिला स्वयंपाकघरात काम करणारी आई दिसत होती. तिची स्वयंपाक करायची गडबड सुरू होती. सुश्रिया पंख पसरून मस्त भरारी मारून आली. हिरवी हिरवी झाडं, त्यावरची रंगीबेरंगी नाजूक नाजूक फुलं तिला खूप आवडली. तिच्या पलीकडच्या फांदीवर एक पक्षी चोचीनं किडा खात होता. ईऽऽई सुश्रिया मनात म्हणाली. आपण आता किडे खायचे? पटकन ती आपल्या घराच्या खिडकीजवळच्या फांदीवर आली. आईच्या पोळ्या करून झाल्या होत्या. आता तिच्या आवडीच्या काचर्या करत होती. सुश्रियाच्या पोटात आता कावळे ओरडायला लागले. अं! आता मो आत कशी जाणार? पोळी कशी खाणार? सुश्रियाला रडायला आलं. तेवढ्यात आई म्हणाली, “ए सुश्रिया, इतकं वाकडं रडवेलं तोंड करून का बसलीस? ये बरं पटकन पोळी खायला.” सुश्रियानं डोळे किलकिले करून पाहिले. अरेच्चा! पुस्तक वाचता वाचता डुलकी लागली अन् स्वप्न पडले की काय? बरे झाले, आपण पक्षी नाही ते!”
दुसर्या दिवशी सगळ्यांनी आपले मनोगत वाचून दाखवले. बाई एकदम खूष! “शाब्बास मुलांनो, सगळ्यांनी छान लिहीलंय आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आपण मानव असल्याचे महत्त्व समजलंय. हो ना! आता एक मुलगा म्हणून, मुलगी म्हणून तुमच्याकडे जे सुप्त गुण आहेत ते ओळखून ते वाढवण्याचा प्रयत्न करा. कसं ते बघा हं, आर्यनकडे घोड्यासारखी चपळता आहे. त्याचा उपयोग त्याने बॅडमिंटन सारख्या खेळात करून शाळेला, राष्ट्राला आणि देशाला बक्षीस मिळवून द्यायचं, देशाचं नाव उज्ज्वल करायचं. अवनी, सुश्रियाला उडायला आवडतं, त्यांनी त्यांना जे करायला येतं, आवडतं, त्यामध्ये उंच भरारी घ्यायची. राधानं मनीमाऊ सारखं नुसतं झोपायचं नाही, तर जे करायचं ते तल्लीन होऊन, एकाग्रचित्तानं करायचं. ती गाणी छान म्हणते, पेटी वाजवते. ते चांगल्यात चांगलं करायचं. रमाला वाचायला आवडते ना, तिने मोठ्या लोकांची, शास्त्रज्ञांची चरित्रे वाचायची आणि खूप अभ्यास करून पहिला नंबर मिळवून शास्त्रज्ञ व्हायचं, शोध लावायचा आणि आमचा ऑल राऊंडर अथर्व इतका हुशार आहे, त्याच्याकडे इतकी शक्ती आहे की तो काहीही करू शकेल. बाॅडी बिल्डर होईल, क्रिकेटीयर होईल किंवा डाॅक्टर, इंजिनियरसुद्धा बनेल. तुम्ही सगळी मुलं खूप हुशार आहात. त्या हुशारीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करा आणि आपल्या शाळेला, देशाला खूप मोठ्ठं करा. ठीक आहे? आता आपण उद्या भेटू.”
सगळ्यांचे मोबाईल बंद झाले. पण प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे खूप मोठ्ठं होण्याचं स्वप्न दिसत होतं.
– समाप्त –
© अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈