डॉ. ज्योती गोडबोले
☆ नाक दाबल्याशिवाय… भाग – ३ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(बाहेर वणवण केलीस की मग समजेल, नोकरी मिळणं किती अवघड आहे. जा !आजपासून तुझा हा स्वैराचार मी खपवून घेणारच नाही.. नाही म्हणजे नाही“.) – इथून पुढे
नरेंद्रने कित्येक दिवसात ब्रशला हातसुद्धा लावला नव्हता. त्याने शोधाशोध करून सगळे साहित्य जमवले. त्याच्या आधीच्या जुन्या खोलीत गेला. तिथल्या माळ्यावर पडले होते इझल्सआणि वाळून गेलेल्या रंगांच्या ट्यूबज्. ते बघून नरेंद्रला वाईटच वाटलं. तो आल्याबरोबर घरमालक आले. “ नरेंद्र, चार महिन्यांचं भाडं थकलंय ,कधी देणार? वहिनी आल्याच नाहीत भाडं द्यायला. भाडं द्या नाहीतर लवकर खाली करा खोली बरं का !” नरेंद्र घरी आला. विजूला म्हणाला, “ हे काय,भाडं नाही भरलंस हो ग? तो मालक किती बोलला मला ! “ विजू म्हणाली “ हो? मग भर की तू ! माझा काय संबंध त्या खोलीशी? आता मी अजिबात सगळ्या जबाबदाऱ्या घेणार नाही. मी तुला आधीपासून सांगत होते की आता ती खोली सोडून दे. पण एक लक्षात ठेव. आता .. म्हणजे आत्ता या क्षणापासून.. माझ्या हातात तू पैसे ठेवल्याशिवाय मी या घरात येऊच देणार नाहीये तुला. हे घर माझं आहे. रिकामे बसून आयते खाणाऱ्या माणसासाठी नाहीये हे.” .. आज विजू अगदी वेगळीच दिसत होती .. वागत होती.
नरेंद्रला शॉक बसला हे ऐकून. संध्याकाळी मित्रांच्या अड्ड्यावर गेल्यावर सुभाष लगेच म्हणाला,” पैसे मागायला आला असलास तर असाच परत जा. मागचे पाच हजार उसने घेतलेले कधी देणारेस? देऊ नका रे याला कोणी आता पैसे ! नरेंद्र, अरे काय हे ! सगळ्यांची उधारी कधी आणि कशी फेडणार आहेस तू? आम्हीही कोणी जहागीरदार नाही लागून गेलोत .आम्हाला ताबडतोब परत कर आमचे पैसे ! नुसता आयता बसून खात असतोस बायकोच्या जिवावर? तुला जराही लाज नाही वाटत का रे? त्या बिचारीची दयाच येते आम्हाला ! एखादी असती तर केव्हाच तुला बाहेरचा रस्ता दाखवला असता. कर की काम कुठेतरी ! हातात कला आहे ती वापर ! “ सुभाष अगदी संतापून बोलत होतं….. नरेंद्र घरी आला तर घराला कुलूप होते आणि विजूने नेहमीसारखी किल्लीही शेजारी ठेवली नव्हती ! एक चिट्ठी तेवढी अडकवली होती कुलपात,….
“मी आज आईकडे राहणार आहे आणि तिकडूनच बँकेत जाईन उद्या ! “ नरेंद्र चिडचिड करत घराबाहेर पडला. दोन वडा पाव विकत घेतले आणि टपरीवरच खाऊन, चहा पिऊन परत वाड्यातल्या खोलीवर गेला.
कालच त्याला एक जुना मित्र भेटला होता रस्त्यात. एका ऍड कम्पनीत त्याला चांगल्या पगाराची नोकरी होती, आणि छान चाललं होतं त्याचं. ‘ तू हल्ली काय करतोस ‘ विचारल्यावर नरेंद्रला ठोस उत्तर कुठे देता आलं? हल्ली अनेक दिवसात त्याने काहीही केले नव्हते. भटकणे, मन मानेल तसे वागणे, या पलीकडे त्याने काहीच केले नव्हते .. कष्ट तर केलेच नव्हते. नरेंद्र त्या मित्राकडे गेला आणि म्हणाला, “ मला मिळेल का जॉब तुमच्या कंपनीत? लाज वाटते रे सांगायला, पण मी विजूला फार छळले. ती बिचारी बोलत नव्हती. पण मी कधी शंभर रुपयेही हातावर ठेवले नाहीत तिच्या. ‘ आहे की बँकेत तिला भरपूर पगार..’ असं म्हणत तिला खूप ओरबाडून घेतलं मी ! पण काल जेव्हा तिने मला शेवटचे अल्टीमेटम् दिले, की ती मला सोडून जाईल, तेव्हा मी हादरलो. ती करारी आहे आणि नक्की जाईल बघ सोडून मला. बघ माझ्यासाठी काही करता येते का.” मित्राला समजले की याला खरा पश्चाताप दिसतोय झालेला !
“ बघतो रे नक्की, “ मित्र म्हणाला ! तो पूर्ण महिना नोकरी शोधण्यात गेला नरेंद्रचा. इतके सोपे नाही नोकरी मिळणे हे प्रखरपणे जाणवले त्याला. विजू म्हणाली, “ काय झालं नोकरीचं? मी फक्त आणखी एकच महिना वाट बघेन. नाहीतर तू इथे राहायचं नाहीस. माझा तुझ्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालाय ! तू आणि तुझं नशीब. मी तुला जन्मभर पोसायचा मक्ता नाही घेतला.” आणि विजू तिथून निघून गेली.
नरेंद्रच्या पायाखालची जमीन सरकली. रोज जाहिराती पाहू लागला तो ! अचानक मित्राचा फोन आला की त्याच्या कंपनीत एक जागा रिकामी आहे. सध्या पगार खूप नाहीये, ‘ पण तू घे ही नोकरी ! नंतर बघू या दुसरीकडे.’ नरेंद्रचा रीतसर इंटरव्ह्यू झाला. त्याच्या अपेक्षेपेक्षा कमी पगार आणि कामाचे तास जास्त होते. पण नरेंद्रने ही संधी घेतली, आणि तो रुजू झाला कामावर. नरेंद्रच्या हातात कला होती आणि त्याला काम आवडायला लागले.
एक महिन्यानंतर त्याचा पगार झाला. नरेंद्रने सगळा पगार विजूच्या हातात ठेवला. “ विजू, हा पगार खूप कमी आहे, पण मी आणखी चांगली नोकरी नक्की मिळवीन. तू माझे डोळे उघडलेस विजू. नाहीतर मी असाच बसलो असतो तुझ्या जिवावर ऐश करत..मला इतका आनंद झाला ग, ब्रश आणि पेंटस हातात घेताना. खरंच सॉरी ! मी खूप छळले तुला. मला माफ करशील ना?” विजूचे डोळे भरून आले… “नरेंद्र,आईअण्णांचा विरोध पत्करून मी तुझ्याशी लग्न केलं आणि तू जर मला हालातच ठेवणार असलास तर मी हरले असते रे. कायम लक्षात ठेव, मी तुझ्यासाठीच आहे, पण तूही माझी जाणीव ठेवली पाहिजेस. आत्ता ठीक आहे ही नोकरी, पण तू जास्त चांगली नोकरी मिळवू शकतोस. तुझी क्षमता खूप जास्त आहे. तू स्वतंत्र कामही मिळवू शक्यतोस. मला खूप छान वाटले, तुझ्यातला आत्मसन्मान जागा झाला.”
दुसऱ्या दिवशी हे सर्व कलाला सांगताना विजूला गहिवरून आले. “ कला, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते ग ! मी तुझ्याकडे मन मोकळे करायला, तू सल्ला द्यायला ,मला खंबीर राहा असे सांगायला, योग्य वेळ आली. तुझे उपकार कसे फेडू ग बाई?”
कला म्हणाली, “ फेडशील फेडशील. अजून वेळ आहे. मग हक्काने मागून घेईन मला हवं ते .बघच !आता नरेंद्र मागे वळून नाही बघणार. त्याच्यातला खरा कलाकार तू जागा केलास, त्याला डिवचून ! आता सगळं छान होईल विजू !”
.. …. विजूला हे सगळं आठवलं. नरेंद्र त्या नोकरीतून दुसऱ्या, असे करत खूप चांगल्या नोकरीवर गेला. दरम्यान त्याची मोठी पेंटिंग्ज लोक नावाजू लागले. आज जहांगीरसारख्या प्रतिष्ठित आर्ट गॅलरीत नरेंद्रच्या निवडक पेंटिंग्जचे प्रदर्शन होते. दाराशी विजू,आणि तिची मुलगी सई हसतमुखाने उभी होती. अकस्मात विजूला कला, कलाचा नवरा विश्राम आणि आई अण्णांना हाताला धरून आणणारा नरेंद्र दिसला. त्याच्या हाताला धरून अण्णा येत होते. विजू धावत आई अण्णांजवळ गेली. अण्णांनी नरेंद्र आणि विजूला जवळ घेतले. नरेंद्रने दोघांना वाकून नमस्कार केला. विजूच्या डोळ्यात अश्रू आले.” पोरी, जिंकलीस हो. नरेंद्र, आज खऱ्या अर्थाने मला अभिमान वाटतोय तुमचा, जावई म्हणून !”अण्णांनी आपल्या गळ्यातली चेन नरेंद्रच्या गळ्यात घातली. “ नरेंद्र, घाला बरं, सासऱ्याची आठवण म्हणून ! अहो, मुलं आपलीच असतात, पण चुकली की आईबाप बोलणारच. यशस्वी झाली की कौतुकही करणारच. बोललो असेन तर राग मानू नका हो ! मुलीत आतडे गुंतलेले असते बरं बापाचे. ती दुःखात असेल तर सहन होत नाही त्या पितृहृदयाला. तुमची ही मुलगी सई, मोठी होईल तेव्हा समजेल तुम्हाला.” नरेंद्रने आपल्या लेकीला- सईला जवळ घेतले,आणि म्हणाला, “अण्णा, मी तुमचे शब्द कायम ठेवीन लक्षात. चला आता आत, जावयाच्या प्रदर्शनाचं उदघाटन करायला ! “ ….
…. हसतमुखाने विजूने रेशमी फीत कापायला कात्री अण्णांच्या हातात दिली आणि आनंदाने भरलेले डोळे पुसत आई अण्णा जमलेल्या गर्दीतून आत गेले.
— नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही …… हेच खरं।
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈