सुश्री शांभवी मंगेश जोशी
जीवनरंग
☆ ‘शाॅवर…’- भाग २ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆
(मागील भागात आपण पाहिले – त्याचं नशीब थोर म्हणून मनिष आणि सुनिता, श्वेता भेटले. त्यांनी मोठ्या मनाने त्याला ठेवून घेतलं. एवढंच नाही, आता जूनमध्ये शाळा सुरू होतील म्हणून त्यांनी गणूच्या शाळेची चौकशी केली. गणू चौथीत गेला होता. त्याला शाळेत पाठवायची पण व्यवस्था त्यांनी केली. – आता इथून पुढे)
दिवसामागून दिवस जात होते. आपल्या आईबापाची आठवण विसरून गणू शर्मांच्या घरातच रुळत होता. त्याच्या प्रगती पुस्तकावरही मनिषच सही करत होता. आपलं घर समजून गणू घरातली कामंही करत होता. झाड-झूड करणे, फरशी पुसणे, कपबश्या धुणे, बाग बनवणे अशी अनेक कामं तो मनापासून करत होता. मनिष त्याच्या अभ्यासाकडेही थोडंफार लक्ष देत होता. तल्लख बुद्धीचा गणू अभ्यासात चांगली प्रगती करत होता.
बघता-बघता दिवस, महिने करत वर्ष लोटलं. छोट्या मुलीला घेऊन पुन्हा रखमा आली. पण गणूवर काहीच परिणाम झाला नाही. आता तर श्वेतासारखाच मनिष-सुनिताचाही गणूवर जीव जडला होता. चार जणांचं सुखी कुटुंबच बनलं होतं ते.
त्यातच मध्यंतरी एक-दोन घटना घडल्या. श्वेताचं बोट सुरीशी खेळता-खेळता कापलं. गणूनं झटकन् तिचं बोट तोंडात गच्च पकडलं. रक्त ओढून घेतलं. त्यावर एका झाडाची पानं ठेचून लावली. रक्त थांबलं. गणूने हे सगळं इतकं वेगानं अन् सफाईनं केलं की, श्वेताला रडायलाही अवधी मिळाला नाही. इतकी ती त्याच्याकडं पहाण्यात गुंगून गेली होती.
त्यानंतर असेच दोघं बंगल्याच्या अंगणात खेळत होते. खेळता-खेळता बागेतल्या हौदातच पडली. हौद जमिनीच्या पातळीतच होता, पण 4फूट खोल होता. 2-2॥ फूट उंचीच्या श्वेतासाठी तो खूप होता. शिवाय पाण्यानं भरलेला. गणूही काही फार उंच नव्हता. पण त्याला पोहता येत होतं. त्यानं किंचितही विचार न करता हौदात उडी मारली अन् श्वेताला बाहेर काढलं. त्याच्या ओरडण्यामुळं मनिष-सुनिता बाहेर आले. समोरचं दृश्य पाहून घाबरून गेले. पण श्वेताला सुरक्षितपणे बाहेर काढल्याचं पाहून त्यांना फारच आनंद झाला. दोन्ही घटनांमुळे त्यांचा गणूवर जीव जडला.
देवाची काय योजना होती कुणास ठाऊक? पण दिवसेंदिवस गणू, शर्मा कुटुंबात साखरेसारखा विरघळत राहिला. परिणाम अर्थातच गोड होता.
‘दैव’ किंवा नशीब किंवा नियती… किंवा काहीही, जे आपल्या हातात नाही ते निश्चित काहीतरी असावं, जे परिणामकारक रीतीने कार्यरत असतं. बघा ना…
जेमतेम 10 वर्षांचा मुलगा, आईबापाला सोडून कसा राहू शकतो? तेही अजिबात ओळख नसलेल्या कुटुंबात?
तेही त्याला कसे सहज स्वीकारू शकतात? आश्चर्य तर पुढेच आहे.
हळू-हळू श्वेता आणि गणूची दिवसेंदिवस गट्टी होत गेली. गणूला मनिषा आणि सुनिताच्या हृदयात स्थान मिळालं. व्हरांड्यात झोपणारा गणू आता हॉलमध्ये झोपू लागला. शर्मा कुटुंबाबरोबर जेवायला बसू लागला. केजीतली श्वेता आणि चौथीतला गणू एकत्र अभ्यास करू लागले. चौथी, पाचवी… करत करत दहावीचा टप्पाही गणूने पार केला. चांगल्या मार्कांनी. दिवसेंदिवस सगळ्यांचंच नातं घट्ट होत गेलं. सोय म्हणून मनिषने सुनिताची स्कुटीही त्याला शिकवली होती.
परक्या अनोळखी लोकांना आता हे एक मुलगा आणि एक मुलगी असलेलं सुखी कुटुंबच वाटू लागलं.
दहावी झाल्यावर पुढं काय? किंवा कधीच पुढं काय असा विचार गणूने केला नव्हता. ज्या बंगल्याचं सुख भल्याभल्यांना खूप उशीरा, खूप खर्च करून महत्प्रयासानं मिळायचं! ते त्याला 9व्या-10व्या वर्षीपासूनच सहज मिळत होतं. एक मात्र खरंय, त्याची तीव्र इच्छा अन् जिद्द!
मनिषने काही विचार करून गणेशला कॉमर्स शाखेला घातलं. त्याच्या व्यवसायाला ते उपयुक्त होईल, असाच त्याचा विचार असावा. गणूनेही बी.कॉम. करता-करता मनिषच्या व्यवसायातली थोडी-थोडी करत बरीच माहिती मिळवली होती. हळू-हळू तो जबाबदार, हुशार तरुण होत होता.
मधल्या काळात मनिष-सुनिता 3-4 वेळा मुलीला घेऊन राजस्थानात त्यांच्या गावी जाऊन आले. तेव्हा 15-20 दिवस गणूने बंगला उत्तम रीतीने सांभाळला. बागेकडेही लक्ष दिलं. तेव्हा शर्मा दांपत्याला गणेशचा चांगलाच आधार आणि विश्वास वाटू लागला.
रखमा, धर्मा 2-3 वेळा येऊन गेले, पण गणू त्यांच्याबरोबर गेला नाही. तेही पुढच्या-पुढच्या कामावर लांब-लांब गेले. बरेच दिवसात त्यांची बंगल्यावर चक्कर झाली नाही. ते एक दिवस असेच अचानक मुलीला घेऊन आले. गणूला न्यायला नाही, फक्त भेटायला. ते गाव सोडून चालले होते. तारुण्यात पदार्पण केलेल्या, शिकून शहाण्या झालेल्या गणूला पाहून रखमा आणि धर्मा हरखून गेले. हा आपलाच मुलगा आहे, यावर त्यांचा विश्वासच बसेना. रखमाच्या डोळ्यांना धाराच लागल्या होत्या. धर्माही त्या शहाण्या-सुरल्या पांढरपेशा लेकाकडे पहातांना अवघडून गेला होता. हा इथं राहिला हे बरंच झालं असं त्याला क्षणभर वाटून गेलं.
यावेळेस मात्र गणूला आई-बापाकडं पाहून भरून आलं. तो धर्माला म्हणाला, ‘‘बा, आता मी शिकलो आहे. नोकरी करून तुम्हाला पैसे देत जाईन.’’ त्याचं हे बोलणं ऐकून धर्माचा बांध फुटला. तो त्याच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागला. बाकी भाषा बदलली होती, पण ते ‘बा’ ऐकून धर्माच्या जिवाची घालमेल झाली. ‘‘नको रं पोरा. मला काही नको. तू सुखाचा रहा – बसं!’’
यावेळेस त्या सगळ्यांना घरात बोलावून सुनिताने चहापाणी केलं. जातांना मनिषने धर्माला 1000 रु. दिले. धर्मा अन् रखमा ‘‘कशाला? नगं-नगं’’ म्हणत होते. पण मनिषने ऐकलं नाही. त्यांचा पुढच्या गावचा पत्ताही नीट विचारून घेतला. 25-30 कि.मी.वर होता. त्यानं आई-बापाला रिक्षात बसवलं अन् तो स्कुटीनं त्यांच्या मागं-मागं गेला. त्यांच्या नव्या घराच्या टपरीत सोडून आला. तिथून निघतांना परत आई-बापानं त्याला अंजारून-गोंजारून डोळे भरून पाहून घेतलं. पोरगं आता आपलं राहिलं नाही असंच त्यांना वाटत होतं.
जाणत्या झालेल्या गणेशला आता वाटू लागलं, आपण बंगल्यात रहातोय, पण आई-बाप मात्र टपरीत. हे काही बरं नाही.
दुसरे दिवशी, तो मनिषला म्हणाला, ‘‘साहेब (पहिल्यापासून तो मनिषला साहेबच म्हणत होता.) मी आता नोकरी करतो म्हणजे मला घरी पैसे पाठवता येतील.
मनिष म्हणाला, ‘‘घरातच मला ऑफिसमध्ये मदत कर. मी तुला पगार देईन. नाहीतरी तुझं बेसिक कंम्प्युटर शिक्षण झालं आहे. टॅली वगैरे पण येतंय. अजून थोडंफार मी शिकवेन. या एक तारखेपासून तुझं काम न् पगार सुरू करू.’’
‘‘आंधळा मागतो एक डोळा…’’ गणूला तर 3-4 डोळे मिळाले. रहायला बंगला, शिक्षण, नोकरी, प्रेमळ कुटुंब, बहीण… काय हवं अजून?
खरंच बोलल्याप्रमाणे 1 तारखेपासून गणूचं काम सुरू झालं. ऑफिसच्या कामाचा भाग म्हणून त्याला बँकेतही जावं लागत होतं. मनिषच्या बँक अकौंटस्चीही त्याला माहिती झाली. म्हटलं ना दैव गणूवर प्रसन्न होतं. आता दर महिनाअखेर तो आई-बापाला ठराविक रक्कम देऊ लागला. त्यांच्या घरी जाऊन.
पण जसजश्या जबाबदार्या वाढत होत्या गणूचा अल्लडपणा कमी-कमी होत होता. श्वेता मोठी होत होती. तिच्याशी खेळणंही संपलं होतं. पण बहीण-भावाचं नातं घट्ट बनलं होतं.
बारावीला श्वेताला 94% गुण मिळाले. अमेरिकेत M.S. करण्यासाठी तिला स्कॉलरशिप मिळाली. ती गेली. घरात मनिष, सुनिता आणि गणू तिघंच. सतत कामात.
बघता-बघता श्वेताचं M.S. पूर्ण झालं. तिकडंच तिचा जॉब सुरू झाला. अन् तिनं लग्नही जमवलं. केलंही तिकडेच. लग्नासाठी मनिष-सुनिता तिकडं गेलं. तेव्हाच श्वेताच्या नवर्यानं आणि श्वेतानं त्यांना अट घातली. तुम्हाला आता इकडे आमच्याबरोबरच रहावं लागेल काहीही झालं तरी!
खूप मोठ्ठा आणि अवघड निर्णय होता. पण एकुलत्या एक लाडक्या लेकीसमोर – जावयासमोर त्यांचं काही चालेना.
लग्न करून ते सर्व व्यवस्था लावून निरवा-निरव करण्यासाठी भारतात आले. त्यांनी पूर्ण बंगला गणूच्या नावावर करून दिला आणि कायमच्या वास्तव्यासाठी अमेरिकेत गेले.
गणूला फार दुःख झाले. पण आता खर्या अर्थाने कायदेशीररित्या तो बंगला त्याचा झाला होता. अर्थात त्यासंबंधी गणूनं कधीच विचार केला नव्हता. बंगल्यात रहावं एवढंच त्याला पुरेसं होतं. लगेचच गणू आईवडिलांना बंगल्यात रहाण्यासाठी घेऊन आला. त्याच्या बहिणीचं धर्मानी लग्न लावून दिलं होतं. आता ते दोघंच होते.
अश्रुभरल्या डोळ्यांनी दोघं बंगल्याच्या दारातच थांबले. आपल्या हातांनी बांधलेल्या बंगल्यात प्रवेश करतांना त्यांची पावलं जड झाली.
गणू म्हणाला, आये, बा – या ना आत. आपलाच बंगला आहे.
थकलेला धर्मा म्हणाला, ‘‘आमच्या पायाची घाण लागंल ना रे आत!’’
गणु त्यांना थेट बाथरुममध्ये घेऊन गेला अन् शॉवर चालू केला. पण शॉवरपेक्षाही त्याचे अश्रु अधिक वहात होते. फक्त शॉवरमुळे ते दिसत नव्हते.
– समाप्त –
© सौ. शांभवी मंगेश जोशी
संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003
फोन नं. 9673268040, [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈