सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ एखाद्याचं नशीब — भाग-२ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
(मोहिनी लेकीच्या काळजीनं सतत तिच्या सोबत राहू लागली आहे. एकीकडे तिचे उपास-तपास, देवधर्म चालूच आहेत. ती यांत्रिकपणे घरातली कामं कशीबशी उरकते. रात्री देखील ती वरदाच्याच खोलीत झोपते. मुकुंदरावांकडे लक्ष द्यायला तिला सवडच नाही. मुकुंदराव हतबल होऊन आपलं पोरकेपण भोगत आहेत.) इथून पुढे —
वरदाच्या बाबतीत झालेली फसवणूक, नंतर घटस्फोट यामुळे त्या घरावर अवकळा आल्यासारखं झालं होतं. जवळच्या मित्र-मंडळींनाही समजत नव्हतं, ही कोंडी फोडावी तरी कशी? पण काळ कोणासाठी थांबत नाही असं म्हणतात. मुकुंदरावांच्या कुटुंबालाही ते लागू होतंच.
मुकुंदराव परत बांधकामाच्या साईटवर जाऊ लागले होते. पण एरवी काम करताना सगळ्यांबरोबर चालणारे हास्य – विनोद बंद झाले होते. संभाषणही कामापुरतंच.
मोहिनीच्या तब्येतीच्या तक्रारी चालू झाल्या होत्या. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठी नियमित औषधं घ्यावी लागत होती.
वरदा घरातल्या कामात आईला मदत करत होती. पण अगदी मिटल्यासारखी. जेवढ्यास तेवढं बोलणं आणि बाकी वेळ काहीतरी वाचत नाहीतर शून्यात नजर लावून बसणं, हाच तिचा दिनक्रम होता आता!
दरवर्षीप्रमाणे दोन्ही वर्षी गणपती उत्सवही साजरा झाला. फक्त आधीचा उत्साह मात्र नव्हता त्यात. यावर्षीचा गणेशोत्सव आठवड्यावर आला होता. सकाळी मुकुंदराव हाॅलमध्ये पेपर वाचत बसले होते. ते घरात असले म्हणजे समोरचा दरवाजा उघडाच असायचा. ‘नमस्कार, काका येऊ का?’, आवाजासरशी मुकुंदरावांनी दाराकडे नजर टाकली तर भोसल्यांचा रमाकांत सपत्नीक दारात उभा होता.
“अरे, रमाकांत ये ना. या घरात यायला तुला परवानगी का हवी? शेंबूड पुसता येत नव्हता तेव्हापासून इथे येतोस की ! .”
“खरंय काका, मी आपलं सहज काही तरी बोलावं म्हणून बोललो हो!” असं म्हणत तो आत आला. दोघांनी वाकून मुकुंदरावांना नमस्कार केला आणि रमाकांतची बायको वरदा आणि काकूंना भेटायला आतल्या खोलीत गेली.
रमाकांत गावातला हुशार पोरगा. त्याला डाॅक्टर व्हायचं होतं पण त्याच्या बाबाला या शिक्षणाचा खर्च परवडणारा नव्हता. अशावेळी मुकुंदरावांनी त्याला सर्व मदत केली होती आणि तीही निरपेक्ष वृत्तीने.
डाॅक्टर झाल्यावर पाच वर्षे रमाकांत मुंबईतल्या मोठ्या हाॅस्पिटलमध्ये नोकरी करत होता. अनुभवासाठी ते आवश्यकच होतं. त्याला आपल्या गावातच मोठं हाॅस्पिटल काढायचं होतं, कारण दहिवलीच्या आसपासच्या परिसरात एकही मोठं हाॅस्पिटल नव्हतं.
सरकारी दवाखान्यात नेहमीच स्टाफ आणि सुविधांचा दुष्काळ! गंभीर स्थितीतला रूग्ण कल्याण-अंबरनाथच्या दवाखान्यात पोचण्याआधीच राम म्हणायचा. हे त्यानं लहानपणापासून पाहिलं, अनुभवलं होतं. आता त्याच्या काही डाॅक्टर मित्रांच्या सहकार्याने त्याला ही कामगिरी पार पाडायची होती. त्याची बायको रोहिणी स्त्रीरोगतज्ज्ञ होती, तिचा सहभाग तर मोठाच होता. मुकुंदरावांचाही याबाबत सल्ला घ्यावा यासाठी तो आज आला होता.
मुकुंदरावांनी दहिवली आणि कर्जतच्या दरम्यान एक मोठा भूखंड विकाऊ असल्याचं रमाकांतला सांगितलं. जमीनीचा मालक परिचयाचा असल्याने व्यवहार वाजवी किमतीत होईल याची त्यांनी खात्री दिली. बँकेचे कर्ज मिळायलाही काही आडकाठी होणार नव्हती, कारण जमिनीची सगळी कागदपत्रं व्यवस्थित होती.
मुकुंदरावांनी लगेच त्या माणसाला फोन लावून, दुपारी जागा बघायला येत असल्याचं कळवलं. रमाकांत आणि त्याच्या बायकोला जागा पटली तर दोन दिवसांनी बाकीच्या मित्रांनाही बोलवणार होते जागा पहायला. आणि बघता बघता जागेची पसंती होऊन, कर्जाची सोयही झाली. गणपती उत्सवही यथासांग पार पडला.
रमाकांत आणि रोहिणी आठवडाभर मुकुंदरावांकडे मुक्काम ठोकून होते. कारण तो आणि त्याचे आई-वडील तीन वर्षांपूर्वी ठाण्यात राहायला गेले होते, मुंबईत रोज ये-जा करणं रमाकांत आणि रोहिणीला सोयीचं होतं म्हणून!
मुकुंदरावांनी स्वतःच्या देखरेखीखाली हाॅस्पिटलचं बांधकाम करून घेणार असल्याचं सांगितलं. रमाकांत आणि रोहिणीनं, वरदानं या बांधकामाच्या हिशोबाची बाजू सांभाळावी यासाठी तिला मनवलं. तिच्या रिकाम्या मनाला काहीतरी गुंतवणूक मिळावी, हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. रमाकांत सख्ख्या भावासारखा असल्याने वरदाला त्याला नाही म्हणताच आलं नाही.
हाॅस्पिटलच्या निमित्ताने रमाकांत, रोहिणी आणि त्याच्या इतर मित्रांची उठबस मुकुंदरावांकडे अनेकदा होऊ लागली. नवीन कामाच्या जबाबदारीत मन गुंतवल्यामुळे मुकुंदराव आणि वरदा दोघेही आपापल्या दुःखातून थोडे बाहेर पडले. या साऱ्याचा चांगला परिणाम मोहिनीच्या तब्येतीवरही झाला.
जागतिक मंदीचा परिणाम म्हणून विनयला अमेरिकेतील नोकरी गमवावी लागली. तिथे नवीन नोकरी मिळणंही दुरापास्त झालं. त्यामुळे त्यानं भारतात परतण्याचा निर्णय घेतला. सोफियाला अमेरिका सोडून भारतात येणं मान्य नव्हतं आणि मुलाची जबाबदारी घेण्याचीही तिची तयारी नव्हती. याची परिणिती त्यांच्या घटस्फोटात झाली.
विनय आपल्या चार वर्षाच्या लेकाला, जाॅयला घेऊन दहिवलीला परतला. इतक्या वर्षातला दुरावा, मुलाच्या आणि नातवाच्या प्रेमापोटी, मुकुंदराव आणि मोहिनीनं मोठ्या मनाने मिटवून टाकला. मिळेल ते काम, नोकरी स्वीकारून पुनश्च श्रीगणेशा करायचं विनयनी ठरवलं. मुकुंदरावांच्या कामातही जमेल तशी मदत तो करू लागला.
भागीदार म्हणून हाॅस्पिटलच्या कामासाठी फेऱ्या घालता घालता कल्याणच्या आर्थोपेडिक सर्जन असलेल्या डाॅक्टर सर्वेश कुलकर्णीनी वरदाच्या मनातही जागा पटकावली. त्याचा मोठा भाऊ डेंटिस्ट आणि आई-बाबा आयुर्वेदिक डॉक्टर होते. रमाकांतचा मित्रच असल्याने वरदाविषयी सगळी माहिती त्याला आपोआपच मिळाली. वरदाच्या बाबतीत जे काही घडलं, त्याची माहिती कुलकर्णी कुटुंबाला मिळाली होती आणि त्यात वरदाकडे काहीच उणेपणा नाही, हे त्यांनाही पटलेलं होतं. लवकरच वरदा आणि सर्वेशचं शुभमंगल अगदी साधेपणाने, पण समस्त दहिवलीकरांच्या उपस्थितीत पार पडलं.
देवधर कुटुंबावरचं नैराश्याचं सावट दूर झालं. जाॅयच्या सहवासानं आजी-आजोबांमध्ये एक नवीन चैतन्य आलंय, घराला घरपण आलंय. रमाकांत आणि त्याच्या मित्रांनी या कुटुंबाचा परीघ विस्तारला आहे. त्यामुळे काहीना काही कारणांनी या कुटुंबाची एकमेकांच्या घरी हजेरी लागत आहे. आता विनयसाठीही वधू संशोधन चालू आहे. त्यामुळे उगाच काहीतरी विचार करत एकटं बसायला, कोणाला सवडच नाहिये.
वाईट परिस्थितीतही आपलं मनोबल टिकवून ठेवलं पाहिजे, कारण बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हेच खरंय! तुम्हालाही पटलं ना?
– समाप्त –
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈