सुश्री शांभवी मंगेश जोशी
जीवनरंग
☆ ‘नॉट रिचेबल…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆
पाच वाजून गेले. कार्यशाळा संपण्याची काही लक्षणं नव्हती. नंदिताचं सारखं घड्याळाकडं लक्ष जात होतं. सकाळचा खडखडीत रस्ता आठवून तिच्या पोटात गोळा येत होता. आता त्याच रस्त्यानं जायचं आहे परत. निदान अंधाराच्या आत पोहोचलं तर बरं. पण छे! समारोप, चहापान हे सगळं होऊन कार्यशाळा संपायला सात वाजले.
नंदिता धावतच बसस्टँडकडे निघाली. पळव्यासारखं छोटंसं गाव. इनमिन दोन-अडीचशे वस्तीचं. एव्हाना सगळीकडे सामसूम झाली होती. त्यात वीज कपातीचे दिवस. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होता. सुदैवाने मोबाईलच्या टॉर्चमध्ये ती कशीबशी बसस्टँडवर पोहोचली. नशीब! तिथे मिणमिणता का होईना दिवा होता. मोजून सहा माणसं होती. नाही म्हणायला सातवा एक जण चहा उकळत होता. दूर कुठंतरी कुत्री केकाटत होती. त्यामुळे आणखीनच भीतीदायक वाटत होतं. सहा माणसात एक म्हातारी होती. धावतच नंदिता पटकन् तिच्याजवळ जाऊन उभी राहिली. धापा टाकतच नंदिताने विचारलं, ‘‘केव्हा येईल हो गाडी?’’
नंदिताला आपादमस्तक न्याहाळत म्हातारी म्हणाली, ‘‘ईल आता. तिचा काय नेम सांगावा?’’ म्हातारीच्या या बिनधास्त बोलण्यानं नंदिता जरा रिलॅक्स झाली. तिच्या बोळकं असलेल्या तोंडामुळं म्हातारी फार प्रेमळ वाटत होती. नंदितानं मोबाईल काढला. सकाळपासून देवेनला फोन करायलाच जमलं नव्हतं. तो काळजी करत असेल. बराच वेळ टुंग, टुंग वाजत राहिलं आणि नंतर ‘द नंबर यु आर ट्राईंग, इज करंटली नॉट रिचेबल, प्लीज ट्राय लेटर’. नंदिता वैतागली. पाच-पाच मिनिटाला फोन करत राहिली तरी प्रत्येक वेळेस तेच उत्तर! छे!
आज नेमके तिच्याबरोबर असणारी तिची मदतनीस आणि शिपाई दोघांनी ऐनवेळी दांडी मारली. देवेन म्हणत होता गाडी, ड्रायव्हर घेऊन जा, पण नंदिताची तत्त्व आड आली.
‘‘नको रे, किती गरीब माणसं असतात. त्यांच्यासमोर गाडी वगैरे घेऊन जाणं म्हणजे…!’’
‘‘ठीक आहे. पण लवकर निघ आणि अंधाराच्या आत घरी ये म्हणजे झालं.’’
हंऽ! आत्ता तिला पश्चात्ताप होत होता. एवढ्यात खडखड करत लाल डब्बा आला. सारे बसमध्ये बसले. नंदिता म्हातारीच्या जवळच बसली. हुश्श! तिनं सुस्कारा सोडला. शेवटी एकदाची बस मिळाली. आता नेईल अकरा-साडेअकरापर्यंत. नंदिता थोडीशी रिलॅक्स झाली. दिवसभराचा थकवा न् गार वार्याची झुळूक! त्यामुळे नंदिताला डोळा लागला. किती वेळ गेला कुणास ठाऊक. अचानक बसच्या गचक्यांनी तिला जाग आली. तिनं चटकन् म्हातारीच्या मांडीवर हात ठेवला. म्हातारी म्हणाली, ‘‘घाबरलीय व्हय? रोजचंच हाय. काय न्हाय. काळजी करू नगंस!’’ नंदिताला जरा दिलासा वाटला. ती बाहेर बघू लागली. बसच्या दिव्यांशिवाय सर्वत्र दाट अंधार होता. खड्ड्यांमुळे बसला धक्के बसत होते. तसा दिव्यांचा प्रकाशही खालीवर होत होता आणि तिचा जीवही. तिनं परत देवेनला फोन लावला. पुन्हा – तेच! ‘नॉट रिचेबल.’
जरासा चढ लागला अन् बस घरघरत चालू लागली. पाचेक मिनिटं ती कशीबशी चालू होती. नंदितानं घड्याळात पाहिलं. अकरा वाजून पाच मिनिटं झाली होती. बस नीट चालली, तर जेमतेम अर्ध्या तासात बस पोहोचली असती. पण छे! धाड-धाड आदळून बस जागेवर उभी राहिली. भीती अन् चिंतेनं नंदिता गोठल्यासारखी झाली. म्हातारीच्या मांडीवरचा हात तिनं घट्ट धरून ठेवला. म्हातारीनं पण तिच्या हातावर थोपटलं. तेवढ्यात उद्दाम आवाजात कंडक्टर म्हणाला, ‘‘उतरून घ्या. धक्का माराय लागंल. समदे उतरा.’’ धक्का मारला तरी ती बस टस् की मस् हलेना.
मिट्ट काळोख! रस्त्यावर वाहतूक नाही. बस सुरू होण्याची शाश्वती नाही. रात्री साडेअकरा, बाराच्या दरम्यान नंदिता एका पारावर बसली होती. बसमधले सहाजण इकडे-तिकडे फिरत होते. म्हातारी तिच्या शेजारीच, हाताची उशी करून लवंडली होती. तिला लगेच डोळाही लागला असावा. क्षणभर नंदिताला तिचा हेवा वाटला.
दोन तरुण तिथं आसपास फिरत होते. एकजण विड्या फुंकत झाडाला टेकून बसला होता. ड्रायव्हर-कंडक्टरचा आसपास पत्ताही नव्हता. कितीही अवसान आणलं तरी नंदिताच्या काळजाचा ठाव सुटलेला होता. देवेनची आठवण येऊन घशात आवंढा येत होता. फोनला अजिबात रेंज नव्हती. फोनची डबी हातात घेऊन नंदिता हताशपणे बसून होती. एका क्षणी, ती डबीही फेकून द्यावीसं वाटलं. एवढ्यात, तो समोर दिसला. थोडंसं दूरवर एका झाडाला टेकून बसलेला. चक्क लॅपटॉपवर काम करत होता.
म्हणजे… म्हणजे… नक्की त्याला रेंज असणार! या जगाशी कनेक्टेड असा ‘तोच’ होता. त्याच्याकडून काहीतरी आशा होती. त्याच्या फोनला रेंज असली तर? देवेनला कळवता तरी येईल. पण तो… तो तर बघायलाही तयार नव्हता. कोण असेल तो? कामात व्यग्र आहे की मुद्दाम करतोय? भला माणूस असेल का? नंदिता स्वतःशीच बोलत होती. ‘बोलावं का त्याच्याशी?’ अशा विचारानं नंदिता उठली. दोनच पावलं टाकली अन् तशीच माघारी फिरली. नको! नकोच! कोण, कुठला तिर्हाईत माणूस अशा जागी, अशा वेळी त्याच्याशी बोलायला नको नकोच!
जगाशी संपर्क साधायला एकही साधन नाही. एकमेव तोच आशेचा धागा आहे. पण त्याला जराही स्त्रीदाक्षिण्य नाही? राग, संताप, भीती, चिंता, अगतिकता, असहाय्यता, उद्विग्नता अशा सर्व टोकाच्या भावनांमुळे नंदिताला बधिरपणा आला. मोठा सुस्कारा सोडून आकाशात पहात राहिली. नशिबानं आकाश निरभ्र होतं. चांदणं पसरलं होतं. तेवढ्यानंही नंदिताचं मन हलकं झालं.
अचानक मागच्या बाजूला, तिला एक उग्र दर्प जाणवला. काहीतरी चाहूल लागली. तिनं चमकून पाहिलं तर एकजण तिच्याजवळच बसलेला दिसला. ती अंगभर शहारली. संतापून त्याच्याकडं पाहिलं. राग, चीड, घृणा त्यातून व्यक्त केली. तर तो उलट म्हणाला, ‘‘काय नखरा? लई शाणी गं!’’ बळं-बळं आणलेलं तिचं अवसानच गळालं. नंदिता चटकन उठली न म्हातारीच्या पलिकडं जाऊन बसली. तिनं थरथरता हात म्हातारीच्या अंगावर ठेवला. म्हातारीचाच काय तो एकमेव आधार होता.
दूरवर दिवे दिसत होते. जवळ-जवळ आले अन् तसेच दूर गेले. ट्रक होता तो एक. हंऽ! सुस्कारा सोडून तिनं पुन्हा एकदा फोन लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण पुन्हा ‘‘द.नं.यू.आर. ट्राईंग इज करंटली नॉट रिचेबल’’ हंऽ! पुन्हा-पुन्हा तेच उत्तर त्याच आवाजात देणार्या त्या बाईचाही तिला राग आला. काय करावं? विचारावं का लॅपटॉपवाल्याला? तेवढ्यात दूरवर पुन्हा वाहनाचा प्रकाश दिसू लागला. बस आली की काय? पण छे! ही तर कार आहे. जाईल निघून आली तशी म्हणून ती तशीच निराश, हताश बसून राहिली.
आश्चर्य म्हणजे, ती कार त्यांच्याजवळच येऊन थांबली. कार आलिशान होती. त्यामधून ड्रायव्हर खाली उतरला अन् लॅपटॉपवाल्याजवळ गेला. त्याची लॅपटॉपची बॅग घेऊन कारच्या मागच्या सीटवर ठेवून दरवाजा उघडून उभा राहिला. तो लॅपटॉपवाला मागे न बसता पुढच्या सीटवर बसला. ड्रायव्हरशी काहीतरी बोलला. ड्रायव्हरने दरवाजा बंद केला अन् तिच्यासमोर येऊन उभा राहिला. नंदिता पहातच राहिली.
ड्रायव्हर म्हणाला, ‘‘चला मॅडम, तुम्हाला साहेबांनी गाडीत बसायला सांगितलंय.’’
‘‘काऽऽय?’’ ती ओरडलीच. कोण साहेब? अन् मला का सांगितलं, एवढा वेळ तर शब्दानं चौकशी नाही अन् आता एकदम गाडीत बसा?
तिला कळेचना. ड्रायव्हर परत म्हणाला, ‘‘हो मॅडम चला. रात्रीची वेळ आहे. इथं आडरानात किती वेळ बसणार?’’
ते तर खरंच होतं. पण हा कोण, कुठला? त्याच्यावर कसा विश्वास ठेवणार? क्षणभर ती विचारात पडली. पुन्हा विचार केला. याच्याबरोबर गेलं तर काही तरी परिस्थिती बदलेल. नाहीतर इथे किती वेळ बसून रहाणार? ‘इकडे आड तिकडे विहीर’ तिने विहिरीत उडी घ्यायची ठरवलं. ती उठली. ड्रायव्हरने तिच्या हातातली पिशवी घेतली, म्हणाला, ‘‘चला मॅडम, आधीच खूप उशीर झाला आहे.’’ ड्रायव्हरचं बोलणं सज्जन, सभ्यपणाचं वाटत होतं. ती नाईलाजानं यंत्रवत त्याच्या मागोमाग जाऊन गाडीत बसली. ‘‘आपण कोण?’’ असं बोलण्यासाठी तिनं तोंड उघडलं, पण तिचा आवाजच फुटला नाही. पाणी प्यावं म्हणून पर्समध्ये पाण्याची बाटली पाहिली तर ती नव्हतीच.
सर्व भरवसा देवावर सोडून अतीव मानसिक त्रासाने ती डोकं मागं ठेवून डोळे मिटून बसून राहिली. तिचे पाय लटपटत होते. धडधडणारं काळीज बाहेर येईल असं वाटत होतं. आपण सुरक्षित आहोत की आणखीन धोक्यात चाललोय तिला कळेना. पण आता विचार करण्याचेही त्राण तिच्यात नव्हते. जेमतेम दहा-बारा मिनिटातच गाडी थांबली. आता काय? म्हणून तिनं घाबरून डोळे उघडले तर गाडी चक्क तिच्या घरासमोर उभी होती. तिचा विश्वासच बसेना. देवेन फाटकातच उभा होता. ड्रायव्हरने दार उघडताच, ती धावत जाऊन देवेनला बिलगली. देवेनने तिला थोपटलं अन् पुढे झाला.
तोही गाडीतून उतरला. म्हणाला, ‘‘सांभाळ तुझी अमानत.’’ देवेननं त्याता हात हातात घेत म्हटलं, ‘‘थँक्स यार निनाद. तुझ्या रूपानं देवच भेटला. आत ये ना कॉफी घेऊ.’’
‘‘अरे नाही. परत कधीतरी. आता फार उशीर झालाय.’’ असं म्हणून तो गाडीत बसून क्षणात दिसेनासा झाला.
नंदिता पहातच राहिली. कोण निनाद? त्याचा देवेनशी काय संबंध? आणि त्यानं मला अलगद घरी कसं आणलं?
देवेननं तिला जवळ घेतलं अन् हसत तिच्याकडे बघत राहिला.
‘‘अरे हसतोस काय? सगळा काय प्रकार आहे!’’ म्हणून तिनं विचारलं.
तेव्हा देवेननं तिला सांगितलं- ‘‘अगं आम्ही मागच्या वर्षी बंगलोरला एकत्र होतो.’’
हे सगळं व्हॉटस्अॅप प्रोफाईलच्या दोघांच्या फोटोमुळं झालं. त्यावरून त्यानं तुला ओळखलं अन् मला विचारलं, ‘‘अरे मी इथं आडरानात अकडलोय. माझ्यासमोर एक स्त्री आहे. ती तुझ्या बायकोसारखी वाटते. ती जर तीच असेल, तर मी कार बोलावली आहे, तिला घेऊन येतो.’’
त्यावर मी तुझा एक फोटो त्याला पाठवला. कन्फर्मेशन झालं. पत्ता पाठवला अन् तू अशी अलगद घरी आलीस! सो सिंपल!
सो सिंपल? अरे फार भयंकर होतं सगळं, पण खरंच अशी माणसं जर असतील, ना तर समस्येलाच म्हणावं लागेल, ‘‘नॉट रिचेबल!’’
© सौ. शांभवी मंगेश जोशी
संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003
फोन नं. 9673268040, [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈