सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ परिवर्तन – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिले – कधी कधी त्याला वाटायचं, हे सगळे लोक मुंग्यांसारखे आहेत. त्यांना हातात घेऊन चुरगळून टाकावं. गाडीच्या चाकाखाली तुडवून टाकावं. आपल्या जंगली जिद्दीसाठी ते जशी मुलांना आपली शिकार बनवतात, तशी त्यांची शिकार करावी. आता इथून पुढे)
त्याच्या मनात आलं, या सार्यासाठी मग आजचाच दिवस का निवडू नये? आज जीवनातला आपला खास दिवस आहे. आज आपला वाढदिवस आहे. भयमुक्त होण्यासाठी, यापेक्षा दुसरा चांगला दिवस कोणता असेल? आज नाही केलं, तर पुन्हा कधी करायला जमेल?
अकस्मात मनात आलेल्या या विचारात त्याच्या मनाच्या एका कोपर्यात कुठे तरी दडून राहिलेला उन्माद सामील झाला. त्याच उन्मादाने रस्ता दाखवला. एका भाड्याने मिळणार्या गाडीच्या ऑफीसचा. त्याने अनेकदा कार, जीप भाड्याने घेतली होती. मग विचार केला, आज एक ट्रकच भाड्याने घेतला तर- नंतर विचार करू काय करायचं ते. जेवढ्या त्वरेने हा विचार त्याच्या मनात आला, तेवढ्या त्वरेने त्याने तो अमलातही आणला. नाही तर एखादा निर्णय घेण्यासाठी त्याला किती तरी दिवस, महीने, वर्षसुद्धा लागायचं.
डॉ. हंसा दीप
साशाने एक छोटा ट्रक भाड्याने घेतला आणि वेगाने ट्रक चालवू लागला. त्याच्या गतीपेक्षा त्याच्या डोक्यातील विचारांची गती किती तरी पटीने जास्त होती. आज तो तीस वर्षांचा झाला होता. पूर्णपणे लायक झाला होता. आज नाही, तर पुन्हा कधीच नाही. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायला, तो अगदी उतावीळ झाला होता. शांती आणि सौहार्द बाळगत तो इथपर्यंत पोचला होता. आता यापेक्षा तो जास्त प्रतीक्षा करू शकत नव्हता.
एक गोष्ट करणं शक्य होतं. गाडीचा वेग वाढवायचा. ती फुटपाथवर चढवायची. फुटपाथवर असलेल्या लोकांना चिरडत सुसाट वेगाने गाडी पुढे न्यायची. रस्त्याच्या शेवटी कडेला जे झाड आहे, त्याला गाडी टकरवायची. मग गाडीही वाचणार नाही आणि तोही. गाडीला नंतर आग लागली, आणि त्याची नावनिशाणीही मिटून गेली, तर सोन्याहून पिवळं. आणि अशा तर्हेने त्याच्या ‘मिशन सूड’ या मोहिमेचा यशस्वी अंत होईल. तो तृप्त होईल आणि समाधानाने मरेल.
पण का कुणास ठाऊक, गाडी त्याच्या घराच्या दिशेने वळली. कदाचित आपल्या घराचा निरोप घ्यावासा वाटला त्याला. धिम्या गतीने तो गाडी चालवत होता. त्याला लोकांना भासवायचं होतं की तो घर बदलतोय आणि सामान घेऊन जाण्यासाठी त्याने ट्रक आणलाय. तो मात्र घरच नव्हे, तर शहर, देशच काय जगही बदलायची इच्छा धरून आलाय. घराजवळ त्याच्या परिचयाचे अनेक चेहरे आपल्या कामावर जाताना त्याला दिसत होते.
“गुड मार्निंग, काय म्हणातोयस दोस्त?” जवळून निघलेला जेसन एका क्षणासाठी थांबला. तो कामावर जाताना रोजच सकाळी भेटायचा. जेसनच नव्हे, तर अनेक लोक याचवेळी कामावर निघण्यासाठी बाहेर पडत.
“गुड मार्निंग जेसन, सगळं ठीक आहे.” आपले हात हवेत पसरून त्याच्या अभिवादनाला उत्तर देत, साशाने स्मितहास्य केलं.
‘आज ट्रक घेऊन कामावर निघालायस?’
‘हं! एका दोस्ताचं सामान शिफ्ट करायचय. नंतर कामावर तर जायलाच हवं!’
‘ काम तर करायलाच हवं! ठीक आहे परत भेटू!’
जेसन तिथेच कुठे तरी रहायचा. तसेच आणखी काही लोक होते। येता-जाता दिसायचे. त्यापलीकडे कुणाशी तसा काही संबंध नव्हता. रोज याच वेळी भेटणार्यांना हाय-हॅलो करून तो पुढे निघाला. कुणालाही जराशीही कुणकुण नव्हती की आजचा दिवस त्याच्यासाठी किती खास दिवस आहे. मुक्तीचा दिवस. त्या विचारातून मुक्ती मिळवण्याचा दिवस, ज्या विचाराने आजपर्यंत त्याची पाठ सोडली नव्हती. त्या जखमेपासून मुक्ती, जिची वेदना त्याला रक्तबंबाळ करत त्याच्या काळजापर्यंत पोचली होती. शरीराचे घाव केव्हाच भरून आले होते, पण त्या जखमांनी मनावर घातलेले घाव अजूनही ताजेच होते. त्यामुळे आजपर्यंत तो कुणालाही आपलं मानू शकला नाही. प्रत्येक जण त्याला दहशतवादीच वाटायचा. मुखवटा घालून आलाय आपल्यापुढे, असं वाटायचं त्याला. मुखवटा काढला, तर आत हिंसक पशूच असणार आहे, जो त्याला पकडीत जखडणार आहे असं वाटायचं त्याला. तो धडपडेल. तडफडेल. मदतीसाठी इतरांना हाका मारेल, असे विचार त्याच्या मनात यायचे.
साशाचे पालन-पोषण करताना, त्याच्या दत्तक माता-पित्यांनी त्याला खूप काही शिकवलंही होतं. अनेकदा भूतकाळ त्याची पाठ सोडायचा, तेव्हा तो असा माणूस बनायचा, की प्रत्येकाला तो हवाहवासा वाटायचा. प्रत्येक जण त्याच्यावर प्रेम करू लागायचा. रुंद कपाळ, भुरे केस, छोटीशी फ्रेंच कट दाढी. मोठा आकर्षक दिसायचा तो. त्याचे नाव घेऊन मुली दीर्घ निश्वास टाकत. त्याची शालीनता बघून अनेक जणी त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत. पण कुणीच त्याच्या मनाच्या तळापर्यंत पोचली नाही. एक एक करत सगळ्यांनी आपले हत्यार टाकले. अपवाद फक्त लीसाचा.
लीसा अजूनही त्याच्या मागे आहे. तिचं शालेय शिक्षण त्याच्याबरोबरच झालय. अनेकदा ती त्याला भेटायला येते. त्याच्या घराच्या बाहेरही आणि कामाच्या बाहेरही. साशाने तिची उपेक्षा केली, बघून न बघितल्यासारखं केलं, तरी ती आपली सावलीसारखी त्याचा मागे असते. तिचा स्वत:चा परिवार आहे. ती कामदेखील करते. साशाला कधी कधी समजतच नाही की साशा तिच्यापासून दूर का रहातो?
साशाची इच्छा असूनही तो लीसाला समजावू शकला नाही, की ती त्याला आवडते, पण त्याच्या आत जी भीती आहे, तिला तो घाबरतोय. ती भीती त्याला अशा तर्हेने जखडून टाकते, की कुठल्याही व्यक्तीतला चांगुलपणा त्याच्या ल्क्षातच येत नाही. त्याला नेहमी तेच तेच आणि तेवढंच दिसतं. चांगल्या चेहर्यांच्या आतही त्याला कुठे ना कुठे तरी पशुता दृष्टीस पडते. मनापासून वाटूनही पापुद्र्यांखाली जमलेल्या भीतीपासून त्याला मुक्ती मिळत नाही. ओल्या मातीला जसा आकार दिला जाईल, त्याच आकारात ती वस्तू कायम रहाते, तुटल्या-फुटल्याशिवाय या वस्तूचं दुसरं काहीच होऊ शकत नाही तसंच. साशाचं बालमनदेखील त्या भीतीत असं घट्ट जखडलं गेलय, इतकं पक्कं झालय की बदलायला तिथे कुठे वावच उरला नाही.
लीसाकडेदेखील, तो त्या पद्धतीने बघू शकला नाही, ज्या पद्धतीने त्याने बघावं, असं लीसाला वाटत होतं. साशालादेखील तिच्या संगतीत खूप छान वाटायचं. तो तिच्या संगतीत वेळ घालवू इच्छ्त असे. पण काही क्षणातच ते विचार त्याच्या डोक्यात प्रहार करू लागत, आणि ते त्याला एकटं राहायला भाग पाडत. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर एक दिवस लीसा साशाला म्हणाली, ‘ मी तुला मुळीच आवडत नाही का? ‘
या प्रश्नासाठी तो तयार नव्हता. उत्तर लगेच द्यायला हवं होतं. त्यामुळे गोष्ट घुमवून फिरवून तो बोलू शकला नाही. तो म्हणाला, ‘तू मला खूप आवडतेस.’
‘खरंच!’ लीसाचे डोळे चमकले. साशाच्या डोळ्यात खोलवर काहीतरी शोधताना तिचा चेहरा प्रफुल्लित झाला. तिच्या आंगोपांगातून खुषी झळकू लागली. असं उत्तर येणं तिच्यासाठी खूप रोमॅंटिक होतं आणि खूप रोमांचकही.
‘ हो. अगदी खरं!’ तो स्वत:ला थोपवू शकला नाही. एका तरुण हास्यासह तो तिच्याकडे एकटक बघत राहिला.
‘मग माझ्यापासून दूर का रहातोस?’
‘कारण मी अजून तरी कुठलंही नातं जोडायला तयार नाही.‘
‘ काही हरकत नाही. मी समजू शकते. तुला हवा तेवढा वेळ तू घे. मला तुझी सदैव प्रतीक्षा राहील.’
लीसा आसपासच कुठे तरी राहायची आणि साशाची येण्या-जाण्याची वेळ बघून त्याला भेटण्याचा प्रयत्न करत करायची. साशादेखील सामान्य दिसण्याचा, रहाण्याचा प्रयत्न करत रहायचा. आपल्या आत कोणतं युद्ध चालू आहे, याची त्याने कुणालाही जराही जाणीव होऊ दिली नव्हती.
जेव्हा भूतकाळच्या आक्रमणापासून तो दूर असायचा, तेव्हा तो सगळ्यांना खूप मदत करायचा. सगळ्यांच्या मनात त्याने आपल्यासाठी खास जागा निर्माण केली होती. गरजावंतांसाठी जे जे करणं शक्य असेल, ते ते तो करत होता. आज मात्र तो जसा विचार करत होता, तसा त्याने यापूर्वी कधीच केला नव्हता. आज त्याच्यात इतकी आकड आली होती, की स्वत:ला सशक्त दाखवण्यासाठी, आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी तो निघाला होता. टोरॅंटो शहराच्या नार्थ यॉर्क एरियात, फिंच अॅव्हेन्यूपासून पुढे जात यंग स्ट्रीट आणि शेपर्ड अॅव्हेन्यूच्या चौकाजवळ त्याला पोचायचं होतं. आपलं काम पूर्ण करण्यासाठी. त्या प्रत्येक घटनेबद्दलचा न्याय मिळवण्यासाठी, काही खास लोकांचे चेहरे काजव्याप्रमाणे चमकत होते आणि अदृश्य होत होते. त्याच्यावर दया दाखवणार्यांचेही चेहरे त्यात सामील होते.
‘बिच्चारा..’
‘राक्षसाच्या घरात जन्माला आलाय हा निष्पाप मुलगा…’
‘मार खाऊन खाऊन दिवस काढतोय.‘
‘सारखा भेदरलेला असतो. ‘
लोक दहा तोंडांनी बोलत. जेवढी तोंडे, तेवढे बोल. सगळ्यांची तोंडे तो आता बंद करेल.
गाडी पुढे… पुढे… पुढे चालली होती. लाल दिवा, हिरवा दिवा, याच्याबरोबर त्याच्या छातीची धडधड वाढत होती… कमी होत होती. दुपारची वेळ होती. रहदारी जास्त नव्हती. एकदा तिथे पोचलं, की गाडी कुठून कशी वर चढवायची, याचा तो विचार करणार होता. आपल्या हातातलं स्टियरिंग व्हील त्याने आशा तर्हेने धरून ठेवलं होतं, जशी काही कुणाची तरी मानगुटच त्याने धरून ठेवलीय. त्याला जुनी आठवण झाली. मागे एकदा त्याच्या वडलांनी त्याची अशीच मानगुट धरून ठेवली होती. ती कशी बशी सोडवून घेऊन तो आपल्या खोलीत आला होता. खोलीचा दरवाजा बंद करून तो दिवसभर आत उपाशी तापाशी तसाच बसून राहिला होता. अशीच एकदा त्याच्या आवडत्या सायकलीची मोडतोड करण्यात आली होती. सायकलीच्या प्रत्येक भागाचे तुकडे तुकडे होत असलेले बघताना त्याला वाटत राहिलं, आपल्या शरिराचेच बोटा बोटाएवढे तुकडे होऊन फेकले जाताहेत. सायकलचा प्रत्येक भाग तोडताना होणारा आवाज त्याला आपल्याच ओरडण्यासारखा वाटला, मदतीसाठी जणू तो कुणाला तरी हाका मारत होता.
त्या दिवसापासून त्याने आजपर्यंत कधी सायकल चालवली नाही. कुणावर मनापासून प्रेम केलं नाही. ना माणसावर ना एखाद्या वस्तूवर.
क्रमश: भाग २
मूळ हिंदी कथा 👉 ‘शत प्रतिशत’– मूळ लेखक – डॉ हंसा दीप
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈