श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ मानिनी…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन बेंगलुरूला जाण्यासाठी दोन तास आधीच आम्ही इंदोरच्या एयरपोर्टवर येऊन पोहोचलो. वाचण्यासाठी म्हणून बॅगेतून पुस्तक काढत होतो, तितक्यात पंचेचाळीसच्या आसपास असलेली एक तरुणी माझ्यासमोर येऊन उभी ठाकली आणि आनंदाश्चर्याने म्हणाली, “सर, तुम्ही? इकडे कसे? ओळखलंत का मला?……” प्रश्नामागून प्रश्न टाकत होती. मी भांबावल्यासारखं पाहत होतो. तिनेच सांगितले, “सर, मी मृण्मयी. मेडिकलसाठी तुम्हीच तर मला…”
मृण्मयी हे आगळं वेगळं नाव ऐकताक्षणी माझी ट्यूब पेटली. माझ्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू पाहताच ती आम्हा उभयतांना नमस्कार करण्यासाठी वाकली. तेवढ्यात एक तरूण मुलांच्यासोबत आला. मग तिने ओळख करून दिली, “सर, हे माझे पति डॉक्टर राम, कॉर्डियालॉजिस्ट आणि ही आमची मुलं.” असं म्हणतच तिने त्यांना नमस्कार करायची खूण केली. मी त्यांना मध्येच थांबवलं.
त्यानंतर तिने गायनाकॉलिजस्टमधे एमडी कसं केलं, राम तिला कसा भेटला आणि आंबेगावला त्यांचं क्लिनिक कसं सुरू केलं याविषयी ती भरभरून बोलत होती. माझ्याशी संपर्क करण्यासाठी तिने काय काय प्रयत्न केले हे ती सांगत होती.
मी तिला मध्येच थांबवून ‘राधाक्का कुठं असते’ असं विचारलं. “सर, आई माझ्याकडेच राहत होती. गेल्यावर्षी ती कोविडमध्ये गेली आणि मी खऱ्या अर्थाने निराधार झाले. मी डॉक्टर असले म्हणून काय झालं? मी खूप प्रयत्न केले. अखेर नियतीपुढे हात टेकावे लागले.”
मी विषय बदलत इंदोरला येण्याचं कारण विचारलं. डॉ. रामच्या कुणा नातेवाईकाच्या घरी लग्न असल्याने ते दोन दिवसासाठी आले होते. पुण्याच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट होताच तिनं तिचं व्हिजीटींग कार्ड दिलं आणि ‘पुण्यात आलात तर अवश्य या’ म्हणून पुन्हा पुन्हा आवर्जून सांगत होती.
ती पाठमोरी होताच…. माझ्या डोळ्यांसमोर पंचवीस वर्षापूर्वीचा तो स्मृतीपट अलगद उलगडला गेला…..
संध्याकाळचे सात वाजले होते. जवळजवळ सगळा स्टाफ निघून गेला होता. केबिनवर टकटक करून विसूभाऊ लगबगीने आत आले. त्यांच्यासोबत एक चुणचुणीत मुलगीही होती. त्यांच्या हातात लहानसा पेढ्यांचा बॉक्स होता. “सायेब, ही माझी ल्योक हाय. मृण्मयी. दहावी परीक्षेत पास झालीय. तुम्हास्नी पेढे द्यायला आल्तो.”
एक पेढा घेऊन मी त्यांना बसायला सांगून फाईली आवरत होतो. तितक्यात तिने तिची मार्कशीट दाखवली. तिला चक्क ९६% मार्क होते. गणित आणि सायन्समध्ये पैकीच्या पैकी. मी उत्स्फूर्तपणे म्हणालो, “व्वा, खूप छान. अभिनंदन बेटा तुझं. विसूभाऊ, कन्येला खूप चांगले मार्क मिळाले आहेत. विसूभाऊंचे डोळे आनंदाने भरून आले.
मी पटकन पुढचा प्रश्न टाकला,
“अहो, लेकीचं असं एवढी अवघड नाव कसं ठेवलंत?” त्यावर विसूभाऊंची कळी खुलली “त्याचं असं हायं सायेब, आमच्या लग्नाला आठ वरस झाली व्हती. घरात पाळणा हलत नव्हता. मग म्या प्रभू रामचंद्रालाच साकडं घातलं. मुलगा झाला तर रामचंद्र नाव ठेवीन म्हनून. पन रामानं आमच्या पोटी ही ल्येक पाठवली. मंग म्या म्हनलं, राम न्हाई तर न्हाई. लेकीचं नाव सीता ठिवतो. पन हिची आई सीता नावाला कबूल हुईना. का म्हनलं तर तिच्या नशीबी वनवासच यिल म्हून. मग म्या तुमच्यासारख्या एका शिकलेल्या माणसाकडनं सीतेची आनिक कंची नावं हायेत म्हनून इच्यारून घेतलं. त्येनी हे एक नाव सांगितलं. मातीत सापडली म्हनून मृण्मयी. माझ्यावानीच हिची आईबी अडाणी. गुमान बसली.
बरं ते असू द्या सायेब. ही पोरगी सायन्सला जायचं म्हनतीय अन हिची आई पुढं शिकवायलाचं नगं म्हनतीय तवा काय करायचं ते तुम्हास्नी इच्यारायला आल्तो.”
मी तिला सायन्स शाखेत प्रवेश घ्यायला सांगितलं. मृण्मयीचे विलक्षण बोलके डोळे आनंदाने चमकले.
“बराय सायेब, म्या तुमच्या शब्दाभायेर न्हाई” असं म्हणत विसूभाऊ निघून गेले.
विसूभाऊंची आमच्या शाखेच्या जवळच एक चहाची टपरी होती. विसूभाऊ आणि राधाक्का सकाळी नवालाच येऊन स्टोव्ह पेटवून चहाला आधण ठेवायचे. दिवसभर वाफाळत्या चहाचे किती तरी कप भरले जायचे, ते कळायचंच नाही. त्या भागात आलेले लोक हमखास विसूभाऊंच्या चहाचा आस्वाद घेऊनच पुढे जायचे. सगळंच टापटीप आणि स्वच्छ. विसूभाऊ एकदम शिस्तीचा आणि निर्व्यसनी माणूस.
जवळच्याच कॉलनीत एक रिसेल फ्लॅट विकत घेताना त्यांना मी बॅंकेकडून एक लाखाचं कर्ज मंजूर केलं होतं. त्यावेळी वारसदारांची नावं घेताना त्यांना एक मुलगी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कोळशाच्या खाणीत रत्न लाभावं तसं विसूभाऊंना कन्यारत्न लाभलं होतं. धावक जसं लांब लांब ढांगा टाकत पळतो तसं विसूभाऊ दर महिन्याला एकाचवेळी दोन किंवा तीन हप्ते धडाधड भरत होते. आणि एके दिवशी विसूभाऊ कार्डियाक अरेस्टने झोपेतच गेले.
जगरहाटी थांबत नाही. राधाक्का एका मुलाला मदतीला घेऊन त्याच जोमात चहाची टपरी चालवत होत्या आणि त्याच धडाक्यात कर्जाचे हप्ते भरत होत्या.
संध्याकाळचे सहा वाजत होते. “साहेब, राधाक्का त्यांच्या मुलीसोबत तुम्हाला भेटायचं म्हणत होत्या. केव्हा यायला सांगू?” शिपायानं येऊन विचारलं.
“सात वाजता यायला सांग. आणि एक काम कर. एक पुष्पगुच्छ आणि पाव किलो पेढ्याचा बॉक्स घेऊन ये.” असं सांगून त्याच्या हातात पैसे दिले. बारावी सायन्सला मृण्मयीचं नाव मेरिट लिस्टमध्ये आल्याचं मला सकाळीच कळलं होतं.
त्या दोघी सात वाजता केबिनमध्ये आल्या. मेरिटमध्ये पास झालेल्या मृण्मयीचा चेहरा कोमेजून गेला होता. तिचे चमकदार बोलके डोळे विझल्यासारखे वाटत होते.
“सायेब, या मुलीच्या डोक्यात डाकटर व्हायाचं खूळ भरलंय. मी कितीबी राबले तरी डाकटरकीचा खर्च माझ्याच्यानं झेपणार हाये का? म्या तर दहावीलाच बास कर म्हनले हुते. हिच्या बापानं पुढं शिकायला पाठवली. म्या म्हनलं त्यो खर्च आपल्यास्नी झेपायचा नाही. ते बीएस्शी का काय म्हणत्यात ते कर. दिवसभर हिथं कॅंटिन चालवून तुला शिकवीन म्हनलं. हात पिवळे करून कुन्या रामचंद्राच्या हातात सोपवून धुमधडाक्यात तुझं लग्न करून दिईन म्हनलं. पन न्हाई. दिसभर बापाची आठवन काढत रडत बसलीया. तुम्हीच सांगा हिला काईतरी.”
– क्रमशः भाग पहिला
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈