श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ त्या दोघी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
जीवांरंग
त्या दोघी… भाग २ लेखक – प्रदिप केळूसकर –
( मागील भागात आपण पाहिले – – ‘‘पण मी कोल्हापूरातली नाही ना? मी मुंबईतल्या अभय कानविंदेंची मुलगी आहे. माझा बाबा बघा कसा फॉरवर्ड विचाराचा आहे. नाहीतर तुम्ही ….’’ असं म्हणून तेजश्रीने फोन ठेवला. सुलभाने तेजश्रीला पुन्हा फोन लावायचा प्रयत्न केला पण तिने फोन उचललाच नाही. आता इथून पुढे )
आज काही काम नव्हतं म्हणून सुलभा घरातच थांबली. तिने चादरी, बेडशीटस् धुवायला काढल्या. दहा वाजायला आले. दारावरची बेल वाजली म्हणून दार उघडलं तर बाहेर स्मिता.
‘‘अगं स्मितू ! फोन न करता आलीस ? नशिब मी आज घरी होते. ये आत.’’
‘‘होय फोन करायचं पण विसरले. हल्ली विसरायला होतं गं. वय झालं का आपलं?’’
‘अगं वय कसलं, अजून पन्नाशी नाही आली.’’
‘‘मग अस का होत? काल भाजी घ्यायला विसरले, अभयचे कपडे इस्त्रीला द्यायचे विसरले. त्यावरुन सकाळी सकाळी अभय चिडला. घरची कामे जमत नसतील तर नोकरी सोड म्हणाला.’
‘‘आणि काय करु म्हणाव? टाळ घेऊन भजन करावं का ? स्मितू तू फार साधी मुलगी गं. त्याचा फायदा घेतो हा अभय आणि त्याचे पाहून तेजू. जगात एवढं साध राहून चालत नाही बाई. माती मऊ दिसली की जो तो खणू पाहतो. आता तुझा अभय . नोकरी सोडून दे म्हणाला, आपण नोकरी आधीच सोडली. मग घर खर्च कसा करणार ? मोठा सावकार लागून गेला तो. बेफिकीर माणूस. स्मितू तुला वाईट वाटेल म्हणून जास्त बोलत नाही, नाहीतर….’’
‘‘बोलून काही उपयोग आहे का सुलु? ’’
‘‘आज बँकेत नाही गेलीस’ ?’’
माझं कशात लक्ष लागत नाही गं…तेजूशी बोललीस काय ?’’
‘‘बोलले बाई, ती मला काय सरळ उत्तर देते? त्याच्याशी रिलेशन मध्ये राहणार म्हणे. मग वाटलं तर लग्न करीन म्हणते. मी तुमच्यासारखी मुळमुळीत नाही म्हणाली. अभय कानविंदेसारख्या स्मार्ट बापाची मुलगी आहे म्हणे.’
हे असं रिलेशन वगैरे आपण याचा विचार तरी केलेला का गं सुलु ?’’
‘‘आपण जुन्या संस्कारातल्या मुली गं…. आपले नवरे राम आणि आम्ही सिता. पण आपणच सितेची भूमिका निभावतो म्हणून अभय सारख्यांच फावतं.
‘जाऊ दे सुलु ! मला कंटाळा आला आहे तोच तोच विषय बोलून. मी आज मुद्दाम आले होते. माझ्या इन्शुरन्स पॉलिसीज किती रकमेच्या आहेत ते पहायला.
आज काय अचानक ? तरी पण तू म्हणते आहेस तर पाहू. सुलभाने कॉम्प्युटर उघडला आणि स्मिताच्या सर्व पॉलिसीज, हप्ते चेक केले.
‘‘एकंदर एक कोटी पंचेचाळीस लाखाच्या पॉलिसीज आहेत ग स्मितू.’’
‘‘आणि नॉमिनीज वगैरे, केवायसी ?’’
‘‘नॉमिनीज बहुतेक अभय कानविंदे, काहीवर तेजश्री कानविंदे. केवायसी अपटूडेट केलेल्या आहेत.’’
‘आणि मॅच्युअल फंड?’
‘‘तीन फंड हाऊस मध्ये तुझी एसआयपी सुरु आहे. त्याची आजची किंमत अंदाजे सोळा लाख आहे.’’
‘आणि शेअर्स ?’
‘‘तुझ्या शेअर्सची आजची किंमत सहा लाख पन्नास हजार आहे. पण हे सर्व आजच का पाहते आहेस तू स्मितू ?’’
‘‘तसं नाही गं. नवरा म्हणतो ना नोकरी सोड म्हणून समजा नोकरी सोडली तर किती रक्कम मिळेल याचा अंदाज घेत होते.’’
पण तुझ्या या इन्शुरन्स पॉलिसीज चालू आहेत बरं का ? एवढ्यात त्याचे पैसे मिळणार नाहीत किंवा एकदम कमी मिळतील. हा तुझ्या पश्चात वारसांना आत्तासुधा मिळतील.’’
‘‘झालं तुझे इन्शुरन्स फंड वगैरे? किती दिवसात तुझ्या केसांना तेल घातलं नाही. सुलभाने स्मिताला पुढे बसवलं आणि ती तिच्या केसांना मालीश करु लागली.’’
‘‘सुलू केव्हा केव्हा मला वाटतं आपण लग्न केलेल्या मुली फक्त आपला नवरा, मुलं यांचीच काळजी घेतो. पण आपली माहेरची माणसं आई, बाबा, भाऊ, वहिनी, भाचरं यांचा पण विचार करायला हवां. आपली आई नऊ महिने पोटात वाढविते. आई-बाबा किती प्रेमाने संगोपन करतात. भाऊ प्रेम देतो, संरक्षण देतो, पण आपण जेव्हा अर्थार्जन करतो तेव्हा आपला संसार पाहतो. माहेरच्या मंडळींना गरज असेल तर आपण त्यांना मदत करायला नको ?’
‘‘करायला हवीच बाई ! तू आता ही नोकरी करतेस, तू पण तुझ्या भावाचा श्यामूचा काहीतरी विचार कर. ’’
तेल घालून केस विंचरल्यावर सुलभाने गरम पाणी काढले आणि स्मिताला आंघोळ करायला सांगितली. आंघोळ झाल्यावर दोघी जेवायला बसल्या. सुलभाने तिच्याशी कोल्हापूरातील मैत्रिणींच्या आठवणी जागवल्या. दामले सरांची नक्कल केली. पाटील बाईंचे विनोद सांगितले. स्मिता पण हसली. दोघींनीही झटपट ओटा, भांडी आवरली आणि बेडरुममध्ये आल्या. सुलभा म्हणाली, स्मितू थोडी झोप आता. पूर्वी कोल्हापूरात असताना मी तुला थोपटायचे ना ? तशी आज थोपटते आणि सुलभा हळू आवाजात गाणं म्हणू लागली आणि स्मिताला झोप लागली. सुलभा पण झोपली. तासा दिडतासाने स्मिताला जाग आली.
‘‘सुले किती दिवसात अशी गाढ झोपले नव्हते गं !’’
‘‘मी थोपटलं ना स्मितू राणीला म्हणून गाढ झोप बरं का ’’
‘‘होय बाई सुले, तू म्हणजे माझी आईच आहेस. चल निघते आता.’’
‘‘जा ग सावकाशीनं दुपारची वालाची उसळ आहे ती देऊ का डब्यातून ?’’
‘‘दे, तेजुला फार आवडते वालाची उसळ.’’ सुलभा स्वयंपाक घरात डबा भरायला गेली तो पर्यंत स्मिताने फोनवर कुणाचे फोन, मेसेज आलेत का हे पाहू लागली. फोनवरचे मेसेज वाचता वाचता एकदम रडू लागली.
‘‘काय हे ? आता काय करायचं मी ?’’
सुलभा बाहेर आली तर स्मिता रडते आहे.
‘‘अग काय झालं?’’
‘‘वाच हा तेजूचा मेसेज’’ स्मिताने रडत रडत मोबाईल सुलभाला दाखवला. सुलभाने मेसेज वाचला, तेजश्रीने लिहिलं होतं –
‘‘मी आज रात्री घरी येत नाही, जहाँगिर बरोबर बाहेर जात आहे. ’’
‘‘आता काय करायचं गं सुले? हे आपले संस्कार का ? मला नाही सहन होत आता.’’
‘‘आता काय करणार बाई, मनाची तयारी करायला हवी. काळच तसा आलाय.’
सिनेमातल्या आणि मालिकेतल्या नट्या काय काय करतात ते या मुली पाहतात. ते आदर्श त्यांचे. तू शांत हो पाहू.’
कितीतरी वेळ स्मिता रडत राहिली आणि सुलभा तिला थोपटत राहिली. संध्याकाळ होत आली तशी स्मिता उठली, तिनं तोंड धुतलं आणि ‘‘येते गं सुले’’ असं म्हणत तिने पायात चप्पल घातले.’’ सांभाळून गं स्मिते, मी येऊ का घरापर्यंत?’’
‘‘नको बाई, किती दिवस माझ्यासाठी रडणार तू. शेवटी मलाच तोंड द्यायला हवे. येते. अस म्हणत स्मिता बाहेर पडली . सुलभा गॅलरीत उभी राहिली. लांब पर्यंत चालणारी स्मिता तिला दिसत राहिली. मग हळू हळू गर्दीत गडप झाली.
विषण्ण मनाने सुलभा घरात आली. तिचे मन काळजीने आणि दुखःने भरुन गेले होते. तिला स्मितूची काळजी वाटत होती. आपल्या एकुलत्या एक मुलीने आपल्या पेक्षा दहा वर्षांनी मोठ्या पुरुषाबरोबर रात्रौ बाहेर जाणे आणि तसा मेसेज आईला करणे ह किती दुखःचे आणि त्रासाचे. सुलभाच्या मनात आलं. काळ किती बदललाय कोल्हापूरला असताना आम्ही वर्गातल्या मुली, शेजारच्या मुलांबरोबर बोलायचोसुद्धा नाही. आता गळ्यात गळे घालून सगळीकडे मुल-मुली फिरतात. काळ बदललाय.
तिने कन्येला विनयाला फोन केला. तिला आत्ता स्मितू मावशी येऊन गेल्याचे सांगितले. हॉलमध्ये येऊन तिने टिव्ही लावला आणि कार्यक्रम पाहत राहीली. टिव्ही पाहता पाहता तिचे डोळे मिटू लागले. हॉलमध्ये कोचवर कधी ती झोपली हे तिलाच कळले नाही. दरवाजाच्या बेल वाजत राहिली त्याने तिला जाग आली. तिने घड्यात पाहिले साडेसात वाजत होते. यावेळेस कोण आले ? असे पुटपुटत तिने टिव्ही बंद केला आणि दरवाजा उघडला. बाहेर राजन होता.
‘‘अरे, आज एवढ्या लवकर ? मेनन सध्या तुमच्यावर खूष दिसतो.’’ ती हसत हसत म्हणाली. ‘‘नाही, नाही मी मुद्दाम आलो. स्मिताचा अॅक्सिडेंट झालाय गोरेगांवला, एसव्ही रोडवर. ’’
‘‘काय !’’ सुलभा किंचाळली.
‘‘आत्ता ती पाच वाजता येथून घरी गेली.’’
‘‘इथे आली होती काय ? तिच्या भावाचा कोल्हापूरहून मला फोन आला. रस्ता क्रास करताना, म्हणजे हिचीच चूक सिग्नल नसताना ही क्रॉस करत होती म्हणे, टॅक्सीने उडवले’’
‘‘पण आता कसं आहे ?’’ सुलभा किंचाळत बोलली.
राजन चाचरत चाचरत तिची नजर चुकवत म्हणाला,
‘‘श्यामू म्हणाला बरं आहे म्हणून, पण डोक्याला मार लागलाय. अॅडमिट केलंय, आपण निघायला हवं.’’ सुलभा रडायलाच लागली. राजनने तिचा ड्रेस आणून दिला.
‘‘चल चल घाल हा ड्रेस, मी उबर मागवतो.’’
सुलभाने रडत रडत ड्रेस बदलला आणि खाली उभ्या असलेल्या उबर मध्ये दोघे बसले. संध्याकाळच्या सुमारास मुंबईतील रस्त्यावर गर्दी त्यामुळे उबर हळूहळू चालत होती. शेवटी रात्रौ नऊ वाजण्याच्या सुमारास उबर भगवती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये गर्दी. राजनने सुलभाच्या हाताला धरुन तिला अॅक्सिडेंट विभागाकडे नेले. राजन व सुलभा आत जाताच त्याठिकाणी आधीपासून आलेली स्मिताची बँकेतील मंडळी तसेच बिल्डींगमधील मंडळी पुढे आली. स्मिताची बँकेतील जवळची मैत्रिण कल्पना रडत रडत पुढे आली. सुलभाच्या गळ्यात पडून – ‘‘गेली ग स्मिता आपली !’’ म्हणून आक्रोश करु लागली. तिच्या सोबतीच्या अनेक स्त्रियांनी पण हुंदके देत रडायला सुरुवात केली. राजनला स्मिताच्या निधनाची कल्पना होतीच तरी तो भांबावून गेला. आता स्मिताला कसे सांभाळावे याचा तो विचार करत होता पण सुलभा शांत होती. कदाचित ती बधीर झाली असावी. हा आक्रोश तिच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता. कुणीतरी स्मिताचा मृतदेह बाजूच्या पोलीसांच्या खोलीत असल्याचे राजनला सांगितले. राजन सुलभाच्या हाताला धरून त्या खोलीत गेला. संपूर्ण झाकलेला तो देह आणि बाजूला बसलेले अभय, तेजश्रीला पाहून सुलभा ‘‘स्मिते’’ म्हणून जोरात किंचाळली आणि बेशुध्द झाली.
क्रमश: – २
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈