श्री अरविंद लिमये
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘आयुष्याचं गणित’ (कवितासंग्रह) – डाॅ. मिलिंद विनोद ☆ परिचय – श्री अरविंद लिमये ☆
कवी : डॉ. मिलिंद विनोद.
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, बोरिवली.
अर्थवित्त क्षेत्रासारख्या रुक्ष कार्यक्षेत्रात प्रदीर्घ काळ वाटचाल करतानाही जगण्याकडे पहाण्याची सजगदृष्टी अतिशय जाणीवपूर्वक जपणाऱ्या डाॅ .मिलिंद विनोद यांचा ‘आयुष्याचं गणित ‘ हा विविध बाजाच्या, शैलीतल्या,
कधी मिष्किल तर कधी उपरोधिक भाष्य करत अंतर्मुख करणाऱ्या कवितांचा संग्रह.
डाॅ. विनोद यांची कविता आजवर ‘कविता’ या साहित्यप्रकाराला अपेक्षित असणाऱ्या मापदंडांच्या बंधनात अडकून न पडता मोकळेपणाने व्यक्त होऊ पहाणारी कविता आहे. प्रत्येकीचा आशय, विषय, रुप, शैली सगळं वेगळं तरीही तिचं स्वरूप मात्र हे वैशिष्ट्य ल्यालेलंच.
आयुष्यात सहज जाताजाताही खुपणाऱ्या बोचणाऱ्या विसंगती कवितांच्या रूपात व्यक्त करतानाही मिष्किलता जपणाऱ्या, तरीही ती बोच बोथट होऊ न देणाऱ्या यातील कविता मनात रेंगाळत रहाणाऱ्या आहेत.
खुमासदार, गंमतीशीर, विषय-आशयाचे थेट अधोरेखन न करणाऱ्या, चटकन् अर्थबोधही न होणाऱ्या शीर्षकांमागचं रहस्य जाणून घेण्यासाठी ती कविता वाचायला रसिकांना उद्युक्त करते, हे या काव्यसंग्रहाचं मला प्रथमदर्शनी जाणवलेलं खास वैशिष्ट्य ! ‘ मापट्याच्या अल्याड मापट्याच्या पल्याड ‘, ‘ बत्ती गुल’, ‘शेखचिल्ली’,’आर आर आर चा पाढा ‘, ‘रम आणि राम’ ही अशा खुमासदार शीर्षकांची कांही प्रातिनिधिक उदाहरणे !
या संग्रहात मराठी आणि हिंदी अशा दोन विभागात एकूण सत्तर+ कविता आहेत. काही अल्पाक्षरी तर काही दीर्घ.
प्रारंभ होतो ‘हेरंब’ आणि ‘गणराया’ या गणेश-वंदनेच्या रूपातल्या श्री गणेशाला अर्पण केलेल्या दोन काव्यरूपी भावफुलांनी !
त्यानंतरचा एखाददुसरा अपवाद वगळता बाकी कविता मात्रांच्या हिशोबात स्वतःची ओढाताण करुन न घेणाऱ्या, तरीही आपली अंगभूत लय अलगदपणे जपणाऱ्या आहेत. अत्यावश्यक तिथेच आणि तेवढेच इंग्रजाळलेले शब्द पण तेही कवितेला आवश्यक म्हणून आलेले आणि तिला वेगळंच रुप बहाल करुन जाणारे. इतर सर्वच कविता न् शायरींमधे अनुक्रमे मराठी आणि हिंदी/उर्दू भाषांवरील प्रभुत्त्व खास जाणवणारे ! प्रदीर्घकाळ परदेशात व्यतीत करूनही त्या वातावरणाचा कणभरही परिणाम होऊ न देता मराठी भाषेवरील प्रभुत्व अबाधित राखणं आवर्जून कौतुक करावं असंच आहे. याचं प्रत्यंतर सुरुवातीच्याच ‘ मापट्याच्या अल्याड मापट्याच्या पल्याड’ ही कविता देते. मीठमोहरीचं पंचपाळं, मोहरीसारखं तडतडणं,नवऱ्याला कणकेसारखं तिंबणं, पोळीला सुटणारा छानसा पापुद्रा यासारख्या या कवितेला अभिप्रेत असणारं मराठमोळं वातावरण जपणाऱ्या प्रतिमा, तसेच चपखल म्हणी आणि वाक्प्रचार यांचा या कवितेतील वापर हे सगळं आवर्जून दखल घ्यावी असंच.
यात रेखाटलेले सासूसुनेचे नाते आणि त्या नात्यातले संबंध न् संघर्ष, ही कविता टोकदार होऊ देत नाही तर ती त्यातील सामंजस्य जपू पहाते हे तिचे वेगळेपण !
‘माझ्या पोटच्या गोळ्याला कणकेसारखा तिंबून, पोळीला छानशा सुटलेल्या पापुद्रयाप्रमाणे
अलगद वेगळीही झालीस ‘ असं म्हणणाऱ्या सासूला ‘मायेच्या उबेत सतत जपलंत त्याला, आता सळो की पळो करून सोडलंय त्यानं मला’ असं म्हणत नवऱ्याच्या वागण्याचा दोष सासूलाच देणारी सून. या दोघींचे पुढचे सगळेच खरपूस संवाद मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. ‘ मापट्याच्या पलीकडची तू सुपातली अन् मापट्याच्या अलीकडची मी– जात्यातली. भरडणं चुकलं नाहीये ते दोघींच्या कपाळी..’ हे सासूचे शब्द सुनेला स्त्री म्हणून समजून घेताना तिला स्त्री जन्माच्या वास्तवाची वेळीच ओळख करून देतात. दोघींनीही नेहमीच फणा न काढता मायेचा गोफही विणावा हे सांगणारी ही कविता आशयाला वेगळेच परिमाण देते.
यानंतर लगेचच येणारी ‘कार्टं ऑफ हॅविंग टू आर्ट ऑफ लव्हिंग ‘ ही कविता परस्परभिन्न जातकुळीतली.
‘आमच्या वेळी सर्रास होते मराठी माध्यम, कळलेच नाही केव्हा झाले त्याचे मराठी मिडियम ‘ अशी विषयाची थेट सुरुवात असणारी ही कविता.ती त्या विषयास आवश्यक अशा इ़ंग्राजळेल्या मराठी भाषेतली प्रदीर्घ कविता आहे.ही एकच कविताही कवीच्या अनुभवविश्वाच्या विस्तृत परिघाचा प्रत्यय देण्यास पुरेशी ठरावी.
बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत आणि एकंदरीत जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे होत गेलेली सर्वदूर पडझड ‘जनरेशन नेक्स्ट’, ‘आजचा सुविचार-मिली भगत’, ‘बत्तीगुल’ अशा अनेक कवितांमधून दृश्यरुप होते.
निसर्ग उद्ध्वस्त करीत विकासाची स्वप्ने पहाणाऱ्या माणसामुळे अस्वस्थ झालेल्या प्राण्यांच्या मनातली घुसमट त्यांना असह्य होते तेव्हा ते प्राणी माणसाला कसा धडा शिकवतात याचे प्रत्यंतर देणाऱ्या भयप्रद स्वप्नातून जाग येताच माणूस खऱ्या अर्थाने कसा जागा होतो याचे अस्वस्थ कल्पनाचित्र रेखाटणारी ‘आर आर आर चा पाढा ‘ ही कविता या शीर्षकाचा अर्थ समजून घ्यायला मुळातूनच वाचायला हवी.
‘अक्कलखाते’ मधील माणसांचे विविध नमुनेही आवर्जून पहाण्यासारखे आहेत. ‘प्रिप्रे ते प्रप्र तत पप ते तप्त- प्रवास तीन तपांचा’ ही गंमतीशीर लांबलचक आणि चटकन् अर्थबोध न होणाऱ्या शीर्षकाची मिष्किल,विनोदी शैलीतली कविता म्हणजे तीन तपातील प्रचंड बदल आणि पडझडी पचवलेल्या प्रदीर्घ प्रवासातील विविध स्क्रिनशाॅटस् म्हणता येतील.वाचताना हसवणारे न् हसवता हसवता नकळत फसवत वाचकांना स्वत:चं जगणंही एकदा तपासून पहायला प्रवृत्त करणारे! यातील ‘तोंडसुख’ या शब्दातील श्लेषार्थ, तसेच इतरही अनेक शब्दांत लपलेल्या विविध छटांचा वेध हे सगळं वेगळ्या, अनोख्या शैलीने अधिकच सजलेलं!
‘पॉलिटिशिअन स्पीक्स् ‘ मधे माणसाची होत गेलेली अधोगती ‘स्फटिकासारखा स्वच्छ होता पांढरा माझा पैसा, कळलंच नाही कधी झाला काळा त्याचा कोळसा ‘ अशा थेट वास्तवाला भिडणाऱ्या कथनाद्वारे ठळकपणे अधोरेखित होते.
‘मिस्टर पर्सेंटेज’ ही कविता व्यवस्थेला लागलेली कीड रोखठोकपणे चव्हाट्यावर आणते.यातील भ्रष्टाचाराला लावलेली ‘एजन्सी हँडलिंग चार्जेस’ , ‘फास्टट्रॅक प्रोसेसिंग फीज ‘, यासारखी नवीन शिष्टसंमत लेबल्स त्या किडीचं पोखरणं किती सर्रास सराईतपणे सुरु आहे हे सांगण्यास पुरेशी आहेत.
आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो ‘ सल ‘या कवितेचा! या संग्रहातील स्वतःच्या वेगळेपणामुळे उठून दिसणारी ही कविता मला विशेष भावली.
समुद्रकिनारा, लाटा, पायाखालची सरकणारी.. पावलाना गुदगुल्या करणारी वाळू, विशाल विस्तीर्ण क्षितिज, अशा प्रतिमांच्या विविध रंगांच्या शिडकाव्यांनी धुंद होत गेलेल्या वातावरणाचाच एक भाग बनून गेलेली ‘ती’ आणि ‘तो’ यांच्या मनासारख्या कधीच न फुललेल्या नात्याची ‘सल’ ही अनोखी कविता! एखादी रूपक कथा अलगद उलगडत जावी तशी ही कविता उमलत जाते.त्याच्या विशीपासून जीर्ण, जर्जर, विकारग्रस्त वृद्धापकाळपर्यंत त्याला सतत अस्वस्थ करीत राहिलेल्या तिच्या अलवार आठवणींनी व्याकुळ झालेला तो !आणि त्याच्या मनातील भावनांचा कोंडमारा व्यक्त करणाऱ्या या कवितेचा उलगडत गेलेला पट!
‘तो’ म्हणजे कवी पण ‘ती’ म्हणजे नेमकी कोण या प्रश्नाचं कवितेच्या आस्वादकांना गवसणारं उत्तर प्रत्येकाच्या विचारांच्या दिशेनुसार वेगवेगळे असू शकेल कदाचित, पण कवीच्या शब्दातून स्पष्टपणे व्यक्त न केलेली तिची ओळख मला अंधूक का होईना जाणवली ती ‘कवीची प्रतिभा’ या रुपातली! ही ओळख मनात जपत कविता पुन्हा वाचताना तिच्या पाऊलखुणा याच रुपात अधिक स्पष्ट होत गेल्या एवढं खरं!
‘शायरी’ विभागातील उर्दू मिश्रित हिंदी काव्यरचनाही आवर्जून दखल घ्याव्यात अशा आहेत. विषयवैविध्य, व्यंगात्मक शैली, थेट, रोखठोक आणि सुलभ रचनाकौशल्य ही वैशिष्ट्ये इथेही दिसून येतात.
प्रेम, विरह, सहजीवन या विषयांवरील बहुतांशी कवितांचा विषय तोच असला तरी त्या रचनांमधल्या वैविध्यामुळे त्या लक्ष वेधून घेतात.या दृष्टीने परायी काया,एहसास-ए-रुह, गुस्ताखी माफ,शबनबी थी सारी राते, कब्र, जुनून-ए -मजनूॅं, खुदकुशी, जले शोले राख तले, अशा अनेक कवितांचे उल्लेख करता येतील.हिंदी-उर्दूच्या लहेजामुळे तर यातील आशय अधिक तीव्रतेने भिडतो.
वेगळ्या आशय- विषयांमुळे उठून दिसणाऱ्या काही खास कवितांचा इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. पाण्याच्या एका थेंबाची पाऊस,अश्रू,घाम अशी विविध रुपांमधली भावना व्यक्त करणारी ‘बूॅंद’ ही कविता हे एक प्रातिनिधिक उदाहरण.
‘सत्ता संपत्ती संततीने बदले तेरे नूर,बनकर मगरूर तू हुआ अपनोंसे दूर’ हे ‘बुराई अच्छाई का राही ‘ या कवितेतील भरकटलेल्या माणसाचे वर्णन असो, की ‘मुजरा आणि मुशायरा’ मधे कवी आणि अदाकारा या शायरीच्या एकाच नाण्याच्या दोन बाजूंची तुलना करताना ‘जवानी का ढलना मुजरेका मुरझाना, जवानी पलभर शब्द निरंतर’ हे वास्तव अधोरेखित करणारा निष्कर्ष असो, दोन्हीही त्या त्या कविता लक्षवेधी बनवतात.
जीवनाचं अस्वस्थ करणारं बोचरं सत्य व्यक्त करणाऱ्या ‘दो गज जमीन’, ‘शहादत की कुर्बानी’, ‘चादर ए आसमान’ या कविताही दीर्घकाळ मनात रेंगाळतील अशाच!
सहज जाणवलेला एक योगायोग म्हणजे यातील मराठी व हिंदी या दोन्ही विभागात असलेल्या ‘जनरेशन नेक्स्ट’ या एकाच शीर्षकाच्या दोन कविता ! विशेष हे की या दोन्ही कवितांचा आशय आणि विषय एकच असला तरी त्यांची मांडणी मात्र सर्वस्वी भिन्न तरीही भावणारी !
या कवितासंग्रहाचं मला जाणवलेलं वेगळपण ध्वनित करण्यापुरता वानगीदाखल घेतलेला त्यातील काही मोजक्या कवितांचा हा प्रातिनिधिक आढावा आहे.
मा.लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे यातील बहुतेक सर्व दीर्घ कविता वाचनापेक्षाही त्यांचे मंचीय सादरीकरण अधिक परिणामकारक ठरेल अशा आहेत.
‘आयुष्याचं गणित’ या संग्रहातील कविता आयुष्याच्या गणितांची मांडणी, ती गणिते सोडवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी रीत, आणि हाती लागलेल्या उत्तरांची अचूकता ताळा करून पहाण्याची प्रेरणा, या तीनही अंगांनी आकाराला येताना आशय-विषयांनुरुप आपापले वेगळे रूप घेऊन व्यक्त होताना दिसतात. आणि त्यामुळेच त्या रसिकांना काव्यानंद देतानाच विचारप्रवृत्त करणाऱ्याही ठरतील असा विश्वास वाटतो.
पुस्तक परिचय – श्री अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈