सुश्री मंजुषा सुनीत मुळे
पुस्तकावर बोलू काही
☆ कृतार्थ वार्धक्य… डाॅ.विनिता पटवर्धन ☆ परिचय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
लेखिका : डॉ. वनिता पटवर्धन
प्रकाशक : समीर आनंद वाचासुंदर, गोवा
– हे पुस्तक पाहिलं, आणि नकळतच मनात प्रश्न उभा राहिला की… ‘‘वार्धक्य… आणि कृतार्थ…?” … आणि तेही आत्ता आजूबाजूला सातत्याने दिसणा-या परिस्थितीत? उत्सुकता स्वस्थ बसू देईना… मग लगेचच हे पुस्तक वाचायला सुरुवात केली. आणि अगदी प्रस्तावनेपासूनच पानागणिक मिळणारी वेगवेगळी शास्त्रीय माहिती वाचतांना, वृध्दत्त्वाशी निगडित असणा-या अनेक प्रश्नांचे वेगवेगळे आकृतीबंध डोळ्यासमोर उभे राहिले.
माणसाचे सर्वसाधारण आयुष्यमान ७५ ते ८० वयापर्यंत वाढले आहे हे तर जाहीरच आहे… त्यामुळे या वयोगटातील माणसांची संख्याही वाढली आहे. आणि अर्थातच् वृध्दांसमोरची आव्हानेही वाढली आहेत. इथे वृध्दांसमोरच्या ‘समस्या’ न म्हणता ‘आव्हाने’ म्हणणे, इथेच लेखिकेचा या विषयाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन अधोरेखित झाला आहे. आणि मग टप्याटप्याने पुढे जात, ही आव्हाने यशस्वीपणे कशी पेलता येतात, याचे लेखिकेने सोदाहरण विवेचन केले आहे… अगदी पटलेच पाहिजे… आणि आचरणातही आणले पाहिजे असे.
‘एखादी व्यक्ती वृध्द होते, म्हणजे नेमके काय होते? ’ हा पहिलाच प्रश्न… इथूनच या पुस्तकाला सुरुवात झालेली आहे. उमलणे… उभरणे… कोमेजणे… थोडक्यात उत्पत्ती-स्थिती-लय… यापैकी ‘ कोमेजत जाणे ’… हा तिसरा टप्पा वृद्धत्वाचा. हे जरी सत्य असले, तरी माणसाचे कोमेजत जाणे कसे असते, हे त्याच्या शारिरिक व मानसिक स्वास्थ्यानुसार, त्याच्या कार्यरत रहाण्याच्या क्षमतेनुसार, अंगभूत कौशल्यानुसार, आणि या अनुषंगानेच, त्याने आयुष्यभर केलेल्या व्यवसायानुसार, प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असते. म्हणूनच वय आणि कार्यमग्न रहाण्याची क्षमता, याचे कुठचेही ठाम गणित मांडता येत नाही, मांडले जाऊही नये, हा विचार नकळत वाचकाच्या मनात भुंग्यासारखा गुणगुणायला लागतो, याचे श्रेय लेखिकेला द्यायलाच हवे. इथेही…१)‘नववृध्द, म्हणजे तरूण जेष्ठ’, २)‘वृध्द किंवा ज्येष्ठ’ , ३) ‘अतिवृध्द किंवा अति ज्येष्ठ’, हे वृध्दत्त्वाचे तीन टप्पे असतात हे सांगतांना लेखिकेने… १ ला टप्पा म्हणणे शिशिरातील चांदणे, २ रा टप्पा म्हणजे हेमंत ऋतूतील पानगळती, आणि ३ रा टप्पा म्हणजे शिशिरातील गूढ शांतता… अशी अगदी सुंदर… सहजपणे पटणारी उपमा दिलेली आहे. आणि अशाच अनेक चपखल उपमा, प्रसिध्द लेखकांच्या साहित्यातले या विषयाला अचूक लागू होतील असे वेचे, काही सुंदर कविता, यांचा अगदी यथायोग्य उपयोग सहजपणे या पुस्तकात केलेला आहे.
याच्याच जोडीने, आत्तापर्यंत विकसित झालेल्या ‘ वृध्दशास्त्राच्या ’ वेगवेगळ्या शाखांचा उहापोहही केलेला आहे, आणि त्याला सहाय्यभूत असणारे कितीतरी आलेख, लहान लहान तक्त्यांच्या माध्यमातून दिलेली प्रत्यक्षदर्शी माहिती, पूरक चित्रे, याद्वारे या विषयाची परिपूर्ण माहिती देण्याचा लेखिकेचा हेतू स्पष्टपणे जाणवतो.
वृद्धत्वाचे स्वरूप, वृध्दांची मनोधारणा, बौध्दिक स्थिती, सामाजिक स्थिती, अशा अनेक गोष्टींचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतांना, वृध्दांनी ‘स्वयंशोध’ घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर लेखिकेने आवर्जून भर दिला आहे, आणि त्यादृष्टीने मांडलेला प्रत्येक मुद्दा कोणत्याही ‘सजग’ वृध्दाला पटलाच पाहिजे असा आहे. कोणाचेही वय विचारायचे असेल तर ‘How old are you?’ असे विचारले जाते. पण वृध्दांच्या बाबतीत मात्र, त्याऐवजी ‘How young are you?’ हा प्रश्न विचारायला हवा, हे लेखिकेचे म्हणणे मला अतिशय आवडले… मनापासून पटले. कारण या प्रश्नाच्या उत्तरातच, माणूस स्वत:च्या वृध्दत्त्वाकडे कशाप्रकारे बघतो… किंवा स्वत:ची निराशेकडे झुकणारी मानसिकता बदलू इच्छितो की नाही, याचे उत्तर दडलेले आहे… वृध्द असणे आणि सारखे वृध्द असल्यासारखे वाटत रहाणे यातला फरक यामुळे आपोआपच ठळकपणे अधोरेखित होतो.
याच अनुषंगाने पुढे वृद्धत्वाच्या गरजा आणि अपेक्षा, नकळतपणेच पण महत्त्वाची ठरणारी मानसिक निवृत्ती, अटळ असे शारीरिक आणि आर्थिक परावलंबन, हे सगळे निरोगी मनाने स्वीकारून, ते आपल्या परीने जास्तीत जास्त नियंत्रणात ठेवण्याची मानसिकता जोपासण्याची गरज, अशा अनेक अतिशय महत्त्वाच्या मुद्यांवर लेखिकेने परिपक्व म्हणावे असे भाष्य केले आहे. खरं तर ते फक्त भाष्य नसून, वाचकांच्या विचारांना अगदी योग्य आणि आवश्यक दिशा देणारे मार्गदर्शन आहे, ज्यातून प्रत्येकाने खूप काही शिकण्यासारखे, प्रत्यक्ष आचरणात आणण्यासारखे आहे.
भूतकाळाच्या तुलनेत आत्ताच्या काळात वृध्दांच्या समस्या बदलल्याही आहेत आणि वाढल्याही आहेत हे तर खरेच. लेखिका स्वत: मानसशास्त्र तज्ञ आणि ख्यातनाम समुपदेशक असल्याने, वृद्धत्व या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातली मानसिकता, झेपतील की नाही अशा वाटणा-या या वयातल्या समस्या, याबद्दल फक्त शास्त्रीय माहिती देऊन न थांबता, त्यावरच्या प्रत्यक्षात करता येणा-या उपाययोजनाही त्यांनी सहजपणे समजतील, आणि तितक्याच सहजपणे प्रत्यक्ष आचरणातही कशा आणता येतील, हे अगदी उत्तमपणे, गप्पा मारता मारता महत्त्वाचे काही आवर्जून सांगावे, अशा पध्दतीने अगदी सहजसोप्या भाषेत सांगितले आहे, असे मी ठामपणे म्हणू शकते. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात असलेले उत्तम समुपदेशनपर लेखही पुस्तकातील मार्गदर्शनाला अतिशय पूरक असेच आहेत.
मीही आता “ 72 years young “ आहे, आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आता ‘ मीच माझा दिवा आहे ’ हे मला पूर्णपणे आणि मनापासून पटले आहे. अर्थात याचे सर्व श्रेय मी लेखिकेला द्यायलाच हवे. हे पुस्तक वाचल्यानंतर, त्यात केलेले समुपदेशन मनापासून आचरणात आणण्याचा निश्चय मी तरी नक्कीच केला आहे. आता माझे वार्धक्य नक्कीच “ कृतार्थ “ होईल हा विश्वास या पुस्तकाने मला दिला आहे, आणि तोच विश्वास या पुस्तकातून सर्वांना मिळेल, याची मला खात्री आहे.
या अतिशय वाचनीय, आणि त्याहूनही मननीय अशा पुस्तकाबद्दल लेखिका डॉ.वनिता पटवर्धन यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार !!!
प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈