सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ भगव्या वाटा… सुश्री अरुणा ढेरे ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तकाचे नाव : “भगव्या वाटा “

लेखिका :  अरुणा ढेरे 

प्रकाशक : सुरेश एजन्सी 

 

स्त्री म्हणजे पाश

स्त्री म्हणजे भावनिक गुंतागुंत 

स्त्री म्हणजे आसक्ती 

हे समीकरण मानणाऱ्या प्रत्येकाला 

‘स्त्री म्हणजे विरक्ती’

हे गणित पटकन सुटेल असं वाटत नाही.

कारण खरंच स्त्रीला संसाराच्या पाशात इतकं गुरफटवून ठेवलं आहे आपण की, ती ‘मुक्तीसाठी अधिकारी असू शकते’, संसाराच्या पाशातून मुक्त होणं हे तिचं ‘स्वप्न’ असू शकतं असा आपण विचारदेखील करत नाही. 

वास्तविक पाहता स्त्री इतकं सहज डिटॅचेबल होणं पुरुषाला जमणं जरा अवघडच. 

अख्खं बालपण म्हणजे वयाची पंधरा-वीस वर्षें वडिलांच्या घराला आपलं घर मानून काढल्यानंतर परत पतीच्या घरात जाऊन तिथे आपलं स्थान निर्माण करणं, नऊ महिने पोटात जपलेल्या जीवाला जन्माला घातल्यानंतर देखील क्षणार्धात त्याची नाळ आपल्यापासून तोडून त्याचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करणं, हे वाटतं तितकं सोपं नाही. स्वतःला रुजवणं तिथून बाहेर पडणं आणि परत दुसऱ्या ठिकाणी रुजवणं, फुलणं यामध्ये तिच्या सगळ्या स्त्रीत्वाचा, व्यक्तित्वाचा कस पणाला लागतो. पण या प्रत्येक वेळी ती अत्यंत सहजतेने या सर्व प्रसंगांना सामोरी जाते. आणि संसारातला सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडते.

अशी स्त्री आसक्ती, पाश, मोह यात खरंच गुंतून राहू शकते? खरंच फक्त हेच तिचं अस्तित्व असू शकतं?

किती मर्यादित करून ठेवलं आहे आपण ‘स्त्रीत्वा’ला… 

पण ज्या वेळेला अरुणा ढेरे यांचं ‘भगव्या वाटा’सारखं पुस्तक हाती येतं तेव्हा स्त्रीत्व म्हणजे काय? स्त्री म्हणजे काय? हे जास्त चांगलं समजतं. स्त्रीत्वाचा आत्तापर्यंत अप्रकाशित राहिलेला विरक्तीचा पैलू मोठ्या ताकदीने आपल्यासमोर येतो आणि अक्षरशः अचंबित करतो. 

भारतीय इतिहासाला संत परंपरेचं प्रदीर्घकाळाचं वरदान लाभलेलं आहे. या संत परंपरेत पुरुषांइतकंच अनेक स्त्रियांचं देखील योगदान आहे हे आपल्यापैकी किती जणांना माहित आहे? काही ठराविक संत स्त्रिया सोडल्या तर बाकी अन्य संत स्त्रिया, वैराग्य पत्करणाऱ्या स्त्रिया यांबाबत आपण तसे अनभिज्ञच आहोत. याचं  कारण म्हणजे आपल्याला या स्त्रियांची माहिती सहजासहजी सापडत नाही. स्त्रियांच्या या पैलूबाबत विचार करावा, शोध घ्यावा, चर्चा करावी असा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झालेला दिसत नाही. पण याचा अर्थ तशा स्त्रिया झाल्याच नाहीत, असा होत नाही. इतिहासामध्ये अशा स्त्रियांची नोंद मोठ्या प्रमाणात लक्षात येण्याजोग्या रीतीने केलेली नसली तरी थोड्याफार प्रमाणात का होईना केलेली आहे. 

गौतम बुद्धांच्या काळात अशा कितीतरी स्त्रिया बौद्ध भिक्षुणी झालेल्या आहेत. त्यात अगदी सामान्य स्त्रियांपासून ते राजघराण्यातील स्त्रियांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर केवळ उतारवयातल्याच नव्हे तर तरुण वयातल्या स्त्रियादेखील बुद्धाच्या सांगण्याने प्रभावित होऊन मुक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी आनंदाने भिक्षुणी झालेल्या आढळतात. 

अशा स्त्रियांच्या कथा थेरी गाथा,  या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. थेरी गाथा म्हणजे स्थविरींच्या गाथा. स्थविरी म्हणजे बौद्ध भिक्षुणी. एकूण ३७ जणींच्या गाथा यात आपल्याला वाचायला मिळतात. या गाथांमध्ये त्या त्या बौद्ध भिक्षुणींचा पूर्वेतिहास आणि त्यांचा बौद्ध भिक्षुणी होण्याचा प्रवास आणि त्या प्रवासाची पुढील वाटचाल अगदी थोडक्यात पण अतिशय उत्कंठावर्धक रीतीने दिलेली आहे.  

मुक्ती म्हणजे काय? ती कशी प्राप्त होते? त्यासाठी काय मर्यादा असतात? त्याची बलस्थानं काय असतात? हे देखील आपल्याला या गाथांमधून समजतं. एकेका भिक्षुणीची कथा वाचताना आपण रंगून जातो. विषय वैराग्य असला तरी वाचताना किंचितही कंटाळा येत नाही. एखाद्या आजीने आपल्या मांडीवरील नातवंडांना गोष्ट सांगावी अशा पद्धतीने अतिशय आपुलकीने, सहज-सोप्या शब्दांत या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. 

यातला मला भावलेल्या काही कथांचा उल्लेख : वासिष्ठी आणि सुजात, एका रूप गर्वितेची कथा, अक्कमहादेवी, प्रणयशरण शिवसुंदर, तिलकवती, भयचकित नमावे तुज रमणी, लल्लेश्वरी, धर्म रक्षति रक्षित:, विद्रोहाची शोकांन्तिका, भद्रा कुंडलकेशा, महादाईसा इ. आहेत. 

आज जागतिक महिला दिन साजरा करताना निरनिराळ्या कार्यक्षेत्रात उत्तुंग भरारी मारणाऱ्या महिलांचे कौतुक केलं जातं, त्यांचे दाखले दिले जातात. त्याबरोबरच मुक्ती आणि वैराग्य यासारख्या विषयांमध्ये देखील स्त्रियांचं कर्तृत्व काही कमी नाही हे सांगणार हे पुस्तक सर्वांनीच आवर्जून एकदा तरी वाचायला हवं. त्यानिमित्ताने भारतीय परंपरेमध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या मुक्ततेचा विचार कृतीत अमलात आणणाऱ्या स्त्रीशक्तीची दखल घेतली जाईल.

अभिमान आहे स्त्री शक्तीचा! 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments