डॉ मीना श्रीवास्तव

अल्प परिचय

जन्मापासून, २१ ऑक्टोबर १९५१ ते ३० सप्टेंबर २००९ होईपर्यंत नागपूर येथे वास्तव्य

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १९६९ ला ऍडमिशन घेतली. येथून MBBS (१९७४) आणि फार्माकॉलॉजी (औषध शास्त्र) या विषयात MD (१९७९) केले. १९९९ पर्यंत तिथे नोकरी केली, मग इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे (१९९९ते ३० सप्टेंबर २००९) नोकरी केली. फार्माकॉलॉजी विभागात प्राध्यापक  म्हणून निवृत्त झाले. नंतर ४ प्रायव्हेट मेडिकल कॉलेज (चेन्नई, कोईम्बतूर, मथुरा आणि इस्लामपूर) मध्ये जॉब केला. (शेवटचा इस्लामपूर इथे) ऑक्टोबर २१ ला ७० वर्षाचे होऊन रिटायर झाले.

मॅनेजमेंटचे तीन डिप्लोमा आणि समाजशास्त्र या विषयात एम ए केले आहे.

नोकरीच्या काळात लिहीत होते, रेडिओ टॉक (वैद्यकीय विषयांवर) देत होते.

लहानपणापासून पेंटिंगची आवड होती अन आहे, बरेच शिकले.

मराठी, हिंदी, इंग्रजी लिहायची अन वाचायची नितांत आवड होती अन आहे. व्यस्त नोकरी आणि घरच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर पूर्ण वेळ लेखन करावे असे वाटले. समाजमाध्यमांवर आणि फेसबुकवर लिहिते. मी ब्लॉगर आहे. माझे स्वतःचे ब्लॉगर.कॉम अन वर्डप्रेस या दोन साईटवर ब्लॉग असतात. मार्च २०२२ पासून मराठी आणि हिंदी भाषांत नियमितपणे ब्लॉग लिहीत असते. महिन्यातून २ ते ४ ब्लॉग असतात.

मला नाट्यसंगीत आणि जुने चित्रपटसंगीत अतिशय प्रिय आहे. तसेच निसर्गरम्य जागी प्रवास करायला अतिशय आवडते.            

सध्या ठाण्यात वास्तव्य आहे. अधूनमधून पुणे येथे जाते. 

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆ 

पुस्तक – रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष

लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव

पुस्तकाचे प्रकाशक-सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन

पृष्ठसंख्या-१३० पाने

पुस्तकाचे मूल्य- १५० रुपये

पुस्तक परीक्षण- डॉ. मीना श्रीवास्तव, ठाणे

देशपांडे सरांनी लिहिलेले “रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष” हे आगळे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक वाचले. रामायणाच्या असंख्य आवृत्त्या आहेत, वाल्मिकी रामायण, तुलसीरामायण, प्रादेशिक वाङ्मय, इतर देशातील रामायणाच्या आवृत्त्या, यांत आणखी भर कशाला हा विचार लेखकाने केला नाही, याचा मला फार आनंद होतोय. त्यांनी या पुस्तकाची रचना विशिष्ट हेतूने केलीत असे मला वाटते. आजकालच्या पिढीला आधुनिकतेचे आवरण असलेली अभिजात कथानकाची पुस्तके फार भावतात, त्यांत मूळ रामायण न वाचता ह्या नवीन संकल्पना वाचून रामायणाविषयी त्यांचे मत फार वेगळे होऊ शकते. उदाहरण द्यायचे तर रावणासारख्या खलनायकाचे उदात्तीकरण करणारी आधुनिक लेखकांची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. पुरोगामी वाचकांना त्यांची नव्या ढंगाने लिहिण्याची पद्धत भुरळ पाडते, ही नक्कीच चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे श्रीरामाच्या चरित्रातील कांही प्रसंगांच्या निमित्त्याने वादग्रस्त मजकुराचे समर्थन आणि प्रसारण करीत, श्रीरामाच्या उज्ज्वल चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे कार्य देखील कांही मंडळी करीत असतात, यामुळे नवीन पिढीचे भ्रमित होणे देखील साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते असे मला वाटते. ‘वाल्मिकी रामायण’ हे सदाहरित असा साहित्यप्रकार आहे! मात्र लेखकाने रामायणाच्या कैक आवृत्त्यांचा गाढ अभ्यास केला आहे, हे जाणवते. ही रामभक्ती अन प्रीती डोळस आहे, म्हणूनच पारंपरिक रामायणाची कथा यात नाही, ती येते स्वाभाविकपणे खळाळत्या निर्झराच्या प्रवाहासारखी!

श्री विश्वास विष्णु देशपांडे

हे पुस्तक सर्वधर्मियांसाठी आहे, कारण यातील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे यातील प्रत्येक पात्र. वाल्मिकींनी जणू काही त्या व्यक्तिविशेष आदर्शाच्या परिसीमा म्हणूनच निर्माण केल्यात. लेखकाने पुरुषोत्तम रामाचे गुणविशेष तीन भागात अत्यंत विचारपूर्वक अन सुंदररित्या मांडले आहेत. राम हा अलौकिक पुरुषोत्तम आहे, त्याचे गुण गातांना वैखरी मुग्ध होते, शब्दभांडार रिते होते, उरते केवळ मनात त्याचे उत्तुंग व्यक्तिमत्व, इतके की सूर्य आपले तेज, हिमालय आपली उंची, सागर आपली खोली अन चंद्र आपल्या सोळा कला रामाच्या तुलनेत आपण  बसतो तरी का, हे तपासून बघतील! ही तीन प्रकरणे मूळ पुस्तकातच वाचावी! उत्तुंग व्यक्तिमत्व  असलेला राम हा आदर्शाचा मेरुमणी, पुत्र, पती, बंधू, सखा, राजा, शिष्य, योद्धा आणि कळस म्हणजे शत्रू देखील! लेखकाने रामाचे चरित्र कायमच एक सर्वगुणसंपन्न मानव म्हणूनच रंगवले आहे, त्याला देव्हाऱ्यात बसवले नाही!  मात्र एक सामान्य मानव किती अशक्यप्राय गोष्टी करू शकतो अन त्या मुळेच देवत्व चरणांपाशी नमते, हे माझ्या मते या तीन भागांचे सार आहे!

रामाच्या सोबत त्याची संगिनी, अर्धांगिनी अन अनुगामिनी सीता आलीच! खरे पाहिले तर ही जोडी अभिन्नच, “जेथे राघव तेथे सीता”! आदर्श कन्या, सून, भगिनी, माता, पत्नी, पण याहून अधिक आपले स्वतंत्र व्यक्तित्व जपणारी आदर्श स्त्री. चंद्राला जशी रोहिणी, तशी रामचंद्राला शोभेल अशी पावित्र्याची अन पातिव्रत्याची परिसीमा, अर्थात सर्वगुणसंपन्न अशी ही सीता! सर्वप्रथम एका मनोहर उपवनात रामाला बघूनच त्याला आपले हृदय अर्पण करणारी, स्वयंवरात “वरमाला घेऊन अधीर होऊनि सौख्याचे मंदिर गाठणारी” अन त्याच सुकुमार चरणांनी रान तुडवणारी, रामाजवळ सुवर्णमृगासाठी हट्ट करणारी, रावणाला “कोल्हा” म्हणून रामाची तुलना सिंहाशी अन स्वतःची तुलना एका सिंहीणीशी करणारी अनुपमेय मैथिली!      विश्वास सरांनी आपल्या लेखणीतून सीतेचे व्यक्तिमत्व इतक्या अलौकिक रित्या साकार झाले आहे की, क्या कहने! शिवाय तिच्यावर रामाने केलेल्या “कथित अन्यायाचा” संवेदनशील भाग फार संयमाने आणि निष्पक्ष रित्या हाताळला गेल्या आहे. अशी अनुपमेय जोडी आजच्या “आज ब्याह कल शायद तलाक” अश्या काळात स्वप्नवत वाटते ना!

या पुस्तकात रामायणातील इतर व्यक्तिरेखा अतिशय चोखंदळपणे निवडलेल्या दिसतात. आजच्या काळात आपल्यासमोर आदर्श, अनुकरणीय व वंदनीय असावीत, अशीच ही पात्रे! लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, उर्मिला, मंदोदरी, बिभीषण, यांचे गुणविशेष त्या त्या प्रकरणात नेमकेपणाने सादर झाले आहेत. विशेष म्हणजे परमभक्त हनुमान याच्यावरील दोन प्रकरणे फारच वाचनीय आहेत.

वणासारख्या खलनायकाचे व्यक्तित्व लेखकाने निष्पक्षपणे हाताळलेले आहे. यातून रावण आजही अस्तित्वात आहे, हे जाणवले. तो आपल्यात किती आहे, हे अनुभवण्यासाठी हे प्रकरण वाचावे!  याच अनुषंगाने आपण “राम आणि रावण” यांच्या प्रवृत्तीतील भिन्नता(अनुक्रमे विश्वात्मक विचार अन व्यक्तिवाद), व नैसर्गिक अशी “रावण वृत्ती” अन संस्कारातून साकार झालेली “रामवृत्ती” याचे केलेले विवेचन फार विचारणीय आहे. यामुळे आजच्या घडीला युवा तसेच बालकांमध्ये रामवृत्ती निर्माण होण्यासाठी पालक, शिक्षक अन समाजाला काय करता येईल याचे भान यावे ही अपॆक्षा आहे! आजच्या घडीला रामायणावरील या पुस्तकाच्या दीपस्तंभाची समाजाला गरज आहे. आणखी एका नकारात्मक व्यक्ती म्हणजे कैकेयी! काळे कपडे घातलेली, कोपभवनातील खलनायिका हे तिचे चित्र जनमानसात फिट्ट बसले आहे लेखकाने त्याला पूर्णपणे छेद देत तिचे मनोविश्लेषणात्मक चित्रण केलय! वाईटातून चांगले (रावणाचा नाश) होण्यास कैकेयी कारणीभूत ठरली, हे महत्वाचे आहे! तिच्यविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा फार महत्वाचा प्रयत्न या तपशीलात दिसतो.

रामायणकालीन शिक्षणात राजसत्ता आणि गुरुसत्ता यांचा सुंदर समन्वय दाखवलाय! विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधून त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व घडवणारे ते शिक्षण कुठे अन आजचे भष्टाचारयुक्त शिक्षण कुठे! हे प्रकरण लेखकाने शिक्षक या अनुभवातून अतिशय मुद्देसूदपणे लिहिले आहे! हीच गोष्ट रामायणकालीन समाजाची! रामराज्याचे हे वर्णन अप्रतिम, अयोध्येच्या आनंदवनभुवनाची आपण आता फक्त कल्पनाच करायची! प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारे आणखी एक प्रकरण म्हणजे रामायणकालीन शासन व्यवस्था. तीन स्तरांवर कार्यान्वित, अष्टप्रधान, ऋषिमंडळ आणि खुद्द राजा! आपल्या कल्पनाशक्तीची हद्द तिथवर पोचणे अशक्य! तशीच कुटुंबसंस्था, कुठे आजचे न्यायालयीन खटले अन कुठे या रामायणातील आदर्श भावकी! आजच्या काळाला अनुरूप अशी “रामकथेचे महत्व” ही दोन सर्वांगसुंदर प्रकरणे मुळातूनच वाचनीय! रामायणातील काही ज्ञात/अज्ञात गोष्टींमध्ये लक्ष्मणरेषेचे आज अभिप्रेत असलेले महत्व, वालीवध, रामाने सीतेचा केलेला त्याग, इत्यादी संवेदनशील आणि वादग्रस्त बाबी लेखकाने फार संयमाने लिहिल्या आहेत. संपूर्ण पुस्तकाचा समारोप करणारा भाग अद्वितीय! भावनांचा कल्लोळ हाच याचा गाभा!

रुचकर जेवणाच्या शेवटी “गोडाचा घास” असलेले शेवटचे प्रकरण, या पुस्तकाचे वेगळेपण जपणारे! रामाची “रामगाणी” अन तीही गीतरामायण विरहित, रामाच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग साकारणारी! (अपवाद “पराधीन आहे जगती”)! यात लेखकाची संगीताची गहिरी जाण आलेखित झाली आहे! या अनोख्या, अवीट अन आकर्षक अंतिम भागासाठी देशपांडे सरांचे खास अभिनंदन!

या पुस्तकाची मला भावलेली सर्वंकष गुणवत्ता म्हणजे याची “नवनवोन्मेषशालिनी” संकल्पना! लेखकाचे भिडस्त आणि नम्र व्यक्तिमत्व या पुस्तकात पदोपदी  जाणवते! त्यांनी राजहंसासारखे नेमके मोती वेचून हे अमूल्य साहित्य निर्मित केले आहे! आजच्या काळाला अन पिढीला अनुरूप असे हे रामायणाचे लेखन आहे! भाषा अत्यंत साधी, सोपी अन सरळ! या पुस्तकाचा स्थायी भाव आहे लेखकाची रामावरील प्रगाढ श्रद्धा, भक्ती अन प्रीती!

श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव. आ. बं. हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. आजवर त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. समाजमाध्यमांवर उगवतीचे रंग, प्रभात पुष्प, थोडं मनातलं, ही त्यांची सदरे वाचकप्रिय आहेत. रेडिओ विश्वासवर ‘आनंदघन लता’, ‘या सुखांनो या’ आणि ‘राम कथेवर बोलू कांही’ या कार्यक्रमांच्या मालिका अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांचे स्वतंत्र यू ट्यूब चॅनल देखील आहे.

सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन द्वारा प्रकाशित या पुस्तकाचे वाचन, मनन, चिंतन आणि त्यानुसार आचरण करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे मला प्रकर्षाने वाटते! भक्ती अन ज्ञानाने समृद्ध असे हे पुस्तक प्रत्येकाने वारंवार वाचावे आणि संग्रही ठेवावे इतके सर्वांगसुंदर आहे!

 

पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक- २७-३-२३

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments