सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ एका रानवेड्याची शोधयात्रा… श्री कृष्णमेघ कुंटे ☆ परिचय – सौ. उज्वला केळकर ☆ 

एका रानवेड्याची शोधयात्रा

लेखक – कृष्णमेघ कुंटे

राजहंस प्रकाशन

पृष्ठे – १६९ मूल्य – १२५ रु.

परिचय उज्वला केळकर

कृष्णमेघ कुंटे हे मदुमलाईच्या जंगलात पूर्णपणे एक वर्ष राहिले. ऑगस्ट ९४ ते जुलै ९५ या काळात ते तिथे राहिले. त्यांनी तिथे जगलेलं जीवन, घेतलेले अनुभव म्हणजे एका रानवेड्याची शोधयात्रा’. तिथे ते घामानं थबथबेपर्यंत, पोटर्‍या लटपटेपर्यंत, बूट फाटेपर्यंत, मांड्या दुखेपर्यंत, पाठीचा कणा मोडेपर्यंत हिंडले. नादावल्यासारखे परत परत झाडीमाध्ये फिरत गेले. जंगलातील सर्व ऋतूंमधीलरूप, रंग, नाद, स्पर्श अनुभवले. त्यामधला रस घेतला आणि तितक्याच रसिलेपणाने, शब्दांमधून तो अनुभव वाचकांपर्यंत पोचवला.   

पहिल्या प्रकरणात लेखकाने आपण मदुमलाईच्या जंगलात का व कधी गेलो, ते सांगितलय. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला ते रसायनशास्त्रात नापास झाले. दुसर्‍या वर्षाचे सर्व विषय सुटले होते, पण रसायनशास्त्रात पास झाल्याशिवाय पुढे जाता येणार नव्हते. मग वर्षभर काय करायचं? याबद्दल विचार चालू असतानाच, त्यांचे सर मिलिंद वाटवे यांनी विचारणा केली की मदुमलाईच्या जंगलात अभ्यासाठी जातोस का? त्यांना रानकुत्र्यांचा काही अभ्यास करायचा होता. त्यांच्या अभ्यासाचा पाठपुरावा कृष्णमेघांनी करावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. तिथला त्यांचा सगळा खर्च ते करणार होते. जंगल भ्रमंतीचं वेड असणार्‍या आणि वन्य प्राण्यांबद्दल कुतूहल असणार्‍या कृष्णमेघांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. ते ६ वीत असताना ‘फ्रेंडस ऑफ अॅनिमल्स’ या संस्थेने अंदमान येथे घेतलेल्या शिबिराला हजर राहिल्यापासून त्यांना वन्य जीवनाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. मदुमलाईच्या जंगलात राहून ते मिलिंद वाटवे यांच्यासाठी त्यांच्या पद्धतीने अभ्यास करणार होते.

त्यानंतर लेखकाने मदुमलाईचे जंगल आणि त्यांच्या पंचक्रोशीची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलय, ‘अन्य जंगलांप्रमाणे हे एकांडं जंगल नाही. तामीळनाडू, कर्नाटक आणि केरळ या तीन राज्यात पसरलेल्या भल्या मोठ्या अरण्याचा, मदुमलाईचे जंगल हा एक भाग आहे. नीलगिरी पर्वतरांगेत हे जंगल येते.’ पुस्तकाच्या शेवटी मदुमलाईच्या जंगलाचा नकाशाही दिलेला आहे. ते म्हणतात, मदुमलाईचा गाभा बघायचा असेल, तर म्हैसूर-उटीचा डांबरी रस्ता सोडून उजवीकडे आत शिरलं पाहिजे. तिथून पुढे फक्त झाडा-झुडपांचं, दाट गवताचं, हत्ती –अस्वलांचं, केताचं ( कृष्णमेघ यांचा आदिवासी वाटाड्या) आणि त्याच्यासारख्या जंगलात रमणार्‍यांचं साम्राज्य. आपण त्यात प्रामाणिकपणे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो थोडा-फार यशस्वी झाला, असं ते म्हणतात. त्यांनी लिहिलय, ‘मी मदुमलाईला आलो आणि कक्कनल्लापासून थोरापळ्ळीपर्यन्त आणि मासिनागुडीपासून गेम हटपर्यन्त, साधारण देडशे- दोनशे चौ. की. मीटरचं जंगल मला उंडारायला मिळालं.’

मदुमलाईला  आल्यावर प्रथम ते मासिनागुडीत राहिले. इथे त्यांचे स्वतंत्र घर होते. इथे ५-६ घरातून रहाणार्‍या शेजारी संशोधकांची थोडी माहिती ते देतात. चार-दोन लेखणीच्या फटकार्‍याने बोम्मा या त्यांच्या स्वयंपाक्याचे आणि कोता या त्यांच्या आदिवासी वाटाड्याचे दर्शन ते घडवतात. इथून आपल्या आनंदी प्रवासाची सुरुवात झाल्याचे ते सांगतात.

ते ज्या प्रदेशात फिरले, तिथली झाडे-झुडुपे, पक्षी-प्राणी, नद्या-ओढे, उंचवटे-टेकड्या या सार्‍यांचं वर्णन अगदी चित्रमय शैलीत झाले आहे. आनईकट्टी येथील वर्णन उदाहरण म्हणून बघता येईल. ‘या भागाचं रूपही वेगळं आहे. इथे उंच डोंगर नाही की सपाट जंगल नाही. आहेत त्या अगदी दाटीवाटीने उभ्या असलेल्या, एकमेकांच्या पोटात शिरणार्‍या छोट्या छोट्या टेकड्या आणि त्यांच्यामधून वाहणारे उन्हाळ्यात रोडावणारे सडपातळ ओढे. पाऊस कमी, त्यामुळे आभाळाला हात लावणार्‍या पण एकमेकांपासून अलिप्त रहाणार्‍या उंच झाडांऐवजी इथे एकमेकांच्या हातात हात आणि गळ्यात गळे घतलेल्या , नसती गर्दी करून राहणार्‍या बुटक्या झाडांची आणि झुडुपांची रेलचेल आहे. आनईकट्टीत बाभळी, ईखळ, धावडा, खैर, पांगारा, चंदन, निवडुंगाचं साम्राज्य.. इथल्या धसमुसळ्या, बाकदार काटेरी जाळ्यांच्या प्रेमळपणापासून, काट्यात कपडे धरून ठेवण्याच्या हट्टापासून थोडं जपूनच राहिलेलं बरं. इथलं रहाणीमान पाठीचा कणा मोडणारं आणि हिंडणं पायाचे तुकडे पाडणारं, पण इतकं रोमांचकारी की इथून पाय लवकर हलत नाही.’

आपल्या भटकंतीतील प्रदेशाप्रमाणे इथले प्राणी, पक्षी, कीटक इ. चे वर्णनही त्यांनी सविस्तर केले आहे. त्यांच्या दिसण्याप्रमाणेच, त्यांचे स्वभाव, सवयी याबद्दल लिहिले आहे. काही निरीक्षणे, अभ्यास नोंदवला आहे. हत्तींमध्ये नराला दात असतात. माद्यांना  नसतात. . त्यांना आपल्या कळपाजवळ कुणी इतर प्राणी आलेला चालत नाही. ते लगेच त्याला हुसकावून लावतात. पाणी जसं ते आपल्या अंगावर घालून घेतात, तसंच पाण्याकाठची मातीही सोंडेने आपल्या अंगावर घालून घेतात. उन्हापासून आणि एक प्रकारच्या रक्तपिपासू माशांपासून आपला बचाव करण्यासाठी ते आपल्याला मातीने माखून घेतात. आपल्या विष्ठेचा वास सहन न झाल्यामुळे किंवा आसपासचे गवत जून निबर झाल्याने, कोवळ्या लुसलुशीत गवताच्या शोधात हत्ती स्थलांतर करतात. डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर हत्ती आईनकट्टीला येतात. हा भाग हत्तींच्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध आहे. इथे शिकार करणार्‍या वीरप्पनसह आणखी तीन टोळ्या आहेत. हस्तीदंतासाठी शिकार होते. एकदा या भागात गेलेले नर पुन्हा दिसत नाहीत. शिकार्‍याच्या गोळीला बळी पडतत, असं आदिवासी सांगतात. 

रानकुत्री ही बुटकी असतात. ती भुंकत नाहीत. इतर प्राण्यात नर, तर या कुत्र्यांमध्ये मादी ही टोळीची राणी असते. तीच तेवढी नवी पिले जन्माला घालू शकते इतर माद्या नवी पिल्ले जन्माला घालत नाहीत. त्या नवीन जन्मलेल्या पिल्लांना वाढवायला मदत करतात. राणी म्हातारी झाली किंवा मेली की दुसरी मादी राणी होते. रानकुत्री भुंकत नाहीत. एकमेकांशी संपर्क करण्यासाठी शीळ घालात.  अशी अनेक प्राण्यांबद्दलची निरीक्षणे त्यांनी इथे नोंदवली आहेत. रानकुत्र्यांच्या पोटातील परजीवी आणि चितळांच्या पोटातील परजीवी यांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी लेखक तिथे गेला होता. हा संबंध असायचं कारण म्हणजे चितळ हे रानकुत्र्यांचं भक्ष. तसाच हातींचाही अभ्यास त्यांना करायचा होता.

जंगल भ्रमंतीत अनेक थरारक प्रसंगांचे अनुभव त्यांनी घेतले. अगदी जीवघेणे प्रसंगही आले. ते वाचताना त्याचा थरार वाचकांनाही जाणवतो. मग प्रत्यक्ष अनुभवलेल्यांची त्यावेळी कशी स्थिती झाली असेल? हे सारं वर्णन इतक्या चांगल्या शब्दात झालय की आपण वाचत नसून व्हिडिओ बघतोय असं वाटतं. खरं तर या पुस्तकावर उत्तम माहितीपट होऊ शकेल.

एकदा आईनकट्टीला असताना ते व केता, त्यांचा मागकाढया , दुपारी एका ओढ्याकाठी जेवायला बसले होते. पाठीमागे गच्च जाळी. ओढ्याच्या पलीकडे झुडुपांमध्ये जोरात खसखस सुरू झाली. चित्कार, आरोळ्या यांनी जमीन हादरू लागली. हत्तींचा एक कळप जवळ जवळ पळतच त्यांच्या दिशेने येत होता. ओढा उथळ असल्याने हत्तींना सहज ओलांडता येणार होता. पाठीमागच्या जाळीमुळे त्यांना पळून जाणंही शक्य नव्हतं. पण सुदैवाने हत्ती ओढा ओलांडून, त्याला समांतर चालत राहिले. ते त्यांच्या दिशेने आले असते तर…  

एकदा रानकुत्र्यांच्या गुहेच्या शोधात ते मोयार गॉर्जपाशी आले. खाली खोल दरी. तिथे उतरायला वाट नव्हती. शेवटी त्यांच्यापासून ४-५ फुटांवर असलेल्या झाडावरून त्यांनी खाली उतरायचं ठरवलं. झाडावर त्यांनी उडी मारली. तो अंदाज बरोबर ठरला. नाही तर त्यांचा कपाळमोक्षच झाला असता. इथे रानकुत्र्यांची गुहा शोधताना त्यांना अजगर दिसला. मगरी दिसल्या. अस्वल, वाघ, पाणमांजरे यांच्या गुहा दिसल्या. हे सगळं वाचता वाचताही आपल्याला धडकी भरते.

कारगुडीला एकदा कुत्र्याच्या टोळीचं निरीक्षण करत कृष्णमेघ आणि अरुण बसले होते. थोड्या वेळाने कुत्री अस्वस्थ झाल्यासारखी वाटू लागली. त्यांनी आवाज केला. त्या आवाजात धोक्याची सूचना होती. जीवाचा आकांत होता. ती कुत्री बघत होती, त्यामागे एक उंचवट्याचा उतार होता. त्यापलीकडे ओढा. ओढ्याभोवती दाट झाडी होती. तिथून गोलसर चेहर्‍याचा पिवळ्या रंगाचा, अंगावर काले पट्टे असलेला वाघ बाहेर आला आणि चालत त्यांच्याच दिशेने पुढे आला. उंचवट्यावर आल्यावर तो क्षणभर थांबला. वाटेतल्या कुत्र्याच्या अंगावर तो धावला. पण कृष्णमेघ लिहितात, ‘आम्हाला बघून तो बुजला असावा. कुत्र्याचा पाठलाग सोडून तो वळला आणि एक मोठी डरकाळी फोडून तो उंचवट्यामागे गायब झाला. एकदा हत्तींणीने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना पळता भुई थोडी झाली. असे अनेक थरारक प्रसंग यात लेखकाने दिले आहेत.

विरप्पन प्रकरणात त्यांनी, आदिवासींच्या काही समस्यांबद्दल, त्यांच्या स्थिती-गतीबद्दल लिहिले आहे.

पुस्तकात जागोजागी, जंगल, हत्ती, गवे, वाघ, कुत्री, पक्षी इ.ची छायाचित्रे वर्णनाला अधीक मूर्त स्वरूप देतात. ऋतुचक्र हे यातलं शेवटचं प्रकरण. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूतील जंगलाच्या बदलत्या रंगरूपाचं वर्णन यात केलं आहे. यात पक्षी, कीटक, कीडे-मकोडे यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या जीवनसंघर्षाबद्दल लिहिलय. जंगल त्यांच्या देहाच्या कणाकणात मुरलय. सरत्या वर्षाबरोबर, म्हणजे, जुलै ९५ मधे त्यांची शोधायात्रा तात्पुरती थांबली. पण संधी मिळताच ती पुन्हा सुरू होईल, यात संदेह नाही.  

ज्यांना रानं-वनं- जंगल, प्राणी-पक्षी, झाडं – झुडुपं, नद्या-टेकड्या याविषयी कुतुहल असेल, त्यांनी ‘एका रानवेड्याच्या शोधायात्रे’त जरूर सामील व्हावं आणि आनंद मिळवावा.

©  उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments