सौ. वंदना अशोक हुळबत्ते
पुस्तकावर बोलू काही
☆ गुजगोष्टी शतशब्दांच्या… सुश्री वीणा रारावीकर ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
पुस्तक – गुजगोष्टी शतशब्दांच्या
लेखिका – वीणा रारावीकर
प्रकाशक – सृजनसंवाद प्रकाशन
पृष्ठ संख्या – ११५
किंमत – २२५ /-
वीणा रारावीकर या पदार्थविज्ञान,संगणक तंत्रज्ञान व्यवस्थापन या विषयातील उच्चशिक्षित पदवीधर आहेत.लोकप्रिय ललित लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत.अनेक प्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित आहेत.त्यांचा नावीन्यपूर्ण ” गुजगोष्टी शतशब्दांच्या “ हा लघुकथा संग्रह नुकताच वाचण्यात आला. या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे शंभर शब्दांच्या शंभर लघुकथा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुस्तकाच्या नावात गंमत आहे. आपण जवळच्या माणसांशी हितगुज करत असतो. आपल्या खोल मनाच्या कप्प्यात दडलेलं त्यांना सांगून मन मोकळं होतो. आपल्यात एक विश्वासाचे नाते तयार होते. मला वाटते त्याच अधिकाराने लेखिकेने या लघुकथातून वाचकांशी संवाद साधला आहे. एखादी गोष्ट पाल्हाळ लावून सांगणे एक वेळ सोपे, पण नेमक्या शब्दात मांडणं अवघड आहे. ते अवघड काम लेखिकेने या पुस्तकात नेमके साधले आहे.
सुश्री वीणा रारावीकर
वाचनाची आवड तर आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनासाठी वेळ काढणे मोठी गोष्ट झाली आहे. अशा वेळी खूप मोठी गोष्ट वाचत बसायला वेळ नसतो. तसेही आजच्या नव्या पिढीला सगळं कसं झटपट हवं असतं. त्यांची ही वाचण्याची भूक भागवण्याचा प्रयत्न लेखिका वीणा रारावीकर यांनी ” गुजगोष्टी शतशब्दांच्या ” या लघुकथा संग्रहातून केली आहे. शंभर शब्दांच्या शंभर गोष्टी ही आपल्याला सोपी गोष्ट वाटू शकते..पण प्रत्यक्षात ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कथेचे मूल्य हरवू न देता आशय संपन्न कथा मर्यादित शब्दात लिहिणे म्हणजे कसोटीचे काम आहे. हे लघुकथा लेखनाचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. लघुकथा लिहिण्याचा एक प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे.
लघुकथेतील शंभर शब्दांच्या शंभर गोष्टी– यातली प्रत्येक गोष्ट नेटकी झाली आहे. कथेची मांडणी उत्तम आहे. नेमक्या शब्दात कथा मांडायची असल्याने शब्दांचा फाफटपसारा कुठे दिसत नाही. प्रत्येक शब्द विचार करून लिहिला आहे. तरीही कोणतीही कथा ओढूनताणून झाली आहे असे वाटत नाही. कथा प्रवाही आहेत. पटपट वाचून होतात.
लघुकथेतील विषय रोजच्या दैनंदिन जीवनातील असल्याने वाचकाला प्रसंग आपले वाटतात. वाचक कथेचा विषय आपल्या अनुभवाशी जोडून बघतो. कोणत्याच विषयाचे लेखिकेला वावडे नाही. आई, सासू, सून, नणंद भावजय, मुलगी, फिटनेस, ऑनलाईन शिक्षण,अपंगत्व, माणुसकी, वयोवृद्ध लोकांच्या समस्या,पदर,यासारख्या अनेक विषयांवर गोष्टी लिहिल्या आहेत. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण आहे.
लघुकथेची मांडणी प्रसंगाला धरून आहेत. लघुकथेचे काही विषय हलकेफुलके आहेत तर काही विषय विचार करायला भाग पाडणारे आहेत, तर काही विषय नवी शिकवण देणारे आहेत. तर काही विषय प्रबोधन करणारे आहेत. लघुकथेतून समाजाचे, व्यक्तीच्या स्वभावाचे, मनोवृत्तीचे निरिक्षण नेमक्या शब्दात लेखिकेने शब्दबद्ध केले आहे.
समाजात पावलोपावली पैश्याचे महत्व वाढताना दिसत आहे. आज पैश्यापुढे नात्यांची किंमत शून्य होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज नाती सोयीनुसार आठवतात, हे ‘ निर्मळ नाती ‘ या कथेतून स्पष्ट झाले आहे. गरज निर्माण झाली की विसरलेली नाती आठवतात. मनात तर असते पण आपण काही कारणाने दुरावतो. पण एखादा प्रसंग असा येतो जेव्हा आपल्याला कुणाच्या तरी आधाराची गरज निर्माण होते . जिथे नाती निर्मळ असतात तिथे कसलीच अडचण येत नाही.
आईचं प्रेम शाश्वत असतं. ते कोणत्याही कारणानं कमी किंवा जास्त होत नाही. आईचं प्रेम व्यक्त करण्यापलीकडेचे असते. सूनेने बोलणे तोडले, संबंध तोडले तरी आईच्या प्रेमावर याचा परिणाम होत नाही. आपलं मुल संकटात आहे म्हटल्यावर आई आपलं सर्वस्व पणाला लावते, हे “अहो आई” या लघुकथेतून अधोरेखित होते. आताच्या नव्या पिढीचे विचार,आचार, जीवनशैली वेगळी आहे.तरी त्यांच्यात प्रामाणिकपणा जिवंत आहे. येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता नव्या पिढीत आहे, हेच लेखिकेने ‘ पत्रास कारण की’ आणि ‘ पत्रास उत्तर की ‘ या लघुकथेतून मांडले आहे.
गरिबीनी गांजलेल्या मुलांच्या आयुष्यात काही क्षण आनंदाचे भरणारी श्यामल ” फुगे घ्या फुगे ”
या लघुकथेतून दिसते. पदर, निर्णय, हळदी कुंकू अशा अनेक गोष्टी मनात घर करून राहतात.
जीवनात अनेक समस्यांना समोरे जावे लागते. हेच खरं जगणं आहे. गुजगोष्टीतील लघुकथा हेच सांगतात. गोष्टी खूप मोठ्या नाहीत, प्रसंग साधेच आहेत. पण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा हवा. म्हणजे जगणं वेगळं, सोपं आणि सुंदर होते. प्रत्येकांने * गुजगोष्टी शतशब्दांच्या* हे पुस्तक जरूर वाचावे. या गोष्टीचा आनंद घ्यावा. जीवन जगण्याचा दृष्टीकोन बदलावा.
लेखिकेला पुढील लिखाणासाठी, साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा देते.
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈