डॉ मेधा फणसळकर
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “मन मे है विश्वास” – श्री विश्वास नागरे पाटिल ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
पुस्तक – मन मे है विश्वास
लेखिका – श्री विश्वास नागरे पाटिल
प्रकाशक – राजहंस प्रकाशन
मूल्य – 300 रु
“माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन- सामुग्रीन आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेने कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक ‘एकलव्या’ ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक – प्रपंच केला आहे.”
सध्या सगळ्या तरुण मुलांचे आयडॉल बनलेले ‛विश्वास नांगरे पाटील ‘ यांच्या आत्मकथनपर पुस्तकाच्या मलपृष्ठावरील त्यांचे मनोगत सर्वाना प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थीदशेपासून आजचा प्रशासकीय अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास , शिवाय 26/ 11 च्या हल्ल्यातील त्यांचे शौर्य या आत्मकथनात वाचायला मिळते.
सांगली जिल्ह्यातील ‛कोकरूड’ या अतिशय छोट्या गावातून आलेल्या या तरुणाने मारलेली भरारी बघताना अचंबित व्हायला होते. पण आत्ता जे प्रत्यक्ष दिसते आहे त्या मागची मेहनत प्रत्यक्ष पुस्तक वाचल्यावर लक्षात येते.
शहरात प्राप्त होणाऱ्या कोणत्याही सुविधा नाहीत, अभ्यासाची अपुरी साधने आणि आजूबाजूचा अर्धशिक्षित समाज या सगळ्या वातावरणातून एखाद्या मुलामध्ये ती अभ्यासू वृत्ती निर्माण होणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. पण अनेक जणांकडे अनेक कला उपजतच असतात. तशीच ही अक्षरांची जादू विश्वासच्या मनावर भुरळ पाडत होती. तो त्यात रमत गेला. त्याच्या नशिबाने त्याला शिक्षकही तितकेच चांगले मिळाले आणि तो यशाच्या पायऱ्या चढत गेला. दहावीला थोडक्यात बोर्डात नंबर हुकला तरी केंद्रात पहिला येऊन त्यांनी बाजी मारलीच होती.
पण प्रत्येक यशस्वी मुलाच्या आयुष्यात येणारी एक फेज त्यांच्याही आयुष्यात आली. सायन्स ला प्रवेश तर घेतला पण मन रमत नव्हते. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष! परिणामी बारावीला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगकडे जाण्याइतका स्कोअर झाला नाही. खूप विचाराअंती प्रथमवर्ष कला शाखेत प्रवेश घेतला. सर्वांनी खुळ्यात काढले ; पण लेखक आपल्या मताशी ठाम होते. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर “पाहिले वर्ष अभ्यासाची दिशा ठरवण्यात आणि राजकारण व गुंडगिरीचे प्रशिक्षण घेण्यात कधी संपले ते समजलेच नाही.” पण दुसऱ्या वर्षी जगदाळे सर त्यांच्या आयुष्यात आले आणि स्पर्धा परीक्षेची दिशा त्यांना मिळाली.
पण तोही प्रवास तितका सोपा नव्हता. मात्र तो प्रत्यक्ष पुस्तक वाचूनच वाचकाने समजून घ्यावा. आजकाल स्पर्धापरीक्षांचे फुटलेले पेव आणि त्याचा फायदा करून घेणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातींच्या पार्श्वभूमीवर विश्वास पाटलांचे कष्ट खरोखर आजच्या तरुणांना मार्गदर्शक ठरणारे आहेत.
मुळातच अंगात असणारी हुशारी, नेतृत्वगुण आणि शारीरिक सामर्थ्य याच्या जोरावर विश्वास पाटलांनी यश मिळवले आणि तोच प्रवास प्रांजळपणे या पुस्तकात मांडला आहे. आपल्या चुकाही तितक्याच परखडपणे नमूद केल्या आहेत. भाषेवर पहिल्यापासूनच प्रभुत्व असल्यामुळे ती ओघवती आहेच. म्हणूनच पुस्तक वाचताना कोठेही रटाळ वाटत नाही. सर्वांनी निश्चितच वाचण्यासारखे हे पुस्तक आहे. म्हणूनच 2016 पर्यंत त्याच्या चार आवृत्या निघाल्या.विशेषतः आजच्या तरुणाईने ते वाचवेच!
©️ डॉ. मेधा फणसळकर.
मो 9423019961.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈