☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ विनोदी कथा संग्रह – “फास्टफूड” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

पुस्तकाचे नांव : फास्ट फुड

लेखिका : श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक : शिवसृष्टी प्रकाशन

पहिली आवृत्ती : मधुश्री प्रकाशन तर्फे १९९८ (रु.९०/—)

तिसरी आवृत्ती :  १८ अक्टूबर २०१८

किंमत : रु. २४०/—

श्रीमती उज्ज्वला केळकर

सौ. ऊज्वला केळकर यांचा “फास्ट फुड”हा विनोदी कथा संग्रह नुकताच वाचनात आला.आणि मनापासून त्यांवर लिहावसं वाटलं.

या कथासंग्रहात एकूण अकरा कथा आहेत.कथांचा आकार लहान असला तरी अनेक प्रसंगांच्या गुंतागुंतीतून सकस विनोदनिर्मीती होत,कथा आशयपूर्ण शेवटास हसत खेळत पोहचते.

वास्तविक विनोदी लेखन प्रक्रिया ही सोपी नसते.निरीक्षण आणि प्रतिभा यांची ऊत्कृष्ट देन असणार्‍यांनाच हे जमते.हे पुस्तक वाचताना ऊज्वला ताईंच्या बाबतीत हे नक्कीच जाणवते.कथेतील विनोद हा ओढून ताणून आणलेला वाटत नाही तसेच केवळ हास्यासाठी द्वयर्थी शब्द वापरून केलेला पाचकळ,हीणकस विनोद ह्या कथांतून आढळत नाही.

विसंगती ,वास्तव आणि सहजता यांचे अचुक मिश्रण झाल्यामुळे विनोदाला दर्जा प्राप्त होतो. आणि त्याचा अनुभव या कथा वाचताना येतो.

या अकराही कथांमधे, केंद्रस्थानी, वेगवेगळी मानसिकताही वेगवेगळ्या विषयातून जाणवते.त्या त्या वेळच्या सामाजिक संदर्भातून हलकी फुलकी कथा जन्माला येते.

फास्ट फुड ही शीर्षक कथा आजकालच्या ईन्सटंट, सगळं काही तत्काळ या परिस्थितीवर मजेदार भाष्य करते. या फास्ट फुड मनोवृत्तीमुळे होणारं,नैसर्गिक असंतुलन, आणि त्याला निसर्गानेच घातलेली खीळ ही मध्यवर्ती कल्पना. मग भूलोकी, निरीक्षण करायला पत्रकार आणि फोटोग्राफर बनून आलेले , नारद आणि विष्णुदेव, यांनी घेतलेली सौ. संशोधिनी ब्रह्मे यांची मुलाखत…आणि  परमेश्वरी योजनानांच छेद देणरे त्याचे संशोधन भगवंत कसे ऊधळून लावतात याची मस्त हास्यकथा म्हणजेच “फास्ट फुड” कथा.

निसर्गापुढे मानव श्रेष्ठ असूच शकत नाही ,याची प्रचीती देणारी ही कथा…

घोरवाडी गावाचा सरपंच ढोरवाडी गावात नुकत्याच घडुन गेलेल्या कार्यक्रमावर कुरघोडी करण्यासाठी शिक्षक दिन आयोजित करतो,आणि या शिक्षक दिनाचा कसा घोळ होतो  हे खुसखुशीत ग्रामीण भाषेत वाचायला खूप मजा येते. “शिक्षक दिनाची गोष्ट” ही कथा वाचताना मला शंकर पाटील, द. मां मिरासदार, यांचीच आठवण झाली…

साहित्यक्षेत्रातल्या नकलीपणाला, बनावटगिरीला वाचा फोडणारी कथा म्हणजे “इथे साहित्याचे साचे मिळतील” ही कथा…काहीशी ऊपहासात्मक. ऊपरोधीक पण हंसत हंसत मर्मावर बोट ठेवणारी..

“स्वर्गलोकात ईलेक्शन” ही कथा अतिशय मार्मीक.

रूपकातून निवडणुक या भ्रष्ट ,राजकीय हेवेदावे ,यावर प्रकाश टाकणारी मजेदार गोष्ट!!

सर्वसाधारणपणे माणसाच्या काही सुप्त इच्छा असतात.

आपली, वैशिष्टपूर्ण ओळख असावी, आपला सन्मान व्हावा, झालास तर धनलाभही व्हावा.. आणि त्यासाठी केलेल्या धडपडीतून नेमकं काय निष्पन्न होतंआणि सारंच कसं हास्यास्पद ठरतं…हे  “शारदारमण गिनीज बुकात” शारदारमणांची सेटी, “मी मंगलाष्टके करते”

तसेच”हातभर कवीसंमेलनाची वावभर कहाणी या कथांतून अनुभवायला मिळतं.

“माझा नवरा माझी पाहुणी”ही कथाही मनुष्य केवळ संशयामुळे,भयग्रस्त होऊन मजेला कसा मुकतो ,हे गंमतीदारपणे सांगते.असे अनुभव कळत नकळत आपल्यालाही आलेले असतात म्हणून या गंमतकथेशी आपण जोडलेच जातो.

वरसंशोधन हा तसा ज्वलंत प्रश्नच आहे.”वन्संसाठी वर संशोधन..” या कथेतून याचाच शोध घेतलाय्.विनोद,हा वास्तवता आणि विसंगतीतूनच निर्माण होतो.ही कथा वाचताना हे जाणवतं.

“असे पाहुणे येती….”ही शेवटची कथा वाचल्यावर,

पुस्तक वाचुन संपले अशी एक चुटपुट मनाला लागते.

या कथेतले मिलीटरी शिस्तीचे मामा,कणखर बाणा असलेली आत्या ,तिचा नातु आणि या भिन्न वृत्तीच्या पाहुण्यांची सरबराई करताना ऊडालेली यजमानांची धांदल वाचताना अगदी सहज हसु येते.आणि कथेच्या शेवटी मामा आणि आत्यांची यजमानांची केलेली स्तुती पत्रे वाचून मन थोडं डुबतंही..माणसं निराळी असतात,

आपलं स्वास्थ्य बिघडवतात पण म्हणून ती वाईटच असतात ,असं नसतं. हे मनाला स्पर्शून जातं…

जाता जाता इतकंच ..फास्टफुड एक वाचनीय,निखळ विनोदी पण विचार देणारा कथासंग्रह…विनोदाच्या नादांत कुठेही संयम न सोडणारे ,सभ्य भाषेतील ऊत्तम लेखन…

ऊज्वलाताई तुमचे अभिनंदन आणि वाचकाची आवड पूर्ण करणार्‍या  पुस्तक प्रकाशनाबद्दल मनापासून आभार…आणि पुस्तकाच्या या तिसर्‍या आवृत्तीनंतरही अनेक आवृत्त्या प्रकाशित  व्हाव्यात या हार्दिक शुभेच्छा…!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments