सौ. उज्ज्वला केळकर
पुस्तकांवर बोलू काही
☆ “फिनिक्स” – लेखिका – सुश्री गौरी गाडेकर ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तकाचे नाव – फिनिक्स
लेखिका – गौरी गाडेकर
प्रकाशक – नीता बुक एजन्सी
पृष्ठे –२२२ मूल्य – ४०० रु.
गौरी गाडेकर या एक प्रथितयश कथालेखिका आहेत. त्यांचा कथालेख संख्यात्मकदृष्ट्या जसा चढता वाढता आहे, तसाच तो गुणात्मकदृष्टयाही चढता वाढता आहे. मोजकंच परंतु दर्जेदार कथालेखन त्यांनी केलं आहे. त्यांच्या कथा प्रामुख्याने घटनाप्रधान आहेत आणि बहुसंख्य कथा मध्यवर्गीय जीवनावर आधारलेल्या आहेत, पण त्या साचेबंद नाहीत. एक वेगळं अनुभविश्व, वेगळा आशय आणि व्यक्तिरेखांचं वेगळेपण त्यांच्या कथांमधून आपल्याला दिसतं. त्यांच्या नातं या अगदी पहिल्या संग्रहापासून त्यांच्या कथांचं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. त्यांच्या कथा आधी मासिकात प्रकाशित झाल्या आणि नंतर पुस्तक रूपाने वाचकांच्या भेटीला आल्या. नातं, आऊटसायडर, सहज व इतर; तिसरं पुस्तक, हनिमून आजी आजोबांचा आणि यानंतर प्रसिद्ध झालेलं पुस्तक म्हणजे फिनिक्स. या शिवाय वादळातील दीपस्तंभ, मृत्यूवर मात, लिंकन ऑन लीडरशिपही ही त्यांची अनुवादीत पुस्तके आहेत.
इथे मी विचार करणार आहे, तो ‘फिनिक्स’ या कथासंग्रहाचा. ‘फिनिक्स’ हे मिथक आहे. आपल्याच राखेतून ‘फिनिक्स’ पक्षी पुन्हा भरारी घेतो, असा लोकसमज आहे. इथे हे रूपकही आहे. जीवनातील निराशा, वैफल्य, औदासिन्य यांची राख बाजूला सारून पुन्हा उभारी घेणं, जीवनेच्छा बलवती होणं, आशा, उमेद वर्धिष्णू होणं, हेही ‘फिनिक्स’ पक्षाने राखेतून भरारी घेण्यासारखं आहे, नाही का? संग्रहातील काही कथांमध्ये असे दिसते.
संग्रहातील पहिलीच कथा ‘फिनिक्स’. त्यावरूनच संग्रहाचे नाव दिले गेले आहे, ‘फिनिक्स’. लेखिकेने, बर्याच दिवसांपूर्वी ‘फिनिक्स’ नावाची कविता लिहिली होती. नामसाम्यामुळे ती कविता, लेखिकेने सुरूवातीला दिली आहे. अतिशय सुरेख पण दुर्बोध अशी ही कविता आहे.
विविध रगांच्या विविध स्वभावाच्या, विविध वर्तनाच्या व्यक्तिमत्वांनी त्यांचं कथाविश्व गजबजलेलं आहे. यातील पहिलीच कथा ‘फिनिक्स ‘ अभय तिचा नायक. शाळेत यशस्वी त्याच्या वर्गात येतो आणि नाटकात राजा होण्याची त्याची संधी हुकते. टिपटॉप रहाणारा यशस्वी. अभ्यासात पुढे. परीक्षेत जास्त मार्क. तो कधी मुद्दाम अभयला त्रास देत नाही. पण त्याच्या अस्तित्वाचं दडपण अभयवर येते. त्याचा आत्मविश्वास हरवतो. त्याच्यात न्यूंगंड निर्माण होतो. त्यात पुढे दोन वेळा त्याचं लग्नं मोडतं. इंद्राणीशी साखरपुडा होतो. ती तो मोडून चार दिवसात यशस्वीशी लग्न करते. मग अभय लग्नच करत नाही. बँकेत नोकरीला लागतो. बँकेत कॉम्प्युटर येणार, कळल्यावर आपल्याला जमणार नाही, म्हणून व्ही.आर.एस. घेतो.
त्याच्या चुलत बहिणीच्या सांगण्यावरून एका निवांत गावच्या एका रिझॉर्टमध्ये तो येतो. तिथलं शांत, निवांत वातावरण त्याला आवडतं. एकदा फिरून येताना तो तिथल्या एका वृद्धाश्रमाजवळ येतो. तिथे त्याला यशस्वी आणि त्याचा मुलगा भांडत असलेली दिसतात. त्याची बायको नुकतीच पाच-सात दिवसापूर्वी गेलेली असते. मुलगा त्याचं रहातं घर विकून टाकतो. त्याला वृद्धाश्रमात राहायचं नाहीये, पण मुलगा सक्ती करतोय. अभयच्या लक्षात येतं, ‘बायको गेली. मुलगा, सून, नात असूनही तो एकटा आहे. ना राहायला हक्काचे घर, ना स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. अभयला वाटतं, यशस्वी हरला, आपण जिंकलो. ही जाणीव त्याला आंतरिक उभारी देते. परतताना त्याला कॉम्प्युटर इंस्टिट्यूट लागते आणि त्याला वाटतं, आत जाऊन बघूयात तरी. ज्या कॉम्प्युटरच्या धास्तीने त्याने बँकेतील नोकरी सोडलेली असते, ती गोष्ट त्याला करून बघविशी वाटते. इथे त्याच्या मनाने उभारी घेतलेली असते, गेलेला आत्मविश्वास परत येतो, म्हणून कथेचा नाव ‘फिनिक्स’.
‘हक्काचे घर’ ही कथासुद्धा कथानायकाने प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या भरारीने ‘फिनिक्स’च्या कल्पनेशी जवळीक जोडते. प्रमोद त्याचा दादा आणि वाहिनी चाळीतल्या एका खोलीत रहात असतात. फ्लॅटमध्ये राहायचे वाहिनीचे स्वप्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ते काही शक्य नाही. तेव्हा वाहिनी ठरवते, जो फ्लॅट देईल, त्याच्या मुलीशीच दिराचे लग्न करायचे. अर्थात प्रमोदला हे मान्य नाही. गावची मुलगी सांगून येते, तेव्हा, तो पळून जाऊन तिच्याशी लग्न करतो. तिथे सासरच्या घरी दोन खोल्या भाड्याने घेऊन रहातो. सासर्याच्या दुकानात काम करतो. गावच्या लोकांचा गरजेच्या वेगवेगळ्या वस्तू दुकानात ठेवतो. दुकानाची भरभराट त्याच्यामुळे होते. पुढे तो स्वत:चे स्वतंत्र दुकान काढतो. संधी मिळताच एक जुना बंगला विकत घेतो. त्याला थोडी डागडुजी, रंगारंगोटीते करतो. बंगला नवा होतो. वास्तुशांतीला दादा- वहिनींना आणतो. सहा खोल्यांचा बंगला पाहून दोघेही खुश होतात. थाटात वास्तुशांत होते. दादा आजारी असतो. रात्री तो जातो. बंगल्यात राहण्याचे नाही, पण स्वत:च्या हक्काच्या घरात मरण्याचे त्याचे स्वप्न पुरे होते. प्रमोद म्हणतो, ‘डोक्यावर छप्पर मिळालं, पण नियतीने डोक्यावरचं छत्रच काढून घेतलं.’
विविध प्रकारच्या आणि नमुन्याच्या व्यक्ती या संग्रहात आपल्याला भेटतात. सासूच्या (कुसुमच्या) कथा आपल्या नावावर देणारी सून (प्रिया) इथे आहे. (गुपीत) तुझा खोटेपणा मी जगासमोर आणीन, असं कुसुम म्हणताच ती उपहासाने म्हणते, ‘कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर? मी सांगीन माझंच हस्तलिखित यांनी चोरलं.’ मी आता कथा लिहिणारच नाही, असं कुसुम म्हणते, तेव्हा प्रिया उद्दामपणे म्हणते, जोपर्यंत तुम्ही माझ्या उपयोगाच्या असाल, तोपर्यंतच इथे मुलाजवळ, नातींजवळ राहू शकाल, नाही तर तुमची गावी रवानगी होईल. शेवटी कुसुमला नावापेक्षा, मुला-नातींचा सहवास महत्वाचा वाटतो आणि ती म्हणते, ‘हे गुपीत गुपीत ठेवण्यातच सगळ्यांचं हीत आहे.’
कुणाच्या खांद्यावर’ मधील नायिका ज्योती आपल्या प्रियकराच्या मुलांचं सांभाळ करायचं ओझं आपल्या खांद्यावर घेते. त्यांची आई होऊन त्यांना वाढवते. मोठं करते. प्रकाश आणी ज्योती लग्न करणार असतात, पण त्याची अम्मी आत्महत्या करण्याची धमकी देऊन प्रकाशचं लग्न, गावातल्या चित्राशी करतात. पुढे त्यांना दोन मुले होतात. एका अपघातात प्रकाश आणि चित्रा दगावतात. मग प्रकाशची आई ज्योतीला बोलावते. तिच्यावर अन्याय झाला म्हणून तिची क्षमा मागते आणि प्रकाशच्या मुलांना सांभाळ म्हणून सांगते. अन्यथा आपल्याला या वयात ही जबाबदारी पेलणार नाही. मुलांना अनाथाश्रमात ठेवावं लागेल, असं म्हणते. आपल्या प्रकाशची मुले अनाथाश्रमात वाढणार, हा विचार ज्योतीला सहन होत नाही आणि ती मुलांची आई होते. दीपिकाचे लग्न होते. नीरव प्रणालीशी लग्न ठरवतो. मग ती प्रणालीला सगळी हकिकत सांगते. प्रणालीही सासूसारखी जगावेगळीच. ती नीरवला सुचवते, ‘तुमची जबाबदारी आता संपलीय, आता तरी त्यांना स्वत:चं आयुष्य जगू दे. आपण त्यांच्यासाठी योग्य जोडिदार शोधू या.’
‘सेवाव्रती’ ही आल्हाद आणि प्रसाद या भावांची गोष्ट. प्रसाद आदिवासींसाठी कार्य करतोय. त्याला ‘सेवाव्रती’ पुरस्कार मिळालाय, पण खरा ‘सेवाव्रती’ आल्हाद्च कसा आहे, हे लेखिकेने कथेत रंगवलय. कथेच्या शेवटी आल्हादच्या सोडून गेलेल्या बायकोचा अपर्णाचा फोन येतो, ती म्हणते, ‘ प्रसादला पुरस्कार मिळाला… आनंद झाला. पण मला वाटतं, सेवाव्रती…खरे सेवाव्रती तुम्ही आहात. खूप चांगले आहात तुम्ही …. सामान्य माणसांना पेलवणार नाही, एवढे चांगले …..म्हणूनच मलाही…’
लोळा-गोळा झालेल्या मुलाला त्याचे कपडे काढून उन्हात-पावसात त्याला सार्वजनिक ठिकाणी झोपवून स्वत: निवांत सावलीत बसणारा, त्याच्या जिवावर पैसे गोळा करणारा स्वार्थी बाप इथे आहे. (गोळा). कडक शिस्तीची, कर्तव्य कठोर, तत्ववेत्ती प्राध्यापिका इथे आहे. एका क्षणी तिला जाणीव होते, ‘आपण ज्याला विजय समजत होतो, ती प्रत्यक्षात शिक्षा होती एकांतवासाची. नातलगांपासून दूर, भाव-भावनांच्या, प्रेमस्नेहाच्या खिडक्या नसलेल्या एका अंधार कोठडीत कैद होतो आपण’ ही जाणीव तिला होते. आपल्या नातवाचंही भविष्य असं घडू नये, या विचाराने ती बदलते.
‘स्त्रीणाम् भाग्यम्’ मध्ये आरतीच्या दोन मैत्रिणींच्या कथा आहेत. दोघींचा जीवन प्रवास परस्पर विरुद्ध दिशेने होतो. दोघी तिच्या चौथीच्या वर्गातल्या मैत्रिणी. . तज्ज्ञा देखणी, हुशार,, टिपटॉप रहाणारी, श्रीमंत. तर सुभद्रा गरीब. बावळट, आजागळ. तज्ज्ञाला बारावीत मार्क कमी मिळतात. ती डॉक्टर होण्याचे वडलांचे स्वप्न भंग होते. मग ती तिला सहानुभूती दाखवणार्या मुलाशी लग्न करते. मग गरिबी तिच्या गळ्यात माळ घालते. आरतीला ती अनेक वर्षांनी भेटते, तेव्हा ती अगदीच बावळट, आजागळ अशी दिसते. याउलट वर्गात बावळट, आजागळ दिसणारी सुभद्रा, संधी मिळताच फिनिक्सप्रमाणे भरारी घेते. आपलं व्यक्तिमत्व सुधारते. शिकते. पुढे चटपटीत एअर होस्टेस होते. दोघींचा दोन दिशांना होणारा प्रवास लेखिकेने छान रंगवलाय.
पत्नी अपघातात गेल्यानांतर, तिच्या डायर्या वाचल्यावर आपण तिच्या मनाचा, इच्छांचा विचार केला नाही, तिला सतत गृहीत धरले, यामुळे पश्चत्तापदग्ध झालेला पती ‘तू बोललीच नाहीस’मधे भेटतो, तर ‘एकुलती’ मध्ये सतत स्वत:च्या मनाप्रमाणे वागणारी केतकी किरकोळ कारणावरून कार्तिकला घटस्फोट द्यायचं ठरवते, अन वडलांच्या आजारपणात कार्तिकने केलेली धावपळ, त्यांची सेवा-सुश्रुषा यामुळे तिचं मतपरिवर्तन होतं. अशा अनेक विविध रंगांच्या, स्वभावाच्या, विविध वर्तन करणार्या व्यक्ती यातील कथांमधून भेटतात.
कथासंग्रहातील कथांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की यातील संवाद चटपटीत आहेत. हे संवाद आणि घटना-प्रसंगांचं यथार्थ वर्णन, यामुळे त्या त्या व्यक्ती आणि ते ते प्रसंग साक्षात डोळ्यापुढे उभे रहातात.
पुस्तक अतिशय वाचानीय आहे. सर्वांनी वाचून यातील कथांचा आनंद घ्यावा.
परिचय – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈