सुश्री वीणा रारावीकर

? पुस्तकावर बोलू काही?

☆ ललिताक्षरं… लेखिका – डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे, चारुशीला धर, प्रा. विजया पंडितराव, सुश्री वासंती वर्तक : संपादन – संपदा जोगळेकर कुलकर्णी ☆ परिचय – सुश्री वीणा रारावीकर ☆

पुस्तक – ललिताक्षरं (ललितलेखनाचा खजिना)

लेखिका – डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे, चारुशीला धर, प्रा. विजया पंडितराव, सुश्री वासंती वर्तक

संपादन – संपदा जोगळेकर कुलकर्णी

प्रकाशक – ग्रंथाली

पृष्ठ संख्या – १८३

मूल्य – ३५० रुपये

पद्य आणि गद्य यातील विविध रुपांचा समन्वय साधत स्वतःचा वेगळा बाज निर्माण करणारे ते ललितलेखन किंव ललित गद्य. म्हटले तर नियमात बसणारे, नाही तर नियम बाह्य (फॅारमलेस फॅार्म). याची वैभवशाली परंपरा लाभलेली मराठी भाषा. ललितलेखनातील इरावतीबाई कर्वे, दुर्गाबाई भागवत, शांताबाई शेळके या त्यातील काही प्रतिभासंपन्न लेखिका.

असाच एक ललितलेखनाचा खजिना घेऊन आल्या आहेत, चार लेखिका. डॉ. वसुधा सहस्त्रबुध्दे, चारुशीला धर, प्रा. विजया पंडितराव, वासंती वर्तक. चार वेगवेगळ्या क्षेत्रातील लेखिकांनी एकत्र मिळून लिहिलेला  ‘ललिताक्षरं’ हा ललित संग्रह. या संग्रहात प्रत्येक लेखिकेचे विविध विषयांवरील अकरा ललितलेख आहेत. आणि एका रेखाचित्रावर आधारीत शेवटचा बारावा लेख. असे या पुस्तकाचे स्वरुप. लेखिका संपदा जोगळेकर यांनी ठाणे आर्ट गिल्ड यांच्या सहाय्याने अशा प्रकारचा प्रयोग केलेले हे चौथे पुस्तक. त्यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.

सुप्रसिध्द लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक. ललितलेख म्हणजे काय हे सांगत त्यांनी प्रस्तावनेला सुरवात केली आहे. आणि पुढे जाताना प्रत्येक लेखिकेच्या लेखांबद्दल उहापोह केला आहे. यातूनच पुस्तकाचे एक चित्र वाचकाच्या मनात तयार होते. पुस्तक वाचताना मनात रेखाटलेल्या या चित्राला मूर्त स्वरुप प्राप्त होते. आणि त्याचप्रमाणे “Look deep into the nature and then you will understand everything better” अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या या वाक्याची प्रकर्षाने जाणीव होते. कारण प्रत्येक लेखिकेची निसर्गाबद्दलची अनामिक ओढ. त्यातून प्रकट होणारी संवेदनशीलता, तरल भावना, आयुष्याकडे बघायचा एक आशावाद  या लेखांमधून अनुभवायला मिळतो.

स्त्री म्हणून जगताना रोजच्या आयुष्यात घडणारे साधे – साधे प्रसंग. त्याची तितक्याच सहजसोप्या शब्दात केलेली मांडणी. सकाळच्या ताज्या दूधाचा चहा किंवा बाहेरून येताना मुलांसाठी काहीतरी घरी न्यायला हवे, याची मनातली खूणगाठ. सर्व स्त्रीवर्गाचा अनुभव सारखाच. म्हणूनच हे पुस्तक आपल्या मनाला अलवारपणे भिडते.

‘‘शो’ की स्पर्धा’, शेजार, ‘पार्टी’ किंवा ‘‘न्यूड’ सारखे लेख सामाजिक प्रश्नावर भाष्य करतात. आणि वाचकाला विचार करायला लावतात.

सध्याच्या जीवनात माणसा-माणसामधील संवाद कमी होऊ लागला आहे. अशावेळी वसुधाताईंनी आपल्या लेखातून, मनामनाचा निःशब्द संवाद अधोरेखित केला आहे. त्यातून मिळणारा आनंद, आधाराचा अनुभव  त्यांनी यथोचित मांडला आहे.

मॅनेक्वीनचे किंवा बोगनवेलचे आत्मवृत,असे निबंधपर विषय. तरीही त्यातून प्रकट होणाऱ्या भावना वाचकाला गुंतवून ठेवण्यात चारुशीलाताई यशस्वी झाल्या आहेत. 

बोडण, अनोखे रक्षाबंधन, मोठी रेघ अशा लेखांमधून लघुकथेचे रुप समोर येते. अनोखे रक्षाबंधन मध्ये ‘रक्षाबंधन कोणाचे’ याचे गुपित शेवटपर्यंत ताणत, विजयाताईंनी लेखात रंगत वाढवली आहे. 

लेखाच्या सुरवातीला प्रवासाची एक साचेबंद व्याख्या वासंतीताईंनी मांडली आहे. अन् या प्रवासाचा शेवट होतो तो मदतीची अन् संस्कारांची साखळीमधील एका व्यापक अर्थाने.

चौघींचेही लेखन अनुभवसिध्द आहे. त्यातून जीवनाकडे बघण्याचा त्यांचा तयार झालेला एक व्यापक दृष्टिकोन आहे. म्हणूनच त्यांच्या लेखांमधून त्या वैश्विक सत्य सहजपणे सांगून जातात.

प्रत्येकीचा शेवटचा लेख त्रिशूळाच्या रेखाचित्रावर आधारीत आहे. या त्रिशूळावर डमरू, कमळ, ॐ, रुद्राक्षाची माळ असे सर्व रेखाटले आहे. शंकराच्या हातातील त्रिशूळापलीकडे जाऊन प्रत्येकीने आपापली कल्पनाशक्ती पणाला लावली आहे. या प्रत्येक चिन्हाचा प्रत्येक लेखिकेने एक वेगळा अर्थ आपापल्या लेखात उमटवला आहे.

वासंतीताईंना हा त्रिशूळ कॉलेजमधील एका मुलाच्या दंडावर टॅटू म्हणून आढळतो. पण त्यामध्ये त्यांनी फक्त फॅशन बघितली नाही. तर त्यामधून विविध समजूती किंवा संस्कृतीमधून प्रकट होणारे त्रिशूलाचे नवीन अर्थ शोधले. विजयाताईंना आत्मविश्वास, निर्भरता याचा हा त्रिशूळ असुरक्षित महिल्यांच्या हाती मिळायलाच हवा असे वाटले. चारुशीलाताईंना या त्रिशूळावरून बंगाली समाजाची दुर्गा पूजा आठवली. व त्यात त्यांना  एकाचवेळी तांडव आणि लास्य नृत्य याचा संगम दिसू लागला. वसुधाताईंना मात्र परमवीर चक्र मिळालेल्या देशासाठी बलिदान करणाऱ्या सैनिकाची आठवण झाली. अशा प्रत्येकीच्या विविधांगी कल्पना.

ग्रंथाली प्रकाशित या पुस्तकाच्या नावाला व अर्पण पत्रिकेला साजेसे मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी रेखाटले आहे.

मराठी भाषेची आणि ललित लेखनाची समृध्दी अनुभवायला, निसर्ग व मानवामधल्या अनुबंधाची अनुभूती घ्यायला, आपल्या रोजच्या जीवनातील प्रसंगांचे वर्णन लेखिकेच्या लेखणीतून वाचताना येणारा पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी, हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे.

परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर

चर्चगेट, मुंबई

मो – ९८१९९८२१५२, ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments