सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
पुस्तकावर बोलू काही
☆ आकाशाशी जडले नाते… सुश्री विद्याताई माडगूळकर ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
पुस्तक परिचय
लेखिका : विद्याताई माडगूळकर
प्रकाशिका – सौ. शीतल श्रीधर माडगूळकर
गदिमा प्रकाशन, ‘पंचवटी’,११ पुणे -मुंबई रस्ता, पुणे. – ४११ ००३
—आत्मचरित्र कै. विद्याताई माडगूळकर, जन्म- 1925, मृत्यू- 1994.
हे आत्मचरित्र विद्याताई माडगूळकर यांनी लिहिले. परंतु ते त्यांच्या मृत्यूनंतर शितल माडगूळकर यांनी प्रसिद्ध केले हे पुस्तक 14 डिसेंबर 1996 रोजी प्रसिद्ध झाले. त्याबद्दल सौ. शीतल यांना खूप खेद वाटतो.
‘प्रिय कविराज…. तुम्ही आणि मी लावलेल्या वडाचा विस्तार आता खूपच फोफावला आहे…. अशी सुरुवात करून… शेवटी ‘तुमची मंदी’ या शब्दात पुस्तकाची सुरुवात होते.
सुरुवातीला विद्याताईंनी आपल्या माहेरच्या कुटुंबाविषयी माहिती दिली आहे. त्यांचे घराणे अस्सल कोकणातले! त्यांचे माहेरचे आडनाव पाटणकर असे होते.
पोटापाण्यासाठी हे कुटुंब सांगलीला येऊन हरिपूर येथे स्थिरावले. विद्याताईंचे वडील लहान असताना मामांबरोबर रत्नागिरीला गेले, नंतर ते कोल्हापूरला आले व तिथून पुढे सांगली जवळ हरिपूरला त्यांच्या स्वतःच्या घरी आले. ते जुने घर स्वच्छ करून ते तिथेच राहिले. त्यांचे लग्न कृष्णाबाई नातू यांच्याशी झाले व तीच पाटणकर यांची पत्नी ‘भागीरथी’ झाली. गदिमांच्या पत्नीचे माहेरचे नाव पद्मा पाटणकर असे होते.
एक डिसेंबर 1925 या दिवशी गदिमांचा जन्म कोल्हापूर येथे झाला.
विद्या ताईंचा जन्म ही कोल्हापूर येथे झाला. त्यांचे बालपण कोल्हापूर मध्ये आनंदात गेले. या बालपणीच्या काळाचे खूप छान वर्णन विद्याताई म्हणजेच गदिमांच्या पत्नी, यांनी केले आहे. विद्याताईंनी सांगितलेल्या, लिहिलेल्या सर्व आठवणी शीतलताईंनी एकत्र करून हे आत्मचरित्र पर पुस्तक लिहिले आहे.
त्यामुळे विद्याताईंच्या शब्दातच ते पुस्तक लिहिले गेले आहे. विद्याताई म्हणतात,’ त्यांचा आवाज चांगला होता. त्या गाणे छान म्हणत असत. परंतु लग्नानंतर मात्र त्यांचे गाणे म्हणणे बंद झाले.’
१९४० साली त्यांची गदिमांशी ओळख झाली. ते औंध संस्थानातून आले होते. ही त्यांची पहिली भेट होती. पुढे रंकाळा तलावावर फिरताना त्यांच्यातील प्रेम कमळ फुलले आणि दोघांच्यातील प्रेम वाढीस लागले. इतक्या जुन्या काळातील या प्रेमप्रकरणाची माहिती पद्माताईंनी(नंतरच्या विद्याताई)खूप छान सांगितली आहे आणि शीतलताईंनी ते छान शब्दबद्ध केले आहे. देशस्थ -कोकणस्थ असा हा विवाह संबंध होता.
लग्नानंतर माडगूळ ला जाणे, तेथील गृहप्रवेश तसेच गदिमांच्या सर्व लहान भावांचा परिचय या गोष्टींची माहिती कळते. गदिमा गाणी लिहू लागल्यानंतर त्यांचे कोल्हापूर येथे जाणे- येणे वाढले. एकत्र कुटुंब होते पण माडगूळ ला जाऊन येऊन कविराज राहत असत. विद्याताई त्यांना “कविराज” म्हणत. कोल्हापूरला लता मंगेशकर, भालजी पेंढारकर या सर्वांशी त्यांचा परिचय होता. मध्यंतरीच्या काळात विद्याताईना मोठा आजारही झाला होता. तेव्हा गदिमांनी त्यांची खूप काळजी घेतली होती. नंतरच्या काळात विद्याताईंनी कोल्हापूर, मग मुंबई आणि नंतर पुणे अशा तीन ठिकाणी संसार मांडला होता.पुण्यातील ‘पंचवटी’ हे त्यांचे आवडते ठिकाण होते.गदिमांच्या प्रत्येक चित्रकथा ते विद्याताईना प्रथम वाचून दाखवत असत. विद्याताईंवर त्यांचे खूप प्रेम होते. सुरुवातीच्या काळात विद्याताईना गदिमांच्या संसारात खूप हाल, कष्ट भोगावे लागले. गदिमांना माणसे गोळा करण्याची आवड होती. घरातील परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे विद्याताईना असेल त्या पैशांमध्येच घर संसार चालवावा लागत असे. तसेच माडगूळकरांचे कुटुंब ही मोठे होते, त्यामुळे शेती मध्ये मिळणाऱ्या उत्पन्नात माडगूळ येथील घर चालवावे लागत असे.
नंतर बाबूजींबरोबर (सुधीर फडके)
गीत रामायणाचे कार्यक्रम सुरू झाले, तसेच चित्रपटामुळे थोडाफार पैसा हातात खेळू लागला आणि.त्यांना चांगले दिवस आले.विद्याताईंना बेबी, लता, श्रीधर, आनंद, शरद अशी मुले होती. पुण्यात आल्यावर मुलांना शिक्षणासाठी चांगली शाळा व कॉलेज मिळाले. 1951 साली प्रपंच तर वाढला पण कामे नाहीत अशी स्थिती होती. पण लवकरच पुन्हा लिखाण चालू झाले. महिन्यां मागून महिने, वर्षे जात होती. 1953 साली वाकडेवाडी जवळ स्वतःचे घर घेतले. पु.भा. भावे गदिमांचे जवळचे मित्र होते. दोघांचाही स्नेह कसा होता, याबद्दलही विद्याताईंनी खूप छान प्रसंग वर्णन केले आहेत.गीत रामायणाच्या काळात सर्व परिस्थिती सुधारली. पुस्तक वाचताना आपण त्यात इतके रंगून जातो की तो क्षण ,ते प्रसंग जगत असतो. एका थोर लेखकाच्या पत्नीचे हे आत्मकथन आहे. ते अतिशय साध्या शब्दात पण ओघवते मांडले आहे.गदिमांना भरपूर सन्मान मिळाले आणि कुटुंबाला चांगले दिवस आले.
त्यांच्या आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे ज्या पारखे कुटुंबात त्यांची मुलगी दिली होती, त्या कुटुंबातील तिघांचा एक्सीडेंट मध्ये झालेला मृत्यू! गदिमांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला होता! गदिमांचे एक मोठे ऑपरेशन झाले आणि त्यांचे एक फुफ्फुस काढले होते. 14 डिसेंबर 1977 या दिवशी संध्याकाळी गदिमांचा मृत्यू झाला.
जगाला आनंद देणारा ‘महाराष्ट्राचा वाल्मिकी’ काळाच्या पडद्याआड लोपला होता. आकाशाची जडलेले विद्याताईंचे नाते संपले होते.
विद्याताईचे दुःख खूपच मोठे होते.
मुले, सुना, नातवंडे यांच्या सहवासात त्यांनी आपले उर्वरित आयुष्य शांतपणे घालवले.
या पुस्तकात गदिमांच्या आयुष्याचा पूर्ण आलेख उलगडला गेला आहे. विद्याताईंनी सांगितलेल्या, लिहिलेल्या सर्व आठवणींना एकत्र करून त्यांचे हे आत्मचरित्र शीतलताईंनी 1996 साली आपल्याला वाचनासाठी उपलब्ध करून दिले.. वाचनीय असे हे आत्मचरित्र आहे. गदिमां बद्दल आपल्याला असणारा आदर या पुस्तकाच्या वाचनाने अधिकच वाढतो.
परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे, पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈