सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

स्व परिचय 

शिक्षा – M. A., B. Ed., M. S. W., Y. C. B. Yoga level 2. (सेवानिवृत्त)

मला वाचनाची व लेखनाची आवड सुरवाती पासूनच आहे. मी पुस्तक वाचले की त्या माझा अभिप्राय विषयी लिहतेच. मी गेली 15 वर्षे योग व प्राणायामचे क्लास घेते आहे. मला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे अनेक सामाजिक संस्थांना भेटी देऊन त्यांच्या कार्याची पद्धत समजून घेतली आहे.त्या पद्धतीने मी स्वतः सामाजिक काम करते आहे.

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “बिकट वाट” – लेखिका – सुश्री नीती बडवे ☆ परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे ☆ 

पुस्तक – बिकट वाट

लेखिका – सुश्री नीती बडवे

प्रकाशक – साधना प्रकाशन

पृष्ठे – ११२  मूल्य- 150 रु.

परिचय : सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

बिकट वाट… – सहा महिलांचा जीवनसंघर्ष – सुश्री नीती बडवे

नीती बडवे या पुणे विद्यापीठात जर्मन भाषेचे अध्ययन-अध्यापन करत असताना, त्यांनी जर्मन भाषिकांना आपल्या नजरेतून भारतातील सर्वसामान्य बायकांच्या मानसिक बळाच्या आणि अंतरिक शक्तीच्या गोष्टी जर्मन भाषेतूनच सांगण्याच्या निमित्ताने एक प्रकल्प हाती घेतला. त्यांनी ठाणे – रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या मुलाखती घेतल्या.त्या अगोदर जर्मन भाषेत प्रसिद्ध केल्या. नंतर या मुलाखती मराठीतून बिकट वाट…….सहा महिलांचा जीवन संघर्ष या पुस्तकातून वाचकांसमोर ठेवल्या आहेत. यामध्ये एकूण सहा महिलांच्या मुलाखती दिल्या आहेत. प्रत्येकीची कहाणी वेगळी. पण जगण्याची आणि जगवण्याची जिद्द, कोणत्याही संकंटा समोर हतबल न होता लढा देण्याची हिंमत मात्र सारखीच. अशा या माझ्या मैत्रिणी जीवनात यशस्वी झाल्या आहेत.

सुभद्राबाई चार बहिणी व भाऊ. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यामुळे शाळे ऐवजी वडिलांसोबत अगदी लहानपणापासूनच हातात कोयता घेऊन कामावर जावे लागे.लहान वयातच ज्या व्यक्तीला पहिली पाच मुलं आहेत पत्नी देवाघरी जाऊन महिनाच झाला आहे. अशा व्यक्तीशी  सुभद्राबाईचा नाईलाजाने  विवाह झाला.    सासरीही परिस्थिती अशीच नवरा रोज कामाला जायचा आणि सुभद्राबाई  घरातल्या पाच मुलांचा सांभाळ करायची. थोड्या दिवसांनी तिलाही दिवस गेले. ती गरोदर असतानाच सासूने त्यांना घराबाहेर काढले. रहायला जागा नाही, खायला कांही नाही. वडील चार दिवस पुरेल इतके सामान देऊन गेले. चार दिवसांनी ही नऊ महिन्याची गरोदर असूनही रोजगाराला जाऊ लागली. घरातून बाहेर काढल्यानंतर आठव्याच दिवशी बाळंतपण झालं  मुलगा झाला. घर म्हणजे अडोसा फक्त. तिने पाचव्या दिवशी कुटुंबनियोजन ऑपरेशन करून घेतले.तिच्या सावत्र मुलीने की जी फक्त नऊ वर्षाची होती तिने आईचे पाच आठवडे बाळंतपण केले. घरात खाण्यापिण्याची वानवाच असल्यामुळे ती  घरी बसून  गोधडी शिवू लागली. एक गोधडी शिवली की १००₹ मिळायचे. त्यातून ती पैसे साठवू लागली.असंच सुभद्राबाईला एका मैत्रिणी कडून महिला गट व हॅलो या सामाजिक संस्थेची माहिती मिळाली. त्यातून ती बचत गटाशी जोडली गेली व बचत करू लागली. तेही नवऱ्याला न समजता. एक दिवस नवऱ्याला आर्थिक अडचण आल्यामुळे त्याने बायकोकडे मला कुठूनही पैसे आणून दे अशी मागणी केली. यावेळी तिने आपल्या नवऱ्याला या बचत गटाविषयी माहिती दिली. नवऱ्याला पैशाची गरज असल्यामुळे त्याने तिला बचत गटाच्या सभेंना हजर राहण्याची परवानगी दिली. प्रथम या बचत गटातून पाचशे रुपये कर्ज घेऊन गाय विकत घेतली व तिथून त्या दोघांच्या लघु उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कांही दिवस गाई घेणं विकणे, नंतर गोबर गॅस त्यावर चालणारे शेवया मशीन, तेल घाणा असे उद्योग सुरु केले. आपल्या सोबतच इतरांनाही यासाठी प्रोत्साहन दिले. कर्ज काढणं, वेळेत फेडणे, नवनवीन छोटे व्यवसाय, उत्पादित मालाची विक्री हे सर्व त्या करू लागल्या.. हे करत असताना अडचणी तर नेहमीच येत राहिल्या. अडचणी धीराने, संयमाने सोडविल्या . लहान वयात लग्न झाले. निरक्षर तरीही, सगळ्यांना आपलं मानून नेटाने आपला संसार केला आणि इतर मैत्रिणींचेही संसार उभी करणारी सुभद्राबाई.

अक्कलकोट तालुक्यातील दहीठण या गावची  नागिणी सुरवातीला 11 वी पर्यत शिक्षण झाले. पुढे शिक्षणाची इच्छा असूनही न शिकता आलेली नागिणी. 11 वी नंतर मात्र तिच्या वडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध मामाशी लग्न लावून दिले.सुरवातीला शेतमजूर  नंतर पुण्यात हमालीचे काम मिळाल्याने तो नगिणीला घेऊन पुण्याला गेला. हमाली करत असल्यामुळे एखाद्या गाडी सोबत तो चार -आठ दिवस बाहेरच असे. नागिणीला आपण रिकामं बसून वेळ घालवतो आहे. या विचाराने ती सतत नाराज असे. दोन वर्षांनी ती गरोदर असल्यामुळे बाळंतपणासाठी माहेरी आली. मुलगी झाली ती आपल्या बाळाला घेऊन पुन्हा पुण्याला न जाता सासू जवळच राहिली. आता सासरी ती, तिचं बाळ, सासू, व अपंग दिर की त्याच सर्व करावे लागे. तरीही ती सासरीच राहिली. थोडया दिवसांनी नवराही गावीच येऊन काम करू लागला. तेवढ्यात दुसरे मुलही झाले.पण इकडे नवऱ्याची तब्बेत सतत बिघडू लागली.त्यामुळे तो अधिक अधिक खंगत गेल्याने तो घरीच बसून असे. एक दिवस हॅलो फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांना शिकलेली महिला हवी होती, की जी घरोघरी जाऊन आरोग्या संबधी माहिती देऊ शकेल. म्हणून गावकरी तिला घरी बोलवायला आले.कारण पुर्ण गावात ती एकटी शिक्षित महिला होती. ती त्या सभेला गेली पाठोपाठ नवराही गेला आणि जेंव्हा तिला कार्यकर्त्यांनी या कामासंबंधी विचारले तेंव्हा ती गोंधळून गेली. पण नवऱ्याने ती हे काम करेल म्हणून सांगितले.तेंव्हा तिलाही आश्चर्य वाटले.कारण घरी मुलं लहान, दिर अपंग, नवरा कामावर जात नाही आणि तिला प्रशिक्षणासाठी  तीन आठवड्यांसाठी  शहरात जावे लागणार होते. नवऱ्याच्या सहकार्यामुळे तीने तो कोर्स पूर्ण केला. त्या कोर्स मध्ये तिला शरीर रचना, व्याधी, औषधं याची माहिती मिळत होती. त्यामुळे ती नवऱ्याच्या आजराविषयी सजग झाली.  कोर्स पुर्ण करून आल्याबरोबर नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली. तिने डॉक्टरांना  मी भारत वैद्य हा कोर्स केला असल्याचे सांगितले. डॉक्टरनी नवऱ्याची रिपोर्ट पाहून कांही न बोलता तिच्या हातात एड्स माहिती पुस्तिका दिली. तिची शंका खरी ठरली. तिच्या वयाच्या २१ व्या वर्षी तिला वैध्यव्य आले. ती दुःखी, निराश झाली.त्याचवेळी फाउंडेशनचे लोक तिच्या मदतीला आले. तिला सोबत घेऊन ते  वस्तीवर जाऊन सर्वे करू लागले. हे काम नागिणी मनापासून करू लागली. फाउंडेशनच्या लोकांसोबतच आनंदवनला गेली. तिथल्या लोकांच्या कामाच्या पद्धतीने ती भारावून गेली. तिथून परतल्यावर कामाला लागली. पण नवरा एड्सने गेल्यामुळे लोक तिला टाळू लागले, तिच्याकडून औषधं घेत नसत.  शिवाय ऐन तारुण्यात आलेलं वैध्यव्य यामुळेही तिला त्रास सहन करावा लागला. या सर्व अडचणीवर मात करून ती भारत वैद्य कामात यशस्वी ठरली. त्यानंतर महिला बचत गट तयार केले.गावाला २००१ चे स्वच्छता अभियानचे बक्षीस मिळवून दिले. दारूबंदी वरतीही काम करते.. नर्सिंग कोर्स केला. या सगळ्यातून मिळणार मानधन अत्यंत तुटपुंज तरीही आपल्या बांधवांसाठी काम करतो याचे समाधान नागिणीला आहे.अशी समाजबांधवांसाठी धडपडणारी नागिणी.

नीरा ही दहावी नापास. वरसई गावची ठाकर जमातीतील. वडील एका शिक्षकाच्या घरी काम करत होते. त्या शिक्षकांच्या सांगण्यावरून  त्यांनी नीराला शाळेत घातले. तिच्या सोबत तीन मुलीही शाळेत जाऊ लागल्या. ती आश्रम शाळा असल्याने तिथेच राहण्याची सोय देखील होती. पण मुलींना घर सोडून रहायची सवय नसल्याने त्या सतत घरी पळून येत. निराच्या आजोबांनी मात्र नीराला एकटं वाटू नये म्हणून एकांच्या घरीच ठेवले. त्यामुळे नीरा नियमित शाळेत जाऊ लागली. आठवी ते दहावी पर्यंत तिला दररोज आठ कि.मी. चालत जावे लागे.  नीराला दहावी पास होता आलं नाही याची खंत आहे.पण  कांही तरी काम करण्याची इच्छा असल्याने ती अंकुर या सेवाभावी संस्थेची जोडली गेली. तीने समजसेविका प्रशिक्षणाचा कोर्स केला. या कोर्समुळे तिला बरेच काही शिकता आलं. सुरुवातीला संस्थेने तिच्यावरती तीस झोपड्यांच्या ठाकरवाडीची जबाबदारी दिली. कांही दिवसांनी आणखी पाच वड्यांची जबाबदारी दिली.  तेथील वाड्यावस्त्यावरील मुलांना शाळेत जाण्याची प्राथमिक तयारी करून घेण्यासाठी अंगणवाडी निर्माण करणे. हे अवघड काम सहज तिने केले. यानंतर तिने वाड्यावस्तीवरील लोक भारताचे नागरिक आहेत हे सिद्ध केले. वाडीचं अस्तित्व कायद्याने मान्य करून घेतले. वाडया जवळच्या पंचायत क्षेत्राला जोडून घेतल्या. आदिवासी बांधवांना जमिनीवर त्यांचा हक्क  मिळवून दिला . वस्तीवरील सर्व लोक अशिक्षित असल्यामुळे सर्व तिलाच करावे लागत होते.त्यासाठी सर्वे करणं, फॉर्म भरणं, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं. प्रसंगी मंत्रलयात जाऊन तिने आपल्या बांधवाना न्याय मिळवून दिला. अशी ही दहावी नापास नीरा. सुरवातली बोलण्यात आत्मविश्वास नव्हता. अनुभवाने आत्मविश्वास मिळवून कलेक्टर, आमदार, मंत्री यांच्या समोर समाजाच्या समस्या मांडून त्या सोडविल्या.

तर अशा या सहा महिलांची कहाणी वेगवेगळी. प्रत्येकीचे संसार गाणे निराळे पण तरीही स्वतःसाठी व समाज बांधवांसाठी झटण्याची धडपड मात्र सारखीच. कमी शिक्षण, शहरी समाजाचा संपर्क कमी, भाषेतील फरक तरीही यांनी निडरपणे परिस्थितीशी संघर्ष केला आणि त्या यशस्वी ठरल्या. अशा या जिद्दी महिलांविषयीचे हे पुस्तक नक्कीच आपल्याला प्रेरणा देणारे असल्याने सर्वांना वाचनीय असेच आहे.

लेखिका – सुश्री नीती बडवे

परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments