सौ. रेखा दयानंद हिरेमठ
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘द अल्केमिस्ट’ – लेखक – पाउलो कोएलो अनुवाद – श्री नितिन कोत्तापल्ले ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆
पुस्तकाचे नाव – द अल्केमिस्ट
लेखक – पाउलो कोएलो
अनुवाद – नितिन कोत्तापल्ले
पद्मगंधा प्रकाशन
पृष्ठसंख्या-160
अल्केमिस्ट या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे धातु परिवर्तन विद्या प्राप्त झालेला माणूस, किमयागार सिद्धपुरुष इत्यादी.या पुस्तकामध्ये या शब्दाचा अर्थ इतर धातू चे रूपांतर सोन्यामध्ये करणारा किमयागार असा अभिप्रेत आहे.
माणसामध्ये असणाऱ्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही मिळू शकतो हा या पुस्तकाचा गाभा आहे.संपूर्ण पुस्तकाची कथा सॅन्तियागो नावाच्या मुलाच्या स्वप्न आणि स्वप्नपूर्ती भोवती फिरते. त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो त्याच्या स्वप्नाचा पाठलाग कसा करतो, त्यात त्याला काय आणि किती अनंत अडचणी येतात, तरी तो त्याची स्वप्नपूर्ती कशाप्रकारे करतो याचे खूपच रोमांचकारी वर्णन या पुस्तकात केलेले आहे
पुस्तक तर सुंदर आहेच पण अनुवादकार नितीन कोत्तापल्ले यांनी लेखकाचा परिचय दिलेला आहे तो पण मला येथे नमूद करावासा वाटतो. पाउलो कोएलो यांचा जन्म 1947 साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्याने लेखक व्हायचा निश्चय केलेला होता. मात्र वडिलांसारखे असल्याने इंजिनियर व्हावे असे त्याच्या आई-वडिलांचे मनसुबे होते. त्याचे वाङ्ग्मया वरील प्रेम त्याच्या आई-वडिलांना अतिरेकी वाटत होते. ते त्याला वेडा ठरवत होते. या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्या मधला बंडखोर जागा झाला व बेताल वागू लागला. त्याकरिता त्याला मनोरुग्णालयातील विजेचे झटके देऊन उपचार करण्यात आले होते. पण त्याने त्याचे साहित्यावरील प्रेम अबाधित ठेवले होते. पुढे 1976 पर्यंत 65 गाणी लिहून ब्राझीलचा रॉक संगीताला त्याने नवीन चेहरा दिला होता. कालांतराने स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यामुळे राजसत्तेने त्याला तुरुंगात डांबून त्रास दिला. सुटकेनंतरही दोन दिवसांनी छळ छावणीमध्ये मरणप्राय वेदनांचा सामना त्यांनी केला. शेवटी मनोरुग्ण असल्याचं नाटक करून त्याने छळ छावणीतून सुटका करून घेतली होती. ही सारी त्यांच्या वयाच्या 26 व्या वर्षाच्या आधीची कहाणी. नंतर कालांतराने त्यांनी 41 व्या वर्षी ही अतिशय वेगळी कादंबरी लिहिली. ती म्हणजे द अल्केमिस्ट. सुरुवातीला फारशी कोणाच्या लक्षात न आलेली ही कादंबरी. पण नंतर जनतेने या कादंबरीला अक्षरशः डोक्यावर घेतले. या कादंबरीचा 55 पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे व कोट्यवधी प्रतींच्या विक्रीचा उच्चांक नोंदवला आहे.
अगदी भारावून जाण्यासारखे कथानक असल्याने वाचताना खंड पडू नये असे सतत वाटत राहते. सुप्रसिद्ध गायिका मॅडोना म्हणते इतरत्र ज्या खजिन्याचा आपण शोध घेतो ते आपल्याच जवळ असतात हे सांगणारी ही परी कथा आहे.
“का उगाच शोधत बसशी ? तुझे असे तुझे तुज पाशी”याचा प्रत्यंतर हे पुस्तक करून देते
ही कथा आहे सँतीयागो नामक एका साधारण कुटुंबात जन्मलेल्या मुलाची. त्याच्या घरच्यांना तो धर्मगुरू व्हावा असं वाटत होतं पण केवळ वेगवेगळे प्रदेश पाहण्यासाठी, प्रवास करण्यासाठी हा मुलगा मेंढपाळ बनतो त्याला एक स्वप्न पडतं की एक लहान मुलगी त्याच्या मेंढ्या बरोबर खेळत आहे. ती चिमुकली त्याचा हात हातात धरून त्याला इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये आणते व सांगते ह्या पिरॅमिडमध्ये तुला खजिना सापडेल. असे स्वप्न त्याला दोनदा पडते. सँतीयागोला मेंढपाळाचे काम करत असताना बरीचशी मोठी मोठी पुस्तके वाचायची आवड होती. अशा या स्वप्न वेड्या सँतीयागोला स्वप्नाचा पाठलाग करत असताना काय काय अडचणी येतात, कोण कोण त्याला मदत करतं याच रोमहर्षक वर्णन अगदी शेवटपर्यंत केलेले आहे. त्याच्या या अद्भूत प्रवासात त्याला खूप जण भेटतात कुणी मदत करणारे, कुणी त्रास देणारे, त्याची सुंदर प्रेयसी आणि खास करून किमयागार. हा किमयागार वारंवार प्रोत्साहन देऊन त्याला स्वप्नपूर्ती कडे कसा नेतो हे वाचणे म्हणजे एक सुखद अनुभव आहे. सर्व अडी अडचणीतून शेवटी त्याला खजिना सापडतोच ते फक्त आणि फक्त तो त्याच्या हृदयाचे ऐकत असतो यामुळेच.
एकंदरीतच आपण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला पाहिजे ते मिळवू शकतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा असा संदेश हे पुस्तक देते. आपल्यामध्ये जर आशावाद असेल तर कोठेही आणि केव्हाही एक किमयागार म्हणजेच आपला आंतरिक आवाज हा आपल्यासाठी हजर असतो. जो आपल्यातील अफाट शक्तीचा वेळोवेळी आपल्याला साक्षात्कार करून देतो. हेच या पुस्तकाचे सार आहे.
या पुस्तकात खूप सुंदर वाक्य वाचनात आली ती अशी
हृदयाचे नेहमी ऐक. हृदयाला सर्व गोष्टी कळतात कारण हृदय हे विश्वातम्याचाच एक भाग असतं. एक दिवस ते तिथेच परत जाणार असतं.
मृत्यूची धमकी नेहमीच माणसाला जीवनाविषयी सजग बनवते.
आपण जेव्हा प्रेम करतो तेव्हा अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो.
तुझ्या हृदयाला सांग प्रत्यक्ष दुःखापेक्षा दुःखाची भीती ही अधिक वाईट असते.
तर असे हे पुस्तक सर्वांनीच वाचावे पण किशोरवयीन युवक युवतींनी आवर्जून वाचावे असे आहे. आपला आंतरिक आवाज ओळखून सकारात्मक विचारसरणीने भारावून जाण्यासाठी नक्कीच वाचा हे खूप सुंदर पुस्तक.
धन्यवाद
© सौ. रेखा दयानंद हिरेमठ
सांगली – मो.नं 9552298887
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈