श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “माझ्या चष्म्यातून”…अर्थात ‘चित्रकाव्य’ – कवी : श्री प्रमोद वर्तक ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक            : “माझ्या चष्म्यातून”…अर्थात ‘चित्रकाव्य’

कवी              : श्री प्रमोद वर्तक

पृष्ठे                : ९५

मूल्य              : रु. १००/_

विनोद  आणि विडंबनात्मक  लेखनातून वाचकांना मोद मिळवून देणा-या श्री. प्रमोद वर्तक यांचे नवे कोरे पुस्तक ‘ माझ्या चष्म्यातून ‘ नुकतेच हाती पडले.हे त्यांचे दुसरे साहित्यिक  अपत्य. (यावेळेला जुनं झालं.त्यातलं एक ).पुस्तकावर शिर्षकामधे ‘अर्थात चित्रकाव्य ‘ असेही लिहीले आहे.म्हणून  उत्सुकतेने उघडून,चाळून पाहिले.त्यानंतर  मला   ‘माझ्या चष्म्यातून ‘ काय काय दिसले ,ते तुम्हालाही दाखवण्याचा हा प्रयत्न !

व्यक्तिचित्रण  हा प्रकार आपल्याला माहित आहे.एखाद्या व्यक्तीचे शब्दांच्या माध्यमातून  हुबेहूब  वर्णन  करणे म्हणजे व्यक्तीचित्र. म्हणजे  रुप, रंग, बोलणे, उठणे बसणे, सवयी, स्वभाव अशा अनेक वैशिष्ट्यांनी बनलेली ती व्यक्ती एखाद्या चित्राप्रमाणे आपल्यासमोर उभी राहते,तेही कुंचला न वापरता केवळ शब्दांच्या माध्यमातून. चित्रकाव्य हा एक वेगळा प्रकार या पुस्तकात पहायला मिळतो. एखादे चित्र किंवा छायाचित्र पाहिल्यावर आपल्या तोंडून सहजपणे वा, मस्तच, बापरे, किती छान असे उद्गार निघतात. पण तेच चित्र पाहून कवीमनाचा माणूस  फक्त  एवढ्यावर थांबत नाही.तर त्याच्या मनात काव्यात्मक  शब्दांतून प्रतिक्रिया उमटतात.चित्राला पाहून उमटलेल्या या प्रतिक्रिया म्हणजेच ‘चित्रकाव्य ‘!

श्री. प्रमोद वर्तक 

श्री. प्रमोद  वर्तक  यांच्या ‘ माझ्या चष्म्यातून  ‘ या पुस्तकात  अशी  चित्रकाव्ये आहेत. म्हणजे चित्रही आहेत आणि काव्यही आहेत. या पुस्तकात  एकंदर ८८ चित्रे किंवा छायाचित्रे आहेत व तितकीच काव्ये आहेत.चित्राला अनुसरून काव्य  असल्यामुळे चित्र कशाचे आहे ते समजून घेणे आवश्यक  आहे.

सुरूवातीला  पाच सहा छायाचित्रे ही देवदेवतांची असून साहजिकच  त्यांचे वर्णन  करणा-या काव्यपंक्ती  वाचायला मिळतात.त्यानंतर मात्र  विषयांची विविधता असणारी चित्रे आहेत  व त्याला अनुसरून  केलेले काव्य आहे.चित्र  व त्याखाली लगेच काव्य  असल्यामुळे वाचक चित्र  व काव्य  या दोन्हीत रमून जातो.यामध्ये आपल्याला निसर्ग, त्यातील प्राणी,पक्षी,गोंडस बालके,सागर यांची चित्रे बघायला मिळतात.त्याबरोबरच  नामवंत  व्यक्ती  कलाकार, सामान्य  माणसाची सुखदुःखे, आनंदाचे क्षण, छायाप्रकाशाचा खेळ, एखादी वृत्तपत्रीय बातमी ,जाहिरात अशी नाविन्यपूर्ण   छायाचित्रे पहायला मिळतात.या सर्वांचे समर्पक  वर्णन  करणारी छोटीशी कविता वाचायला मिळते.काही वेळेला कवी आपल्याच भावना बोलून  दाखवत आहे असे वाटते तर काही वेळेला एकदम  नवीन कल्पना कवी आपल्यासमोर मांडतो. कवीने एका छायाचित्रावर तर दोन वेगवेगळी काव्ये केली आहेत.एकाच चित्राकडे कवी वेगवेगळ्या नजरेने कसे पाहतो, ही कवीच्या चष्म्याची किमया काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला पुस्तक  वाचल्याशिवाय कसे कळणार ?,(पान क्रमांक  ४६ व ४७). एखादा अल्बम बघावा तसे आपण एक एक पान उलटत जातो आणि शेवटच्या पानापर्यंत  कधी येऊन पोचलो समजतही नाही.मऊ मुलायम गुळगुळीत  कागदावरील रंगीबेरंगी चित्रे आणि कवीचे शब्दरंग यामुळे हे पुस्तक  वाचताना मनाला मिळणारा आनंद सुगंधी फुलाच्या गंधाप्रमाणे दीर्घकाळ टिकणारा असा आहे.

फक्त   एक चित्रकाव्य इथे देत आहे.

आधुनिकतेच्या वाटेने जाणा-या  श्री.प्रमोद वर्तक  यांनी एका आधुनिक काव्यसंग्रहाची निर्मिती करुन मराठी साहित्यात वेगळी वाट तयार केली आहे.त्याबद्दल  त्यांचे हार्दिक  अभिनंदन  आणि पुढच्या जुळ्या (साहित्यिक) अपत्यासाठी शुभेच्छा ! 

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments