☆ पुस्तक “मेंदूतला माणूस” – लेखक : डॉ. आनंद जोशी / सुबोध जावडेकर ☆ परिचय – श्री ओंकार कुंभार ☆
लेखक : डॉ. आनंद जोशी / सुबोध जावडेकर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे.
पृष्ठे : 232
किंमत : रु. 300/-
लेखकद्वयांपैकी एक डॉक्टर तर एक आय.आय.टी. इंजिनिअर. दोघांचेही लिखाण पूर्वी विविध माध्यमांतून छापून आलेले आहे.
शिर्षकापासूनच वेगळेपणा असणारे हे पुस्तक कमल शेडगे यांनी केलेल्या मुखपृष्ठ रचनेमुळे नक्कीच मन वेधून घेणारे आहे. एकूण 29 प्रकरणांमधून माणसाच्या मेंदूचा आणि मेंदूतल्या माणसाचा वेध घेण्याचा छान प्रयत्न लेखकद्वयांनी केला आहे.
लेखकद्वयांनी अनेक पुस्तकांतील संदर्भ, उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे त्यांचे वाचन चौफेर असल्याचे आपल्याला पुस्तक वाचत असताना वेळोवेळी लक्षात आल्यावाचून राहत नाही. विषय जरी किचकट असला तरी विविध उदाहरणांच्या माध्यमातून तो सहज आणि सोपा केला आहे. मेंदूची रचना, मेंदूचे कार्य, मेंदूची उत्क्रांती, मेंदूत स्रवणारी रसायने, त्यांचा वर्तनाशी असणारा संबंध, पिढीजात आपल्यासोबत आलेल्या जीन्सचा परिणाम, यांविषयी विविध प्रकारच्या जगभरात झालेल्या प्रयोगांविषयी, अभ्यासाविषयी खूप छान इंटरेस्टिंग माहिती या पुस्तकात आपणाला वाचायला मिळते. पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर एक सुंदर अर्थपूर्ण पुस्तक वाचल्याचे समाधान नक्कीच मिळते.
हे पुस्तक वाचल्यानंतर लेखकद्वयांनी पुस्तकात म्हंटल्याप्रमाणे मेंदूच्या अभ्यासातून आपल्याला एक अंतर्दृष्टी मिळेल….. दुसऱ्यातला माणूस पहायची दृष्टी. -आणि आपल्यातला माणूसही !
धन्यवाद!
परिचय – श्री ओंकार कुंभार
श्रीशैल्य पार्क, हरिपूर सांगली.
मो.नं. 9921108879
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈