श्री सुनील शिरवाडकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “भगतसिंगचा खटला” – मूळ लेखक : ए. जी. नुराणी – मराठी अनुवाद : सुश्री रेखा ढोले / डॉ. सदानंद बोरसे ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

पुस्तक : भगतसिंगचा खटला

“The trial of Bhagatsingh“ — ‘न्यायाच्या हत्येचे कारस्थान’

मूळ लेखक : ए. जी. नुराणी.

मराठी अनुवाद : रेखा ढोले / डॉ. सदानंद बोरसे 

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे.

१७ डिसेंबर १९२८ ला भगतसिंगने सॉंडर्सची हत्या केली. खरे तर त्याला पोलीस अधिक्षक स्कॉटला मारायचे होते. पण चुकीच्या संदेशामुळे मारला गेला तो सॉंडर्स.

या घटनेनंतर थोड्याच दिवसांनी ८ एप्रिल१९२९ ला दिल्लीत विधीमंडळात भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉंब टाकले.

एकापाठोपाठ घडलेल्या घटनांनी इंग्रज सरकार पेटून उठले यात नवल नाही. त्यांनी धरपकड सुरू केली. काही जण पकडले गेले.. पोलीसी छळाला कंटाळून त्यातील काही जण माफिचे साक्षीदार झाले आणि थोड्या दिवसातच भगतसिंग आणि त्याचे साथीदार यांना अटक झाली.

पुस्तकात हा सर्व घटनाक्रम तपशीलवार आला आहे. त्यानंतरच्या घटना… तुरुंगात घडत असलेल्या आणि बाहेर.. म्हणजे देशभर.. वाचताना एक नवीनच इतिहास माहीत होत जातो.

देशभरात भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल सहानभूती होतीच.. पण त्यातही विसंगती होती विधीमंडळात केलेली बॉम्बस्फोटाची कृती अनेकांना पसंत नव्हती. म. गांधी, जवाहरलाल नेहरू आणि एकूणच काँग्रेसची भूमिका काय होती? भगतसिंग आणि त्याचे सहकारी तुरुंगात गांधींचा मार्ग अनुसरतात. तुरुंगात त्यांना मिळणारी वागणूक.. दिला जाणारे अन्न.. पाणी याच्या निषेधार्थ ते अन्न सत्याग्रह सुरु करतात.

एकामागून एक घडणार्या घटनांमुळे देशभर आगडोंब ऊसळतो. आणि मग खटला उभा राहतो.

पुस्तकाचा हा मुख्य विषय. लाहोरच्या केंद्रिय तुरुंगात १० जुलै पासून खटल्याचे कामकाज सुरू झाले. भगतसिंग यांनी आपले कायदेशीर सल्लागार म्हणून लाला दुनीचंद यांची निवड केली. ते आणि इतर सात आठ जण या खटल्यात आरोपींचा बचाव करण्यासाठी उभे राहिले. खटल्याचे कामकाज सर्वसामान्य जनतेसाठी खुले नव्हते.

इथून पुढे जे घडत गेले त्यावर प्रकाश टाकणे हा या पुस्तकाचा मुळ उद्देश. या खटल्याची कठोर चिकित्सा कधीच झाली नाही आणि लाहोर कटाचा तपशीलवार अभ्यासही झाला नाही. या खटल्यातील काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. हा खटला म्हणजे एक फार्सच होता. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इंग्रज सरकारने या खटल्याचा पुरेपूर वापर केला. खटल्याच्या काळातच इंग्रज सरकारने एक वटहुकूम काढला. त्या अन्वये एका खास न्यायाधिकरणाची स्थापना केली. त्याचा हेतू काय होता? तर या खटल्यातील आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीच मिळू नये. त्यामुळे त्यांची फाशीची शिक्षा कायम राहील.

शालेय इतिहासात भगतसिंगबद्दल वाचले होते. त्यानंतर कधीच या विषयावर काहीच वाचनात आले नाही. मराठीत यावर काही पुस्तके असतीलही.. पण कधी वाचनात आली नाही. हे पुस्तक हातात घेतले आणि सगळा इतिहास नव्याने समजत गेला. भगतसिंगाचा पूर्व इतिहास काय होता.. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती यावर देखील एक प्रकरण पुस्तकात आहे. तसं पाहिलं तर हा विषय क्लिष्ट. पण तो कुठेही कंटाळवाणा होत नाही. ए. जी. नुराणी यांच्या ‘ The trial of Bhagatsing ‘ या इंग्रजी पुस्तकाचा सुबोध अनुवाद रेखा ढोले आणि डॉ. सदानंद बोरसे यांनी केला आहे. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी तर हे पुस्तक मोलाचे आहेच, पण सामान्य वाचकांनी देखील नेमका इतिहास समजून घेण्यासाठी एकदा तरी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

परिचय : श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments