श्री सुहास रघुनाथ पंडित
पुस्तकावर बोलू काही
☆ “शूरा मी वंदिले” – संकल्पना : सौ. माधवी नाटेकर – लेखक : सतीश अंभईकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : शूरा मी वंदिले
संकल्पना : सौ.माधवी नाटेकर, 9403227288
लेखक : सतीश अंभईकर
प्रकाशक : चतुरंग प्रकाशन, सांगली
मूल्य : रु.२००/-
सौ.माधवी नाटेकर यांच्या संकल्पनेतून उतरलेले व श्री.सतीश अंभईकर लिखित ‘ शूरा मी वंदिले ‘ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले.१९६२ मध्ये झालेल्या भारत चीन युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवून धारातीर्थी पडलेल्या एका मराठी मावळ्याची ही शौर्यगाथा आहे.
या शौर्यगाथेची सर्वांनाच उत्सुकता असेल.पण सुमारे बासष्ट वर्षांपूर्वी घडलेल्या युद्धाची कथा आत्ता कशी काय प्रकाशात आली असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.त्यामुळे या पुस्तकाच्या जन्माची कथा समजून घेणे आवश्यक आहे.
सेकंड लेफ्टनंट शहीद विष्णू आठल्ये हे अकोल्याचे रहिवासी.याच अकोल्यात काही वर्षे श्री.सतीश अंभईकर हे रहात होते.अकोल्यातील जठारपेठ या भागात श्री.अंभईकर यांना एका रस्त्याच्या सुरुवातीला काळ्या फरशीचा छोट्याश्या शिलालेखासारखा एक फलक दिसला.तो अत्यंत अस्वच्छ व उपेक्षित अवस्थेत होता.परंतू श्री.अंभईकर यांना चैन पडत नव्हते.अनेक प्रयत्नांनंतर एक दिवशी त्या फरशीवरील कोरलेली अक्षरे त्यांना वाचता आली. त्यावर लिहीले होते–
“शहीद लेफ्टनंट कर्नल विष्णू आठल्ये मार्ग..जन्म ४मार्च १९४१.मृत्यू १९६२.सेकंड लेफ्टनंट विष्णू आठल्ये. “
या अक्षरांनी श्री.अंभईकर यांच्या मनात वादळ निर्माण केले.अवघ्या एकवीस वर्षांचा वीर जवान शहीद कसा झाला हा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देईना.आपण याचा शोध घ्यायचाच असे त्यांनी ठरवले.पण कसा ? हा प्रश्न सर्वात मोठा होता.६२ वर्षांपूर्वीची घटना.कोणताही संदर्भ नाही. काहीही माहिती नाही.कधी लेखन केलेले नाही.परंतू युद्ध, युद्धशास्त्र, संरक्षण विषयी लेखन करणारे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी त्यांनी संपर्क साधला.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली येथील सौ.माधवी श्रीनिवास नाटेकर या विष्णू आठल्ये यांच्या भगिनी. श्री.अंभईकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला व विष्णू आठल्ये यांच्याविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.त्यानंतर अनेक निवृत्त लष्करी अधिका-यांनी
सुद्धा माहिती पुरवली.या सर्वांनी दिलेल्या माहिती व पुराव्यांच्या आधारे या पुस्तकाची निर्मिती झाली.मुळात केवळ उत्सुकतेपोटी घेतलेला शोध आणि त्याचा अथक पाठपुरावा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती हेच या पुस्तक निर्मितीचे रहस्य आहे.त्यामुळे पुस्तक वाचताना सौ. नाटेकर यांचे मनोगत व श्री.अंभईकर यांचे ‘आभार ऋणानुबंधाचे ‘ हे लेख जरुर वाचावेत.
सुरूवातीलाच ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा १९६२ च्या चिनी आक्रमणासंबंधी एक लेख आहे.यामध्ये त्यांनी युद्धाची पार्श्वभूमी, भारत चीन सीमावादाची कारणे व मुख्यतः चीन युद्धातील भारताकडून झालेल्या घोडचुका यांचा आढावा घेतला आहे.युद्धाचा हा विषय समजून घेण्यासाठी सामान्य वाचकाला यातून खूप चांगली माहिती मिळाली आहे.आपली कितपत तयारी होती व धोरणे कशी चुकली हे यातून समजून येते.
यापुढील प्रकरण आहे ‘ वलाॅन्गची लढाई आणि विष्णू आठल्ये यांचे युद्धातील शौर्य ‘ .विष्णू आठल्ये यांना आणि त्यांच्या तुकडीला कोणत्या परिस्थितीत लढावे लागले व त्यांनी या प्रसंगाला कसे तोंड दिले यांची सविस्तर माहिती या प्रकरणात दिली आहे.सुरुवातीला लेखकाने या रणभूमीची भौगोलिक स्थिती आपल्या समोर ठेवली आहे. ती वाचून आपल्याला प्रतिकुलतेची आणि सैन्यावर असलेल्या जबाबदारीची कल्पना येऊ शकते.सुमारे ९२७ चौ.मैल एवढ्या विस्तृत क्षेत्राचे रक्षण करण्याची जबाबदारी या तुकडीवर होती.प्रतिकूल नैसर्गिक वातावरण, अपुरी साधन सामुग्री आणि राजनैतिक पाठिंब्याचा पूर्ण अभाव अशा पेचामध्ये सापडूनही आपल्या सेनेने पराक्रमाची शर्थ केली.अत्यंत शिस्तबद्ध व संयमाने लढा देऊन या सेनेने आपल्या भूभागाचे रक्षण केले.त्संगधर या क्षेत्रातील लढाई आपल्या युद्धाच्या इतिहासातील सर्वात दुःखदायक लढायांमध्ये असली तरी भारतीय सैनिकांच्या अभूतपूर्व धैर्याची गाथा गणला गेली आहे असे लेखकाने म्हटले आहे.हे वाचताना पानिपतच्या युद्धाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.प्रत्यक्ष चढाईची इत्थंभूत माहिती वाचताना एकीकडे अंगावर काटा येतो, ऊर अभिमानाने भरुन येतो तर दुसरीकडे राजकीय नेतृत्वाची नादानी पाहून मन अस्वस्थ होते .असीम पराक्रम गाजवूनही सेनादलाकडून विष्णू आठल्ये यांना कोणताही शौर्य पुरस्कार मिळाला नाही याची खंत लेखकाने व्यक्त केली आहे.
वास्तविकता या प्रकरणानंतर, शौर्यगाथा सांगून झाली आहे म्हणून हे लेखन थांबवता आले असते.पण लेखकाने तसे केलेले नाही.यापुढील प्रकरणे ही विष्णू आठल्ये यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतात.अनेक नकाशे, फोटो, यांचा समावेश केल्यामुळे पुस्तक म्हणजे महत्वाचा दस्तावेज झाले आहे.
पुस्तकाच्या पुढील भागामध्ये विष्णू आठल्ये बेपत्ता व नंतर मृत घोषित केल्याची जी अधिकृत पत्रे आहेत त्यांचा मजकूर देऊन मूळ पत्रांची फोटोप्रतही दिली आहे.आठल्ये यांच्या व्यक्तीगत वस्तूंची सूची, त्यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून लढलेल्या अमर अशा अकरा जवानांची छायाचित्रे, एन.डी.ए.मधील छायाचित्रे, युद्धात वापरलेल्या तोफा, विमाने यांची छायाचित्रे देण्यात आली आहेत.वलाॅन्ग वॉर मेमोरियल, राष्ट्रीय समर स्मारक, तेथील छायाचित्रे दिल्यामुळे युद्धप्रसंगाचे उचित स्मरण होते.पुढील काही प्रकरणांमध्ये आठल्ये यांच्या रेजिमेंटचा परिचय, विविध पुरस्कारांची माहिती देण्यात आली आहे.आठल्ये घराण्याशी संबंधित सेनादलातील व्यक्तींचा परिचय व कर्तृत्व सविस्तरपणे कथन करण्यात आले आहे.
आठल्ये यांच्या भगिनी सौ.माधवी नाटेकर यांनी १७ पॅरा फिल्ड रेजिमेंटला भेट दिल्यानंतर त्याविषयीचा लेखही छायाचित्रांसह समाविष्ट करण्यात आला आहे.विष्णू आठल्ये यांचा जीवनप्रवास व पत्रे यांचे एक स्वतंत्र प्रकरण आहे.या युद्धाव्यतिरिक्त त्यांनी गोवामुक्ती संग्रामात घेतलेला सहभाग व कामगिरी यांची माहितीही आपल्याला वाचायला मिळते.
पुस्तकाच्या दुस-या भागामध्ये विष्णू आठल्ये यांच्या निकटवर्तीयांनी लिहीलेल्या आठवणी देण्यात आल्या आहेत.त्यातून कौटुंबिक आठवणी, छायाचित्रे यांचे दर्शन होते. गीतेत सांगितलेला कर्मयोग व विष्णू आठल्ये यांचे कर्तृत्व यातील साम्य् दाखवणारा सौ.माधवी नाटेकर यांचा लेखही आपणास वाचायला मिळतो.या सर्व एकत्रित तपशिलामुळे वाचकाला सर्व इतिहास समजून घेणे सहज शक्य झाले आहे.शूर वीरांच्या बलिदानाचे महत्व लक्षात येते.
नकळतच हात जोडले जातात आणि शब्द उच्चारले जातात
” युद्धभूमी हिच ज्यांची तपोभूमी, अशा शूरा मी वंदिले.”
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈